नुपूर शर्मांचं पैगंबरांबद्दलचं 'ते' वक्तव्य, ज्यामुळे एवढा गहजब सुरू आहे

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी इस्लाम धर्मियांचे प्रेषित पैगंबर मोहम्मद यांच्या विवाहासंबंधी आक्षेपार्ह विधान केलं आणि त्याचे पडसाद जगभरात उमटले. ईशनिंदा केल्याप्रकरणी नुपूर शर्मा यांचं भाजपमधून निलंबन झालं असलं तरी हा वाद आता पेटलेला आहे.

नुपूर शर्मा यांना देशाच्या सुप्रीम कोर्टानेही फटकारल्याचं दिसून आलं. नुपूर यांनी टीव्हीवरून देशाची माफी मागावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे.

पैगंबरांचा विवाह आणि इस्लाम धर्मातल्या काही मान्यतांबाबत हे वक्तव्य आहे. टाइम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावरून बोलताना शर्मा यांनी अत्यंत आक्रमकपणे पैगंबरांविषयी हे उद्गार काढले होते. त्यांच्या विधानांची री भाजपचे दिल्लीतले नवीन जिंदाल यांनी ओढली आणि हा वाद वाढला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानपूर दौऱ्यापूर्वी याचे पडसाद कानपूरमध्ये उमटले आणि दोन गटांमध्ये या मुद्द्यावरून तणाव निर्माण झाला. मात्र, हा वाद भारतातच न थांबता देशाच्या सिमेपलिकडे गेला.

टीव्हीवरून देशाची माफी मागावी - सुप्रीम कोर्ट

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबरांवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबाबत त्यांनी देशाची माफी मागावी, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिले आहेत. त्यांनी टीव्हीवरून देशाची माफी मागावी, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

प्रेषित मोहम्मद पैगंबर अवमान प्रकरणावर दाखल याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी झाली.

यावेळी कोर्टाने म्हटलं, "नुपूर शर्मांची जिभ घसरली. त्याचा परिणाम म्हणून देश पेटला. शर्मा यांच्या वक्तव्यामुळेच उदयपूर हत्या प्रकरणासारखी दुर्दैवी घटना घडली आहे."

आंतरराष्ट्रीय पातळीवरून टीका

या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोदी सरकारवर जगभरातून टीका होतेय. कतार, कुवेत, इराण या देशांसह इस्लामिक कोऑपरेशन या आंतरराष्ट्रीय संघटनेनं यावर जोरदार आक्षेप घेतलाय. या देशांनी 5 जूनला त्यांच्या देशातील भारतीय राजदूतांना बोलावून घेतलं आणि आपला निषेध व्यक्त केला होता.

कुवेत सरकारला तिथल्या भारतीय दूतावासाने दिलेल्या पत्रात या प्रकाराची निंदा करण्यात आलीय.

तसंच, हे मत भारत सरकारचं अधिकृत मत नसून देशातल्या असामाजिक तत्त्वांचं हे मत आहे. याचा भारत सरकार पुरस्कार करत नाही.

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने सोमवारी एक नवं पत्रक जारी करून ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनने जारी केलेल्या प्रतिक्रियेला फेटाळून लावलं आहे. ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक को-ऑपरेशनने जारी केलेलं मत हे संकुचित असल्याची टीका भारतीय परराष्ट्र खात्याने केली आहे.

"भारतात सर्व धर्मांचा आदर राखला जातो. एखाद्या व्यक्तीने कुठल्याही धर्माबद्दल केलेली आक्षेपार्ह टिपण्णी भारत सरकारचं अधिकृत मत नाही. संबंधित संस्थेनं त्या वक्तीवर कडक कारवाई केली आहे. ओआयसीने घेतेलली भूमिका दुर्दैवी आणि दुटप्पी आहे," असं भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय.

नुपूर शर्मा, नवीन जिंदाल यांच्यावर कारवाई

दरम्यान, भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांना पक्षातून निलंबित करत त्यांचं प्राथमिक सदस्यत्व रद्द केलंय.

