You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठ्यांनी जिंकलेल्या अटकेच्या किल्ल्यात पाकिस्तानने तुरुंग बनवला
- Author, सिद्धनाथ गानू
- Role, बीबीसी मराठी
28 एप्रिल 1758. चैत्राच्या उन्हाळ्यातल्या इतर कोणत्याही दिवसासारखाच खरा हा दिवस, पण येणाऱ्या इतिहासात या दिवसाला मोठं स्थान मिळणार होतं. आजच्या अफगाणिस्तानाच्या सीमेपर्यंत जाऊन धडकलेल्या मराठा सैन्यानं याच दिवशी अटकचा किल्ला जिंकला.
'अटकेपार झेंडे लावणं' हा मराठा इतिहासातला पराक्रमाचा मापदंड झाला. पण आज 260 वर्षांनंतर या पराक्रमाचं महत्त्व समजून घेताना त्याआधीचा घटनाक्रम समजून घेणं गरजेचं ठरतं.
सन 1757 मध्ये तत्कालीन हिंदुस्तानात महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. प्लासीच्या लढाईनंतर इंग्रज इथे जम बसवत होते, मराठा सत्तेनं संपूर्ण भारतात दबदबा निर्माण केला होता. अफगाणिस्तानातल्या अहमदशाह अब्दालीनं दिल्लीच्या सत्तेवर चाल करून बराच मोठा भाग लुटला होता आणि काही काळातच मराठ्यांनी आक्रमकांना दिल्लीबाहेर हुसकावलं होतं.
अब्दालीनं अफगाणिस्तानात परत जाताना लाहोरवर आपला मुलगा तैमूर खान याला सुभेदार पदावर नेमलं. 1758च्या पूर्वार्धात मराठ्यांच्या उत्तरेतल्या मोहिमांचं कार्यक्षेत्र वाढणार हे निश्चितच होतं. पंजाबमधला सरदार अदिना बेग यानं अब्दालीच्या मुलाला सहाय्य करण्याचं नाकारलं आणि मराठ्यांना पंजाबवर स्वारी करण्यासाठी निमंत्रण दिलं.
1758चा मार्च महिना उजाडला, कडाक्याचा हिवाळा ओसरला असला तरी हवेतला गारवा अजूनही कायम होता. 1757च्या उत्तरार्धापासून उत्तर भारतात असलेली मराठा फौज आता सतलज नदीच्या किनारी येऊन धडकली. पंजाबातले शीख सैनिक आणि मोगल सरदार अदिना बेग यांची सैन्यंही त्यांना येऊन मिळाली. सर्वांचं लक्ष्य एकच होतं- अफगाणिस्तानातून आलेल्या अब्दालीनं बळकावलेला प्रदेश परत जिंकून घेणं.
दिवस होता 21 मार्चचा. चंदीगढजवळ असणाऱ्या सरहिंदच्या किल्ल्याला शीख आणि अदिना बेगच्या सैनिकांनी दोन आठवडे वेढा दिलेलाच होता. मराठा सैनिक आल्यावर अंतिम चढाई झाली आणि सरहिंदचा किल्ला पडला. पंजाबात आपल्याविरुद्ध कारवाया होत असलेल्या पाहून अब्दालीचा सेनापती जहान खान चालून येऊ लागला. पण स्वतः अब्दाली अफगाणिस्तानातली अंतर्गत बंडाळी शमवण्यात व्यग्र होता. मराठा-मुगल-शीख अशा तिहेरी ताकदीसमोर आपला निभाव लागणार नाही, हे लक्षात घेऊन जहान खाननं माघार घ्यायला सुरुवात केली.
सरहिंदकडून मराठे लाहोरकडे गेले. अफगाण सैन्य आधीच लाहोर सोडून पळालं होतं. त्यांनी मागे टाकलेली शस्त्रास्त्रं, इतर सामानसुमान या सैनिकांच्या हाती पडलं. 19 एप्रिलला मराठ्यांनी उरलासुरला प्रतिकार मोडून काढला आणि लाहोर जिंकलं. (सरहिंद ते लाहोर हे सुमारे 217 किलोमीटरचं अंतर आहे) रघुनाथरावांच्या नेतृत्वाखालची मराठा फौज अजूनही समाधानी नव्हती. इथून पुढे 9 दिवसांत मराठ्यांनी 'अटक' गाठलं आणि जिंकलं.
तुकोजी होळकर आणि साबाजी शिंदे या दोन वीरांच्या पलटणी शत्रूवर चालून गेल्या आणि पुढे पेशावरपर्यंत पोचल्या. मराठ्यांनी पेशावरही जिंकलं. मराठा साम्राज्याची ध्वजा अटकेपार नेली. अतुल्य पराक्रमाची उपमा म्हणून मराठी भाषेत असलेली 'अटकेपार झेंडे लावले' ही म्हण इथेच जन्माला आली.
