You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
अल्लू अर्जुन : 19 वर्षं, 22 सिनेमे, 19 हिट, असा आहे 'पुष्पा'पर्यंतचा प्रवास
- Author, रवी तुंगाला
- Role, बीबीसीसाठी
अल्लू अर्जुनला 2021च्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोकृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला आहे.
तेलुगू अभिनेता अल्लू अर्जुनच्या चित्रपटांविषयी बोलताना 'पुष्पा' या चित्रपटाच्या आधी आणि नंतर असे दोन भाग पडल्याचं दिसतं. 'गंगोत्री' या पहिल्या चित्रपटापासून 'पुष्पा'पर्यंतचा अल्लू अर्जुनचा प्रवास कसा राहिला आहे, याचा हा आढावा...
कुटुंबीय, मित्रपरिवार आणि चाहते अल्लू अर्जुनला प्रेमाने 'बनी' म्हणतात.
गेल्या 19 वर्षांमध्ये अल्लू अर्जुनने 14 दिग्दर्शकांसोबत 22 चित्रपट केले असून त्यातील 19 चित्रपटांनी तिकीटखिडकीवर जोरदार कमाई केली. अर्थात, त्याच्या कारकीर्दीचा अंदाज केवळ या आकडेवारीवरून येणार नाही. 'गंगोत्री' या पहिल्या चित्रपटापासून त्याच्या अभिनयामध्येही महत्त्वाचा बदल होत आलेला आहे.
सर्व प्रकारच्या तेलुगू प्रेक्षकांना भुरळ घालणाऱ्या मोजक्या अभिनेत्यांमध्ये अल्लू अर्जुनचा समावेश होतो. 'पुष्पा' या नुकत्याच गाजलेल्या चित्रपटाद्वारे त्याने हिंदी प्रेक्षकांनाही तितकंच प्रभावित केल्याचं स्पष्ट झालं.
अल्लू अर्जुनचा पहिला चित्रपट 'गंगोत्री' मार्च 2003 मध्ये प्रदर्शित झाला. ज्येष्ठ दिग्दर्शक के. राघवेंद्र राव यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं.
पहिल्या चित्रपटामध्ये अभिनय करत असताना अल्लू अर्जुनला त्याचे वडील आणि आघाडीचे निर्माते अल्लू अरविंद यांचा आणि त्याचे मामा अभिनेते चिरंजीवी यांचा मोठा आधार लाभला होता. परंतु, त्यानंतरचं यश मात्र त्याने स्वतःच्या कष्टाने मिळवलेलं आहे.
'गंगोत्री'मधील अजाण सिंहाद्री हे पात्र आणि 'पुष्पा'मधील पुष्पाराज हा सराईत तस्कर यामध्ये बराच फरक आहे. 'गंगोत्री' प्रदर्शित झाला तेव्हा अल्लू अर्जुन केवळ 21 वर्षांचा होता. नवोदित कलाकार म्हणून त्याचा स्वतःचा अजाणपणा आणि अवघडलेपणा चित्रपटातील पात्राच्याही स्वभावाशी जुळणारा होता.
पहिल्या चित्रपटातील त्याच्या कामावर बरीच टीका झाली. पण, पुढच्याच वर्षी आलेल्या 'आर्या' या चित्रपटात मात्र त्याने स्वतःच्या अभिनयाने टीकाकारांना आपलंसं केलं.
अल्लू अर्जुने पडद्यावर रंगवलेली बहुतांश पात्र प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली आहे. 'आर्या', 'आर्या 2', 'हॅपी', 'जुलाई', या चित्रपटांमध्ये त्याने लोकांच्या चेहऱ्यावर स्मित फुलवणाऱ्या उत्साही भूमिका केल्या, तर 'परुगू', 'वेदम्', 'वरुडू' या चित्रपटांमधील त्याच्या भूमिका लोकांच्या डोळ्यांमधून अश्रू काढणाऱ्या होत्या.
अल्लू अर्जुन प्रत्येक पात्रावर स्वतःचा ठसा उमटवण्यासाठी प्रयत्नशील असतो. त्याचा चित्रपट भरपूर कमाई करणारा ठरला, तरी तो अत्यानंदी होत नाही किंवा एखाद्या चित्रपटाने खराब कामगिरी केली, तरी निराश होत नाही. 'ना पेरू सूर्या' या चित्रपटाचं अपयश त्याने उमदेपणाने स्वीकारलं.
तुलनेने अल्लू अर्जुनच्या चित्रपटांमधील कारकिर्दीवर कमी टीका झालेली आहे. पण 2016 साली हैदराबादमध्ये चित्रपटांशी संबंधित एका कार्यक्रमात त्याने केलेलं विधान टीकेचं लक्ष्य ठरलं होतं. 'मेगास्टार' चिरंजीवीचा धाकटा भाऊ आणि विख्यात अभिनेता पवन कल्याण याच्याबद्दल काही बोलावं, अशी मागणी त्या कार्यक्रमात उपस्थित चाहत्यांनी अल्लू अर्जुनकडे केली.
पण अल्लू अर्जुन म्हणाला, "भावा, मी यावर काहीच बोलणार नाही." त्याचे हे उद्गार उद्धटपणाचे मानले गेले आणि पवन कल्याणच्या चाहत्यांनी त्यावर जोरदार टीका केली.
