आलम आरा : बॉलीवूडला जन्म देऊन हरवलेल्या चित्रपटाचा शोध

    • Author, सौतिक बिस्वास
    • Role, बीबीसी प्रतिनिधी

भारताच्या पश्चिमेकडे असणारं शहर मुंबई. इथल्या पुरालेखशास्त्रज्ञांच्या एका गटाला या महिन्याच्या सुरुवातीला भारतातील पहिल्या बोलपटाशी संबंधित एकमेव दुवा सापडलाय.

पुरस्कार विजेते चित्रपट निर्माता, अर्काईव्हिस्ट आणि पुनर्संचयक असलेले शिवेंद्रसिंग डुंगरपूर यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम राबविण्यात आली. या पुरालेखशास्त्रज्ञांच्या गटाने एका व्हिंटेज मशीनचा शोध घेतला.

या मशीनचा वापर 1931 साली बनवण्यात आलेल्या 'आलम आरा' या चित्रपटाच्या प्रिंट तयार करण्यासाठी केला जात होता. या मशिनव्यतिरिक्त आज चित्रपटाच्या कोणत्याही गोष्टी अस्तित्वात नाहीत.

शिकागोमध्ये तयार झालेली ही 'बेल अँड हॉवेल' फिल्म प्रिंटिंग मशिन साड्यांच्या दुकानात पडून होती. ही मशीन चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक अर्देशीर इराणी यांच्या मालकीची होती. नंतर हे मशीन नलिन संपत यांनी खरेदी केले. त्यांच्याकडे मुंबईस्थित फिल्म स्टुडिओ आणि प्रक्रिया प्रयोगशाळा देखील होती.

"आलम आराशी संबंधित ही एकमेव जिवंत कलाकृती आहे. याव्यतिरिक्त चित्रपटाशी संबंधित दुसरं काहीच शिल्लक नाही," असं डुंगरपूर म्हणतात.

हे मशिन खरेदी करण्यासाठी संपत यांनी 1962 मध्ये 2500 रुपये मोजले होते. त्यांच्या प्रयोगशाळेत 2000 सालापर्यंत सरकारी मालकीच्या फिल्म्स डिव्हिजनने तयार केलेल्या चित्रपटांची छपाई व्हायची.

"हे दुसरं असं प्रिंटिंग मशीन होते पण ज्याला खूप भावनिक मूल्य आहे. जेव्हा सिनेमे डिजिटल व्हायला लागले तेव्हा याचा वापर बंद झाला," संपत म्हणतात.

डुंगरपूर मागील काही दशकापासून मुंबईस्थित चित्रपट संग्रहण असलेलं फिल्म हेरिटेज फाऊंडेशन ना नफा तत्वावर चालवतात. त्यांनी 'आलम आरा'ची कॉपी शोधण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना त्यात यश आलं नाही.

त्यांनी सोशल मीडियावर ही लोकांना आवाहन केलं होतं. यातूनचं अल्जेरियातील एका फिल्म आर्काइव्हकडे चौकशी करण्यासंदर्भात त्यांना सांगण्यात आलं. त्या अर्काइव्हमध्ये अनेक जुने भारतीय चित्रपट आहेत. मात्र अर्काईव्हने तिथं जाऊन तपासणी करण्यास सांगितलं, जे डुंगरपूर यांना शक्य नव्हतं.

आणखी एक क्लू मिळाला होता, तो म्हणजे इराणमधील फिल्म अर्काइव्ह. इराणी जेव्हा मुंबईत आलम आरा या चित्रपटाचं शूटिंग करत होते, त्याचवेळी त्यांचा स्टुडिओ लॉर गर्ल नावाचा फारसी भाषेतील पहिला बोलपट बनवत होता.

"इराणी यांनी 'आलम आरा' आणि 'लॉर गर्ल' या दोन्ही चित्रपटांसाठी समान पोशाख परिधान केलेले समान पार्श्वभूमी असलेले अभिनेते कास्ट केले होते. 'आलम आरा' आज अस्तित्वात नाही. मात्र 'लोर गर्ल' इराणमधील अभिलेखागारांमध्ये उपलब्ध आहे." असं डुंगरपूर सांगतात.

भारतातील प्रसिद्ध चित्रपट अभ्यासक आणि पुरातत्त्वकार पीके नायर यांनी म्हटलं होते की, आलम आरा 'कायमस्वरुपी हरवली' आहे यावर माझा विश्वास नाही. नायर 2016 मध्ये मरण पावले. ते स्वतः चित्रपटाच्या शोधात होते. त्यांनी इराणी कुटुंबातील ह्यात सदस्यांची भेट घेतली होती.

इराणी कुटुंबातील एका सदस्याने त्यांना सांगितलं होतं की, "कुठेतरी एक दोन रील पडलेली असावी. दुसर्‍याने सांगितलं की त्याने रिल्समधून चांदी काढल्यानंतर त्या तीन रील्सची विल्हेवाट लावली होती. 'आलम आरा' हा नायट्रेट फिल्मवर चित्रित करण्यात आला होता, त्यात इतर चित्रपटांच्या तुलनेत जास्त चांदीची सामग्री होती.

डुंगरपूर सांगतात की, कुटुंबावर वाईट वेळ आली तेव्हा पैसे मिळवण्यासाठी त्यांनी चांदीसाठी पैसे काढून चित्रपट नष्ट केले असावेत.असंख्य चित्रपटांच्या बाबतीत असंच घडलं असावं.

