करण जोहरवर मुव्ही माफिया, घराणेशाहीचं अपत्य अशी टीका का होते?

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधल्या घराणेशाहीवर जोरदार टीका होत आहे. या टीकेचा सध्या सर्वाधिक धनी झाला आहे दिग्दर्शक करण जोहर. मात्र, यापूर्वीही करण जोहरवर टीकाकारांनी सडकून टीका केली आहेच आणि खिल्लीही उडवली आहे.

करण जोहर. बॉलीवूडमधल्या रोमँटीक सिनेमांच्या निर्मितीसाठी आणि अलिकडे कॉफी विथ करण या टीव्हीवरच्या गप्पांच्या कार्यक्रमासाठी तो विशेष करून ओळखला जातो. वयाची 48 वर्षं पूर्ण केलेल्या या पटकथा लेखक - दिग्दर्शकाला सुरुवातीला ओळख मिळाली ती त्यांचे वडील अभिनेते आणि जुन्या काळातले निर्माते यश जोहर यांच्यामुळे.

पद्मश्री करण

1998 साली पदार्पणातच त्याला कुछ-कुछ होता है या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर घवघवीत यश मिळवून दिलं. त्यावर्षी उत्कृष्ट दिग्दर्शकाचा आणि उत्कृष्ट पटकथा लेखकाचा फिल्मफेअर अवॉर्डही त्याने खिशात घातला.

त्यानंतर, 2001मध्ये 'कभी खुशी, कभी गम', 2006मध्ये 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या चित्रपटांनी नंतरच्या काळात करण जोहरचा सिनेसृष्टीतला खुंटा अजूनच बळकट केला. त्याच्या धर्मा प्रॉडक्शनचा दबदबाही सिनेजगतात वाढला.

तो काळ तद्दन रोमँटीकपटांचा असल्याने करण जोहरची लोकप्रियता चांगलीच वाढली होती. मात्र, सिनेसृष्टीत नाव होत असताना 'स्टारकीड' म्हणूनही त्याची चेष्टा होऊ लागली. घराणेशाहीचा वारसा घेऊन बॉलीवूडमध्ये आल्याचा त्याच्यावर आरोप होऊ लागला. मात्र, नंतर-नंतर करण जोहरची लैंगिकता, तो सूत्रसंचालन असलेला कॉफी विथ करण या कार्यक्रमात येणाऱ्या पाहुण्यांमुळेही तो टीकेचा धनी झाला.

यंदा त्याला सिनेसृष्टीतल्या योगदानाबद्दल देशातला मानाचा पद्मश्री पुरस्कारही मिळाला. यावरूनही त्याच्यावर सोशल मीडियावर टीका झाल्याचं पाहिला मिळालं. करण जोहरवर नेमकी कधी आणि केशी टीका झाली ते आपण पाहूयात.

सुशांत सिंगची आत्महत्या आणि 'तो' व्हीडिओ

सुशांत सिंग राजपूतने गेल्या आठवड्यांत मुंबईत आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस तपास सुरू आहे. पण, सुशांतच्या आत्महत्येनंतर करण जोहरने ट्वीट करून त्याला खूप दुःख झाल्याचं मत मांडलं. अभिनेत्री आलिया भटनेही तिला या आत्महत्येबद्दल दुःख झाल्याबद्दल ट्वीट केलं. पण, नेटीझन्सनी या दोघांच्याही ट्वीटचा चांगलाच समाचार घेतला.

करण जोहर आणि आलिया भट यांनी कॉफी विथ करण कार्यक्रमांत सुशांत सिंग कोण आहे? असं वक्तव्य करत त्याची टर उडवली होती. सोशल मीडियावर लोकांनी हा व्हीडिओ व्हायरल करत हे दोघंही घराणेशाहीतून बॉलीवूडमध्ये आले आहेत आणि इतरांची किंमत नसल्याची मतं मांडली.

यावेळी करण जोहरची बाजू घेण्यासाठी निर्माते - दिग्दर्शक रामगोपाल वर्मा, अभिनेत्री स्वरा भास्कर उतरले आहेत. मात्र, या व्हीडिओवरून करण जोहर यांच्यावर नेटीझन्स तोंडसुख घेत आहेत.

करण म्हणतो, "माझ्यात एक महिला आहे"

करण जोहर हा गे म्हणजेच समलैंगिक असल्याचं त्याने जाहीर केलं होतं. मात्र, त्यापूर्वीपासूनच त्याच्यावर तो समलैंगिक आहे म्हणून त्याला त्रास दिला गेला होता. ट्विटरवर एकाने करण जोहर याने त्याचा चरित्रपट केला तर त्याचं नाव 'द गे' असं ठेवावं म्हटलं होतं. एरव्ही करण जोहर अशा टीकाकारांना जुमानात नसला तरी त्याने या ट्वीटचा खरपूस समाचार घेतला होता.

अखेर ज्याने हे ट्वीट केलं त्याला ते ट्वीट डिलीट करावं लागलं, पण त्यावर करण जोहर यांनी दिलेला प्रतिसाद अजूनही ट्विटरवर आहे.

