You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
सोशल : 'ताजमहाल वर राजकारण करणारे तुम्ही आणि मुघल यांच्यात काय फरक?'
भारतीय जनती पार्टीचे आमदार संगीत सोम मेरठमध्ये बोलताना म्हणाले की, "अनेक लोक ताजमहालला उत्तर प्रदेशच्या पर्यटक यादीतून वगळल्यामुळे चिंतेत आहे. खरंच आपण कोणत्या इतिहासाबद्दल बोलतो आहोत?"
"ज्या व्यक्तीनं ताजमहाल बनवला, त्यांनं आपल्या वडिलांना कैदेत ठेवलं होतं. तो हिंदूचं शिरकाण करणार होता."
ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर कलंक आहे, असंही सोम पुढे म्हणाले.
भाजप आमदाराच्या या वक्तव्यावर बीबीसी मराठीने वाचकांची मतं मागवली होती. बहुतांश वाचकांनी म्हटलं की ताजमहल हा भारतीय संस्कृतीचाच भाग आहे.
गणेश लटके म्हणतात की "विकासाचे मुद्दे बाजूला राहिलेत आणि इथे दुसरंच काहीतरी चालू आहे. ताजमहाल आपल्या देशाचं वैभव आहे."
असंच काहीसं मत सोहन गौरव यांच आहे. ते म्हणतात, "भाजपच्या या अतार्किक तर्काचा आधार घ्यायचा झाला तर भारतावर जुलमी राजवट करणाऱ्या इंग्रजांनी बांधलेल्या राष्ट्रपती भवन, संसद, गेटवे ऑफ इंडिया, इंडिया गेट, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, बृहन्मुंबई महापालिकेची इमारत आणि अशा बऱ्याच गोष्टी मग "त्यांना अपेक्षित असलेल्या" (!) भारतीयत्वात बसत नाहीत. तोडून टाकायच्या मग त्या?"
विकासाचे मुद्दे बाजूला ठेवून या गोष्टींचं राजकारण करणारे तुम्ही आणि मुघल यांच्या काही फरक नाही, असं सौरभ विघ्ने यांनी म्हटलं आहे.
ताजमहाल हा भारतीय संस्कृतीवर कलंक आहे, असं म्हणणाऱ्या व्यक्तीचं इतिहासाचं ज्ञान कमी असलं पाहिजे, असं अब्दुल शेख म्हणत आहेत.
वृषाली प्राजक्त म्हणतात, "हडप्पा मोहोंजदडोपासून अगदी 2014 पर्यंत सगळं आपल्या देशाच्या इतिहासाचा हिस्सा आहे. कुणाला मान्य असो वा नसो."
हर्षवर्धन पाठक यांनी जरा वेगळा मुद्दा मांडला आहे. त्यांच्या मते ताजमहाल बांधण्याचं सगळं श्रेय तो घडवणाऱ्या कारागिरांना जातं.
अभिराम साठे म्हणतात की, "ताजमहाल हा शहाजहानने बांधलाच नाही तर जो आधी पासून होता तोच बळकावला. हा आमचा दावा आहे. संशोधन करून योग्य इतिहास समोर आणा, असा पवित्रा भाजपने घेतला पाहिजे."
मराठी थिंकर्स या अकाउंटने ट्वीट केलं आहे की मुघलांनी निर्माण केलं म्हणून कोणाला ताजमहालविषयी आपत्ती असेल तर त्यांनी लाल किल्ला आणि इंग्रजांनी बनवलेल्या संसदभवना वरतीही बोललं पाहिजे.
शेखर जोशी म्हणतात की तो ताजमहाल नाही आहे, तेजोमहालय आहे.
मात्र प्रतिक खडतरेंचं मत आहे की या सगळ्या वादात पडून आपण विकासाकडे दुर्लक्ष नाही केलं पाहिजे.
सरकारने मुद्द्याचं बोलावं, विकासाचं बोलावं, असंही ते पुढे म्हणतात.
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)