You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
जेजुरी ते उल्हासनगर : विरुष्काने कुटं कुटं जायाचं हनिमूनला?
विराट आणि अनुष्का लग्न झाल्यानंतर आज दिल्लीत रिसेप्शन देत आहेत. पण त्यांनी लग्नानंतर दिल्लीत न येता महाराष्ट्रात यावं, अशी गावोगावच्या लोकांची तीव्र इच्छा आहे!
त्यामुळेच सोशल मीडियावर त्यांचे फोटोशॉप केलेले फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विरुष्का जेजुरीपासून नागपूरपर्यंत सगळ्या शहरांत आणि गावांत जोडीने फिरताना दिसत आहेत!
ते झालं असं, की लग्नानंतर अनुष्काने विराटसोबत त्यांच्या हनिमूनचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या फोटोवर हजारों लाइक्स आले आणि मग त्यातूनच अनेकांनी या फोटोवर आपली विनोदबुद्धी चालवली.
आता भ्रमंती म्हटलं की, शॉपिंगही आलीच. अनेकांनी तर त्यांना आपापल्या दुकानांमध्ये खरेदी करतानाही दाखवलं आहे. पण काय केली शॉपिंग त्यांनी? काहीतरी प्रायव्हेट राहू द्या ना!
फेसबुक असो किंवा व्हॅाट्सअॅप, अनुष्का-विराटचा तो फोटो वापरून अनेकांनी त्यांना आपापल्या गावी नेलं. सध्या हे फोटो व्हायरलही झाले आहेत.
इटलीतल्या टस्कनी प्रांतात एका छोटेखानी समारंभात विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विवाहबद्ध झाले.
त्यांचं लग्न झाल्यानंतर सोशल मीडियावर #virushkawedding असा हॅशटॅश ट्रेंड होत होता. त्यांच्या चाहत्यांनी त्यांचे काही फोटो शेअर करत त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला होता.
लग्नाला पाहुणे इनमिन 40-50. म्हणून हळदीपासून ते अगदी हनिमूनपर्यंत सर्वच गोष्टींची जोरदार चर्चा सुरू आहेत. लोकांमध्ये कुतूहल होतं, उत्सुकता होती.
काहींच्या मनात लग्न देशाबाहेर झालं म्हणून नाराजी. काही लोकांना तर ट्रेंड होणारा "हॅशटॅग 'विरुष्का' का? 'अनुराट' का नाही? म्हणूनही आक्षेप होता. आता लग्नकार्य म्हटलं की कुणा ना कुणाची नाराजी असतेच.
त्यानंतर लोकांनी विरुष्काला ठाणेनजीकच्या उल्हासनगरला नेलं, पुढे जळगाव, नाशिक, अशी त्यांची महाराष्ट्र भ्रमंतीच झाली.
जळगाव स्टेशनवर तर दोघं चक्क रगडा खायचा की भरीत, यावर चर्चा करत होते.
आज दिल्लीत त्यांचं रिसेप्शन होत आहे. पाहू तिथून काय नवीन मीम्स येणार, कुणास ठाऊक!
तुम्ही हे वाचलं का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)