सागर गोरखे : भीमा कोरेगाव खटल्यातील आरोपीचं कारागृहात उपोषण

सागर गोरखे

फोटो स्रोत, FACEBOOK/SAGARGORAKHE

फोटो कॅप्शन, सागर गोरखे

एल्गार परिषद-भीमा कोरेगाव खटल्यातील अटक आरोपी सागर गोरखेने कारागृहात गेल्या चार दिवसांपासून उपोषण सुरू केलंय. सागर गोरखे नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात कैदेत आहे.

कारागृह प्रशासनाविरोधात छळवणूक करण्याचा आरोप करत त्याने अन्न-पाणी सोडलंय. गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना लिहिलेल्या पत्रात, त्यांनी कारागृह प्रशासना विरोधात तक्रारीचा पाढा वाचलाय.

दुसरीकडे जेल प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. "सागर गोरखे यांचे आरोप खोटे आहेत. त्यांनी अन्न-पाणी सोडल्याबाबत आम्ही कोर्टाला माहिती देणार आहोत," असं तळोजा मध्यवर्ती कारागृहाचे अधीक्षक यू. टी. पवार बीबीसीशी बोलताना म्हणाले.

सागर गोरखे यांनी आमरण उपोषण का सुरू केलंय? गृहमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी काय म्हटलंय?

सागर गोरखेने का सुरू केलं उपोषण?

एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपी सागर गोरखेने 20 मे पासून उपोषण सुरू केलंय. तळोजा जेल प्रशासनाकडून मिळणाऱ्या छळवणुकीविरोधात आमरण उपोषण करत असल्याचं त्याने गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना पाठवलेल्या पत्रात म्हटलंय.

"मी आणि माझ्या सहआरोपींसाठी कारागृह छळछावणी बनली आहे. कारागृह प्रशासन पूर्वग्रहदूषित मानसिकतेने व्यवहार करतंय," असा आरोप त्यांनी केलाय. त्यामुळे आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्याचे त्याने म्हटलंय.

"मला पाठदुखी, सांधेदुखी आणि त्वचेच्या अॅलर्जीचा आजार आहे. पण, जेलमधील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून जाणीवपूर्वक मला उपचार दिले जात नाहीत. कोर्टाने उपचारासाठी बाहेरच्या रुग्णालयात पाठवण्याबाबत आदेश देऊनही जेलप्रशासन आणि वैद्यकीय अधिकारी त्यांचं पालन करत नाहीत," असा त्याने आरोप केलाय.

भीमा कोरेगाव

तळोजा जेलमध्ये एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणातील अटक आरोपी गौतम नवलखा, रमेश गायचोर, सुधीर ढवळे, महेश राऊत, सुधीर गडलिंग, आनंद तेलतुंबडे आणि हनी बाबू यांना कैदेत ठेवण्यात आलंय.

या प्रकरणातील आरोपी फादर स्टेन स्वामी यांचा गेल्यावर्षी मुंबईच्या एका रुग्णालयात मृत्यू झाला. तर सामाजिक कार्यकर्त्या सुधा भारद्वाज यांना कोर्टाकडून जमीन मिळालाय.

"मला आणि माझ्या सहआरोपींना अनेक आजार आहेत. मात्र उपचारांवर लक्ष दिलं जात नाही," असं सागर गोरखेने पुढे म्हटलंय.

"कारागृह प्रशानाकडून पाणी विक्री सुरू आहे," असा गंभीर आरोप त्यांने केला आहे.

गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांना लिहिलेल्या पत्राची एक प्रत सागर गोरखेने सेशन्स कोर्ट, कारागृह प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी आणि राज्य मानवी हक्क आयोगाला पाठवली आहे.

सागर गोरखेची मागणी

एल्गार परिषद प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ वैद्यकीय सुविधा देण्यात याव्यात. आम्ही लिहिलेली पत्र बेकायदेशीररित्या स्कॅन केली जातात. हे तात्काळ बंद करण्यात यावं, अशा मागण्या त्याने केल्या आहेत.

जेलच्या नियमांनुसार कैद्याला दररोज 135 लीटर पाणी देणं बंधनकारक आहे. पण प्रत्यक्षात फक्त 15 लीटर पाणी मिळतं. जेल प्रशासनाकडून पाण्याची विक्री केली जाते. यामुळे कैद्याच्या बॅरेकमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलंय. कैद्यांना दररोज योग्य पाणी पुरवठा झाला पाहिजे, अशीही त्याची मागणी आहे.

जेलमध्ये कैद्यांना भेटण्यासाठी त्यांचे नातेवाईक येतात. त्यांच्यासाठी योग्य सोयीसुविधा तयार करण्यात याव्यात, असंही त्याने लिहिलं आहे.