मायकल जॅक्सनचा चाहता
अल्लू अर्जुनच्या बाबतीत बोलताना त्याचा नाच पहिल्यांदा डोळ्यांसमोर येतो.
'पुष्पा'मधील 'श्रीवल्ली' या गाण्यात त्याची स्लिपर पायातून निसटते आणि तो पुन्हा त्या दिशेने जात ती स्लिपर पायात घालतो. ही स्टेप देशभरात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक विख्यात व्यक्तींपासून ते लहान मुलामुलींपर्यंत सर्वांनी या स्टेपचं अनुकरण करणारे व्हीडिओ बनवले होते.
'आला वैकुंटपुरामुलो' या चित्रपटातील 'बुट्ट बोम्मा' या गाण्यामधील अल्लू अर्जुनचा नाचही असाच प्रसिद्ध झाला होता.
प्रत्येक चित्रपटात त्याची अशी एक खास स्टेप असते.
लहानपणापासूनच अल्लू अर्जुनला नाचाची भरपूर आवड होती. लहानपणी त्याच्या खोलीत फक्त मायकल जॅक्सन आणि चिरंजीवी या दोनच माणसांची छायाचित्रं होती, असं त्याने एका मुलाखतीत सांगितलं होतं.
या दोघांकडून आपण खूप काही शिकल्याचंही तो म्हणाला. मायकल जॅक्सनचा तो कट्टर चाहता आहे. मायकल जॅक्सनच्या निधनानंतर त्याला आदरांजली म्हणून अल्लू अर्जुनने स्वतः मंचावरून नाच सादर केला होता.
'पुष्पा' चित्रपटातील 'मैं झुकेगा नही, साला' या संवादासारखे अनेक खटकेबाज संवादही अल्लू अर्जुनच्या नावावर आहेत.
केरळमध्ये चाहत्यांची प्रचंड संख्या
इतर भाषांमधील प्रेक्षकांमध्येही लोकप्रिय असलेल्या तेलुगू अभिनेत्यांच्या यादीत अल्लू अर्जुनचं स्थान सर्वोच्च आहे.
तेलुगू खालोखाल मल्याळी भाषेतही अल्लू अर्जुनला खूप लोकप्रियता लाभली. केरळमध्ये मल्याळी तारेतारकांच्या चित्रपटांसोबत अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची अटीतटीची स्पर्धा होताना दिसते.
केरळमध्ये 2018 साली पूर आला, तेव्हा अल्लू अर्जुनने मदतकार्यासाठी देणगी दिली होती.
डबिंगद्वारे हिंदी प्रेक्षकांची मनं जिंकली
'पुष्पा' चित्रपट हिंदी प्रदेशांमध्ये इतका प्रचंड यशस्वी होईल, असं चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान किंवा प्रदर्शनावेळीसुद्धा कोणाला जाणवलं नव्हतं.
पण, हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधीच अल्लू अर्जुनचा चेहरा हिंदी बाजारपेठेत परिचयाचा झालेला होता.
डबिंगद्वारे अनेक तेलुगू चित्रपट हिंदी प्रेक्षकांना पाहायला मिळालेले आहेत. 'दुव्वडा जगन्नाधम' आणि 'सराईनोडू' यांसारख्या अल्लू अर्जुनच्या चित्रपटांची हिंदी रूपं 'यू-ट्यूब'वर प्रदर्शित झाल्यानंतर लाखो लोकांनी हे चित्रपट पाहिले.
प्रयोगशीलता आणि चिकाटी
अल्लू अर्जुन प्रयोगशील असल्याचं वेळोवेळी दिसून आलं आहे. अर्थात, त्याचे प्रयोग प्रत्येक वेळी यशस्वी होतातच असं मात्र नाही.
अलीकडच्या काळात अल्लू अर्जुनसारखे कष्टाळू अभिनेते मिळणं अवघड आहे, असं सुकुमार, त्रिविक्रम श्रीनिवास, पुरी जगन्नाथ यांसारख्या लोकप्रिय तेलुगू दिग्दर्शकांनी वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये म्हटलेलं आहे.
उदाहरणार्थ, 'बद्रीनाथ' या चित्रपटासाठी तलवारबाजीचं प्रशिक्षण घेण्याकरता तो मलेशियाला गेला होता.
इन्स्टाग्रामवर 1 कोटी 70 लाख फॉलोअर
अल्लू अर्जुन समाजमाध्यमांवर चांगलाच सक्रिय असतो. त्याच्या चित्रपटांशी संबंधित माहिती तो समाजमाध्यमांवरून चाहत्यांशी शेअर करत असतो.
इन्स्टाग्रामवर त्याचे 1 कोटी 70 लाखांहून अधिक फॉलोअर आहेत. इतके फॉलोअर असलेला तो एकमेव तेलुगू अभिनेता आहे.
कुटुंबात रमणारा अल्लू अर्जुन
चित्रीकरण नसेल तेव्हा अल्लू अर्जून त्याचा पूर्ण वेळ कुटुंबाला देतो आणि त्याच्या मुलासोबत व मुलीसोबत खेळतो.
यातलीही काही छायाचित्रं तो समाजमाध्यमांद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोचवत असतो.
आता 'पुष्पा : द रूल' या त्याच्या आगामी चित्रपटाचं चित्रीकरण सुरू आहे.
हेही वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)