राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला ब्रिजभूषण सिंहांचा विरोध कुणाच्या पथ्यावर?

फोटो स्रोत, ANI
- Author, नीलेश धोत्रे
- Role, बीबीसी मराठी
राज ठाकरे यांच्या 5 जूनच्या अयोध्या दौऱ्याला भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांच्याकडून जोरदार विरोध सुरू आहे.
आधी राज ठाकरेंकडून उत्तर भारतीयांच्या माफीची मागणी केलेल्या बृजभूषण सिंह यांनी आता मात्र राज ठाकरेंनी माफी जरी मागितली तरी ते 5 तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही, असं म्हटलंय.
"माझं वैर महाराष्ट्राशी नाहीये, कित्येक महाराष्ट्रातील बांधव अयोध्येत येतात. प्रभू रामाचं दर्शन घेतात. आमची हरकत असण्याचं काही कारण नाहीये. माझा फक्त एका व्यक्तीला विरोध आहे, त्याचं नाव आहे राज ठाकरे. शेवटी मुक्तीचा उपाय आहे माफी. त्यामुळे त्यांनी माफी मागावी, पण माफी जरी मागितली तरी ते 5 तारखेला अयोध्येत येऊ शकत नाही कारण 5 तारखेला अयोध्या फुल पॅक आहे", असं बृजभूषण सिंह म्हणालेत.
मंगळवारी ब्रिजभूषण यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत राज ठाकरे यांना विरोध केला. मंगळवारी अयोध्येत राज ठाकरेंच्या दौऱ्याविरोधात मोर्चा काढण्यात आला. यात साधू-संत सुद्धा मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
"तेव्हा उत्तर भारतात लोक वाट पाहत होते की अशी संधी कधी येईल," असं म्हणत भाजपचे आमदार प्रतीक भूषण सिंह यांनीही राज ठाकरे यांच्यावर तीव्र टीका केली.
राज ठाकरे यांनी हिंदुत्वाची भूमिका घेत मशिदींवरील भोंग्यांना विरोध केला. पुणे आणि ठाण्यात झालेल्या सभेनंतर त्यांनी अयोध्येला जाण्याची तारीख जाहीर केली.
त्यानंतर लगेचच 1 मे महाराष्ट्र दिनी झालेल्या औरंगाबादच्या सभेत त्यांनी भोंग्यांविरोधात राज्य सरकारला अल्टिमेटम दिला. परिणामी मीडियामध्ये पुढचे चार दिवस याच विषयावर चर्चा सुरू होती.
भोग्यांविरोधात 4 मे रोजी पुकारलेल्या आंदोलनाची मीडियातली चर्चा संपते ना संपते तोच ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला आणि गेले 4-5 दिवस मीडियात सध्या त्याच विषयाची चर्चा सुरू आहे.
खरंतर ब्रिजभूषण यांनी राज ठाकरे यांना विरोध केला आहे. पण त्यांनी घेतलेली भूमिका राज ठाकरे यांच्या पथ्यावर पडतेय का? मनसेला आणि त्यांच्या एकंदर राजकारणाला त्याचा फायदा होत आहे का?
ब्रिजभूषण यांची याबाबत सतत बदललेली वक्तव्यं नेमकं काय सांगतात? या प्रश्नांची उत्तरं आपण पाहुया...
राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या दिवशी म्हणजेच 5 जूनला अयोध्येमध्ये लाखो लोक एकत्र येऊन राज ठाकरे यांना विरोध करतील असं ब्रिजभूषण यांनी जाहीर केलं आहे.
त्याचवेळी अयोध्येचे भाजप खासदार लल्लू सिंह यांनी मात्र राज ठाकरे यांचं स्वागत केलं आहे.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
'हनुमानाच्या कृपेने अयोध्येत प्रभू श्रीरामाला जो कोणी शरण जाईल. त्याचं स्वागतच आहे. राज ठाकरे यांना मोदींच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची सद्बुद्धी द्यावी, जेणेकरून त्यांचं आणि महाराष्ट्राचं कल्याण होऊ शकेल अशी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्री रामचरणी प्रार्थना आहे,' असं त्यांनी ट्वीट केलं आहे.
'विरोधामुळे राज ठाकरेंना फायदा'
ब्रिजभूषण यांच्या भूमिकेचा राज ठाकरे आणि मनसेला प्रसिद्धीसाठी फायदा होत असल्याचं मत दैनिक सकाळचे नवी दिल्लीतील वरिष्ठ प्रतिनिधी आणि राजकीय विश्लेषक अजय बुवा यांनी बीबीसी मराठीशी बोलताना व्यक्त केलं आहे.

