You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
विराट कोहली आता 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' - ICCने केली घोषणा
- Author, पराग फाटक
- Role, बीबीसी प्रतिनिधी
विराट कोहलीला ICC या क्रिकेटच्या सर्वोच्च संस्थेने 'टेस्ट क्रिकेटर ऑफ द इयर' हा मानाचा खिताब जाहीर केला आहे. ही घोषणा ट्विटरवरून करताना ICCने लिहिलं आहे - 'टेस्ट मॅचेसमध्ये 1322 रन काढून आणि 55.08च्या सरासरीने तो टेस्टमधला सर्वात जास्त रन काढणारा खेळाडू झाला आहे. त्याने द. अफ्रिका, इंग्लंड, भारत आणि ऑस्ट्रेलियातही शतकं गाठली आहेत.'
ही बातमी जाहीर होताच त्याच्या फॅन्सनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला.
क्रिकेटच्या मैदानावर दररोज नवा विक्रम रचणारा विराट कोहली माणूस म्हणून आहे तरी कसा? रोबोटिक सातत्यासह खेळणाऱ्या आणि भारताला जिंकून देणाऱ्या कोहलीचं आतापर्यंतचं आयुष्य कसं होतं? पाहूयात त्याच्याबद्दलच्या 27 गमतीशीर गोष्टी:
1. टॅटू प्रेम
विराट टॅटूप्रेमी असून, त्याच्या अंगावर साधारण 8 टॅटू आहेत. आई (सरोज) आणि वडील (प्रेम) या कारकीर्दीतील आधारस्तंभ व्यक्तिमत्वांची नावं विराटने गोंदवून घेतली आहेत.
विराट भगवान शंकराचा पाईक आहे. ध्यानधारणा करणाऱ्या शंकराचे चित्र विराटने काढून घेतले आहे. त्याच्या बाजूलाच शांततेचं प्रतीक असणाऱ्या मॉनेस्ट्री या वास्तूचा टॅटू आहे.
विराटच्या अंगावर 175 आणि 269 हे आकडेही आहेत. भारतासाठी वनडे खेळणारा विराट 175वा खेळाडू होता तर टेस्ट खेळणारा 269वा खेळाडू आहे. या आठवणीसाठी हे आकडे आहेत.
आक्रमक पवित्र्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या विराटने आदिवासी शैलीचं आरेखन गोंदवून घेतलं आहे. याच्या जोडीला स्कॉर्पिओ म्हणजेच वृश्चिक राशीचं चिन्ह असणारा विंचूही गोंदवून घेतला आहे.
विराटच्या डाव्या हातावर जपानी सॅमुराईचा मोठा टॅटू आहे. त्याच्या उजव्या खांद्यावर तिसऱ्या डोळ्यासारखी प्रतिमा रेखाटण्यात आली आहे. याच्या सभोवताली ओम शब्द टॅटू करण्यात आला आहे.
2. वंचितांसाठी काम
विराटने 2013 मध्ये 'विराट कोहली फाऊंडेशन'ची स्थापना केली. वंचित समाजातील मुलांसाठी हे फाऊंडेशन काम करतं.
3. सुदृढ बालक ते फिट खेळाडू
लहानपणी गोंडस सुदृढ बालक असणाऱ्या विराटने स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पाय रोवल्यानंतर तो फिटनेसप्रती प्रचंड जागरुक झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला मोस्ट फिट खेळाडूंमध्ये गणना होणारा विराट दररोज चार तास जिममध्ये व्यतीत करतो.
4. शाकाहारी
वजन वाढू नये यासाठी अतीव काळजी घेणाऱ्या कोहलीचं डाएट आत्तापर्यंत साधारण असं होतं. नाश्त्याला ऑम्लेट, तीन अंडी, स्पिनॅच ब्लॅक पेपर चीज, ग्रिल्ड बेकन, स्मोक सलाड, पपई, कलिंगड, चीज, नटबटर, ग्लुटेन फ्री ब्रेड असा तगडा आहार असतो. याच्या जोडीला ग्रीन टी असतो.
