शरद पवारांनी खरंच देवी-देवतांचे बाप काढलेत की हा भाजपचा विपर्यास?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
शरद पवार याचा एक व्हीडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. त्यातून शरद पवार 'जातीयवादी आणि हिंदूविरोधी' असल्याचा दावा केला जात आहे.
महाराष्ट्र भाजपनेसुद्धा शरद पावर यांचा हा व्हीडिओ ट्वीट करत त्यांच्यावर टीका केली आहे.
"नास्तिक शरद पवारांनी हिंदू देवी देवतांचे बाप काढलेत. पवार नेहमीच हिंदू धर्माचा द्वेष करतात. पवारांनी हिंदू धर्माची बदनामी केली नसती, जातीवाद केला नसता, देवीदेवतांचा अपमान केलाच नसता, तर ते एवढे मोठे झालेच नसते. पवार साहेब या वयात आपल्याला शोभेल असेच वक्तव्य करा," असं त्या ट्वीट मध्ये म्हटलंय.
भाजपच्या या टीकेला शरद पवार यांनी पुरंदरमध्ये प्रत्युत्तर दिलं आहे.
"या काव्यात जवाहर राठोड यांनी कष्टकऱ्यांच्या वेदना मांडल्या आहेत. आता त्याचा गैरप्रचार कुणी करत असेल तर त्यांनी तो आवश्य करावा. लोक शोधतील हे कशात आलं आहे आणि जवाहरचं हे काव्य त्यांच्या लक्षात येईल," असं शरद पावर यांनी म्हटलंय.
या व्हीडिओत पवार यांनी नेमकं काय म्हटलंय?
साताऱ्यात केलेल्या एका भाषणात विद्रोही कवी जवाहर राठोड यांनी लिहिलेल्या एका कवितेचा उल्लेख शरद पवार यांनी केला.
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
X पोस्ट समाप्त
सुरुवातीला जवाहर राठोड यांच्या आठवणींना उजाळा देत शदर पवार म्हणतात, "ब्रम्हा-विष्णू-महेश यांच्या मूर्ती आम्ही घडवल्या. तुम्ही त्या मंदिरात ठेवल्या आणि साल्यांनो त्या मंदिरात आम्हाला येऊ देत नाहीत. हा तुमचा देव आम्ही आमच्या छिन्नीने बनवला. तुमच्या देवाचे बाप आम्ही आहोत. त्यामुळे आमच्यावरील अन्याय आम्ही सहन करणार नाही. अशा प्रकारचं ते काव्य मला आठवतं जव्हारने ते लिहून ठेवलं आहे."
"माझं म्हणणं एकच आहे हा अत्याचार आणि या प्रकारची बाजूला ठेवण्याची भूमिका, हा करणारा वर्ग आजही समाजामध्ये आहे. काही रितीरिवाजच्या नावाखाली पुन्हा एकदा लोकांच्या डोक्यामध्ये जातीयवादाचं मनुवादाचं विष तो प्रसूत करण्याचा प्रयत्न करतोय. पिढ्यानपिढ्या एकत्र राहणाऱ्या कष्टकरी लोकांमध्ये अंतर वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. अशा सर्व प्रश्नांच्याविरोधात संघर्ष करणं संघर्षासाठी एकसंघ राहाणं ही जबादारी तुमची माझी आहे," पवार सांगतात.
शरद पवार यांनी जवाहर राठोड यांच्या पाथरवट कवितेतील ओळी अशा आहेत.
तुमच्या ब्रह्मा, विष्णू, महेशाला
लक्ष्मीला अन् सरस्वतीला
आम्हीच की रुपडं दिलंय.
आता तुम्हीच खरं सांगा-
ब्रह्मदेव आमचा निर्माता की
आम्हीच ब्रह्मदेवाचे बाप?
या कवितेच्या माध्यमातून जवाहर राठोड यांनी कष्टकरी समाजाची व्यथा मांडत जातीयवादावर प्रहार केला आहे.
