आशिया कपमध्ये अफगाणिस्तानचा भारताला धक्का; मॅच टाय

काही महिन्यांवर आलेल्या वर्ल्डकपचे दावेदार असणाऱ्या भारतीय संघाला दुबई येथे सुरू असलेल्या आशिया कप स्पर्धेत अफगाणिस्तानविरुद्ध 'टाय'वर समाधान मानावे लागले.

भारतीय संघासमोर विजयासाठी 253 धावांचं लक्ष्य होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये भारतीय संघाला 6 चेंडूत 7 धावांची आवश्यकता होती आणि शेवटची जोडी मैदानात होती. अफगाणिस्तानच्या दमदार वाटचालीचा प्रमुख शिलेदार रशीद खानने आपल्या फिरकीच्या बळावर भारतीय बॅट्समनना रोखलं.

शेवटच्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर स्कोअरची बरोबरी झाली. भारतीय संघाला 2 चेंडूत एक धाव हवी होती. मात्र पाचव्या चेंडूवर रवींद्र जडेजाने मारलेला पुलचा फटका नजीबुल्लाच्या हातात जाऊन विसावला आणि मॅच टाय झाली. वनडे क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा सामना टाय झाल्याची ही केवळ आठवी वेळ आहे. सामना टाय झाल्यानंतर अफगाणिस्तानच्या प्रेक्षकांनी जल्लोष केला. स्पर्धेतले अफगाणिस्तानचे आव्हान याआधीच संपुष्टात आले आहे.

भारतीय संघ ICC वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी आहे. एशिया कप स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत नवख्या हाँगकाँगविरुद्धही विजयासाठी संघर्ष करावा लागला होता. दरम्यान भारतीय संघ याआधीच एशिया कपच्या अंतिम फेरीत दाखल झाला आहे.

अंतिम फेरी याआधीच गाठल्याने भारतीय संघाने या सामन्यात शिखर धवन, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार आणि युझवेंद्र चहल या प्रमुख खेळाडूंना विश्रांती दिली. वनडे संघाचं कर्णधारपद सोडलेल्या महेंद्रसिंग धोनीकडे नेतृत्वाची धुरा सोपवण्यात आली. कर्णधार म्हणून धोनीची ही 200वी वनडे होती. भारतीय संघाने लोकेश राहुल, अंबाती रायुडू, दीपक चहर, सिद्धार्थ कौल आणि खलील अहमद यांना संधी दिली. दीपक चहरने वनडे पदार्पण केलं.

अफगाणिस्तानने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानचा सलामीवीर मोहम्मद शहजादने 11 चौकार आणि 7 षटकारांसह 124 धावांची मॅरेथॉन खेळी केली. मधल्या फळीकडून त्याला साथ मिळू शकली नाही. मोहम्मद नबीने 56 चेंडूत 64 धावा केल्या आणि अफगाणिस्तानने अडीचशेचा टप्पा ओलांडला. भारताकडून रवींद्र जडेजाने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.

प्रत्युत्तरादाखल खेळताना लोकेश राहुल आणि अंबाती रायुडू यांनी 110 धावांची दमदार सलामी दिली. भारतीय संघ सहज सामना जिंकेल असं चित्र होतं. मात्र अफगाणिस्तानची शिस्तबद्ध गोलंदाजी आणि तीन नाहक रनआऊट्सच्या नादात भारताने संघाने विकेट्स गमावल्या आणि त्यांना टायवर समाधान मानावं लागलं.

लोकेश राहुल (60), अंबाती रायुडू (57) आणि दिनेश कार्तिकने (44) धावांची खेळी केली. कॅप्टन कुल आणि फिनिशर म्हणून प्रसिद्ध महेंद्रसिंग धोनी केवळ 8 धावा करून तंबूत परतला. मधल्या फळीतील फलंदाज केदार जाधव (19), मनीष पांडे (8) यांना झटपट माघारी धाडत अफगाणिस्तानने भारताच्या डावाला खीळ घातली. तळाच्या अनुनभवी बॅट्समनला वाढत्या रनरेटचे आव्हान पेलवलं नाही आणि अफगाणिस्तानने मॅच टाय केली. अफगाणिस्तानकडून आफ्ताब आलम, मोहम्मद नबी आणि रशीद खान यांनी प्रत्येकी 2 विकेट्स मिळवल्या.

आव्हानात्मक खेळपट्टीवर शतकी खेळी साकारणाऱ्या मोहम्मद शहजादला मॅन ऑफ द मॅच पुरस्काराने गौरवण्यात आले.

संक्षिप्त धावफलक

अफगाणिस्तान- 252/8 (मोहम्मद शेहझाद 124, मोहम्मद नबी 64; रवींद्र जडेजा 3/46) टाय विरुद्ध भारत- सर्वबाद 252 (लोकेश राहुल 60, अंबाती रायुडू 57, दिनेश कार्तिक 44; मोहम्मद नबी 2/40, रशीद खान 2/41)

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)