प्रोनिंग: कोरोना रुग्णांना पोटावर का झोपवतात?

    • Author, फर्नांडा पॉल
    • Role, बीबीसी न्यूज

जगभर कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असताना हॉस्पिटलचं दृश्यं सर्वांनाच सवयीचं झालं आहे.

श्वसनाचा त्रास असणाऱ्या रुग्णांना अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटर्सवर ठेवलेलं आपण बघतो. मात्र, अलिकडे एका गोष्टीने अनेकांचं लक्ष वेधलं आहे.

अनेक कोरोनाग्रस्त पोटावर झोपलेले दिसतात. असं का?

वैद्यकीय भाषेत याला 'प्रोनिंग'(proning) म्हणतात. लॅटिन भाषेतल्या प्रोनस (pronus) म्हणजेच पोटावर झोपणे या शब्दावरून प्रोनिंग शब्द आलाय. श्वास घेण्यास त्रास असणाऱ्या काही रुग्णांना या पद्धतीचा बराच फायदा होतोय.

अशा प्रकारे पोटावर झोपल्याने फुफ्फुसामध्ये जास्त ऑक्सिजन पुरवठा होतो.

मात्र, या टेक्निकचे काही दुष्परिणामही आहेत.

ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो

रुग्णाच्या फुफ्फुसात पाणी झालं असेल आणि त्यामुळे श्वास घेण्यास अडथळा निर्माण होत असेल तर अशा रुग्णांना काही तास अशा पद्धतीने पोटावर झोपवता येतं.

अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलेल्या अनेक कोरोनाग्रस्तांना हल्ली अशा पद्धतीने झोपवतात.

जॉन हापकिन्सन इन्स्टिट्युटमध्ये प्राध्यापक असणारे आणि फुफ्फुसासंबंधीचे आजारतज्ज्ञ असणारे प्रा. फॅनागिस गॅलिअॅटसॅटोस म्हणतात, "बरेचदा ऑक्सिजन देऊनही ते पुरेसं ठरत नाही. मग अशावेळी आम्ही रुग्णांना पोटावर पालथ झोपवतो. अशापद्धतीने झोपल्याने त्यांचं फुफ्फुस प्रसरण पावतं."

डॉ. गॅलिअॅटसॅटोस सांगतात की आपल्या फुफ्फुसांचा सर्वांत जड भाग मागच्या बाजूला असतो. त्यामुळे रुग्ण जेव्हा पाठीवर झोपतो त्यावेळी शरीराचं सगळं वजन पाठीवर पडतं आणि मग त्याला पुरेशा प्रमाणात हवा आत घ्यायला त्रास होतो. त्यामुळे रुग्णाला पोटावर झोपवलं की त्याला बराच फायदा होतो. अनेक रुग्णांच्या बाबतीत डॉक्टरांना हा अनुभव आला आहे.

मार्च महिन्यात जागतिक आरोग्य संघटनेनेही श्वास घेण्यास त्रास असणाऱ्या कोव्हिड-19 रुग्णांना दिवसातून 12 ते 16 तास पालथं झोपवावं, असा सल्ला दिला होता.

लहान मुलांनाही अशा पद्धतीने झोपवता येईल. मात्र, त्यासाठी प्रशिक्षित स्टाफ आणि विशेष कौशल्याची गरज आहे, असंही जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं आहे.

फेब्रुवारी महिन्यात चीनमधल्या वुहान शहरातल्या एका हॉस्पिटलमध्ये अमेरिकन थोरॅसिस सोसायटीने कोव्हिड-19 आजार असणाऱ्या आणि श्वासच्छोश्वासाचा गंभीर त्रास असणाऱ्या 12 रुग्णांवर एक अभ्यास केला. यात असं आढळून आलं की जे रुग्ण पालथे झोपले नाही त्यांच्या फुफ्फुसाची क्षमता पालथे झोपणाऱ्या रुग्णांपेक्षा कमी होती.

