You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आंदोलनासाठी जीव देणारे काकासाहेब शिंदे कोण आहेत?
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून औरंगाबादमध्ये काकासाहेब दत्तात्रय शिंदे या 28 वर्षांच्या आंदोलकाने गोदावरीत उडी मारून जीव दिला.
मंगळवारी सकाळी कायगाव टोकामधल्या स्मशान भूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
मूळ गंगापूर तालुक्यातील कानडगावचे शिंदे यांनी कायगाव टोका येथील नव्या पुलावरून उडी घेतली. आंदोलकांपर्यंत पोलीस पोहोचण्याच्या आत शिंदे यांनी उडी घेतली. ते पोहत आहेत की बुडत आहेत याविषयी तिथे गोंधळाचं वातावरण होतं, असं मोबाईलवरून काढलेल्या व्हीडिओत दिसत आहे. नंतर त्यांना स्थानिकांनी बाहेर काढलं, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
कोण आहेत काकासाहेब शिंदे?
28 वर्षांचे काकासाहेब शिंदे पेशाने ड्रायव्हर होते. त्यांच्या घरात आई, वडील आणि भाऊ असे चौघेच जण. गंगापूर तालुक्यातील आगर कानडगाव हे त्यांचं मूळ गाव. तिथे घरी दोन एकर शेती. शेतीवर उपजीविका चालत नाही म्हणून काकासाहेब यांनी ड्रायव्हर म्हणून नोकरी सुरू केली. त्यांच्यावर घर अवलंबून होतं.
गंगापूरमधून शिवसेनेचे माजी आमदार अण्णासाहेब माने यांचा मुलगा संतोष माने यांच्या गाडीचे काकासाहेब शिंदे ड्रायव्हर होते. त्यामुळे काकासाहेब शिवसेनेच्या संपर्कात आले.
काकासाहेब यांचे लहान भाऊ अविनाश शिंदे हे 23 वर्षांचे असून गंगापूर तालुका संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष आहेत.
अविनाश शिंदे यांनी बीबीसी मराठीशी बोलताना म्हटलं की काकासाहेब यांना मिळणाऱ्या 15 हजार रुपये पगारातच त्यांचं घर चालायचं. "माझं शिक्षण सुरू आहे. दोन एकर जमीनीत काय उगवणार?"
पोहायला येत नसताना मारली उडी
अविनाश सांगतात, "आज आंदोलनात आम्ही दोघं बरोबरच होतो. आजपर्यंत मराठा समाजाची जेवढी आंदोलनं झाली, त्यावेळेस काकासाहेब माझ्याबरोबरच असायचे. आंदोलन सुरू असताना त्यांनी गोदावरीमध्ये उडी घेतली. ते असं काही करतील याची आम्हाला कल्पना नव्हती. त्याला पोहता येत नव्हतं."
काकासाहेब यांनी उडी घेतल्यानंतर त्यांना वाचवायला कुणीच का पुढे आले नाही? या प्रश्नावर अविनाश यांनी पोलिसांवर आरोप केले. "काकासाहेबानं उडी घेतल्यानंतर ज्या लोकांना पोहता येत होते, ते नदीत उडी घेणार होते, पण पोलिसांनी त्यांना रोखलं.
"आम्ही कायगाव टोका इथं आंदोलन करणार असल्याची माहिती पोलीस आणि प्रशासनाला दिलेली असताना त्यांनी काहीच उपाययोजना केलेल्या नव्हत्या. आंदोलनकर्त्यांनी जलसमाधी घेण्याचा इशारा दिलेला असतानाही नदीकाठी अँब्युलन्स किंवा होड्या नव्हत्या. लाईफ जॅकेट किंवा जीवरक्षक नव्हते," असे आरोपही अविनाश यांनी केले.
"मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि परळी वैजनाथ इथं सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा म्हणून आम्ही आज कायगाव टोका इथं ठिय्या आंदोलन आयोजित केलेलं होतं. या नियोजित आंदोलनानंतर दुपारी तीन वाजता जलसमाधी आंदोलन करणार असल्याचा इशाराही आम्ही प्रशासनाला दिला होता," असं अविनाश यांनी सांगितलं.
घटनेचे प्रत्यक्षदर्शी सुदर्शन गवळी यांनी म्हटलं की शिंदे यांनी उडी मारल्यानंतर त्यांचा पाण्याचा अंदाज चुकला असावा. "आपण पोहून जाऊ, असं त्यांना वाटलं असावं, पण पाण्याचा अंदाज न आल्यानं त्यांच मृत्यू झाला असावा, आम्ही त्यांना वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न केला," असं गवळी म्हणाले.
"काकासाहेब यांना नदीतून बाहेर काढण्यासाठीही कुणी नव्हतं. आमच्याच लोकांनी स्थानिक मच्छिमारांच्या मदतीनं त्यांना बाहेर काढलं. थर्माकोलच्या होड्या घेऊन ते नदीत उतरले होते. आमच्या लोकांनी काकासाहेब यांना गंगापूर इथं आणलं. पण तोपर्यंत सगळं संपलं होतं," असं अविनाश शिंदे म्हणाले.
महाराष्ट्र बंदची हाक
मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हात दिली होती.
या बंद दरम्यान काय काय घडलं हे वाचण्यासाठी इथे क्लिक करा
मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी मराठा समाज आता आक्रमक होत आहेत. सोलापूर, औरंगाबाद, लातूर आणि इतर काही ठिकाणी ठिय्या आंदोलन करण्यात आलं. शनिवारी सोलापूरमध्ये एसटी बसेसची तोडफोड करण्यात आली.
'मराठ्यांना गुन्हेगार ठरवलं जातंय'
या घटनेनंतर सगळ्यांनी संयम पाळावा आणि शांतता पाळावी, अशी मागणी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केला.
मराठा समाजातील तरुणांना गुन्हेगार ठरवलं जात असल्याचा आरोप अशोक चव्हाणांनी केला आहे. तर हा पोलिसांचा हलगर्जीपणा आहे, असा आरोप राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांनी केला.
सोशल मीडियावर या घटनेचे मोठे पडसाद उमटत आहेत. कुणी हळहळ व्यक्त करत आहे तर कुणी संताप. मराठा क्रांती मोर्चाने शिंदे शहीद झाल्याचं म्हटलं आहे. अनेकांनी शहीद शब्दाचा वापर केला आहे. तर अनेकांनी जीव न देण्याचं आवाहन केलं.
भरती रद्द करण्याची मागणी
जोपर्यंत मराठा समाजातील तरुणांना आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुख्यमंत्र्यांनी मेगाभरती रद्द करावी, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाने केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील विविध खात्यांतील 36 हजार पदं भरणार असल्याची घोषणा केली होती.
71 हजार रिक्त पदं दोन टप्प्यात भरणार असल्याचं आश्वासनही त्यांनी दिलं होतं. पहिल्या टप्प्यात 36 हजार तर दुसऱ्या टप्प्यात पुढच्या वर्षी 36 हजार पदं भरण्यात येतील, असं ते म्हणाले होते.
मराठा आंदोलकांच्या इशाऱ्यांनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूरचा दौरा रद्द करून मुंबईतच विठ्ठलाची पूजा केली.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)