करण जोहरच्या लैंगिकतेवरून वाद आता नित्याचीच बाब झाली आहे. इंडिया टुडेच्या वेबसाईटवरच्या एका बातमीनुसार, मार्च, 2019मध्ये अभिनेता अरबाझ खान याच्या एका चॅटशोमध्ये परिणिती या प्रेक्षक महिलेनं तुम्ही तुमचं लिंग बदलून घेतलंय का असा थेट सवाल विचारला होता. यावर करण तिला म्हणाला होता, "नाही परिणिती. मी एक पुरुष म्हणून जन्माला आलो. मला पुरुष असल्याचा गर्व आहे. माझ्या आत एक महिला आहे आणि तिच्यामुळेच मला माणूस असल्याबद्दल गर्व वाटतो."

करण पुढे असं म्हणाला, "माझ्यावर लोक जेव्हा टीका करायचे तेव्हा मला राग यायचा आणि मी रागाताच त्यांना प्रत्युत्तर द्यायचो. मात्र, आता मला त्याचं काही वाटत नाही. रोज सकाळी उठलो की मला कोणीतरी वाईट बोलत असतं आणि मला त्याबद्दल राग न येता आश्चर्य वाटतं."

हार्दिक पांड्याचं 'ते' वक्तव्य आणि करणची माफी

करण जोहर यांच्यावर वेळोवेळी होणाऱ्या टीकेमागे ते सूत्रसंचालन करत असलेल्या 'कॉफी विथ करण' कार्यक्रमाचा मोठा हात आहे.

'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात हार्दिक पंड्याने स्वत:च्या खाजगी आयुष्याबद्दल तसंच महिलांबद्दल मतं व्यक्त केली. हार्दिक आणि भारतीय संघातील त्याचा मित्र क्रिकेटपटू लोकेश राहुल हे दोघे या कार्यक्रमात सहभागी झाले होते.

अनेक महिलांशी संबंध असल्याचा दावा हार्दिकने या कार्यक्रमादरम्यान केला. माझ्या घरचे पुढारलेल्या विचारांचे आहेत. स्वत:च्या व्हर्जिनिटीबद्दलही आईवडिलांना सांगितलं आहे, असा खुलासा हार्दिकने केला.

मात्र, या कार्यक्रमानंतर महिलाविरोधी वक्तव्य केल्याबद्दल हार्दिक पंड्या, के. एल. राहुल आणि करण जोहर यांच्यावर संपूर्ण देशांतून टीका झाली. पांड्या आणि राहुल यांना बीसीसीआयने निलंबितही केलं. अखेर त्या दोघांना माफी मागावी लागली.

करण जोहरनेही या प्रसंगानंतर आपल्याला कार्यक्रमात त्यांच्याकडून असं काही वक्तव्य केलं जाईल याची माहितीही नसल्याचं स्पष्ट केलं होतं. मात्र, माझ्या कार्यक्रमात असा प्रकार घडल्याने मी माफी मागतोय असंही तो म्हणाला होता. करणने माफी मागितल्यावर या प्रकरणावरचा पडदा पडला मात्र, आजही यावरून त्याच्यावर टीका होतेय.

कंगना म्हणते, 'करण तर मुव्ही माफिया'

कॉफी विथ करणच्या अशाच एका कार्यक्रमात अभिनेत्री कंगना रणौत हीने करणनेच तिला इंडस्ट्रीमध्ये अॅटीट्यूड दाखवल्याचं म्हटलं. यावेळी भविष्यात जर तिच्यावर चरित्रपट करण्यात आला तर त्यात 'मुव्ही माफिया'ची भूमिका करण जोहर बेतलेली असेल. तसंच, बॉलीवूडमध्ये बाहेरून आलेल्यांबद्दल असहिष्णू वागणाऱ्याची ही भूमिका असेल असंही कंगना म्हणाली होती.

कंगणाने थेट अशी टीका केल्यानंतर करणला तिची तिथेच माफीही मागावी लागली. करण जोहर घराणेशाहीचा समर्थक असल्याचं कंगणाने तेव्हा म्हटल्यावर बॉलीवूडमधली घराणेशाही तेव्हा माध्यमांमध्ये चर्चेचा विषय बनला होता.

मिरा कपूरने घेतली करणची विकेट

अभिनेता शाहीद कपूर आणि त्याची पत्नी मिरा कपूर यांनीही एकदा कॉफी विथ करणच्या पाचव्या सिझनमध्ये हजेरी लावली होती. यावेळी कार्यक्रमाचा भाग म्हणून करणने काही प्रश्न विचारायला सुरुवात केली.

मात्र, यातला रँक इन ऑर्डर ऑफ टॅलेंटचा प्रश्न मिरानेच करणला विचारला. तिने यात अभिनेत्यांच्या यादीत अनेक अभिनेत्यांची नावं घेतली आणि शाहीदचं नाव टाळलं.

यावर शाहीदने तिला त्याचं नाव का नाही घेतलं असा प्रश्न केला. यावर करण त्याच्या कोणत्याच कार्यक्रमात तुला पसंती देत नसल्याचं शाहीदला सांगितलं. यावर करणला आश्चर्यचकीत होण्यापलिकडे काही करता आलं नाही. यावेळी मीराने करणला घराणेशाहीवरूनही चिमटे काढले होते.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)