विराट कोहली : 'प्रिय विराट, तू फक्त खेळावर लक्ष केंद्रित कर' - सोशल

'परदेशी बॅट्समन आवडत असतील तर भारतात राहू नका,' या विराट कोहलीच्या वक्तव्याचा क्रिकेटप्रेमींनी समाचार घेतला आहे. 'कोणाला कोणता खेळाडू आवडतो हे विराटने ठरवू नये, त्याने फक्त खेळावर लक्ष द्यावं,' अशा प्रतिक्रिया 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांनी व्यक्त केल्या. विराटला अनेकांनी 'सचिन तेंडुलकर आणि महेंद्र धोनीकडून धडे घ्यावेत,' असा सल्ला दिला आहे.

वाढदिवसाच्या निमित्ताने विराट कोहलीनं अॅप लाँच केलं आहे. या अॅपच्या प्रमोशनसाठी रेकॉर्ड केलेल्या व्हीडिओत केलल्या या वक्तव्यावरून सोशल मीडियावर कोहलीला ट्रोल केलं जात आहे. यावर बीबीसी मराठीने 'होऊ द्या चर्चा'मध्ये वाचकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या.

त्यातील काही निवडक आणि संपादित प्रतिक्रिया इथं देत आहोत.

अनिकेत देशमुख म्हणतात, "भारतात कमावलेला पैसा इटलीत जाऊन उधळणाऱ्यांनी देशभक्ती शिकवू नये. भारतात फॅसिस्टवादाने उच्चांक गाठला आहे. राजकारण्यांनंतर खेळाडूसुद्धा त्यांच्या फायद्यासाठी लोकांच्या देशप्रेमाचा गैरफायदा घेत आहेत."

सुहास बच्छाव म्हणतात, "लग्न इटलीला केलं. आवडता खेळाडू दक्षिण आफ्रिकेचा हर्षल गिब्ज. एवढंच देशप्रेम आहे तर विजय माल्याच्या टीमकडून का खेळतो? 200 शतकं जरी केली तरी तुझं देशप्रेम सचिनपेक्षा जास्त नसणार."

दया पवार म्हणतात, "खेळाडू म्हणून या गोष्टींकडे दुर्लक्ष केलं पाहिजे. कोणाला कुठले खेळाडू आवडायला हवेत हे तू कसं सांगू शकतोस? तिथं पाकिस्तानात तू स्वत: प्रसिद्ध आहेस हे विसरलास का? दुसरी गोष्ट परवेझ मुशर्रफ यांना सचिन तेंडुलकर आवडतो, त्याचं काय?"

गजानन शिंदे यांच्या मते, "फक्त आपल्या देशातील व्यक्ती, कलाकार, क्रिकेटर, लेखक यांचे फॅन असावं हे चुकीचे आहे. कारण कोणाचे फॅन असणं हे विनाकारण नसतं. त्यांच्यातील एखादा गुण आवडतो, योग्य वाटतो मग संबंधित व्यक्ती आवडायला लागते. त्यामुळे विराट कोहलीचं हे वक्तव्य चुकीचे वाटतं. आवड देश बघून नसते."

श्याम ठाणेदार म्हणतात, "विराटचे हे वक्तव्य अखिलाडू आहे. विराटने आपलं लक्ष फक्त क्रिकेटवर केंद्रित करावं. विनाकारण वादग्रस्त वक्तव्य करू नयेत. देशभक्तीचे प्रमाणपत्र वाटण्याचे काम राजकारणी करतात तेच खूप झालं. अशा वक्तव्यांनी विराट विषयी आदर कमी होईल."

विकास इंगळे महाजन यांना विराटचं बरोबर आहे, असं वाटतं. ते म्हणतात, "आपल्या देशात प्रगती करणाऱ्यांवर जळणारे खूप आहेत. जे विराटच्या विरोधात लिहीत आहेत ते सगळे त्याची प्रसिद्धी, पैसा, कला याचा मत्सर करणारे आहेत. तो असं का बोलला? त्याला काय प्रश्न विचारला गेला होता? याची माहिती करून घ्या आणि मगच त्याच्या विरोधात बोला."

आदित्य कदम म्हणतात, "विराटने या प्रश्नाचं उत्तर द्यायला नको होतं. जो विराटला 'ओव्हररेटेड' म्हणाला त्याची कमाल वाटते. विराटने सगळ्या फॉर्मॅटमध्ये धावा केल्या आहेत. इंग्लंड किंवा ऑस्ट्रेलियामध्ये सध्या त्याच्यासारखा कोणीही नाही."

कल्याणकर म्हणतात, "आम्हाला क्रिकेट आवडत नाही. ह्याचा अर्थ असा नाही की आम्ही भारतात राहू नये."

"विराट कोहलीचा आवडता खेळाडू हर्षल गिब्ज आहे," असं गौतम म्हणतात.

बाळासाहेब मुरकुटे म्हणतात, "एवढंच देशप्रेम तर तो विजय माल्याच्या टीमकडून का खेळतो?"

संजय वावळे म्हणतात, "परदेशातील अनेकांना विराट आवडतो. मग त्यांना भारतात राहायला घेणार का? विराट कोहलीची ही कमेंट अगदी अखिलाडू आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)