You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
वजनः भारतात लठ्ठ लोकांचा आकडा होत चाललाय गलेलठ्ठ, जाणून घ्या कारणं
- Author, गीता पांडे
- Role, बीबीसी न्यूज, दिल्ली
भारतीयांमध्ये लठ्ठपणाची समस्या वाढत असल्याची माहिती एका नव्या सरकारी सर्वेक्षणात समोर आली आहे. तज्ज्ञांनी वाढत्या लठ्ठपणाच्या समस्येला युद्धपातळीवर हाताळण्याची गरज व्यक्त करत आरोग्य आणीबाणीचा इशारा दिलाय.
लठ्ठपणा ही एकेकाळी श्रीमंत अशा पाश्चिमात्य देशांची समस्या मानली जायची. अलिकडच्या काही वर्षांत कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सुद्धा लठ्ठपणाची समस्या आढळून आली. मात्र इतर कोणत्याही देशापेक्षा भारतात ही समस्या एकदम वेगाने पसरत आहे.
कुपोषित किंवा मग कमी वजन असलेल्या लोकांचा देश म्हणून भारताची कधीकाळी ओळख होती. मात्र मागील काही वर्षात लठ्ठ लोकांच्या बाबतीत पहिल्या पाच देशांच्या यादीत भारताचा नंबर लागतो.
2016 मधील एका अंदाजानुसार, भारतातील 13.5 कोटी लोक लठ्ठ झाले आहेत. आरोग्य तज्ञांच्या मते, ही संख्या झपाट्याने वाढत आहे. देशातील कुपोषित लोकसंख्येची जागा आता लठ्ठ लोकांनी घेतली आहे.
सरकारच्या आरोग्य आणि सामाजिक निर्देशकांचे सर्वात व्यापक घरगुती सर्वेक्षण असलेल्या नॅशनल फॅमिली हेल्थ सर्व्हे (NFHS-5)च्या ताज्या आकडेवारीनुसार, जवळपास 23% पुरुष आणि 24% महिलांमध्ये बॉडी मास इंडेक्स (BMI) हे 25 आणि त्याहून अधिक असल्याचं आढळून आलं आहे. 2015-16 च्या तुलनेत ही वाढ 4% ने जास्त आहे. तर पाच वर्षाखालील 3.4% मुले लठ्ठ असल्याचं आकडेवारी सांगते. 2015-16 मध्ये ही टक्केवारी 2.1% एवढी होती.
यावर ओबेसिटी फाउंडेशन ऑफ इंडियाचे संस्थापक आणि चेन्नईतील सर्जन डॉ. रवींद्रन कुमेरन इशारा देतात की, "आपण भारतात तसेच जागतिक स्तरावर लठ्ठपणाच्या साथीशी सामना करत आहोत. आणि मला याची भीती वाटते की जर आपण यावर लवकरात लवकर काही उपाय केला नाही तर मात्र ही समस्या गंभीर स्वरूप धारण करू शकते"
बैठी जीवनशैली, स्वस्त आणि मेदयुक्त पदार्थांची सहज उपलब्धता यामुळे "आपल्यापैकी बहुतेकजण, विशेषतः भारतातील शहरी लोक शरीराने वेढब होत चालले आहेत." असं डॉ. कुमेरन सांगतात.
व्यक्तीची उंची आणि वजन लक्षात घेऊन जे मोजमाप केलं जातं त्याला बीएमआय (BMI) म्हटलं जातं. या बीएमआयमुळे लोकांच "सामान्य वजन" "लठ्ठपणा" "अति लठ्ठपणा" आणि "आत्यंतिक लठ्ठपणा" या प्रकारात वर्गीकरण करता येतं. बीएमआय ही जागतिक स्तरावर स्वीकारलेली संकल्पना आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन नुसार, 25 किंवा त्यापेक्षा जास्त बीएमआय असेल तर ती व्यक्ती लठ्ठ गटात मोडते.