जेवणात ग्रिल्ड चिकन, मॅश पोटॅटो, पालक. रात्रीच्या जेवणात सीफूडचा समावेश होता. मात्र काही दिवसांपूर्वीच कोहलीने नॉन व्हेज सोडण्याचा निर्णय घेतला.
5. छोले-भटूरे
पक्का दिल्लीकर असलेल्या विराटला राजौरी गार्डनमधल्या रामकडचे छोले भटोरे प्रचंड आवडतात. टम्म फुगलेला भटूरा, जोडीला कांदा, हिरवी चटणी, गाजर आणि मिरचीचं लोणचं हा विराटचा वीक पॉइंट आहे. मात्र कठोर डाएटमुळे त्याला आता हे खाणं शक्य होत नाही.
6. गोल्डन रिट्रीव्हर
विराटला पाळीव प्राण्यांची आवड असून, त्याच्याकडे व्हाइट पॉमेरिअन कुत्रा होता आणि त्यानंतर रिको नावाचा गोल्डन रिट्रीव्हर कुत्रा होता. सध्या त्याच्याकडे ब्रुनो कुत्रा आहे. बेंगळुरूस्थित चार्लीज अनिमल रेस्क्यू सेंटरशी विराट संलग्न असून, या केंद्रातल्या 15 कुत्र्यांना विराटने दत्तक घेतलं आहे.
7. गाड्यांची आवड
विराटला लक्झरी गाड्यांची प्रचंड आवड असून, त्याच्या ताफ्यात असंख्य महागड्या गाड्या आहेत. U19 वर्ल्डकप जिंकल्यानंतर विराटने पहिली गाडी खरेदी केली होती. त्याची पहिली गाडी टाटा सफारी गाडी होती.
8. चिकू
विराटचं निक नेम अर्थात टोपण नाव 'चिकू' आहे. दिल्ली संघाचे सहाय्यक प्रशिक्षक अजित चौधरी यांनी त्याला हे नाव दिलं.
9. शो मस्ट गो ऑन
2016 मध्ये 18 वर्षीय विराट रणजी करंडक स्पर्धेत दिल्ली संघातर्फे कर्नाटकविरुद्धची मॅच खेळत होता. या मॅचदरम्यान कोहलीच्या वडिलांचं निधन झालं. कोहली मॅच सोडून जाणं साहजिक होतं. मात्र तू खेळून मोठं व्हावंस हे तुझ्या वडिलांचं स्वप्न होतं. त्यामुळे तू खेळणं अर्धवट सोडू नकोस असं त्याच्या प्रशिक्षकांनी समजावलं.
अंत्यसंस्कार विधी केल्यानंतर दुसऱ्याच दिवशी विराट मॅच खेळण्यासाठी परतला आणि त्याने 90 धावांची खेळी साकारली. अशा कठीण प्रसंगीही कर्तव्याला प्रमाण मानल्याबद्दल त्यावेळी प्रतिस्पर्धी कर्णधारानं त्याला आलिंगन दिल्याचा फोटो त्यावेळी प्रसिद्ध झाला होता.
10. जगातल्या बेस्ट ड्रेस्ड अर्थात उत्तम पोशाख परिधान करणाऱ्या व्यक्तींच्या यादीत कोहलीचा समावेश होतो.
11. तुझा आवडता क्रिकेटपटू कोण असा प्रश्न कोहलीला U19 संघाचा कर्णधार असतानाच्या काळात विचारण्यात आला होता. भारतीय महान खेळाडूचं तो नाव घेईल अशी अपेक्षा होती. मात्र कोहलीने दक्षिण आफ्रिकेच्या हर्षल गिब्सचं नाव घेत सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
12. राजधानी दिल्लीतल्या पश्चिम विहारचा रहिवासी असलेला विराट सेव्हिअर कॉन्व्हेंट शाळेचा विद्यार्थी. दिल्लीतल्या उत्तम अशा शालेय क्रिकेटमधून विराटची जडणघडण झाली.
13. शोएब अख्तर आणि मोहम्मद इरफान या दोन बॉलर्सचा सामना करणं अवघड असतं असं विराटचं म्हणणं आहे.