शरद पवार यांचं संपूर्ण भाषण पाहिलं तर लक्षात येतं की ते जवाहर राठोड यांची आठवण सांगत तसंच त्यांच्या कवितेचा आशय घेत वाढत्या जातीयवादावर भाष्य करत होते.
पिढ्यान् पिढ्या कष्ट करणाऱ्या लोकांच्या मनात जातीयवादाचं, धर्मवादाचं विष कालवण्याचा आणि त्यांच्यातलं अंतर वाढवण्याचा प्रयत्न एक वर्ग कसा करतोय, असं सांगण्याचा प्रयत्न पवार करताना दिसत आहेत.

फोटो स्रोत, Sharad Pawar
पण भाजपने मात्र या व्हीडिओतल्या एका भागाचा आधार घेत शरद पवार यांच्यावर जातीयवादी आणि हिंदूविरोधी असल्याचा आरोप केला आहे.
सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी याबाबत एक फेसबुक पोस्ट लिहून या व्हीडिओचा कसा विपर्यास करण्यात आला आहे हे मांडलं आहे.
"एखादी गोष्ट आऊट ऑफ कॉन्टेक्स्ट कशी सांगावी, याचा वस्तुपाठ म्हणजे सोशल मीडियावर फिरणारं शरद पवारांचं भाषण. प्रथमदर्शनी हा बरोबर उलटं चित्र व्हिडिओ दाखवतो. पवार जातीयवादी आहेत, असं चित्र उभं करतो. भाषणाची सुरूवातच जणू पवार मत मांडताहेत, अशी होते आणि सोशल मीडिया- व्हॉटस्अॅप युनिर्व्हसिटीत 10 सेकंदांवर पेशन्स नसलेली मंडळी पवारांना जातीयवादी ठरवून मोकळी होताहेत. कष्टकऱ्यांच्या वेदना मांडणारी ही विद्रोही कविता. पवार ती कविता वाचून दाखवत नव्हते; त्या कवितेचा आशय सांगत होते," असं सम्राट फडणीस यांनी लिहिलं आहे.
साताऱ्यातल्या ज्या कार्यक्रमात शरद पवार यांनी हे भाषण केलं त्या कार्यक्रमात ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे स्वतः उपस्थित होते. तिथं त्यांना फुले आंबेडकर पुरस्कार प्रदान करण्यात आला.

फोटो स्रोत, Sharad pawar
शरद पवार यांनी तिथं केलेल्या भाषणाबाबत बीबीसी मराठीशी बोलताना वागळे म्हणाले, "या कार्यक्रमातलं शरद पावर याचं संपूर्ण भाषण जातीयवादाच्या विरोधात होतं. त्यांनी फुले, शाहू, आंबेडकरचे दाखले दिले. 2 कवितांचे दाखले त्यांनी यामध्ये दिले. त्यातलीच एक कविता जवाहर राठोड यांची होती. ती पाथरवट समाजाबद्दल भाष्य करणारी होती. शरद पवार यांच्या या बोलण्यात किंचितही जातीयवाद नव्हता. भाजप लबाड आहे. ते लबाडीनं पवारांच्या या वक्तव्याचा वापर करत आहेत."
भाजपने माफी मागावी - राष्ट्रवादी काँग्रेस
राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे नेते रविकांत वर्पे यांनी एक व्हीडिओ जारी करत भाजपच्या या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. तसंच त्यांनी भाजपने माफी मागितली नाही तर कायदेशीर कारवाई करू असं म्हटलंय.
"मुळामध्ये हे भाषण भाजपला समजलेले नाही. अर्धवट ज्ञान असणरा भाजपा पक्ष आणि त्यांचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे शरद पवार साहेब यांच्याबद्दल खोटी माहिती पसरवत असून याबद्दल त्यांनी पवार साहेबांनी जाहीरपणे माफी मागावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जाण्याची तयारी ठेवावी," असं म्हटलंय.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








