RRR-पुष्पा : ‘झुकेगा नहीं’ म्हणत साउथ इंडियन सिनेमा बॉलिवूडला कसं आव्हान देतोय?

    • Author, पराग छापेकर,
    • Role, ज्येष्ठ पत्रकार, बीबीसी हिंदीसाठी

एक काळ होता, जेव्हा हिंदी पट्ट्यातील चित्रपटप्रेमींना 'मद्रासी सिनेमां'मध्ये फक्त रजनीकांत, कमल हासन किंवा चिरंजिवी इतकेच कलाकार माहिती असायचे.

कधी-कधी नागार्जुन किंवा व्यंकटेश या कलाकारांनाही ते ओळखत.

पण आज गल्लोगल्ली प्रभास, अल्लू अर्जुन यांसारख्या चित्रपट-ताऱ्यांचं नाव लोकप्रिय तर आहेच, पण त्यांच्यासोबत धनुष, अजित, मोहन बाबू, विजय देवराकोंडा, चियान विक्रम, किच्चा सुदीप, पवन कल्याण, नागचैतन्य, रामचरण तेजा, ज्युनियर एनटीआर, सूर्या, समंथा, रश्मिका मंदाना या नावांची लांबलचक यादीसुद्धा आहे.

यूपी, बिहार, बंगालपासून मध्य प्रदेश आणि गुजरातपर्यंत या कलाकारांनी भुरळ घातली आहे. हिंदी सिनेमात दक्षिणेकडच्या अभिनेत्रींची जादू वैजयंती माला यांच्यापासून सुरू होती.

हेमा मालिनी, जया प्रदा, मिनाक्षी शेषाद्री यांच्यापासून श्रुती हासनपर्यंत दाक्षिणात्य अभिनेत्री हिंदी चित्रपटांत लोकप्रिय आहेत.

पण सध्याचा जमाना थोडा वेगळा आहे. दाक्षिणात्य सिनेताऱ्यांनी संपूर्ण देशात आपली चमक निर्माण केली आहे.

शुद्ध मनोरंजन, प्रेक्षकांच्या आवडीची योग्य ओळख यांच्यासह गेल्या 20 वर्षांपासून योग्य रणनितीच्या बळावर दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीने बॉलीवूडसमोर आव्हान निर्माण केलं आहे.

संपूर्ण बॉलीवूडवर वर्चस्व गाजवण्याचं त्यांचं स्वप्न पूर्ण होण्याच्या उंबरठ्यावर आहे.

फक्त पुष्पा या एका चित्रपटाच्या प्रचंड कमाई आणि लोकप्रियतेमुळे हे निष्कर्ष काढले जात आहेत, असं अजिबात समजू नका.

बॉलीवूड कलाकारांच्या सहाय्याने प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्याचं धोरण

दाक्षिणात्य सिनेमांच्या या रणनितीमध्ये हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकाच्या भावनांना हात घालण्यासाठी विशेष रणनिती आहे.

ती म्हणजे दाक्षिणात्य सिनेमात बॉलीवूड कलाकारांना लहान-मोठ्या भूमिका देणं होय.

हे सत्र 'रोबोट' चित्रपटात ऐश्वर्या रायला घेण्यापासून आगामी 'आरआरआर' चित्रपटात आलिया भट्ट आणि अजय देवगण यांना घेण्यापर्यंत सुरू आहे.

या कलाकारांच्या मदतीने एक मोठी बाजारपेठ आपल्यासाठी खुली होते, हे त्यांना चांगलंच माहिती आहे.

'पुष्पा' चित्रपटातील मुख्य अभिनेता अल्लू अर्जुन म्हणतो, "बॉलीवूडमधील कलाकारांचं दाक्षिणात्य इंडस्ट्रीत मोकळ्या मनाने स्वागत आहे."

पण, दक्षिणेतील अभिनेत्यांचं स्टारडम इतकं मोठं आहे की त्यामुळे प्रेक्षक 'बाहेर'च्यांना स्वीकारू शकत नाहीत.

गेल्या 15 ते 20 वर्षांपासून निर्मात्यांनी बॉलीवूडमधील कलाकारांसोबत चित्रपट बनवत मद्रासी चित्रपटांची सवय लोकांना लावली. त्यामधूनच श्रीदेवी आणि जया प्रदा यांच्यासारख्या अभिनेत्री बॉलीवूडच्या मुख्य प्रवाहात आल्या.