फोटो स्रोत, Getty Images
ते सांगतात, "दोन्ही कडून होणारी वक्तव्य ही एकमेकांना पुरक आहेत. ब्रिजभूषण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला राष्ट्रीय स्तरावर नक्कीच प्रसिद्धी मिळत आहे.
भोंग्याविरोधात राज ठाकरेंनी घेतलेल्या भूमिकेनंतर महाराष्ट्रात त्याला फारसा प्रतिसाद मिळताना दिसला नाही. हनुमान चालिसाच्या मद्द्यावरून तर राज ठाकरेंपेक्षा राणा दांपत्याला जास्त प्रसिद्धी मिळाली. अशातच ब्रिजभूषण यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला चर्चेत येण्यास मदतच झाली आहे."
'संतुलन साधण्याचा प्रयत्न'
तर राज ठाकरेंच्या दौऱ्याला होणारा विरोध म्हणजे लुटुपुटूची लढाई आहे, असं मत ज्येष्ठ पत्रकार रविंद्र अंबेकर यांनी मांडलं आहे.
बीबीसीशी बोलताना ते सांगतात, "मला वाटतं भाजपा राज ठाकरेंचं मार्केट गरम करण्याचा प्रयत्न करत आहे. राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे भाजपाचाच फायदा होऊ शकतो. शिवसेना वोट बँकसाठी कट्टर हिंदुत्वाकडे वळली तर काँग्रेसची गोची होऊन सरकार अस्थिर होईल असे ठोकताळे काही नेते मांडतायत, मात्र एकूणच परिस्थिती स्थिर दिसतेय. फक्त माध्यमं आणि समाज माध्यमांमध्ये हे विषय 24 तास जिवंत ठेवून वातावरण तापवत ठेवलं आहे."
"राज ठाकरे यांनी घेतलेल्या भूमिकेला भाजपला फायदा होत असला तरी उत्तर भारतीयांच्या विरोधातील हिंसक आंदोलनांमुळे स्थानिक जनतेत रोष आहे, तो बॅलन्स करण्याचा हा प्रयत्न दिसतोय. ही लुटुपुटूची लढाई आहे," असं अंबेकर यांना वाटतं.
'राज ठाकरेंना सहानुभूती तर मिळेल पण...'
राज ठाकरेंना जो विरोध होत आहे त्यामुळे राज ठाकरे यांना सहानुभूती मिळेल पण त्याचे मतात रूपांतर होईल की नाही याबाबत शंका दिसते, असं मत ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांनी मांडलं.
"राज ठाकरे यांची आताची भूमिका भाजपच्या पथ्यावर पडणारी आहे. राज ठाकरेंना अयोध्येपर्यंत घेऊन जाणारेही भाजपवाले आहेत आणि त्यांना विरोध करणारेसुद्धा भाजपवालेच आहेत. राज ठाकरेंबरोबर गेल्यास उत्तर भारतात कोणी प्रश्न विचारण्याआधीच आपणच प्रश्न उपस्थित करायचे आणि यातून आपलं काही नुकसान होता कामा नये अशी भाजपची स्ट्रॅटेजी सध्यातरी यातून दिसून येते," असं परब सांगतात.

फोटो स्रोत, facebook
"ब्रिजभूषण यांची भाषा उचकवणारी आहे त्यामुळे त्यांनी केलेल्या विरोधाची सहानुभूती राज ठाकरे यांना नक्कीच मिळेल, पण त्याचा राज ठाकरे यांना दीर्घकालीन फायदा किती मिळतो हे पाहणे महत्त्वाचं ठरेल. राज ठाकरे यांना याआधी सुद्धा अशा प्रकारची सहानुभूती मिळाली आहे पण पुढे त्याचा मतं आणि संघटना बांधणीमध्ये फारसा प्रभाव दिसून आलेला नाही," असं निरीक्षण परब यांनी मांडलं आहे.
हेही वाचलंत का?
- शरद पवारांनी खरंच देवी-देवतांचे बाप काढलेत की हा भाजपचा विपर्यास?
- 'तुम्ही कधी अशा मुस्लीम व्यक्तीला भेटला आहात का ज्याला चार पत्नी आहेत?'
- Bra कशी निवडायची? चुकीच्या साईजची ब्रा वापरल्यामुळे खरंच गंभीर आजार होतात का?
- राज ठाकरेंना 'मारण्या'साठी आलेल्या बिहारी तरुणाचं जेव्हा पोलिसांनी एन्काउंटर केलं होतं..
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








