चंद्रमुखी : अमृता खानविलकरला प्रसाद ओकने घातली होती 'ही' अट

    • Author, प्राजक्ता पोळ
    • Role, बीबीसी मराठीसाठी

"चंद्रा हे पात्र फक्त लावणी सम्राज्ञी नाहीये. ती केवळ नृत्यांगनाही नाहीये. ती प्रेमिका आहे. कृष्णभक्त आहे. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये चंद्रा आणि चंद्रमुखीमध्ये प्रत्येक स्त्री आहे," अभिनेत्री अमृता खानविलकर सांगते.

अमृता आणि आदिनाथ कोठारे यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'चंद्रमुखी' हा चित्रपट आज म्हणजे 29 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने बीबीसी मराठीच्या प्रतिनिधी प्राजक्ता पोळ यांनी अमृता खानविलकरशी संवाद साधला.

यावेळी बोलताना अमृताने चंद्राच्या भूमिकेबद्दल, त्यासाठी केलेल्या तयारीबद्दल, चित्रपटातील गाण्यांबद्दल काही गोष्टी शेअर केल्या.

'चंद्रमुखी ही प्रत्येक कलाकाराची कथा'

चंद्रमुखी या चित्रपटाबद्दल बोलताना अमृतानं म्हटलं, "चंद्रा फक्त एक लोककलावंत नाहीये किंवा लावणी सम्राज्ञी नाहीये. चंद्रमुखी हा सिनेमा प्रेमाचा आहे. बलिदानाचा आहे. यात राजकारणही आहे आणि त्यात जी प्रेमकहाणी दडली आहे, त्याचाही आहे.

चंद्रा ही कृष्णभक्त आहे. स्वतःच्या कलेसाठी, ती कला लोकांसमोर सादर करण्यासाठी धडपडत आहे. आपली लोककला वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवण्याचं तिचं ध्येय आहे. चंद्रा ही प्रत्येक कलाकाराची कथा आहे."

हा चित्रपट विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कादंबरीवर आधारित आहे.

चित्रपटाआधी ही पुस्तक वाचलं होतं का, या प्रश्नावर उत्तर देताना अमृता खानविलकर यांनी म्हटलं, "मी जवळपास अठरा वेळा ते पुस्तक वाचलं आहे. जेव्हा पहिल्यांदा हे पुस्तक वाचलं, तेव्हा मी लंडनच्या फ्लाईटमध्ये होते. सात ते आठ तासांत एका बैठकीत मी ती कादंबरी वाचली. विश्वास पाटील यांची ही कादंबरी अतिशय अजरामर अशी आहे. विश्वास पाटील यांची चंद्रमुखी ही जी कादंबरी आहे, त्याची व्याप्ती ही इतकी मोठी आहे की, त्यावर असा एखादा सिनेमाच तयार व्हायला हवा होता."

कोरोना काळात रखडलं होतं शूट

हा चित्रपट करताना कोरोना काळातल्या लॉकडाऊनमुळे काही अडचणीही आल्या होत्या. या काळात इतका भव्य चित्रपट शूट करणं हेच मोठ्ठं आव्हान होतं, असं अमृताने म्हटलं.

"चंद्रमुखी हे आमचं बाळ अडीच वर्षांचं आहे. सहा-सात महिने याची स्क्रिप्ट बनत होती. स्क्रिप्ट हातात आल्यानंतर आम्ही आठ महिन्यांचे वर्कशॉप केले. त्यानंतर कोरोना काळातला पहिला लॉकडाऊन आणि दुसरा लॉकडाऊन या दरम्यान आम्हाला जो तीन-चार महिन्यांचा गॅप मिळाला, त्यात आम्ही हा चित्रपट शूट केला," असं अमृतानं म्हटलं.

लावणी कलावंतिणीची भूमिका साकारताना 'अशी' केली तयारी

तू 'वाजले की बारा' ही लावणी केली होतीस. पण हे गाणं अगदी पारंपरिक लावणी स्वरूपातलं नव्हतं. चंद्रमुखी चित्रपटाचं तसं नाहीये. हा चित्रपटच कलावंतिणीच्या जीवनावर आहे. त्यामुळे या चित्रपटात लावणी साकारताना काय वेगळी तयारी केली होती, असा प्रश्न अमृताला विचारला.