दक्षिणेकडील चित्रपटांमध्ये हिंदी चित्रपटांतील कलाकारांना प्रामुख्याने चरित्र पात्रांच्या स्वरुपातच घेतलं जात होतं.

राहुल देव, सोनू सुद, चंकी पांडे, विनीत कुमार, मुरली शर्मा नेहमी दाक्षिणात्य चित्रपटांमध्ये दिसतात.

त्याशिवाय टीव्हीचं मोठं मार्केटही दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांनी ओळखलं. कोणत्याही चॅनेलवर डब केलेला दाक्षिणात्य सिनेमा पाहण्याची सवय लोकांना लागली आहे.

एके काळी दाक्षिणात्य चित्रपटांचे टीव्ही अधिकार एक ते दीड लाख रुपयांत मिळायचे. पण आता हा व्यवहार कोट्यवधींच्या घरात गेला आहे.

बॉलीवूडला दाक्षिणात्य चित्रपटांकडून धोका?

लोकप्रिय चित्रपट निर्माते मेहुल कुमार यांच्या मते, "आजपर्यंत कधीच घडलं नाही ते आता घडत आहे. ही बॉलीवडूकरिता नक्कीच धोक्याची घंटा असू शकते. दाक्षिणात्य चित्रपट निर्मात्यांचा डबिंगचा फॉर्म्युला हिट झाला आहे."

मेहुल कुमार सांगतात, "बॉलीवूडला 100 टक्के धोका आहे, कारण त्यांनी कंटेंटला बाजूला केलं आहे. फक्त स्टार मिळाला की चित्रपट बनवा, असं इथं काम चालतं. बड्या स्टार्सचा चित्रपटातील हस्तक्षेप वाढला आहे. दिग्दर्शकाला आपल्या पद्धतीने काम करण्यास मिळत नाही.

मी कुणाचं नाव घेणार नाही. पण एक मोठी कंपनी आहे, ती गाणी विकत घेते आणि दिग्दर्शकांना ते चित्रपटात टाकण्यास सांगते. बॉलीवूडमध्ये दर्जावर लक्ष दिलं जात नसल्याचं दाक्षिणात्य निर्मात्यांना पूर्वीच लक्षात आलं होतं. त्यामुळेच त्यांनी कथा आणि गाणी यांच्यावर लक्ष केंद्रीत केलं. आपण लोकांना तसा कंटेंट देऊ शकत नाही."

गेल्या काही वर्षांत दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेकचा प्रकार खूप वाढला आहे.

कधीकाळी कोरियन किंवा हॉलीवूड चित्रपटांचा रिमेक करणारं बॉलीवूड आता तमीळ, तेलुगू आणि मल्याळम चित्रपटांवर अवलंबून राहात आहे. सलमान खान आणि अक्षय कुमार यांमध्ये आघाडीवर आहेत.

अक्षय कुमारच्या करिअरला 'राऊडी राठोड' या रिमेक चित्रपटानंतरच नाट्यमय वळण प्राप्त झालं.

दाक्षिणात्य चित्रपटांच्या रिमेककडे बॉलीवूड फायद्याचा सौदा म्हणूनच पाहतो.

पुष्पा चित्रपटाने पहिल्या 14 दिवसांत 234 कोटींची कमाई केली. अजूनही चित्रपटाची गर्दी कमी होण्याचं नाव घेताना दिसत नाही.

मास्टरनेही 209.60 कोटी कमावले. वकील साहबने 119.90 कोटी, अखंडा चित्रपटाने 103 कोटी, अन्नाथे चित्रपटाने 102.50 कोटी, उप्पेनाने 93.30 कोटी, तर डॉक्टर चित्रपटाने 81.60 कोटी कमावले.

बाहुबली पासून सुरुवात

हिंदी पट्ट्यातून प्रचंड गंगाजळी घेऊन जाण्याची सुरुवात सुरुवात भव्यदिव्य बाहुबली चित्रपटाने केली, असं आपल्याला मानता येईल.

फक्त कंटेंटच नव्हे तर चित्रपटाचं लार्जर दॅन लाईफ असणं हेही त्यामागचं कारण होतं.

शिवाय कट्टप्पा मामासुद्धा चित्रपटात होतेच ना. कट्टप्पाने बाहुबलीला का मारलं, हा प्रश्न 'शोले' चित्रपटांतील संवादांप्रमाणेच अजरामर झाला आहे.