मात्र दक्षिण आशियाई लोकसंख्येसाठी बीएमआयच्या प्रत्येक टप्प्यावर किमान दोन संख्या कमी करणं आवश्यक असल्याचं डॉ. कुमेरन आणि इतर अनेक आरोग्य तज्ञांना वाटतं. कारण आपण "सेंट्रल ओबेसिटी" च्या यादीत मोडतो. याचा अर्थ असा आहे की, आपल्या पोटावर लगेचंच चरबी जमा होते. आणि शरीरातील इतर वजनापेक्षा ही गोष्ट जरा जास्त धोकादायक आहे. म्हणून 23 बीएमआय असलेल्या भारतीयाचे वजन जास्त म्हणता येईल.
"जर बीएमआयचा 23 हा आकडा तुम्ही लठ्ठपणासाठी कट ऑफ पॉइंट घेतला तर मला वाटतं की, भारतातील निम्मी लोकसंख्या आणि त्यातही शहरी लोकसंख्या ही लठ्ठ गटात मोडेल." असं डॉ. कुमेरन म्हणतात.
डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, शरीरात जास्त चरबी असल्यास गैर-संसर्गजन्य रोगांचा धोका वाढतो. यात 13 प्रकारचे कर्करोग, टाइप -2 सारखे मधुमेह, हृदयाची समस्या आणि फुफ्फुसाच्या समस्या यांचा समावेश होतो. मागील वर्षभरात लठ्ठपणामुळे जागतिक स्तरावर 28 लाख मृत्यू झालेत.
इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ ओबेसिटी अँड मेटाबॉलिक डिसऑर्डर (IFSO) चे माजी अध्यक्ष डॉ. प्रदीप चौबे म्हणतात की, "प्रत्येकी 10 किलो जास्तीचं वजन आपलं आयुष्य तीन वर्षांनी कमी करतं. त्यामुळे जर एखाद्याचे वजन 50 किलोने जास्त असेल तर त्याचं आयुष्य 15 वर्षांनी कमी झालेलं असेल. कोव्हिड दरम्यान जे मृत्यू झाले त्यात जास्त वजन असलेल्या आणि लठ्ठ रूग्णांचं प्रमाण तिप्पट होतं."
डॉ. चौबेंनी भारतात सुमारे 20 वर्षांपूर्वी बॅरिएट्रिक शस्त्रक्रियेची सुरुवात केली होती. बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ही 40 किंवा त्याहून अधिक बीएमआय असलेल्या आणि धोकादायक वजनी गटात मोडणाऱ्या लठ्ठ लोकांवर उपचार करण्यासाठी शेवटचा उपाय म्हणून वापरली जाते. लठ्ठपणावर प्रभावी उपाय म्हणून ही शस्त्रक्रिया सर्वश्रुत आहे. मात्र याच्या मानसिक आणि सामाजिक प्रभावाबाबत मात्र तितकीशी चर्चा होताना दिसत नाही.
"आम्ही तीन वर्षांपूर्वी 1,000 व्यक्तींचं सर्वेक्षण केलं होतं. यात आम्हाला असं आढळून आलं की लठ्ठपणामुळे लैंगिक आरोग्यावर ही परिणाम होतो. यामुळे स्वप्रतिमा खराब झाल्याचं वाटून लोकांच्या मानसिकतेवर परिणाम होतो. यामुळे वैवाहिक जीवनात ही अडचणी येऊ शकतात."
आता या संदर्भात सिद्धार्थ मुखर्जींपेक्षा दुसरं कोण चांगलं सांगू शकेल असं वाटतं नाही. 56 वर्षांच्या सिद्धार्थ मुखर्जींनी 2015 मध्ये बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया केली होती.
ऍथलीट असताना सिद्धार्थ मुखर्जींचं वजन 80-85 किलो दरम्यान होतं. पुढे काही वर्षांपूर्वी त्यांचा अपघात झाला आणि या अपघातात त्यांची खेळाची कारकीर्द संपुष्टात आली.
ते सांगतात, "माझा आहार खेळाडूंसाठी सारखाचं होता. मात्र मी खूप तेलकट, मसालेदार खाल्लं, मी दारू प्यायलो. यामुळे माझं वजन वाढतचं राहील. आणि सरतेशेवटी ते 188 किलोपर्यंत वाढलं."
