भेटा पहिली कसोटी खेळणाऱ्या अफगाण क्रिकेट संघाच्या भारतीय गुरुजींना

    • Author, जान्हवी मुळे
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

काही खेळाडू मैदानात उतरतात, तेव्हा खेळ फक्त खेळ राहत नाही. त्यांचं केवळ मैदानात असणं हाच एक विजय ठरतो आणि त्यांच्या पावलागणिक एका अख्ख्या देशाला नवी उमेद मिळते.

अफगाणिस्तानच्या क्रिकेट टीमचंही तसंच आहे. असगर स्टानिकझाईच्या नेतृत्वाखाली हा संघ आज 14 जून रोजी बंगळूरूच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर भारताविरुद्ध खेळायला उतरला आहे.

क्रिकेटच्या इतिहासात अफगाणिस्तानचा हा पहिलावहिला कसोटी सामना आहे. सगळ्या क्रिकेटविश्वाची उत्सुकता वाढवणाऱ्या याच सामन्याची एक भारतीय तर गेली दोन वर्ष फार आतुरतेनं वाट पाहत होता.

भारताचे माजी कसोटीवीर आणि 2007 सालच्या T20 विश्वचषक विजेत्या भारतीय संघाचे प्रशिक्षक लालचंद राजपूत यांचं अफगाणिस्तानशी खास नातं आहे.

जून 2016 ते ऑगस्ट 2017 या दरम्यान राजपूत हे अफगाण क्रिकेट संघाचे प्रशिक्षक होते. त्यांच्याच कार्यकाळात अफगाणिस्ताननं कसोटीचा दर्जा मिळवला. म्हणूनच या ऐतिहासिक सामन्याच्या पार्श्वभूमीवर आम्ही राजपूत यांना बोलतं केलं.

अफगाण खेळाडूंचे भारतीय गुरू

"मी प्रशिक्षक झालो, तेव्हा अनेकांना माहितच नव्हतं की अफगाणिस्तानचा संघ जगातल्या आघाडीच्या संघांना टक्कर देतो आहे." लालचंद राजपूत त्या दिवसांबद्दल सांगतात.

"लोक प्रश्न विचारत होते, तुम्हाला हे कसं जमेल? मलाही खात्री नव्हती... मला त्यांच्या संस्कृतीविषयी माहिती नव्हतं, आणि संवाद कसा साधणार? ते हिंदी बोलतात की नाही, त्यांना इंग्लिश समजतं की नाही. काहीच माहीत नव्हतं."

अर्थात बहुतेक खेळाडूंना हिंदी समजत असल्यानं त्यांची ही पहिली अडचण दूर झाली.

मग राजपूत यांच्या कार्यकाळात मर्यादित षटकांच्या (वन डे आणि ट्वेन्टी20) क्रिकेटमध्ये अफगाणिस्तानं दहापैकी सहा मालिका जिंकल्या आणि वेस्ट इंडिजला वेस्ट इंडिजमध्ये एका सामन्यात हरवण्याचा पराक्रम गाजवला. अखेर ICCनं आयर्लंडसोबत अफगाणिस्तानलाही कसोटीचा दर्जा दिला.

खडतर वाटा, अपार कष्ट

राजपूत म्हणतात, "आयुष्यात एकदा तरी कसोटी खेळता यावी, हे प्रत्येक क्रिकेटरचं स्वप्न असतं. ही गोष्ट लक्षात आल्यावर अफगाण खेळाडूंनी खूप मेहनत घेतली."

"अफगाणिस्तानचे खेळाडू मेहनतीत कमी नाहीत. ते म्हणायचे, आमच्या देशवासीयांकडे काही नाही, पण क्रिकेटनं आम्हाला त्यांचं प्रेम मिळवून दिलं आहे. आम्ही मेहनत घेतली तर त्यांना आनंद देऊ शकतो."

याच निर्धारानं या खेळाडूंना वेळोवेळी बळ दिलं आणि त्यांच्या संघासाठी कसोटी क्रिकेटचं दारही उघडलं.