14. खेळाप्रती एकाग्र राहण्यासाठी सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर राहतो. मात्र तरीही त्याचे ट्वीटरवर 27.1 मिलिअन तर इन्स्टाग्रामवर 25.1 मिलिअन इतके फॉलोअर्स आहेत.
15. शरीराला अपायकारक ठरू शकतील अशा वस्तू प्रमोट करणार नाही असं विराटने गेल्यावर्षी ठरवलं आणि म्हणूनच काही प्रॉड्कट्सच्या जाहिरातींना त्याने रामराम केला.
16. स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे एखाद्या प्रॉडक्टची जाहिरात करण्यासाठी विराटला एका पोस्टसाठी साधारण 81 लाख रुपये एवढं मानधन मिळतं.
17. ईएसपीएनतर्फे ग्लोबल स्पोर्ट्स फेम लिस्ट तयार करण्यात येते. खेळाडूचं मानधन, जाहिराती यांच्याबरोबरीने सोशल मीडियावरील फॉलोअर्सची संख्या तसंच गुगल सर्च लोकप्रियता या सगळ्या मुद्यांचा विचार करून ही यादी तयार करण्यात येते. विराट या लिस्टमध्ये आठव्या क्रमांकावर आहे.
18. मूळचा दिल्लीकर असणारा विराट आता मुंबईत राहतो. समुद्राचा व्ह्यू असणारं वरळीतलं आलिशान घर विराटने तब्बल 34 कोटी रुपये खर्च करून घेतल्याची चर्चा होती. मात्र विराटने हे घर घेतलं नाही. विराटला मुंबईत पेंटहाऊस घ्यायचं आहे. तूर्तास तो वरळीतच 40व्या मजल्यावर असलेल्या आणि समुद्राचा व्ह्यू दिसणाऱ्या घरात राहतो. या घराकरता विराट दर महिना 15 लाख रुपये भाडं देत असल्याची चर्चा आहे.
19. विराट आणि अनुष्का या सेलिब्रेटी जोडीचं लग्न इटलीतल्या तुस्कान या नयनरम्य ठिकाणी झालं.
20. हनिमूनसाठी या सेलिब्रेटी जोडीनं फिनलँडची निवड केली. लॅपलँडमधल्या आर्क्टिक सर्कल या विहंगम ठिकाणी हे दोघं गेले होते.
21. आई, भाऊ, बहीण, तिचा नवरा आणि त्यांचा मुलगा असं विराटचं कुटुंब आहे. भाचा आरव विराटच्या आयपीएल मॅचेसच्या वेळी हजर असतो.
22. वेस्ट दिल्ली क्रिकेट अकादमी याठिकाणी विराटने प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली क्रिकेटची पहिले धडे गिरवले.
23. काही महिन्यांपूर्वीच विराटने ट्वीटर हँडलवर 'ट्रेलर' या चित्रपटाचं पोस्टर शेअर केलं. पोस्टरवर स्वत: विराटच आहे. हा पूर्ण लांबीचा मोठा चित्रपट आहे का डॉक्युमेंटरी आहे हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
24. तिशीत पदार्पण करणाऱ्या विराटच्या कारकीर्दीचा आढावा घेणारी अनेक पुस्तकं उपलब्ध आहेत. मात्र विराटने स्वत: अद्याप चरित्र किंवा आत्मचरित्र लिहिण्याची घोषणा केलेली नाही.
25.विराटला पंजाबी गाणी मनापासून आवडतात.
26. ड्रेसिंग सेन्सच्या बाबतीत विराटला अमेरिकेचा गायक, अभिनेता, नृत्यकार जस्टिन टिंबरलेक आवडतो. टीव्ही शोच्या बाबतीत विराट होमलँड सीरिज फॉलो करतो. याव्यतिरिक्त विराट नेटफ्लिक्सवरची नार्कोस ही सीरिज पाहतो.
27. टीनएज म्युटँट निंजा टर्टल्समधलं मिचलँग्लो हे पात्र विराटला आजही आवडतं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)