या वजनसोबतचं त्यांना अनेक आजारांनी ग्रासलं. त्यांना मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल आणि थायरॉईडच्या समस्या निर्माण झाल्या. 2014 मध्ये तर त्यांना श्वास घ्यायला त्रास होऊ लागला.
ते सांगत होते की, "झोपल्यावर मला श्वास घेता यायचा नाही म्हणून मी बसूनच झोपायचो. पण डॉ. चौबेंनी मला जीवनदान दिलं. माझं वजन साधारणपणे 96 किलोपर्यंत कमी झालं. आता मी बाइक चालवू शकतो, मी अभिनय करतो, मी सुट्टीवर जातो."
"एक काळ असा होता की मला पायऱ्या चढता येत नव्हत्या. आता मी एका दिवसात 17 ते 18 किलोमीटर चालू शकतो. मी गोड खाऊ शकतो, मी मला हवे तसे कपडे घालू शकतो."
लठ्ठपणा त्यांच्यासाठी शाप ठरला असल्याचं ते म्हणतात.
"जग अतिशय सुंदर आहे. आपली आपल्या कुटुंबांशी काहितरी बांधिलकी आहे. म्हणून स्वार्थी बनणं थांबवून लोकांनी त्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी असंच मी सांगेन."
डॉ. चौबे म्हणतात, बॅरिएट्रिक सर्जरी मुखर्जींसारख्या लोकांसाठी जीवन वाचवणारी असू शकते. पण वजन वाढण्याच्या धोक्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे ही यात सर्वात महत्वाची गोष्ट आहे.
सरकारने लठ्ठपणा हा आजार म्हणून घोषित करावा म्हणून डॉ. चौबेंनी प्रयत्न केले, मात्र त्यांचे हे प्रयत्न अयशस्वी ठरले.
सरकार संसर्गजन्य रोगांवर नियंत्रण ठेवण्याच्या प्रयत्नात व्यस्त आहे. त्यांचं संपूर्ण लक्ष हे संसर्गजन्य रोगांवर केंद्रित आहे. लाइफस्टाइल डिसीज अर्थात आपल्या जीवनशैलीशी निगडित आजारांना नियंत्रित करण्यासाठी सरकारकडे संसाधनांची कमतरता आहे. लठ्ठपणाशी संबंधित आजाराचं व्यवस्थापन करणं कठीण आणि खर्चिक आहे. यामुळे आरोग्य सेवा प्रणालीवर मोठा भार पडतो.
काही वर्षांपूर्वी, "सिन टॅक्स" ची चर्चा होती. हा टॅक्स, शरीराला अपायकारक असणाऱ्या खाद्यपदार्थ आणि पेयांवर लावण्यात येणार होता. हा टॅक्स लावल्यावर किंमती वाढतील आणि साहजिकच लोक हे पदार्थ खण्यापासून परावृत्त होतील. पण आरोग्य तज्ञ म्हणतात की, यांची विक्री करणाऱ्या कंपन्यांच्या पुशबॅकमुळे हा टॅक्स लावता आलाचं नाही.
डॉ. कुमेरन म्हणतात की, भारताने धूम्रपानाबाबत जी रणनीती अवलंबली तीच खाद्यपदार्थांच्या बाबतीत अवलंबली पाहिजे.
ते म्हणाले की, एक काळ असा होता की, अगदी फ्लाइटपासून ते कार्यालय आणि सार्वजनिक ठिकाणापर्यंत सर्वत्र धूम्रपान करण्यास परवानगी होती. पण आता त्यावर बंदी आहे. सरकारने मालिका आणि चित्रपटांमधील या दृश्यांवर डिस्क्लेमर देणं अनिवार्य केलंय. त्याचप्रमाणे धूम्रपान केल्याने भविष्यात जे गंभीर आजार उद्भवू शकतात त्यासंदर्भात इशारे सिगारेटच्या पाकिटांवर देणे बंधनकारक केलं आहे.
डॉ. कुमेरन पुढे म्हणतात की, वारंवार असे संदेश दिल्यास अपेक्षित असा प्रतिसाद मिळतो. अगदी त्याचपध्दतीने लठ्ठपणासाठी काही गोष्टी करणं आवश्यक आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)