मराठा साम्राज्याचं सत्ताकेंद्र असलेलं पुणं आता खूप मागे पडलं होतं. अफगाण आक्रमक अब्दाली आणि त्याने नेमलेल्या सरदारांना मागे रेटण्याचा उद्देश साध्य झाला होता. पण उत्तर मोहिमेतलं एक महत्त्वाचं उद्दिष्ट अजूनही हुलकावण्या देत होतं. ते म्हणजे खंडणी!
1757 मध्ये अब्दालीने उत्तरेत प्रचंड लूट केली त्यामुळे मराठ्यांना मिळणाऱ्या चौथाईत घट येणं कठीणच होतं. त्यात मराठा मुलुखापासून इतक्या दूर पंजाबात बस्तान बसवणं मराठ्यांच्या प्राथमिकतांमध्ये बसत नव्हतं. त्यामुळे अदिना बेगला लाहोरची आणि अब्दालीचा बंडखोर पुतण्या अब्दुर रहीम खान याला पेशावरची जबाबदारी देऊन रघुनाथराव परत पुण्याकडे निघाले.
सप्टेंबर 1758च्या सुमारास जेव्हा राघोबा पुण्यात पोहोचले तेव्हाच अदिना बेगचा मृत्यू झाला. एव्हाना पंजाबात राघोबांची जागा दत्ताजी आणि जनकोजी शिंदेंनी घेतली होती. पंजाबात पुन्हा अस्थैर्याची चिन्हं दिसायला लागली आणि शिंदेंनी सूत्रं हातात घेऊन ती शमवली. अब्दालीकडून तात्काळ आक्रमणाचा धोका नाही असं वाटल्यानं मराठ्यांनी तातडीनं नवे सुभेदार नेमले नाहीत.
शिंदे गंगा खोऱ्यातल्या मोहिमेच्या आखणीवर लक्ष देऊ लागले. साबाजी शिंदे पेशावरात नाहीत हे पाहून मराठ्यांपुढे एकदा माघार घ्यावी लागलेल्या जहान खानानं पुन्हा पंजाबची वाट धरली. पेशावर, अटक असं एक एक ठाणं पादाक्रांत करत जहान खानाचं सैन्य रोहतस किल्ल्यापाशी आलं आणि साबाजी शिंदेंनी त्याचा पाडाव केला. जहान खानाला आपला मुलगा गमवावा लागला, तो स्वतःही जखमी झाला. मराठ्यांनी पेशावरपर्यंतचा मुलुख पुन्हा काबीज केला.
आपल्या सेनापतीचा पराभव पाहून एव्हाना अफगाणिस्तानातली घडी बसवण्यात यश आलेला अब्दाली पंजाबवर पाचव्यांदा चढाई करण्यासाठी सज्ज झाला होता. साठ हजारांचं विशाल सैन्य घेऊन येणाऱ्या अब्दालीचा प्रतिकार करण्याचा मराठ्यांनी प्रयत्न केला पण त्याच्यापुढे निभाव लागणं कठीण होतं हे जाणून त्यांनी माघार घ्यायला सुरुवात केली.
पेशावर, अटक, लाहोर करत करत मराठ्यांनी पंजाबातली ठाणी रिकामी केली. आपल्या महत्त्वाकांक्षी वायव्य मोहिमेत पादाक्रांत केलेला प्रदेश मराठ्यांनी 18 महिन्यांत गमावला.
ऐतिहासिक 'अटक'
मराठा इतिहासात मोलाचं स्थान असणाऱ्या अटकेच्या किल्ल्याचा जन्म झाला होता 1581 साली बादशाह अकबराच्या आदेशावरून. भारतातल्या आपल्या साम्राज्याचं अफगाण आक्रमकांपासून रक्षण करण्यासाठी अकबरानं हा किल्ला उभारला.
तत्कालीन हिंदुस्तान, पर्शिया आणि चीन यांच्या व्यापारी आणि दळणवळण मार्गांवर अटक आहे. बदाओनी या इतिहासकारानं लिहून ठेवलं आहे की, अटकेच्या किल्ल्याला 'अटक बनारस' असं नाव देण्यात यावं, असं ठरलं जेणेकरून आजच्या ओडिशातल्या 'कटक बनारस'बरोबर याची गल्लत होऊ नये.
अकबरानेच इथे नावांचा एक पूल तयार करून घेतला होता. नावा आणि तराफे नदीत टाकून त्यावर चिखल वगैरे लिंपून त्यावरून वाहतूक करण्याची ही पद्धत होती. हे पूल बांधणाऱ्यांची वस्तीही अकबरानं किल्ल्याजवळच्या गावांमध्ये वसवली होती.