देशभरातील चित्रपटांच्या व्यवसायांवर बारीक नजर ठेवणारे ट्रेड एक्सपर्ट अतुल मोहन म्हणतात, "त्याचा पाया तर 10-15 वर्षांपूर्वीच रचला गेला होता. तेव्हा दक्षिणेतील चित्रपट डब होऊन टीव्हीवर येत असत. लोकांना एंटरटेनमेंट टीव्हीवर मोफत मिळायचा.

दुसरीकडे, बॉलीवूड रिअलिस्टिक चित्रपटाकडे जात होतं. मल्टीप्लेक्स आणि शहरी प्रेक्षकांकडे लक्ष केंद्रीत करत होतं. त्याच काळात दाक्षिणात्य चित्रपटांना युट्यूब नामक एक शस्त्र मिळालं."

अतुल सांगतात, "दक्षिणेतील कंटेंट पाहण्यासाठीची व्ह्यूअरशीप कोट्यवधींमध्ये असते. टीव्हीमुळे अभिनेत्यांच्या कार्यक्रमांची टीआरपी वाढली. यामध्ये अल्लू अर्जुन, महेश बाबू, विजय, अजित वगैरे लोकप्रिय होऊ लागले होते.

आपण क्लास बनवण्यात मग्न होतो, तर त्यांनी मास एंटरटेनमेंटवर लक्ष केंद्रीत केलं. सिंगल स्क्रिन प्रेक्षकांना तेच हवं असतं. यानंतर बाहुबलीने त्यांना वेगळ्याच उंचीवर नेलं आहे."

ते पुढे सांगतात, "दक्षिणेतील कलाकाल स्वतःला अपग्रेड करत आले आहेत तर बॉलीवूडने स्वतःला डिग्रेड केलं आहे. इंटेलिजन्ट कंटेंट पाहिजे असेल मल्याळम चित्रपट पाहावेत, मास एंटरटेनमेंट हवं असेल तर तमीळ-तेलुगू पाहावेत. इथं सलमान-अक्षयसारखे अभिनेते त्यांच्या चित्रपटांचे रिमेक करतात.

दाक्षिणात्य निर्माते ओरिजनल कंटेंट बनवत आहेत. त्यांनी आता हिंदी पट्ट्यावर लक्ष केंद्रीत केलं. गेल्या 10 वर्षांपासून ते सुरू होतं. पण बॉलीवूडला ते समजलं नाही."

दक्षिण-उत्तर सिनेमातील अंतर मिटलं

अतुल मोहन यांच्या मते, "बॉलीवूडसाठी सध्याचा काळ कठीण आहे. अनेक प्रोजेक्ट बनत आहेत. मल्टीस्टार मसाला चालेल, हे त्यांना माहिती आहे. त्याचा परिणाम येत्या दोन-तीन वर्षांत दिसेल. बॉलीवूड कलाकार ओव्हर-एक्सपोझ झाले आहेत, असं मला वाटतं. त्यांनीही दक्षिणेकडील कलाकारांप्रमाणे रिझर्व्ह राहावं, म्हणजे त्यांचं स्टारडम तयार होईल."

चित्रपट समीक्षक कोमल नाहटा म्हणतात, "बॉलीवूडची स्पर्धा बॉलीवूडसोबतच होती. आता ती हॉलीवूड आणि तमीळ-तेलुगूसोबत सुरू झाली. शिवाय ओटीटी कंटेंट आहे, ते वेगळं. स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे त्यांना मेहनत करावी लागेल. नवं काहीतरी आणावं लागेल.

साधारण गोष्टींसाठी आता प्रेक्षक तयार नाही. त्यामुळे दर्जेदार कामच करावं लागेल. लॉकडाऊननेही समीकरण बदललं आहे. त्यामुळे बॉलीवूडला आता सजग व्हावं लागेल."

ते पुढे म्हणतात, "दक्षिणेकडून येणाऱ्या नदीचं फाटक उघडल्यामुळे पूर येणारच. आपल्या भागात नाव कमावलेले दक्षिण भारतीय कलाकार हिंदी पट्ट्यातील प्रेक्षकांच्या मनावर राज्य करण्यासाठी येत आहेत. अनेक चित्रपट रांगेत उभे आहेत. चित्रपटांमध्ये आता उत्तर-दक्षिण अंतर कमी झालं आहे. आता इंडियन सिनेमाच राहील आणि तोच सगळीकडे चालेल."

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)