दिव्या इंदौरा: बेपत्ता गायिकेचा 11 दिवसांनी सापडला मृतदेह, नेमकं घडलं काय?

प्रतीकात्मक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

हरियाणामधल्या रोहतकच्या महम भागात नॅशनल हायवेजवळ 29 वर्षीय लोकगायिकेचा अर्धनग्न अवस्थेतील मृतदेह सापडला.

हा मृतदेह संगीता उर्फ दिव्या इंदौरा नावाच्या तरूणीचा होता. ती दिल्लीतल्या जफरपूर भागातील रहिवासी होती.

या हरियाणवी गायिकेच्या हत्येप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती दिल्ली पोलिसांनी दिली आहे. संगीता 11 मे पासून आपल्या दिल्लीमधल्या घरातून बेपत्ता झाली होती.

या गायिकेच्या आई-वडिलांनी, सत्यवीर आणि संतरा यांनी दिल्ली पोलिसांवर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. पोलिसांनी योग्य वेळी आमची तक्रार दाखल करून घेतली असती, तर आमची मुलगी आज जिवंत असती, असं त्यांनी म्हटलं.

आई-वडिलांनी काय म्हटलं?

संगीताचे वडील सत्यवीर यांनी मीडियाशी बोलताना म्हटलं की, "दोघा आरोपींपैकी एक असलेला मोहित त्यांच्या मुलीला भिवानीला घेऊन गेला होता. एक म्युझिक अल्बम रेकॉर्ड करण्याचं कारण सांगत त्याने तिला घरातून नेलं होतं. म्युझिक अल्बम रेकॉर्ड करण्याऐवजी त्यानं दुसऱ्या आरोपीसोबत संधान बांधत आमच्या मुलीला अंमली पदार्थ देऊन तिची हत्या केली."

संगीताच्या आईनं सांगितलं, "आम्ही दिल्ली पोलिसांकडे गेलो होतो. आमच्या मुलीच्या जीवाला धोका आहे, असं आम्ही सांगितलं होतं. 21 मे रोजी आम्ही पोलिसांना लवकरात लवकर संगीताचा शोध घ्या, असंही म्हटलं होतं. पण त्यांनी आमचं काही ऐकलं नाही. खूप विनवण्या केल्यानंतर पोलिसांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करून घेतली, पण तिला शोधण्यासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. आमची मुलगी महम भागात असू शकते यासंबंधीचे काही पुरावेही त्यांना दिले. पण आमचं काही ऐकलं नाही."

मुलीच्या आई-वडिलांनी दोषींना शिक्षा देण्यासोबतच दिल्ली पोलिसांच्या जाफरपूर स्टेशनमधील कर्मचाऱ्यांविरोधातही कठोर कारवाईची मागणी केली आहे.

हरियाणवी गायिका

फोटो स्रोत, BBC/SATSINGH

मुलीचा मृतदेह 22 मे रोजी महमधल्या भैणी भैरों गावाजवळच्या रस्त्यालगत मिळाला होता. स्थानिक पोलिसांनी पीजीआयएमएस रोहतक इथे शवविच्छेदन करून घेतलं.

इंडियन एक्सप्रेस या वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार भीम आर्मीच्या सदस्यांनी मृत गायिकेसोबत पोलिसांविरोधात आंदोलन केलं आणि तिच्यावर सामूहिक बलात्कार झाल्याचा आरोपही केला.

कुटुंबाने सुरूवातीला मदतीसाठी केलेल्या विनंतीकडेही पोलिसांनी दुर्लक्ष केल्याचं आणि नंतर स्वतः तिथलं सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतल्याचं सांगितलं.

काय आहे पोलिसांचं म्हणणं?

पोलिसांनी मात्र सामूहिक बलात्कार झाल्याचं अजून सिद्ध झालं नसल्याचं म्हटलं आहे. मात्र, या गायिकेला अंमली पदार्थ दिले गेले, तिचं अपहरण करण्यात आलं आणि गळा दाबून तिची हत्या केली गेल्याचं पोलिसांनी सांगितलं.

सब इन्स्पेक्टर विकास यांचं म्हणणं आहे की, प्राथमिकदृष्ट्या पीडितेची गळा दाबून हत्या केल्याचं दिसत आहे. मात्र, शव विच्छेदनानंतरच योग्य कारण समोर येईल.

पोलिसांनी या प्रकरणी अटक केलेल्या दोन आरोपींपैकी एकाचं वय जवळपास वीस वर्षांचं आहे आणि तो एका फायनान्स कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करतो.

या प्रकरणातला दुसरा आरोपी रवीविरोधात गायिकेनं बलात्काराची तक्रार दाखल केली होती.

हरियाणवी गायिका

फोटो स्रोत, BBC/SATSINGH

पोलीस आणि कुटुंबियांनी सांगितलं की, मृत गायिका आणि रवी तीन वर्षांपूर्वी रिलेशनशिपमध्ये होते. मात्र रवीनं वारंवार त्रास दिल्यानंतर हे नातं संपुष्टात आलं.

22 मे रोजी रोहित आणि अनिल नावाच्या दोन आरोपींना अटक केली आहे.

11 मे रोजीच रोहतकमध्ये मुलीची हत्या करण्यात आल्याची कबुली आरोपींनी दिल्याचं पोलिसांनी म्हटलं होतं.

पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजही ताब्यात घेतलं आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये पीडिता गुन्हा घडण्याआधी महमजवळ एका ठिकाणी जेवण करताना दिसत आहे.

स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, दिल्लीमध्ये 365 कलमांतर्गत आधीच एफआयआर दाखल करण्यात आल्यामुळे शवविच्छेदनानंतर हे प्रकरण त्यांच्याकडे सोपवलं जाईल.

हे पहिलंच प्रकरण नाहीये

हरियाणवी गायिका संगीता उर्फ दिव्या इंदौरा हिच्या हत्येचं एकमेव प्रकरण नाहीये. ऑक्टोबर 2017 मध्ये सोनिपतमधली एक हरियाणवी गायिका हर्षिता दहियाला दिल्लीच्या तिहार जेलमध्ये बंद केलेल्या गँगस्टर्सनी सात गोळ्या घातल्या होत्या.

त्यानंतर जानेवारी 2018 मध्ये ममता शर्मा नावाच्या हरियाणवी गायिकेचीही गोळी घालून हत्या करण्यात आली होती.

हरिद्वारमध्ये 2012 साली हरियाणवी गायिका बीना चौधरीची गोळी घालून हत्या केली गेली.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)