अटकेत मराठ्यांच्या पाऊलखुणा आहेत का?
ज्या अटकेने मराठा साम्राज्याची नवी सीमा आखली, ज्या मोहिमेने रघुनाथरावांना 'राघोभरारी' हे बिरुद मिळालं, ज्या अटकेच्या ताब्यावरून मराठा आणि अफगाण सैन्य 3 वेळा समोरासमोर उभं ठाकलं त्या अटकेत मराठी संस्कृतीच्या, मराठा सैन्याच्या पाऊलखुणा आहेत का?
शीख इतिहासाचा अभ्यास करणारे आणि खुद्द पाकिस्तानातल्या विविध प्रांतांमध्ये जाऊन शीख इतिहासाच्या पाऊलखुणांचा मागोवा घेतलेले लेखक अमरदीप सिंग यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं, "अटक किंवा आसपासच्या प्रांतांत मराठा सैन्याच्या पाऊलखुणा सापडत नाहीत."
1758 साली मराठ्यांनी तत्कालीन पंजाबचा उत्तरेकडचा भाग काबीज केला पण 18 महिन्यांत तो त्यांनी गमावला सुद्धा. अमरदीप सिंग सांगतात, "अटकेवर मराठा ध्वज इतका अल्पकाळ फडकला. इतक्या अल्प कालावधीत काही लक्षणीय परिणाम करणं अवघड होतं."
पाकिस्तानच्या अधिपत्याखाली अटकेचं काय झालं?
भारत-पाकिस्तानची फाळणी झाल्यानंतर पाकिस्तानातल्या पंजाबात असलेला हा किल्ला आणि जिल्हा खैबर-पख्तुनख्वा प्रशासकीय प्रांतात आला. पाकिस्तानच्या लष्कराच्या अखत्यारीत हा किल्ला येतो. स्पेशल सर्व्हिसेस ग्रुप (SSG) आणि नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (NAB) यांच्या नियंत्रणात हा किल्ला आहे.
पाकिस्तानी पंतप्रधान आणि अटकचा किल्ला यांचंही एक विचित्र नातं आहे. पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष आणि दिवंगत बेनझीर भुत्तो यांचे पती आसिफ अली झरदारी यांना अटक किल्ल्यात असलेल्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो कोर्टात 19 वर्षं बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी खटल्याला सामोरं जावं लागलं होतं. त्यांना अनेक वर्षं तुरुंगवासही भोगावा लागला होता.
नवाझ शरीफ पंतप्रधान असताना त्यांनी झरदारींना अटकमध्ये अटकेत ठेवलं पण त्यांनाही तेच भोगावं लागलं. 12 ऑक्टोबर 1999 ला परवेझ मुशर्रफ यांनी शरीफ यांची सत्ता उलथवून टाकली आणि त्यांना अटकच्या किल्ल्यात बंदी बनवलं.
सप्टेंबर 2007 मध्ये नवाझ शरीफ 7 वर्षं देशाबाहेर राहिल्यानंतर पाकिस्तानात परतले. पण परवेझ मुशर्रफ यांना शरीफ यांचं परत येणं मान्य नव्हतं. मात्र, अटकमधल्या नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्यूरो कोर्टानं त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट बजावण्यास नकार दिला. शरीफ यांनी पाकिस्तानात परत यावं आणि खटल्याच्या सुनावणीसाठी पुन्हा हजेरी लावावी असं कोर्टानं सुचवलं. शरीफ अखेर एअरपोर्टवरूनच सौदी अरेबियाला परतले.
शरीफ कुटुंबासाठी या किल्ल्याच्या आठवणी कटूच आहेत. नवाझ शरीफ यांचे बंधू आणि पंजाब प्रांताचे मुख्यमंत्री शाहबाझ शरीफ आणि नवाझ यांचा मोठा मुलगा हुसैन नवाझ या दोघांना वेगवेगळ्या कोठड्यांमध्ये डांबून ठेवलं गेलं होतं. दोघांवर नॅशनल अकाउंटेबिलिटी कोर्टात खटले सुरू होते.
बादशाह अकबर, अफगाण शासक, मराठे, शीख आणि ब्रिटिश असा खांदेपालट पाहणाऱ्या अटकेच्या किल्ल्याची ही संक्षिप्त कहाणी. मराठ्यांचं अटकवर आणि पंजाब प्रांतावर थोडाच काळ वर्चस्व असलं तरी मराठी सत्तेच्या जडणघडणीत त्याचा मोठा वाटा होता.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)