अफगाण क्रिकेटवीरांचा प्रवास किती खडतर होता, त्याविषयी राजपूत सांगतात, "मला काही खेळाडूंनी सांगितलं, की 2004 साली ते पहिल्यांदा कुठल्याशा सामन्यासाठी भारतातच आले होते. तेव्हा पूर्ण टीमला मिळून त्यांच्याकडे केवळ 12 डॉलर्स होते. खाणं-पिणं, राहणं सगळ्याच ठिकाणी अडचणी आल्या."

पण त्यांनी अडचणींचा विचार मागे सोडला आणि क्रिकेटला प्राधान्य दिलं, याकडे राजपूत लक्ष वेधतात. "आपल्याला क्रिकेट खेळायचं आहे, पैसे तर येत राहतील, असाच विचार त्यांनी केला. आणि आता त्यांची टीम कसोटीच्या उंबरठ्यावर आहे."

अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाची आजवरची वाटचाल कठीण आणि विलक्षणच आहे. 2008 साली अफगाणिस्तानच्या क्रिकेट फेडरेशनला ICCनं संलग्न संघटना म्हणून मान्यता दिली.

मग 2009 साली ते पहिला आंतरराष्ट्रीय वन-डे सामना खेळले. 2014 साली अफगाणिस्तानला ICCचं सहसदस्यत्व मिळालं. हा संघ 2010 सालच्या ट्वेन्टी-20 विश्वचषकात आणि 2015 सालच्या वन-डे विश्वचषकातही खेळला.

"अफगाणिस्तान क्रिकेटवेडा देश आहे. सततच्या युद्धांमुळे तिथं राजरोसपणे खेळणंही सोपं नव्हतं. तरीही क्रिकेटमध्ये त्यांनी प्रगती केली आहे, हे आश्चर्यच आहे. ते मोठ्या जिद्दीनं खेळतात आणि म्हणूनच त्यांची प्रगती एवढ्या वेगानं झाली," असं राजपूत सांगतात.

आता खरी कसोटी

अफगाणिस्ताननं घेतलेली ही झेप इतकी मोठी आहे, की त्याची तुलना इतर देशांशी करता येणार नाही.

राजपूत म्हणतात, "आयर्लंडची टीम अनेक वर्ष खेळत होती, पण त्यांना कसोटीचा दर्जा आत्ताच मिळाला. पण अफगाणिस्ताननं सहा सात वर्षांतच वन डे पासून कसोटीपर्यंतचा प्रवास केला आहे. त्यांच्या देशात आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलं जात नाही, तरीही त्यांच्याकडे जागतिक दर्जाचे खेळाडू, विशेषतः गोलंदाज आहेत."

अफगाणिस्तानकडे जबरदस्त गोलंदाज आहेत, आणि त्यांची फलंदाजी सुधारली, तर ते कुठल्याही आघाडीच्या संघाला टक्कर देऊ शकतील, असा विश्वास राजपूत यांना वाटतो.

"त्यांचे फलंदाज ट्वेन्टी-20 आणि वन-डे जास्त खेळले आहेत, त्यामुळं ते स्फोटक फलंदाजी करतात. पण कसोटीत संयम गरजेचा असतो. अफगाणिस्तानच्या गोलंदाजांकडे वीस विकेट्स काढण्याची क्षमता आहे, पण त्यांना फलंदाजांचीही साथ मिळायला हवी. ते कसोटी खेळण्यासाठी सज्ज आहेत, पण त्यांची तयारी नेमकी केवढी आहे, हे आता कळेल."

न्यूझीलंड, बांगलादेश, श्रीलंका यांसारख्या संघांनाही पहिली कसोटी जिंकण्यासाठी वेळ लागला होता, याकडे राजपूत लक्ष वेधतात.

आपल्या पहिल्याच कसोटीत अफगाणिस्तानसमोरचं आव्हानही मोठं आहे. कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर असलेल्या भारताचा सामना करताना त्यांच्यावर सहाजिकच जास्त दबाव राहील. पण हे मोठं व्यासपीठ आहे आणि अफगाण खेळाडू आपला पहिला सामना खेळण्यासाठी उत्सुक आहेत.

'फिरकी' अफगाणिस्तानची ताकद

सलामीवीर मोहम्मद शहजाद आणि कर्णधार असगर स्टानिकझाई अफगाणिस्तानसाठी फलंदाजीत निर्णायक भूमिका बजावू शकतात, असं राजपूत यांना वाटतं.