या प्रश्नाचं उत्तर देताना अमृतानं सांगितलं की, तिनं ब्लॅक अँड व्हाईटपासून सगळे सिनेमे पाहिले, ज्यामध्ये लावणी किंवा लोककला आहे.

"मधु कांबीकर यांचं 'श्रावणातलं ऊन मला झेपेना' हे गाणं माझं अत्यंत लाडकं आहे. त्यांनी ज्याप्रकारच्या अदा या गाण्यात केल्या आहेत, त्या आत्मसात करण्याचा प्रयत्न मी केला आहे."

'चंद्रमुखी'तल्या गाण्यांचं श्रेय अमृतानं कोरिओग्राफर दिपाली विचारे आणि आशिष पाटील यांनाही दिलं.

तिनं म्हटलं, "दिपाली विचारे आणि आशिष पाटील हे माझे दोन्ही कोरिओग्राफर हे उत्तम नृत्यदिग्दर्शक आहेत. मी या दोघांकडेही अधूनमधून चंद्रमुखीसाठी वर्कशॉप करत होते. मला आशिषचा बाज खूप आवडतो. दुसरीकडे मला दिपाली ताईची ग्रेसही आवडते. चंद्रा हे गाणं दिपाली विचारेंनी कोरिओग्राफ केलंय आणि बाई गं हे गाणं आशिष पाटील यांनी कोरिओग्राफ केलंय. अत्यंत वेगळे कोरिओग्राफर या चित्रपटाला लाभले आहेत. आणि हे नृत्य 'चंद्रमुखी' करते, अमृता खानविलकर करत नाहीये."

चंद्रा साकारण्यासाठी प्रसाद ओकनं घातली 'ही' अट

चंद्रमुखीची गाणी पाहताना अमृताचं वजन वाढल्याचं दिसंत आहे. चंद्रासाठी अमृतानं तब्बल आठ किलो वजन वाढवलं होतं.

अमृतानं सांगितलं, "माझे दिग्दर्शक प्रसाद ओक यांनी मला आधीच सांगितलं होतं की, मला तू बारीक, झिरो फिगर वगैरे नको आहेस. मी आयुष्यात पहिल्यांदा वजन वाढवलं होतं. जवळपास आठ किलोंनी माझं वजन वाढलं होतं. जेव्हा मी शूटिंग सुरू केलंस तेव्हा मी 60 किलोंची होते. माझं आयुष्यात इतकं वजन कधी वाढलं नव्हतं, मी 50-55 या रेंजमध्ये असायचे. पण माझ्या दिग्दर्शकाची तशी अटच होती की, नऊवारीमध्ये चंद्राचा बांधा सुबक दिसायला हवा. म्हणून हे वजन वाढवलं."

पण मधल्या काळात लॉकडाऊन होता. त्याकाळात भूमिकेसाठी म्हणून वाढवलेलं वजन राखणं किती कठीण होतं, या प्रश्नावर अमृतानं म्हटलं, "फार नाही."

"मी खूप खाल्लं, झोपले आणि थोडंफार वर्क आउट केलं. मजेत गेली दोन वर्षं...छान सगळं गोड, तुपातलं खाल्लं आणि चंद्रा साकारायला तयार झाले. दोन वर्षं हे वजन मेन्टेन केलं होतं. चित्रपट शूट झाला, डबिंगला आम्ही सुरूवात केली त्यानंतर मी वजन कमी करायला सुरूवात केली. "

चंद्राची भूमिका तुझ्यासाठी काय आहे?

आपल्या भूमिकेचं सार सांगताना अमृताने म्हटलं, "चंद्रा हे पात्र फक्त लावणी सम्राज्ञी नाहीये. ती केवळ नृत्यांगनाही नाहीये. ती प्रेमिका आहे. कृष्णभक्त आहे. मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीमध्ये चंद्रा आणि चंद्रमुखीमध्ये प्रत्येक स्त्री आहे. कारण झोकून देऊन स्वतःच्या कलेसाठी काहीतरी करणं, झोकून देऊन प्रेम करणं काय असतं हे स्त्रीलाच जमू शकतं. आणि त्याचंच प्रतिबिंब म्हणजे चंद्रमुखी आहे."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)