विराट कोहली टी-20चं कर्णधारपद सोडणार

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आगामी टी-20 वर्ल्ड कपनंतर टी-20 सामन्यांमध्ये यापुढे भारताचं नेतृत्व करणार नाहीये.

विराट कोहलीनं स्वतः ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

विराट कोहलीनं आपल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे, "हा निर्णय घेणं कठीण होतं. रवी भाई आणि रोहितसोबत चर्चा केल्यानंतर मी हा निर्णय घेतला आहे की, टी20 वर्ल्ड कपनंतर मी कर्णधारपद सोडेन."

विराटनं आपल्या पत्रात काय म्हटलं आहे?

'मला केवळ भारताचं प्रतिनिधीत्व करण्याची संधीच मिळाली नाही तर संघाचं नेतृत्वही करता आलं. त्यासाठी मी स्वतःला नशीबवान समजतो. भारतीय संघाचा कर्णधार म्हणून मला पाठिंबा देणाऱ्या सर्वांचे मी आभार मानतो. माझे सहकारी, सपोर्ट स्टाफ, प्रशिक्षक, निवड समिती आणि आमच्या विजयाची प्रार्थना करणाऱ्या प्रत्येक भारतीयाशिवाय हा प्रवास शक्य नव्हता.

गेल्या 8-9 वर्षांत क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांमध्ये खेळताना आणि सलग 5-6 वर्षं नेतृत्व करताना येणारा ताण समजून घेणं गरजेचं होतं. त्यामुळे मला वाटलं की, आता भारतीय कसोटी संघ तसंच एकदिवसीय संघाचं नेतृत्व करण्यासाठी मी पूर्णपणे तयार असणं गरजेचं आहे. टी 20 संघाचा कर्णधार म्हणून मी संघासाठी पूर्ण क्षमतेनं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि यापुढेही फलंदाज म्हणून देत राहीन.'

गेले काही दिवस विराट कोहलीच्या फॉर्मची चर्चा सुरू झाली होती. कर्णधार आणि फलंदाज म्हणूनही विराट कोहलीचा फॉर्म गेले काही दिवस चांगला नाही, ऐन मोक्याच्या क्षणी विराट कोहली आपल्या नावाला साजेशी कामगिरी करू न शकल्याने संघ अडचणीत आल्याने त्यावरून चर्चांना सुरुवात झाली होती.

कधीकाळी खोऱ्याने धावा ओढणाऱ्या विराट कोहलीच्या गेल्या काही दिवसांतील आकडेवारीवर नजर मारल्यास हा फरक लक्षात येऊ शकतो.

विराट कोहलीच्या बॅटमधून शेवटचं शतक नोव्हेंबर 2019 मध्ये नोंदवलं गेलं. त्यानंतर क्रिकेटच्या कोणत्याही फॉरमॅटमध्ये 51 डावांत विराट एकही शतक झळकावू शकला नाही.इंग्लंडविरुद्ध कसोटी क्रिकेट मालिकेतील दुसऱ्या सामन्यात लॉर्ड्स मैदानावर ऐतिहासिक विजय संपादित केल्यानंतर पुढच्याच सामन्यात हेडिंग्ले मैदानावर भारताला दारूण पराभव स्वीकारावा लागला होता.

बीबीसी प्रतिनिधी पराग फाटक यांचं विश्लेषण

2019 पासून कोहलीचा बॅट्समन म्हणून फॉर्म घसरणीला लागला आहे. बॅटिंगवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कोहली वनडे आणि ट्वेन्टी-20 कॅप्टन्सी सोडू शकतो, असा अंदाज क्रिकेट वर्तुळात वर्तवला जात होता. त्यानंतर विराटनं आता स्वतःवरचा भार हलका करण्याचा निर्णय घेतला आहे. विराट कोहलीचा प्युअर बॅट्समन म्हणून रेकॉर्ड अफलातून आहे, पण कॅप्टन म्हणून त्याला लौकिकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही.

कोहलीच्या नेतृत्वात टीम इंडियाला आयसीसी ट्रॉफीही जिंकता आली नाही. कोहली आयपीएल स्पर्धेत बेंगळुरूचा गेली 8-9 वर्ष कॅप्टन आहे. पण तिथेही त्याच्या नेतृत्वात आरसीबीला जेतेपद पटकावता आलेलं नाही. दुसरीकडे 2019 वर्ल्डकपनंतर वनडे आणि ट्वोनन्टी-20 कॅप्टन्सी रोहितला द्यावी असा विचार पुढे आला. रोहितचा आयपीएलमध्ये कॅप्टन म्हणून रेकॉर्ड जबरदस्त आहे. रोहितच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्सने आयपीएलची 5 जेतेपदं पटकावली आहेत.रोहित चांगला मॅन मॅनेजर आहे, शांत आहे. अनेक खेळाडूंचा तो मित्र आहे, त्यांचं करिअर घडण्यात रोहितचा मोलाचा वाटा आहे. रोहितचा वनडे आणि ट्वेन्टी-20 मध्ये बॅट्समन म्हणून रकॉर्ड जबरी आहे. इंग्लंड दौऱ्यातली पाचवी टेस्ट कॅन्सल करण्यात रोहितची मेजर भूमिका होती. प्रत्यक्षात टेस्टमध्ये रहाणे व्हाईस कॅप्टन आहे, पण कोहलीच्या बरोबरीने रोहितने बीसीसीआयला टेस्ट कॅन्सल करायला लावली.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)