"शहजाद अगदी वीरेंद्र सेहवागसारखाच स्फोटक फलंदाज आहे. तो मोठा स्कोर करत नसेलही, पण वेगानं 70-80 धावा कुटून समोरच्या टीमला नाउमेद करू शकतो. असगर स्टानिकझाईचं खेळावर चांगलं नियंत्रण आहे."

अफगाणिस्तानची फिरकी गोलंदाजी, खास करून राशीद खान भारतासमोर मोठं आव्हान ठरू शकतो, असा इशारा राजपूत देतात.

"IPLमध्येही यंदा राशीदचा बोलबाला होता. तो ट्वेन्टी-20 क्रिकेटमध्ये जगातला नंबर वन गोलंदाज आहे. त्याच्यामुळेच टीमनं आणखी भरारी घेतली आहे. मिस्ट्री स्पिनर मुजीब उर रहमान, मोहम्मद नबी, 'चायनामन' गोलंदाजी करणारा झहीर खान अशी फिरकी गोलंदाजांची भक्कम फळी त्यांच्याकडे आहे."

बंगळुरूच्या कसोटीत राजपूत यांचं मन भारतासोबत असलं, तर त्याच्या एका कोपऱ्यात अफगाणिस्ताननं चांगली लढत द्यावी, असंही नक्कीच असेल.

भारताशी विशेष नातं

अफगाणिस्ताननं भारताविरुद्ध खेळून कसोटीत पदार्पण करावं, असंच सर्वांना वाटत होतं. कारण भारत त्यांच्या टीमचं 'सेकंड होम' आहे. BCCIनं त्यांना ग्रेटर नॉयडाचं मैदान दिलं आहे आणि ते आता देहरादूनमध्येही बांगलादेशविरुद्ध मालिकेत खेळले आहेत.

भारताविषयी अफगाण खेळाडूंना काय वाटतं? आम्ही राजपूत यांना विचारलं.

"त्यांना भारतीय सिनेमा खूप आवडतात. मला माहीतही नाहीत एवढे चित्रपट त्यांनी पाहिले आहेत. भारतीय टीव्ही सीरियल्सही ते पाहतात. भारताविषयी त्यांना आपुलकी वाटते. आपली संस्कृतीही मिळती-जुळती आहे. ते प्रशिक्षकांना गुरूसारखं मानतात आणि त्यांचा आदर राखतात. सुरुवातीला माझ्या मनात शंका होत्या, पण त्यांनी सगळं सोपं केलं."

खेळाडूंशी इतकं चांगलं नातं जुळल्यावरही राजपूत यांना गेल्या वर्षी प्रशिक्षकपद सोडावं लागलं. राष्ट्रीय टीमच्या प्रशिक्षकानं काही काळ देशात येऊन युवा खेळाडूंनाही मार्गदर्शन करावं, असं अफगाण क्रिकेट बोर्डाचं म्हणणं होतं. तर सुरक्षेच्या कारणांमुळं राजपूत काबूलमध्ये जाऊन राहण्यास तयार नव्हते.

"तिथली परिस्थिती आणखी सुधारली, तर मला जायला आवडेल. पुन्हा संधी मिळाली तर मला या संघासोबत काम करायला आवडेल," असं राजपूत सांगतात.

प्रशिक्षकपद सोडलं असलं तरी राजपूत अफगाण खेळाडूंच्या संपर्कात आहेत. "व्हॉट्सअॅपवरून आम्ही बोलत असतो. मार्चमध्ये जेव्हा त्यांनी विश्वचषक पात्रता स्पर्धा जिंकली, तेव्हा मी कर्णधाराला शुभेच्छा दिल्या होत्या. तर अख्ख्या टीमनं 'सरजी, हा विजय तुमच्यासाठी' असं म्हटलं. मला खूप आनंद झाला."

इतक्या प्रेमळ खेळाडूंचा पहिला कसोटी सामना पाहण्यासाठी मात्र हे 'गुरूजी' बंगळुरूला जाऊ शकले नाहीत. राजपूत यांनी आता अंतरिम प्रशिक्षक म्हणून झिम्बाब्वेच्या संघाला वर आणण्याची जबाबदारी स्वीकारली आहे आणि रविवारीच ते हरारेला रवाना झाले आहेत.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)