ग्राउंड रिपोर्ट : 'मराठा आरक्षणासाठी भाऊ गमावलाय, आता स्वस्थ बसणार नाही'

    • Author, श्रीकांत बंगाळे आणि अमेय पाठक
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

"आरक्षणासाठी मी माझा भाऊ गमावलाय, आता आरक्षण मिळेपर्यंत स्वस्थ बसणार नाही."

आपल्या घराबाहेर गावकऱ्यांच्या गराड्यात बसलेले काकासाहेब शिंदे यांचे भाऊ अविनाश शिंदे सांगतात. मराठा आंदोलनादरम्यान कायगाव टोक्याजवळील गोदावरी नदीपत्रात उडी मारल्यानंतर काकासाहेब यांचा मृत्यू झाला होता.

औरंगाबाद जिल्ह्यातल्या गंगापूरपासून 12 किलोमीटर अंतरावरील आगर कानडगावात शिंदे कुटुंबीय राहतात.

गंगापूर फाट्यावरून आमची गाडी कानडगावच्या दिशेनं वळली तोच दत्तप्रसाद शिंदे यांनी आम्हाला हाक मारली.

कुठे जाताय असं त्यांनी विचारलं आणि ते पुढे सांगायला लागले,"23 तारखेला माझा वाढदिवस होता. काकासाहेबचा फोन आला नाही म्हणून मीच त्याला फोन करत होतो.

पण तो काही फोन उचलत नव्हता. काही टाईमानं मला आमच्या चुलत्याचा (काका) फोन आला आणि काकासाहेबानं नदीत उडी मारली असं त्यांनी मला सांगितलं.

आम्ही कायगावला निघालो तर गंगापूरच्या ग्रामीण रुग्णालयात काकासाहेबला भरती केल्याचं आम्हाला समजलं. आम्ही तिथं पोहोचलो तर डॉक्टरांनी त्याला इंजेक्शन, सलाईन दिलं आणि पुढच्या 10 मिनिटांनी मृत म्हणून घोषित केलं."

दत्तप्रसाद शिंदे हे कानडगावातच राहतात.

रस्त्यातले खड्डे चुकवत आमची गाडी आगर कानडगावच्या दिशेनं जात होती. "रस्ता एवढा खराब आहे की काकासाहेबांच्या मौतीचा कार्यक्रम आम्हाला कायगावात ठेवावा लागला," दत्तप्रसाद पुढे सांगत होते.

कानडगावच्या अलीकडे असलेल्या ममदापूर गावातले तरुण 'काकासाहेब शिंदे, अमर रहे' या आशयाचं बॅनर लावण्याच्या तयारीत होते.

आगर कानडगावात पोहोचलो तेव्हा मात्र गावात भयाण शांतता होती. या भयाण शांततेत काळजाचा थरकाप उडवणारा आवाज एका गल्लीतून कानावर पडला.

"कमावणारे हात होते माय, पिवळे व्हायच्या आतच गेले वं...," असा तो आवाज होता.

गल्लीवर नजर टाकली तर एका घराबाहेर 40-50 पुरुष मंडळी जमलेली होती. हेच काकासाहेबांचं घर आहे, हे त्यावरून आम्हाला लगेचच समजलं.

घराजवळ गेलो तर पुरुषांच्या गराड्यात काकासाहेबांचे वडील दत्तात्रय शिंदे आणि भाऊ अविनाश शिंदे बसलेले होते. येणारा प्रत्येक जण त्यांचं सांत्वन करत होता.

घरातील महिलांच्या रडण्याचा आवाज गल्लीभर घुमत होता. यात काकासाहेबांच्या आई मीराबाई यांचा समावेश होता. आम्ही त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होतो, पण त्या काहीही बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हत्या. घराच्या भिंतीला पाठ टेकवून त्यांची नजर दरवाजावर खिळून होती.

'आरक्षणासाठी एक मुलगा गेला, आतादुसऱ्याला तरी आरक्षण द्या'

आम्ही तिथं पोहोचलो तेव्हा काकासाहेब ज्यांच्या गाडीवर ड्रायव्हर म्हणून काम करत होते ते संतोष माने तिथं कुटुंबीयांचं सांत्वन करत होते.