प्रोनिंगचे धोके

रुग्णाला पोटावर झोपवणं सोपं वाटत असलं तरी त्यात अनेक धोकेही आहेत.

रुग्णाला पोटावर पालथ करण्यासाठी वेळ लागतो आणि त्यासाठी अनुभवी स्टाफची गरज असते.

प्रा. गॅलिअॅटसॅटोस म्हणतात, "हे सोपं नाही. यासाठी चार ते पाच अनुभवी लोक लागतात."

जेव्हा हॉस्पिटलमध्ये रुग्ण जास्त असतात आणि स्टाफ कमी असतो त्यावेळी प्रोनिंग प्रक्रियेसाठी वेळ मिळणं अवघड होतं.

मात्र, कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर जॉन हापक्सिन्सन हॉस्पिटलने एक टीम केवळ याच एका कामासाठी नियुक्त केली आहे.

प्रा. गॅलिअॅटसॅटोस म्हणतात, "अतिदक्षता विभागातल्या कर्मचाऱ्यांना याचं प्रशिक्षण नाही. त्यामुळे अतिदक्षता विभागात एखाद्या कोरोनाग्रस्त रुग्णाला पालथं झोपवायचं असेल तर प्रशिक्षित टिमला बोलवण्यात येतं."

मात्र, रुग्णाची पोझिशन बदलणं कधीकधी धोकादायकही ठरतं.

डॉ. गॅलिअॅटसॅटोस सांगतात, "लठ्ठपणा एक मोठा अडसर असतो. तसंच छातीला दुखापत झालेल्या, व्हेंटिलेटरवर असलेल्या किंवा कॅथेटर ट्युब असणाऱ्या रुग्णांची जास्त काळजी घ्यावी लागते."

रुग्णांना अशा पोझिशनमध्ये झोपवल्याने हार्ट अटॅक किंवा श्वसन नलिकेत अडथळा निर्माण होण्याचीही शक्यता असते.

'मोठ्या प्रमाणावर होतोय वापर'

1970च्या मध्यात प्रोनिंग श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांसाठी फायदेशीर असल्याचं लक्षात आलं. मात्र, हॉस्पिटलमध्ये या तंत्राचा मोठ्या प्रमाणावर वापर सुरू व्हायला तब्बल 10-12 वर्षांचा काळ लोटावा लागला.

लुसिअॅनो गॅट्टीनॉनी त्या पहिल्या डॉक्टरांपैकी होते ज्यांनी या तंत्राचा अभ्यास केला आणि आपल्या रुग्णांवर वापरून बघितलं.

सुरुवातीला प्रोनिंगला वैद्यकीय क्षेत्रातूनच बराच विरोध झाला. मात्र, आता जगभरात प्रोनिंग मान्यता मिळाली आहे आणि त्याचा वापरही होतो.

प्रोनिंगमुळे केवळ फुफ्फुसात ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो, असं नाही.

तर "रुग्ण जेव्हा पालथा झोपलेला असतो तेव्हा फुफ्फुसातली शक्ती सर्वत्र सारखी विभागली जाते," असं डॉ. गॅलिअॅटसॅटोस सांगतात.

या शतकाच्या सुरुवातीलाही प्रोनिंगचे फायदे सांगणारी काही संशोधनं झाली. 2000 साली फ्रान्समध्ये करण्यात आलेल्या अभ्यासात असं आढळून आलं की प्रोनिंगमुळे रुग्णाच्या फुफ्फुसात ऑक्सिजनचा पुरवठा तर वाढतोच शिवाय रुग्ण बचावण्याची शक्यताही वाढते.

प्रा. गॅलिअॅटसॅटोस म्हणतात, "कोरोना विषाणुमुळे हजारो लोकांचा बळी जातोय. यावर अजून औषध नाही. अशावेळी अशाप्रकारच्या उपचार पद्धतींचा अवलंब करणं योग्य ठरेल."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)