You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
मराठा आरक्षण : परिस्थिती चिघळण्यास सरकारच जबाबदार - शरद पवार
औरंगाबाद जिल्ह्यात मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांच्या मृत्यूनंतर मराठा समाजातर्फे मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. आता बुधवारी मुंबई आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे.
औरंगाबाद, जालना, उस्मानाबाद बीडसह मराठवाड्यात तसंच नाशिक आणि अहमदनगरमध्ये या बंदचे पडसाद उमटले. ठिकठिकाणी जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. ओरंगाबादच्या कायगाव टोकामध्ये आंदोलनादरम्यान एका पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला.
औरंगाबादमध्येच संतप्त जवामानं अग्निशामन दलाची गाडी पेटवून दिली.
लोकसभा आणि राज्यसभेत सुद्धा या बंदचे पडसाद उमटले. राज्यातल्या खासदारांनी मराठा आरक्षणाचा मुद्दा संसदेत उपस्थित केला.
पुणे आणि कोल्हापुरातही याचे पडसाद उमटले.
काय आहेत मागण्या ?
- मराठा आरक्षण तत्काळ जाहीर करावं, तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी
- काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला तत्काळ मदत जाहीर करावी.
- काकासाहेब शिंदे यांच्या भावाला सरकारी नोकरी द्यावी आणि काकासाहेब यांना हुतात्माचा दर्जा द्यावा.
याआधी आंदोलकांनी मराठा आरक्षण मिळालं नाही तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पंढरपूरची आषाढी एकादशीची विठ्ठल महापूजा करू देणार नाही, असा इशारा दिला होता.
मंगळवारी राज्यात दिवसभरात घडलेल्या घटनांचा वृत्तांत
रात्री 9.30 - परिस्थिती चिघळण्यास सरकारच जबाबदार - शरद पवार
राज्य सरकारनं मराठा आंदोलनाची दखल न घेल्यानंच उद्रेक झाल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. त्यांनी एक पत्रक काढून मराठा आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे.
राज्यात परिस्थिती चिघळण्यास सरकार आणि त्यांचे मंत्री जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मुख्यमंत्री आणि त्यांचे मंत्री याबाबत चिथावणीखोर वक्तव्य देत असल्याचं पवारांनी पत्रकात म्हटलं आहे.
आंदोलकांनी सार्वजनिक मालमत्तेच नुकसान करू नये, असं आवाहन सुद्धा पवारांनी केलं आहे. आरक्षणासंदर्भात तामिळनाडू पॅटर्नची आठवणही त्यांनी सरकारला करून दिली आहे.
रात्री 9 - विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न
शिर्डीमध्ये कृष्णा गंभीरे या तरुणानं मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उस्मानाबादच्या कळंब गावातील हा तरुण आहे. पदयात्रेत तो शिर्डीला आला होता. सध्या साईबाबा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचा सुरू आहेत.
संध्याकाळी 5.19 - न्यायालयात टिकणारं मराठा आरक्षण शक्य?
माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत यांच्याबरोबर मराठा आरक्षणाच्या कायदेशीर बाबींबाबत चर्चा.
संध्याकाळी 5.15 - उद्या सातारा बंदची हाक
सातारा शहरात उद्या बंदची हाक देण्यात आली आहे. बुधवारी सकाळी 9 वाजल्यापासून आंदोलनाला सुरुवात होणार आहे.
संध्याकाळी 5 - जालन्यात पोलिसांची गाडी जाळली
जालन्यातल्या घनसावंगीमध्ये मराठा मोर्चा आंदोलकांनी पोलिसांची व्हॅन जाळल्याचं वृत्त आहे. तसंच पोलीस स्टेशनचीसुद्धा तोडफोड करण्यात आली.
तसंच पोलीस ठाण्यावर दगडफेकही करण्यात आली. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यामुळे जमाव आणखीनच आक्रमक झाला. त्यांनी तहसील आणि पंचायत समिती कार्यालयावर दगडफेक करून जाळपोळ केली.
दुपारी 4.20 - शाळा-कॉलेज सुरू राहणार
बऱ्याच गोंधळानंतर शाळा-कॉलेज सुरू राहणार असल्याचं सकल मराठा समाजाकडून स्पष्ट करण्यात आलं.
दुपारी 4 - मुंबईतील बैठकीत गोंधळ
मुंबईतल्या उद्याच्या बंदमध्ये शाळा कॉलेज सुद्धा बंद ठेवण्याच्या मागणीसाठी काही कार्यकर्त्यांनी बैठकीत गोंधळ घातला.