चित्रपट संग्रहित ठेवण्यात भारताची कामगिरी अत्यंत वाईट आहे. 1912 ते 1931 दरम्यान बनवलेल्या 1,138 मूकपटांपैकी बहुतेक चित्रपट आज अस्तित्वात नाहीत. पुण्यातील सरकारी फिल्म इन्स्टिट्यूटने यापैकी 29 चित्रपट संग्रहित केले आहेत. दुकान, घरं, तळघर, गोदामं आणि अगदी थायलंडमधील सिनेमा हॉलमध्ये चित्रपटांच्या प्रिंट आणि निगेटिव्ह बेवारस पडल्याचं आढळलंय.

चित्रपट निर्माते मृणाल सेन यांना 1980 मध्ये एका जुन्या घरात एका जुन्या बंगाली टॉकीच्या प्रिंट्स पडलेल्या आढळल्या.

पण 'आलम आरा' हा सर्वात महत्त्वाचा चित्रपट होता जो आज अस्तित्वात नाही. 1929 च्या हॉलीवूड रोमँटिक ड्रामा शो 'बोट'पासून प्रेरित आणि सुरुवातीच्या बोलपटांप्रमाणेच थिएटरमध्ये तुफान चाललेला हा चित्रपट. एका पौराणिक राज्यावर आधारित या चित्रपटाचे वर्णन 'राजवाड्यातील कारस्थान, ईर्ष्या, प्रणय आणि युद्ध करणाऱ्या राण्यांची गोष्ट' असं करण्यात आलंय.

ब्रिटिश फिल्म इन्स्टिट्यूटने याला 'राजकुमार आणि एका जिप्सी मुलीत फुलणाऱ्या प्रेमाचा रोमँटिक ड्रामा शो' म्हटलं आहे.

124 मिनिटांच्या चित्रपटाचं चित्रीकरण बंद दाराआड करण्यात आलं होतं जेणेकरुन आवाज बाहेर येऊ शकेल. ज्या स्टुडिओमध्ये हे चित्रीकरण करण्यात आलं तिथं मुंबईच्या रेल्वे ट्रॅक होता. आवाजाचा अडथळा टाळण्यासाठी क्रूने रात्रीच्या वेळी जेव्हा गाड्या धावत नाहीत आणि कंपनांमुळे मजला थरथरत नाही त्या रात्री शूट केलं.

साऊंड रेकॉर्ड करण्यासाठी कोणताही बूम माईक नसल्यामुळे, उर्दू आणि हिंदीमध्ये बोलणाऱ्या अभिनेत्यांच्या आजूबाजूला 'छुप्या जागांवर' मायक्रोफोन ठेवलेले होते. ते कॅमेऱ्यापासून लपलेले होते. संगीतकार झाडांवर चढायचे किंवा लपायचे आणि साउंडट्रॅक गाण्यांसाठी त्यांची वाद्य वाजवली जायची. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, या चित्रपटात वजीर मोहम्मद खान, एका वृद्ध व्यक्तीच्या भूमिकेत होते. आणि त्यांनीच भारतीय चित्रपटात पहिलं वहिलं गाणं गायलं होत.

शाहिद हुसेन मन्सूरींकडे 'आलम आरा'ची एकमेव विद्यमान पुस्तिका आहे

अर्देशीर इराणी यांनी एका मुलाखतकाराला सांगितलं होतं की, "आमच्यासाठी मशीन असेंबल करण्यासाठी बॉम्बेत (आता मुंबई) आलेल्या मिस्टर डेमिंग या परदेशी तज्ञाकडून साऊंड रेकॉर्डिंगची बेसिक माहिती करून घेतली होती. मिस्टर डेमिंग यांनी निर्मात्यांना प्रतिदिन 100 रुपये आकारले.

"त्या काळात ही एक मोठी रक्कम होती, जी आम्हाला परवडत नव्हतं. म्हणून मी इतरांच्या मदतीने चित्रपट रेकॉर्ड करण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली," असं ते म्हणाले.

हा चित्रपट 14 मार्च 1931 रोजी प्रदर्शित झाला. आणि काही आठवड्यांसाठी विकला गेला. चित्रपटगृहांबाहेरील गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना बोलवावं लागलं. एका समीक्षकाने म्हटलं होतं की "गाणं आणि नृत्य या गोष्टी एकत्र ठेवण्यासाठी चित्रपटाच्या कथानकाने थोड जास्त काम केलं." चित्रपटाची नायिका असलेली झुबेदा "कामुकता आणि निरागसता" यामुळे खूप गाजली.

प्रसिद्ध भारतीय नृत्यांगना सितारा देवी यांनी हा चित्रपट पाहिलायं. त्या सांगतात की, "हा एक प्रचंड संवेदनशील चित्रपट होता. टायटल कार्ड वाचून लोकांना मूक चित्रपट बघायची सवय होती. पण आता पात्रं बोलू लागली होती. लोक थिएटरमध्ये म्हणत होते आवाज कुठून येतोय?"

मग आलम आराच्या संबंधी कोणत्या गोष्टी उरतात. तर काही चित्र, पोस्टर्स आणि प्रचारात्मक पुस्तिका. मुंबईत फिल्म प्रॉप्स विकण्याचं दुकान असणारे शाहीद हुसेन मन्सूरी, यांच्याकडे ही पुस्तिका आहे. ते सांगतात की, "आता जवळपास 60 वर्षांपासून हे आमच्यासोबत आहे. मी ऐकलयं की हा एकच पुरावा उपलब्ध आहे. आज या गोष्टींची किंमत कोणालाच माहीत नाहीये."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)