You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
आशिया कप : अफगाणिस्तानचा वजनदार हिरो तुम्हाला माहितेय का?
भारताविरुद्धची आशिया कपची मॅच टाय करून देण्यात शतकी खेळी साकारणाऱ्या मोहम्मद शेहझादचा वाटा सिंहाचा होता. क्रिकेटविश्वातला हा 'वजनदार' हिरो आपल्या मोकळ्याढाकळ्या स्वभावासाठी प्रसिद्ध आहे.
क्रिकेट खेळायचं म्हणजे वजन कमी असावं, सडपातळ बांधा असावा असं सगळ्यांनाच वाटतं. वजनामुळे शरीराच्या हालचालींवर मर्यादा येतात. बहुतांश आंतरराष्ट्रीय खेळाडू त्यासाठी प्रयत्नशील असतात. मात्र अफगाणिस्तानच्या मोहम्मद शेहझाद या सगळ्या साचेबद्ध विचारांना अपवाद आहे.
शेहझादचं वजन नव्वदीच्या घरात आहे. शेहझाद अफगाणिस्तानचा विकेटकीपर आहे आणि ओपनरही आहे. दोन्ही जबाबदाऱ्यांमध्ये प्रचंड शारीरिक कसरतीचं काम आहे. पण शेहझाद आपल्या वजनासह ते सहज पेलतो. 5 फूट 8 इंच उंचीच्या शेहझादला पाहिल्यावर पाकिस्तानचा माजी कर्णधार इंझमाम उल हकची आठवण येते. इंझमाम अनेक वर्ष पाकिस्तान क्रिकेट संघाचा तारणहार होता. 30 वर्षीय शेहझाद अफगाणिस्तान संघासाठी हुकूमी एक्का ठरतो आहे.
क्रिकेटविश्वात विराट कोहली अद्भुत फिटनेससाठी ओळखला जातो. विराट कोहलीसारखं फिट असावं असं सगळ्यांनाच वाटतं पण मला ते शक्य नाही. मी फिट आहे, पण मी खाण्याची हौस सोडणार नाही असं शेहझाद आवर्जून सांगतो. कोहलीइतका फिट नसेनही पण माझ्याकडे ताकद आहे. मी पल्लेदार षटकार लगावू शकतो, असं शेहझाद आत्मविश्वासाने सांगतो.
महेंद्रसिंग धोनीशी शेहझादचे खास ऋणानुबंध आहेत. धोनीचं व्यक्तिमत्त्व विलक्षण आहे. 2010 मध्ये शेहझादची पहिल्यांदा धोनीशी भेट झाली होती. धोनीचा सल्ला मोलाचा ठरतो असं शेहझाद आठवणीने सांगतो. धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर फटका लगावण्याचं कौशल्य शेहझादने आत्मसात केलं आहे. भारतीय संघातले शिखर धवन आणि सुरेश रैनाशी शेहझादची खास दोस्ती आहे.
अजय देवगण, शाहरूख खान, विद्या बालन, जॅकलिन फर्नांडिझ हे तारेतारका शेहझादला आवडतात. 'देवदास' आवडीचा चित्रपट आहे. झोपणं आणि खाणं हे शेहझादचे वीक पॉइंट. त्याबाबत तडजोड नाही असं तो दरवेळी सांगतो.
तडाखेबंद शैलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नाव कमावणाऱ्या वजनदार शेहझादचा जन्म पाकिस्तानमधल्या पेशावर शहरातल्या निर्वासितांच्या छावणीत झाला. शेहझादच्या घरचे मूळचे आताच्या अफगाणिस्तानमधल्या जलालाबाद खोऱ्यातल्या नानग्रहरचे आहेत. शेतीवाडीसाठी सुपीक असा हा प्रदेश. सोव्हिएत युद्ध पेटलं आणि शेहझादच्या घरच्यांना पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेजवळच्या खैबर पासच्या पेशावरमधल्या निर्वासितांच्या छावणीत आश्रय घ्यावा लागला.
शेहझादचा जन्म तिथलाच. साहजिक अस्थिरता नेहमीचीच. मात्र क्रिकेटची आवड पाचव्या-सहाव्या वर्षीपासूनची. कुचंबणासदृश वातावरणात क्रिकेटनेच त्या मुलांना भरकटण्यापासून तारलं. प्लॅस्टिकची बॅट, टेपचा चेंडू यांच्या साह्याने शेहझादने क्रिकेटची धुळाक्षरं गिरवली. इम्रान खान, जावेद मियाँदाद या पाकिस्तानच्या दिग्गज क्रिकेटपटूंचा खेळ पाहत शेहझाद लहानाचा मोठा झाला. जर्सीवर रशीद लतिफ, मोईन खान असंही त्याने लिहून ठेवलं होतं.
परिस्थिती निवळल्यानंतर शेहझाद कुटुंब अफगाणिस्तानात परतलं. क्रिकेट ही फक्त आवड न राहता शेहझादसाठी उदरनिर्वाहाचं साधन झालं. ICC ने अफगाणिस्तानला असोसिएट संघाचा दर्जा दिलेला असल्याने अफगाणिस्तानला मिळणाऱ्या खेळण्याच्या संधी मर्यादित होत्या. पण दिलखुलास स्वभाव आणि स्फोटक बॅटिंग यांच्या बळावर शेहझादने अफगाणिस्तानमधील मैदानं जिंकली.
शेहझादच्या नावावर ट्वेन्टी-20 फॉरमॅटमध्ये शतक आहे. अफगाणिस्तानसाठी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये पहिलीवहिली द्विशतकी खेळी करण्याचा विक्रम शेहझादच्या नावावर आहे. शारजा येथे खेळताना शेहझादने कॅनडाविरुद्ध 214 धावांची खेळी साकारली होती. अफगाणिस्तानतर्फे पहिलं वनडे शतक झळकावण्याचा पराक्रमही शेहझादच्या नावावर आहे. ट्वेन्टी-20 प्रकारात 200 चौकार लगावणारा आंतरराष्ट्रीय स्तरावरील तो केवळ दुसरा खेळाडू आहे.
सलामीला येऊन बॉलर्सच्या ठिकऱ्या उडवण्याचं काम शेहझाद नेमाने करतो. मंगळवारी भारताविरुद्धची शतकी खेळी याचाच प्रत्यय देणारी होती.
गेल्या वर्षी शेहझादला डोपिंग प्रकरणात दोषी आढळला. शेहझादच्या नमुन्यांमध्ये क्लेनब्युटेरॉल हा प्रतिबंधित घटक आढळल्याने ICCने शेहझादवर वर्षभराची बंदी घातली. वजन कमी करण्यासाठीच्या उपचारांचा भाग म्हणून घेतलेल्या औषधात हा घटक असल्याचं शेहझादने सांगितलं. मात्र त्याने आपली चूक मान्य करत शिक्षेला आव्हान दिलं नाही. तिशीतल्या शेहझादच्या करिअरला ही बंदी खीळ घालणार अशी चिन्हं होती. मात्र बंदीकाळात बॅटिंग आणि विकेटकीपिंगची कौशल्यं आणखी पक्की करणाऱ्या शेहझादने नव्या दमाने पुनरागमन केलं.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)