दुपारी 3.52 - मुंबई बंदची हाक
मुंबईत झालेल्या बैठकीत उद्या मुंबई आणि परिसरात बंदची हाक देण्यात आली आहे. ठाणे, नवी मुंबई, पालघर, रायगडसुद्धा बंद राहणार आहे. मराठा मोर्चाचे मुंबई समन्वयक वीरेंद्र पवार यांनी ही माहिती दिली. तसंच उद्याच्या मोर्चामध्ये कुठलाही अनुचित प्रकार आणि हिंसा होणार नाही, हा आमचा शब्द आहे, असंही पवार यांनी सांगितलं.
दुपारी 3.42 - मुख्यमंत्र्यांचा निषेध
मुंबईत सुरू असलेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांच्या पंढरपूरला न जाण्याच्या निर्णयाचा निषेध करण्यात आला. तसंच उद्या नवी मुंबईतलं APMC मार्केट बंद राहणार असल्याची माहिती मराठा मोर्चाचे पदाधिकारी अंकुश कदम यांनी दिला.
दुपारी 3.30 - मुंबईत बैठक सुरू
मुंबईमध्ये सकल मराठा समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीला सुरुवात झाली. दादरच्या राजर्षी शाहू सभागृहात आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महिलांना पहिल्या रांगेत स्थान देण्यात आलं. या बैठकीला सुरूवात होण्याआधी काकासाहेब शिंदे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
दुपारी 2.54 - कर्जतमध्ये ठिय्या आणि जाळपोळ
अहमदनगरमधल्या कर्जतमध्ये मराठा आंदोलकांची जाळपोळ केली. तसंच त्यांच ठिय्या आंदोलनही सुरू होतं.
दुपारी 2.30 - नाशिकमध्ये रास्तारोको
नाशिकमध्ये मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन सुरू करण्यात आलं. या आंदोलकांनी मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.
दुपारी 1.40 बीडमध्ये कडकडीत बंद
उस्मानाबादमध्ये आमदारांच्या नावांचा फलक लिहून त्याला चपलांची माळ घालण्यात आली.
दुपारी 1.35 शेवगावमध्ये दगडफेक
अहमदनगर जिल्ह्यात शेवगावमध्ये बसेसवर दगडफेक करण्यात आली. अहमदनगर-औरंगाबाद रोड बंद असल्याने शेवगावमार्गे वळवली होती.
दुपारी 1.30 राज्यसभेत संभाजीराजेंचं आवाहन
खासदार धनंजय महाडिक लोकसभेत मागणी केली की, "काल गोदावरीत एका युवकाने गोदावरीत उडी घेऊन जीव दिला. मराठा आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी वारंवार केली. त्याची दखल सरकारने घ्यावी. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबाला 50 लाखाची मदत मिळावी."
संभाजीराजे यांनी राज्यसभेत मराठा आरक्षणाचा मुद्दा मांडला. ते म्हणाले, "स्वातंत्र्यानंतरही मराठा समाजाला आरक्षण न मिळाल्यानं भावना तीव्र झाल्या आहेत. अनेक मोर्चे निघाले. जगाने दखल घेतली. महाराष्ट्रात तीव्र भावना झाल्या आहेत. मी सूचना करू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या नेत्यांना एकत्र बोलावं आणि मागण्या सोडवाव्यात. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन हा प्रश्न सोडवावा."
दुपारी 1.20 लोकसभेतही मराठा आरक्षणाचा मुद्दा गाजला
विनायक राऊत, धनंजय महाडिक यांनी लोकसभेत आरक्षणाची मागणी केली. राऊत म्हणाले, "न्यायालयाची ढाल करून आरक्षण देणं टाळलं जात आहे. मराठा, धनगर, लिंगायत समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आहे. लाखोंच्या संख्येने मोर्चे निघाले. या मोर्च्यांची दखल जगभरात घेतली गेली. पण आरक्षण का दिलं जात नाही. आरक्षणाचा प्रश्न तातडीनं सोडवा अन्यथा जलसमाधी घेऊ, असं लेखी पत्र देऊनही प्रशासन, सरकार, पोलिसांनी ढुंकूनही पाहिलं नाही."
दुपारी 1.10 चंद्रकांत पाटील यांचं आवाहन
मराठी वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी लोकांना शांततेचं आवाहन केलं आहे. हिंसक घटना थांबवण्याचं आवाहन केलं.
