चेतना राज : लिपोसक्शन ऑपरेशननंतर अभिनेत्रीचा मृत्यू, काय आहे प्रकरण?

    • Author, इम्रान कुरैशी
    • Role, बीबीसी हिंदीसाठी बंगळुरूमधून

कन्नड अभिनेत्री चेतना राज हिचा बंगळुरूमधील एका खासगी रुग्णालयात मृत्यू झाला आहे. तिने वजन कमी करण्यासाठी एक सर्जरी करून घेतली होती त्यामुळे तिची अवस्था बिघडत गेली, आणि त्यात तिचा मृत्यू झाला अशी तक्रार चेतनाच्या कुटुंबीयांनी केली आहे.

सोमवारी म्हणजे 16 मे रोजी तिचं ऑपरेशन झालं. त्यानंतर तिच्या फुप्फुसात पाणी भरल्यामुळे तिच्या त्रासात भर पडली.

बंगळुरू पोलिसांच्या उत्तर विभागाचे उपायुक्त अविनाश पाटील यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, "त्रास वाढल्यावर तिला एका दुसऱ्या रुग्णालयात नेण्यात आलं होतं. तिच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली आहे, त्यावर तपास सुरू आहे."

तक्रारीत दिलेल्या माहितीनुसार, "हे वैद्यकीय निष्काळजीपणाचं प्रकरण आहे. त्यामुळे आम्ही भादंविच्या कलम 174 नुसार या प्रकरणावर कारवाई करत आहोत. "

पोलिसांकडे तक्रार

चेतना राजने कन्नड टीव्हीवर गीता, दोरस्वामी अशा लोकप्रिय मालिकांत काम केलं होतं.

चेतना राजच्या स्थितीबद्दल एका डॉक्टरांनी पोलिसांना सर्वांत प्रथम माहिती दिली.

त्यांच्या रुग्णालयात एक भूलतज्ज्ञ चेतनाला 'निश्चेतावस्थेत' घेऊन आले होते अशी माहिती या डॉक्टरांनी पोलिसांना दिली.

तक्रारीनुसार "त्या भूलतज्ज्ञांनी या डॉक्टरांच्या रुग्णालयात आल्यावर चेतनाला फक्त हृद्यविकाराचा झटका आल्याचं सांगितलं होतं."

"आम्ही ठरलेली प्रक्रिया करुन पाहिल्यावरही तिच्या स्थितीत सुधारणा झाली नाही. तिला जेव्हा आणलं गेलं तेव्हा ती मृतच होती असं वाटत होतं."

माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार चेतनावर सोमवारी लिपोसक्शनचं ऑपरेशन झालं होतं.

लिपोसक्शन म्हणजे काय?

लिपोसक्शन म्हणजे जाडी कमी करण्याचं किंवा चरबी कमी करण्याचं ऑपरेशन.

डॉक्टरांनी या ऑपरेशनवर गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे.

लिपोसक्शनमुळे मेदाचे ग्लोब्युल्स फुप्फुसात जाऊ शकतात, असं डॉक्टर सांगतात.

या ऑपरेशनचा परिणाम दीर्घकाळ राहातो पण त्याचे अनेकदा वाईट परिणामही होतात.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)