जेल प्रशासनाने फेटाळले आरोप

सागर गोरखेने केलेल्या आरोपाप्रकरणी आम्ही जेल प्रशासनाकडून त्यांची बाजू जाणून घेतली. तळोजा मध्यवर्ती कारागृह प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावलेत.

भीमा-कोरेगाव आंदोलन

फोटो स्रोत, BBC/MAYURESH KONNUR

सागर गोरखेने आमरण उपोषण सुरू केल्याचं कारागृह अधीक्षक यू. टी. पवार यांनी मान्य केलं. ते म्हणाले, "उपोषणाबाबत आम्ही कोर्टाला माहिती देणार आहोत."

बीबीसीशी बोलताना ते पुढे म्हणाले, "कोर्टाकडून या आरोपांबाबत काही विचारणा झालेली नाही. कोर्टाने विचारणा केली की आम्ही योग्य माहिती देऊ."

दरम्यान, सागर गोरखेने जेल प्रशासनावर पाणी न पुरवण्याचा आरोप केलाय. यावर अधीक्षक सांगतात, "खारघर भागात एप्रिल-मे महिन्यात पाणी पुरवठा कमी होतो. पण, या आरोपींच्या बॅराकमध्ये पाण्याची टाकी बसवण्यात आली आहे. त्यामुळे त्यांना मुबलक पाणी उपलब्ध आहे."

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी लहान-सहान गोष्टीवर आरोप करत असतात. त्यांचे आरोप काही नवीन नाहीत, असं म्हणत जेल अधीक्षकांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

अंडरवर्ल्ड, दहशतवाद आणि नक्षलींशी संबंध असलेल्या कैद्यांना किंवा दोषींना फोन न देण्याबाबत सरकारचे आदेश आहेत. त्यामुळे फोन दिला जात नाही, असं जेल अधीक्षक पत्रकारांना माहिती देताना म्हणाले.

कोण आहे सागर गोरखे?

सप्टेंबर 2020 मध्ये राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) सागर गोरखेला एल्गार परिषद-भीमा कोरेगाव प्रकरणी अटक केली होती. गेल्या दोन वर्षांपासून सागर गोरखे जेलमध्ये कैदेत आहे.

सागर गोरखे भीमा कोरेगाव शौर्य दिन प्रेरणा अभियानाशी जोडलेला आहे. जवळपास 15 वर्षं तो कबीर कला मंचाचा कलाकार आहे. 2017 मध्ये या संघटनेकडून एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. भीमा कोरेगावला 200 वर्षं पूर्ण होत असल्याने, पुण्याच्या शनिवार वाड्यात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

कबीर कला मंचावर प्रतिबंधित संघटना CPI (Maoist) बरोबर संबंध असल्याचा आरोप केला जातो.

भीमा कोरेगाव हिंसाचारानंतर एल्गार परिषद प्रकरणी पुणे पोलिसांनी तपास सुरू केला. त्यानंतर हे प्रकरण राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे चौकशीसाठी देण्यात आलं.

राष्ट्रीय तपास यंत्रणेने सागर गोरखेला अटक केल्यानंतर माहिती दिली होती की, "नक्षली विचार प्रसारित केल्याबद्दल आणि नक्षलींशी संबंध असल्याच्या आरोपावरून ही अटक करण्यात आली आहे. जंगलात नक्षलींसोबतच्या भेटीमध्ये त्याने शस्त्र चालवण्याचं आणि स्फोटकांचं ट्रेनिंग घेतलं आहे. त्याचसोबत, एल्गार परिषद कार्यक्रमात चिथावणीखोर वक्तव्य आरोपींनी केली आहेत."

सागर गोरखेला कलम 153 (a) दोन गटांमद्ये वैमनस्य निर्माण करणं, 505 1 (B) लोकांमध्ये दहशत पसरवणं आणि कलम 117 अंतर्गत अटक करण्यात आली आहे.

राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून अटकेआधी सागर गोरखेने एक व्हीडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. त्यात त्याने नक्षलींशी संबंध असल्याचं मान्य करा, तुमच्यावर कारवाई करणार नाही. माफीनामा लिहून द्या, असा NIA कडून दबाव असल्याचा आरोप केला होता.

एल्गार परिषद आरोपींची उपोषणाची ही पहिली वेळ नाही

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपी स्टेन स्वामी यांच्या मृत्यूनंतर आरोपींनी जेलमध्ये एक दिवसाचं लाक्षणिक उपोषण केलं होतं. तर, केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केल्यानंतर याला पाठिंबा देत भीमा कोरेगाव प्रकरणातील आरोपींनी एक दिवस उपोषण केलं होतं.

एल्गार परिषद प्रकरणातील आरोपींनी तपास यंत्रणा, पुणे पोलीस आणि केंद्र सरकारच्या विरोधात वेळोवेळी आरोप केले आहेत.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)