ते म्हणाले, "मी सगळ्यांना आवाहन करतो, या मार्गाने प्रश्न सुटणार नाही. सरकारच्या हातात जे आहे, ते सगळं सरकारनं केलं आहे. अंमलबजावणीत त्रुटी असतील तर त्याही दूर करू या. ज्या बँका कर्ज देत नसेल त्यांच्यावर कारवाई करू."
"आरक्षण मिळायलाच पाहिजे. सरकार आग्रही आहे. आरक्षणातून मिळणाऱ्या दोन्ही गोष्ट आपण दिल्यात. जे ओबीसीला मिळते, ते सगळं सरकारनं दिलं आहे. आरक्षण देणं सरकारच्या हातात नाही. जे आपल्या हातात नाही, त्यासाठी हिंसक आंदोलन करू नका असं आवाहन करतो", असं ते म्हणाले.
दुपारी 1.00 कायगावमध्ये जमाव हिंसक, अग्निशमन दलाची गाडी पेटवली
औरंगाबाद - अहमदनगर मार्गावर कायगाव टोका पुलावर रास्ता रोको दरम्यान जमाव आक्रमक झाला. अग्निशमन दलाची गाडी तोडफोड करून पेटवली. तीन ते चार इतर वाहनांवर दगडफेकही करण्यात आली.
सकाळी 12.15 कोल्हापुरात ठिय्या आंदोलन
कोल्हापूरमध्ये ठिय्या आंदोलन सुरू झालं आहे. आमदार सतेज पाटील यात सहभागी झाले आहेत. आंदोलन शांततेत सुरू होतं.
कोल्हापूर जिल्ह्यात काही ठिकाणी एसटी बसवर दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. शिरोळ तालुक्यातील 5 तर हातकणंगलेत 2 बसेसवर दगडफेक झाली.
सकाळी 12.00 - औरंगाबादमध्ये आंदोलक आक्रमक
औरंगाबादमधल्या गुलमंडी, औरंगपुरा आणि निराला बजार या बाजारापेठांतली मराठा संघटना आक्रमक झाली. बहुतेक शाळांना सुट्टी देण्यात आली.
औरंगाबादमध्ये महाराष्ट्र बंदनिमित्त मराठा संघटना आक्रमक झाल्या आहेत. पाहा व्हीडिओ -
सकाळी 11.50 - कन्नड तालुक्यात आणखी एकानं मारली नदीत उडी
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कन्नड तालुक्यातील देवगाव रंगारी इथे मराठा मोर्चाच्या आणखी एकाने नदीपात्रात उडी घेतली. गुड्डी सोनवणे असं उडी मारण्याचं नाव आहे. रास्ता रोको सुरू असताना सकाळी 10.15च्या सुमारास या तरुणानं उडी मारली. नदीपात्र कोरडं असल्याने ते जखमी झाले.
सोनवणे यांना जखमी अवस्थेत सुरुवातीला ग्रामीण रुग्णालयात आणि नंतर उपचारासाठी औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी गोदावरी नदीत उडी मारली होती. त्यात त्यांचा मृत्यू झाला.
सकाळी 11.35 - अहमदनगर : थोरात यांच्या नेतृत्वाखाली निघणार मराठा मोर्चा
महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर आज संगमनेरमध्ये होणारा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा सत्कार कार्यक्रम रद्द झाल्याचं कळवण्यात आलं आहे. त्याऐवजी थोरात यांच्या नेतृत्वाखालीच इथे मराठा समाजाचा मोर्चा निघणार असल्याचं वृत्त आहे.
सकाळी 11.20 - उस्मानाबादमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन
उस्मानाबाद जिल्ह्यात बहुतेक सेवा बंद आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलकांनी टायर जाळून सर्व मराठी आमदारांचा निषेध केला.
सकाळी 11.10 अंत्यसंस्कारासाठी आलेल्या खा. खैरेंना धक्काबुक्की
काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी काल जीव दिल्यानंतर आंदोलन चिघळलं. आज कायगाव टोका स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येत आहेत. यासाठी खासदार चंद्रकांत खैरे तिथे आले असता आंदोलकांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागलं.
पाहा व्हीडिओ -
आंदोलकांच्या गर्दीत खैरे यांना धक्काबुक्की करण्यात आली.
