व्हिएतनाम : प्राचीन काळी हिंदूंचा बालेकिल्ला, पण आज इथे किती हिंदू उरलेत?

    • Author, झुबैर अहमद
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

मध्य व्हिएतनाममधल्या हिंदू धर्माचं मूळ रूप पाहण्यासाठी काही दिवसांपूर्वी मी व्हिएतनामध्ये गेलो होतो. तिथं पोहोचल्यावर मला कळलं की, काही पारंपरिक गोष्टी वगळता इथं बराच बदल झाला आहे. थोडं फार तसंच राहिलं असलं तरी खूप काही हरवल्याची जाणीव झाली.

2000 वर्षांचा इतिहास असलेला चंपा समुदाय अजून शिल्लक आहे. मात्र इथल्या हिंदू धर्माचं अस्तित्व संपण्याच्या मार्गावर आहे. प्राचीन काळी चंपा परिसर हा हिंदू राज्य आणि हिंदू धर्माचा बालेकिल्ला होता.

चंपामध्ये शिल्लक असलेली मंदिरं इथं कोणे एकेकाळी हिंदू धर्माचं प्राबाल्य होतं याची साक्ष देतात.

इथं दुसऱ्या शतकापासून 18 व्या शतकापर्यंत चम समाजाची सत्ता होती. चम समाजात हिंदू नागरिक मोठ्या संख्येनं होते. नंतर, यातल्या अनेकांनी बौद्ध किंवा मुस्लीम धर्म स्वीकारला.

इथले हिंदू आता कमी-कमी होत चालले आहेत. या हिंदूंनाच शोधण्यासाठी आम्ही त्यांच्या न्गेप या गावात पोहोचलो.

शतकांपासून हिंदूंचे वास्तव्य

दुपारची वेळ होती आणि सूर्य डोक्यावरही आला होता. हे गाव खूप छोटं असून मुख्य महामार्गापासून बरंच आतल्या भागात आहे. एका घराबाहेर डोक्यावर मुंडासं बांधलेला आणि सदरा परिधान केलेले इनरा जाका फोनवर कुणाशी तरी बोलत उभे होते. त्यांच्या घरातल्या किचनमध्ये जेवण शिजत असल्याचं जाणवत होतं.

तरुण असलेल्या इनरा जाका यांची भाषा व्हिएतनामी भाषेपेक्षा वेगळी होती. फोनवरचं बोलणं झाल्यावर त्यांनी आमचं स्वागत केलं. त्यांनी सांगितलं की, मी चम भाषेत माझ्या वडिलांशी बोलत होतो.

घराबाहेर जेवणासाठी टेबल ठेवलं होतं. दारावर एक-दोन मूर्ती लावण्यात आल्या होत्या. इनरा जाका आणि इनरा सारा हिंदू धर्माचं पालन करतात. गेल्या काही शतकांपासून त्यांचे पूर्वज याच भागात राहत आले आहेत.

पितापुत्रांच्या या जोडीला हिंदू धर्माचं बाह्य जगाकडून होणाऱ्या परिणामांपासून केवळ संरक्षणच करायचं नसून चम संस्कृतीला जिवंतही ठेवायचं आहे. तसंच, त्यांना चम संस्कृतीच्या हरवलेल्या साहित्य आणि कलेचा शोधही घ्यायचा आहे.

इनरा सारा हे चम भाषेतले कवी आणि कादंबरीकार आहेत. त्यांनी मोठ्या मेहनतीनं चम साहित्यातल्या जुन्या कवींचा शोध घेत त्या पुन्हा छापल्या आहेत. त्यांनी लहानपणापासूनच आपल्या समाजाच्या सुवर्ण काळाबद्दल ऐकल्याचं ते सांगतात.

ते सांगतात की, "माझे लहानपणीचे शिक्षक आणि नातेवाईक मला पूर्वीच्या कथा आणि तेव्हाच्या सामान्य जीवनाबाबत सांगत असत. मोठा झाल्यावरही माझ्या आठवणींमध्ये जुन्या कथाच येतात."

हिंदू धर्माच्या संरक्षणाचा प्रयत्न

वडील चम समाजाच्या साहित्याला पुनरुज्जीवित करण्याचा प्रयत्न करत आहेत. तर, मुलगा हिंदू धर्म वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी इनरा जाका आणि इनरा सारा हे पितापुत्र चार वेळा भारतात येऊन गेले आहेत आणि एकदा विश्व हिंदू संमेलनातही सहभागी झाले आहेत.

इनरा जाका याबद्दल सांगतात, "भारताकडून प्रेरणा घेऊन इथे हिंदू धर्माबद्दल लोकांना माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. पण, इथला हिंदू धर्म भारतापेक्षा एकदम निराळा आहे."

हिंदू धर्मातल्या कोणत्या जुन्या परंपरा आणि रीतीरिवाज तुम्ही पाळता असं आम्ही इनरा जाका यांना विचारलं. तेव्हा ते म्हणाले, "आमचे आजी-आजोबा आणि आई-वडील सांगायचे की आपण डोंगरांची पूजा करायचो. तसंच, आम्ही आजही शिवभक्त आहोत. इथे सगळी शंकराचीच मंदिरं आहेत."

सध्या चम समाजाची लोकसंख्या 2 लाख आहे. तीन प्रांतांमध्ये ही लोकसंख्या पसरली असून यात जवळपास 70 हजार नागरिक हिंदू आहेत. चंपा क्षेत्रात चार मंदिरं असून ज्यातल्या दोन मंदिरात आजही पूजा होते.

इथला हिंदू धर्म संपुष्टात येण्याची शक्यता आहे. इनरा जाका यांना आम्ही विचारलं की, तुम्ही रामायण, महाभारत, भगवतगीता यांसारखे हिंदू धर्मग्रंथ वाचले आहेत का? त्यावर ते सांगतात, "आमच्या समाजातून हे ग्रंथ आता गायब झाले आहेत. आमच्या पुजाऱ्यांकडेही हे ग्रंथ आता नाहीत. आमच्या समाजातल्या युवा पिढीला हिंदू धर्माच्या इतिहासाबद्दल कोणतीही माहिती नाही."

व्हिएतनामी हिंदूंचे पूर्वज

हो ची मिन्ह या व्हिएतनामधल्या दक्षिणेकडील शहरात यापूर्वी अनेक हिंदू राहत होते. आज पण आहेत, काही जुने तर काही मिश्र वंशाचे लोक या शहरात राहतात.

18 व्या शतकांत बनलेल्या या मंदिराची देखरेख करणारे मुतैय्या अर्धे भारतीय आणि अर्धे व्हिएतनामी आहेत. त्यांचे पूर्वज तामिळनाडूमधून येऊन इथे वसले आणि त्यांनी लग्नही इथेच केलं. ते आजही हिंदू धर्माशी जोडले गेलेले आहेत.

मुतैय्या सांगतात, "मला माझ्या वडिलांनी देवाची पूजा कशी करायची हे शिकवलं होतं. त्यांनी श्लोकही मला शिकवले होते. मंदिरांबाबत मला सगळं माहिती आहे."

या शहरांत अजून दोन मंदिरं आहेत. या मंदिरांमध्ये भारतातून आलेले लोक पूजा करतात. भारतातून येणाऱ्या पर्यटकांनी इथल्या हिंदू मंदिरांबद्दल ऐकलेलं असतं. ही जुनी मंदिरं पर्यटकांच्या आकर्षणाची केंद्र ठरू लागली आहेत.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)