संतोष माने सांगतात, "काकासाहेब आणि मी लहानपणापासून सोबत आहोत. तो माझ्या गाडीचा गेल्या 4 ते 5 वर्षांपासून चालक होता. राजकारणाशी थेट संबंध नसला तरी समाजासाठी काहीतरी करण्याची त्याची भावना होती.

पण तो असे काही करेल असं वाटलं नव्हतं. त्याने समाजासाठी बलिदान दिलं आहे जे आम्ही व्यर्थ जाऊ देणार नाही."

यानंतर आम्ही काकासाहेब शिंदे यांचे वडील दत्तात्रय शिंदे यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला.

"दोन मुलं आणि आम्ही पतीपत्नी असं आमचं सुखी कुटुंब होतं. एक एकरात काय उगवणार अन काय खाणार. काकासाहेबच्या नोकरीवर 10-15 हजार महिन्याला यायचे.

माझा लहान मुलगा, मी आणि माझी पत्नी तिघंही शेतात मोलमजुरीच करतो. आता यापुढेही तेच करावं लागणार.

सरकारनं कितीही आर्थिक मदत केली तरी माझा गेलेला मुलगा परत येऊ शकत नाही. पण दुसऱ्या मुलाला किमान सरकारी नोकरी द्यावी. आरक्षणासाठी मी मोठा मुलगा तर गमावला आहे, आता लहाण्याला तरी आरक्षणाचा फायदा व्हायला हवा."

दत्तात्रय यांचा दुसरा मुलगा बारावीत आहे.

काकासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण होतंय का यावर ते सांगतात, "आमच्या मुलाचा जीव गेला. यात आमचंच नुकसान झालं आणि त्रासही आम्हालाच झाला."

काकासाहेब यांचे भाऊ अविनाश यांनी मात्र स्पष्टपणे त्यांची मतं मांडली.

"मी माझा भाऊ गमावला आहे, आता तर आरक्षण मिळेपर्यंत शांत बसणार नाही. मराठा समाजाचे आमदार फक्त राजकीय स्वार्थासाठी समाजाचा वापर करतात. पण आम्ही सुशिक्षित आहोत.

आरक्षण मिळालं तर आम्ही आमच्या शिक्षणाचा उपयोग करू शकू. सत्ता बदलली तरी मराठा समाजाकडे पाहण्याचा दृष्टिकोन तोच आहे.

आताचं सरकार 4 वर्षांपासून नुसती आश्वासनं देत आहे. मागच्या सरकारनंही गेल्या 15 वर्षांत काही केलं नाही, ते 2019मध्ये सत्तेत आल्यावर आरक्षण देतील याची काय खात्री? पण असे आणखी काकासाहेब होऊ द्यायचे नसतील तर सरकारनं आरक्षण द्यावं."

गावातल्या तरुणांना काय वाटतं?

काकासाहेब शिंदे यांच्या प्रकरणाबद्दल आम्ही गावातल्या तरुणांना विचारलं.

यातलाच एक युवक आहे राजू पठाण. तो सांगतो, "कृष्णा मिसाळ माझ्या शेजारी राहतो. 1ली ते 15वी पर्यँत तो वर्गात पहिला आला. आता तो पुण्यात एमपीएससीची तयारी करत आहे.

एक एक मार्कानं त्याचा नंबर हुकत आहे. आज मराठा समाजाला आरक्षण असतं तर त्याला आतापर्यंत नोकरी लागली असती."

"काकासाहेब मराठा आरक्षणासाठी हुतात्मा झाले आहेत, मराठा समाजाला आरक्षण मिळावं, असं मला वाटतं. त्यासाठी आम्ही त्यांच्यासोबत आहोत," राजू पूढे सांगतात.

अमोल कानडे यानंही त्याचं मत मांडलं.

"मराठा समाजातल्या मुलांना 80-90 टक्के असले तरी चांगल्या कॉलेजात ऍडमिशन मिळत नाही, इतरांना मात्र 50-60 टक्क्यांवरही मिळतं. शिवाय आम्हाला लाखापेक्षा जास्त फी भरावी लागते. हे सगळं आरक्षण नसल्यामुळे होत आहे. काकासाहेबांनी आमच्यासाठी जीव दिला आहे, आम्ही त्यांची लढाई सुरू ठेवणार आहोत."

हेही वाचलंत का?