सकाळी 11.00 औरंगाबादमध्ये इंटरनेटसेवा बंद
औरंगाबाद परिसरातली इंटरनेट सेवा बंद करण्यात आल्याचं वृत्त आहे. औरंगाबाद ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक आरती सिंग यांनी या माहितीला दुजोरा दिला असल्याचं आमच्या औरंगाबादच्या बातमीदारानं कळवलं आहे.
सकाळी 10.45 अहमदनगरमध्ये रास्ता रोको
अहमदनगर- दौंड रोडवर घारगाव इथे रास्ता रोको करण्यात आलं. त्यामुळे या भागातली वाहतूक पूर्ण थांबली आहे. मराठा आंदोलनाचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरल्यामुळे अतिरिक्त पोलीस बळ पाठवलं गेलं आहे.
नगर जिल्ह्यातल्या तारकपूर आगाराने औरंगाबादकडे जाणाऱ्या सर्व गाड्या रद्द केल्या आहेत. ओरंगाबादहून पुण्याला जाणाऱ्या गाड्याही शेवगावमार्गे वळवल्या आहेत, अशी माहिती बीबीसी मराठीसाठी काम करणाऱ्या प्रवीण ठाकरे यांनी दिली.
सकाळी 10.30 काकासाहेब शिंदे यांच्यावर थोड्याच वेळात अंत्यसंस्कार
तरुण मराठा आंदोलक काकासाहेब शिंदे यांनी आरक्षणाच्या मागणीसाठी जीव दिल्यानंतर मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली, त्यांच्यावर थोड्याच वेळात कायगाव टोका स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातल्या कायगाव टोका स्मशानभूमीवर आंदोलक आणि समर्थकांची गर्दी जमायला लागली आहे.
सकाळी 10.15 बंदचा प्रभाव मराठवड्यात अधिक
लातूर, उस्मानाबाद, बीड जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंदचा मोठा प्रभाव दिसतो आहे. शाळा- कॉलेज बंद आहेत. सोमवारी उस्मानाबाद येथे जिल्हाधिकारी कार्यलयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं. आज अद्याप कुठे आंदोलनाची बातमी हाती आलेली नसल्याचं बीबीसी मराठीसाठी उस्मानाबादहून काम करणारे कैलास चौधरी यांनी सांगितलं.
उस्मानाबादेत सध्या स्थिती नियंत्रणात आहे आणि शांत आहे. पण इथला पूर्वेतिहास पाहता कधीही गोंधळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती चौधरी यांनी दिली.
सकाळी 10.00 अमरावती, अकोल्यात बंदचा परिणाम नाही
बीबीसी मराठीसाठी अमरावतीहून काम करणारे बातमीदार नीतेश राऊत यांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरावती आणि अकोला शहरात बंदचा फार परिणाम नाही. आंदोलनंही नाहीत. दोन्ही शहरांमधल्या बससेवा सुरळीत आहेत.
सकाळी 9.00 वारकऱ्यांना बंदचा फटका नाही
मराठा मूक मोर्चाचे समन्वयक वीरेंद्र पवार यांनी घोषणा केली की, महाराष्ट्र बंद सातारा, सोलापूर, पुणे आणि मुंबईत नाही. ही शहरं वगळता उर्वरित महाराष्ट्र मंगळवारी बंद आहे. मुंबई बुधवारी बंद आहे. सोलापूर आणि पंढरपूरला जवळ असल्याने पुण्यातही बंद पाळू नये, असं आवाहन त्यांनी केलं आहे. वारकऱ्यांना परतण्यास अडथळा ठरू नये म्हणून असं ठरवण्यात आलं आहे, असं पवार म्हणाले.
सकाळी 9.15 कोल्हापूर, साताऱ्यात आज बंद नाही
बीबीसी मराठीसाठी कोल्हापूरहून काम करणाऱ्या स्वाती पाटील राजगोळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, सातारा, सांगली भागात आज बंद नाही. उद्या म्हणजे बुधवारी बंद जाहीर करण्याबाबत संध्याकाळी घोषणा होण्याची शक्यता आहे.
"आम्ही मंगळवारी महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे, पण हा महाराष्ट्र बंद शांतेतत केला जावा, असं आमचं मराठा संघटनांना आवाहन आहे. सरकारकडून आमच्या मागण्या मान्य होतील, असा विश्वास आम्हाला अजूनही आहे. त्यामुळे बंद शांततेत पार पाडावा, असं आवाहन आम्ही केलं आहे," असं मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक विनोद पाटील यांनी बीबीसी मराठीशी बोलताना सांगितलं.
हेही वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)