You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
उदयपूर हत्या प्रकरण : गौस मोहम्मदचं कराची कनेक्शन, पाकिस्तानने दिलं उत्तर
राजस्थानातील उदयपूरमध्ये कन्हैय्यालाल यांच्या हत्येनंतर दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या आरोपींपैकी गौस मोहम्मद याने आठ वर्षांपूर्वी पाकिस्तान प्रवास केला होता. शिवाय, अधूनमधून तो तिथे फोनही करायचा, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.
पण, पाकिस्तान सरकारने एक प्रसिद्धीपत्रक काढून भारतीय अधिकाऱ्यांचा हा दावा फेटाळून लावला आहे.
राजस्थानचे गृहराज्य मंत्री राजेंद्र सिंह यादव यांनी बुधवारी (29 जून) सांगितलं की गौस मोहम्मदने 2014 मध्ये पाकिस्तानात कराची शहराला भेट दिली होती. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो पाकिस्तानात फोन करत होता.
राजस्थानचे पोलीस महासंचालक एम. एल. लाठर म्हणाले, "गौस हा कराचीच्या दावत-ए-इस्लामीच्या कार्यालयात गेला होता. दावत-ए-इस्लामी ही एक सुन्नी इस्लामिक संघटना आहे. 1981 मध्ये मोहम्मद इलियास अत्तार कादरी यांनी या संघटनेची स्थापना केली होती.
लोकांमध्ये इस्लाम धर्माचा प्रसार करण्यासाठी ही संघटना काम करते.
राजेंद्र सिंह यादव यांनी द इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं, "गौस 2014 मध्ये कराचीला गेला होता. त्यावेळी तो तिथे 45 दिवस राहिला. यानंतर 2018-19 मध्ये त्याने अरब देशांचा दौराही केला होता. याशिवाय नेपाळचाही त्याने दौरा केला होता. गेल्या दोन-तीन वर्षांपासून तो पाकिस्तानात फोन करत असे. त्यासाठी 8 ते 10 दूरध्वनी क्रमांकाचा वापर तो करायचा.
राजेंद्रसिंह यादव म्हणाले, "त्याने केलेला गुन्हा सामान्य स्वरुपाचा नाही. या प्रकरणात NIA ने गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाशी संबंधित नेटवर्कचा तपास करण्यात येत आहे."
दरम्यान, गौस मोहम्मदच्या पाकिस्तान कनेक्शनबाबत वक्तव्यांची दखल घेत पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याविषयी प्रतिक्रिया दिली.
गौसच्या पाकिस्तानशी संबंधांबाबतचे आरोप त्यांनी फेटाळून लावले आहेत.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने बुधवारी ट्विट करत म्हटलं, "आम्ही भारतीय माध्यमांमधील बातम्या पाहिल्या. उदयपूरच्या घटनेचा संबंध पाकिस्तानशी जोडला जात आहे. हे आरोप आम्ही फेटाळून लावतो. भारतातील भाजप-RSS चं सरकार अंतर्गत मुद्दयांबाबतही पाकिस्तानकडे बोट दाखवतं. अशा प्रकारे बदनामी करण्याची मोहीम काहीच उपयोगाची नाही."
मुख्यमंत्री गहलोत उदयपूर दौऱ्यावर
राजस्थानमध्ये टेलर कन्हैय्यालाल साहू यांच्या हत्येनंतर येथील वातावरण तणावपूर्ण आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अशोक गहलोत उदयपूर येथे भेट देऊन येथील परिस्थितीचा आढावा घेणार आहेत.
यावेळी गहलोत यांच्यासोबत गृह राज्यमंत्री राजेंद्र यादव, पोलीस महासंचालक एम. एल. लाठर आणि इतर वरिष्ठ अधिकारी असणार आहेत.
काल मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एक सर्वपक्षीय बैठक झाली. यानंतर मुख्यमंत्री गहलोत यांचा उदयपूर दौरा निश्चित झाला.
कन्हैय्यालाल साहू यांच्या हत्येची घटना मंगळवारी दुपारी घडली होती. दोघांनी गळा चिरून कन्हैय्यालाल यांची हत्या केली.
राजस्थान पोलीस महासंचालक एम. एल. लाठर यांनी बीबीसीशी फोनवर संवाद साधताना म्हटलं, "आतापर्यंत दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली आहे. शिवाय बुधवारी इतर चार जणांनाही ताब्यात घेण्यात आलं आहे."
मोहम्मद रियाज आणि गौस मोहम्मद अशी पोलिसांनी अटक केलेल्या दोन्ही आरोपींची नावे आहेत.
या हत्या प्रकरणाचा तपास आता NIA कडे सोपवण्यात आला आहे. घटनेच्या दिवशीच NIA चं पथक उदयपूरला दाखल झालं होतं.
याव्यतिरिक्त राज्य सरकारने गठित केलेली SIT आणि ATS सुद्धा तपासामध्ये NIA ला सहकार्य करेल.
दुसरीकडे, जयपूरमध्ये आज बंद पाळण्यात येणार आहे. हिंदू संघटनांनी हा बंद पाळण्याचं आवाहन केलं आहे. हिंदू संघटनांकडून रविवारी (3 जुलै) कन्हैय्यालाल यांच्या हत्येच्या विरोधात मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरण्यासंदर्भात तयारी सुरू आहे.
या मोर्चामध्ये अंदाजे एक लाख लोक सहभागी होतील, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
उदयपूर दौऱ्यावर जाण्यापूर्वी अशोक गहलोत यांनी सर्व धर्मगुरू, लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था आणि समाजसेवकांना शांतता राखण्याचं आवाहन केलं.
शिवाय, समाजात भीती आणि अस्थिरतेचं वातावरण निर्माण होईल, असा कोणताही मजकूर सोशल मीडियावर शेअर करण्यात येऊ नये, असंही मुख्यमंत्री म्हणाले.
हत्येनंतर राजस्थानातील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. उदयपूरमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहि61890597ले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)