गेल्या महिन्यात नुपूर शर्मा टाईम्स नाऊ या वृत्तवाहिनीवर एका कार्यक्रमात पॅनेलिस्ट म्हणून सहभागी झाल्या होत्या. ज्ञानव्यापी मशिदीसंदर्भात या कार्यक्रमात चर्चा आयोजित करण्यात आली होती. टीव्ही कार्यक्रमात नुपुर शर्मा मोहम्मद पैगंबरांबाबत असं काही बोलल्या की वादाला तोंड फुटलं.

या उद्गारांसाठी नुपुर यांच्यावर कारवाईची मागणी समाजाच्या विविध स्तरातून करण्यात येत होती.

नुपूर यांचे कार्यक्रमातील उद्गार, पत्रकार आणि फॅक्ट चेकिंग वेबसाईट Alt newsचे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर यांनी ट्वीटर अकाऊंटवरून शेअर केले. त्यांनी नुपुर यांच्यावर मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह उद्गार काढल्याचा आरोप केला. यानंतर नुपूर यांच्यावरील टीकेचा जोर वाढत गेला.

भारतासह पाकिस्तानमध्येही नुपूर शर्मा यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. हे सगळं सुरू असताना भाजप दिल्लीचे प्रवक्ते नवीन कुमार जिंदाल यांनी अल्पसंख्याक समाजासंदर्भात ट्वीट करून वादात भर घातली.

या ट्वीटवरही जोरदार टीका झाली.

जीवे मारण्याच्या धमक्या मिळत असल्याप्रकरणी जिंदाल यांनी दिल्ली पोलिसात तक्रार दाखल केली. भारतीय जनता पक्षाने 5 जूनला दुपारी या प्रकरणावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा आणि नवीन कुमार जिंदाल यांनी पैगंबर मोहम्मद यांच्यावर केलेल्या वक्तव्यावरून निर्माण झालेल्या वादावर भाजपचे सरचिटणीस अरुण सिंग म्हणाले की, "त्यांचा पक्ष कोणत्याही पंथाचा किंवा धर्माचा अपमान करणाऱ्या कोणत्याही विचारसरणीच्या विरोधात आहे. भारताच्या हजारो वर्षांच्या इतिहासात अनेक धर्म उदयास आले.

भारतीय जनता पक्ष प्रत्येक धर्माचा आदर करतो. भारतीय संविधानाने नागरिकांना कोणत्याही धर्माचे पालन करण्याचे स्वातंत्र्य दिले आहे. सर्वांचा आदर आणि सन्मान करण्याचा अधिकारही दिला आहे."

मात्र, प्रेषित मोहम्मद पैगंबरांवरच थेट टीप्पणी केल्यानंतर इस्लाम धर्मिय देशांनी या प्रकाराची निंदा केली. कतारच्या परराष्ट्र मंत्रालयानं दोहा या ठिकाणी असलेले भारताचे राजदूत दीपक मित्तल यांना बोलावून घेतलं.

कतारचे परराष्ट्र मंत्री सुल्तान बिन साद अल-मुराइथी यांनी भारतीय राजदूतांना कतारच्या अधिकृत प्रतिक्रियेचं निवेदनच सोपवलं. मंत्रालयानं यासंबंधीची माहिती दिली आहे.

भारताचे उपराष्ट्रपती एम वैंकया नायडू सध्या कतार दौऱ्यावर आहेत. त्यांनी कतारचे पंतप्रधान आणि गृहमंत्री शेख खालिद बिन खलिफा बिन अब्दुल अजीज अल-थानी यांच्यासोबत चर्चा केली.

केवळ कतार आणि कुवेतच नाही तर नुपूर शर्मा यांच्या विधानानंतर ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशननेही (OEC) आक्षेप घेतला आहे आणि भारतातील सत्ताधारी पक्षाशी संबंधित असलेल्या एका व्यक्तिनं केलेल्या वादग्रस्त विधानावर कठोर शब्दांत टीका केली आहे.

दरम्यान, भगवान महादेवांचा अपमान सहन न झाल्याने मी हे वक्तव्य केलं होतं. आता मी हे शब्द मागे घेत असून माफी मागत असल्याचं शर्मा यांनी म्हटलंय. नुपूर शर्मा या भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आहेत. त्यांच्यामुळे देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू झालेला हा ईशनिंदेचा हा वाद वाढण्याची भीती व्यक्त होतेय.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)