शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे?

फोटो स्रोत, Getty Images
राज्यात गुरुवारी विविध ठिकाणी प्राप्तीकर विभागानं छापे मारून चौकशी केली. यामध्ये अजित पवारांच्या तीन बहिणींशी संबंधित मालमत्तांवरगही छापे मागण्यात आले. ही कारवाई सूडबुद्धीनं केली जात असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी गुरुवारी माध्यांशी बोलताना ही शक्यता व्यक्त केली आहे.
माझ्या तीन पुतण्या ज्यांचा राजकारणाशी काहीही संबंध नाही, त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मात्र त्याला काही वेगळी कारणं असण्याची शक्यता यावेळी पवारांनी बोलून दाखवली.
अजित पवार यांच्या निकटवर्तीयांच्या घरी आयकर विभागाने गुरुवारी छापे मारले. त्यात अजित पवार यांच्या 3 बहिणींचादेखील समावेश आहे. त्याचबरोबर अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या कार्यालयावर देखील आयकवर विभागाने छापा मारला आहे.
शरद पवार यांच्याकडे किती संपत्ती आहे?
शरद पवार यांच्या संपत्तीबद्दल महाराष्ट्रात कायमच चर्चा होत असते.
2009च्या लोकसभा निवडणुकीपासून शरद पवार यांनी उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांनुसार त्यांच्याकडे एकूण संपत्ती किती आहे?

फोटो स्रोत, Getty Images
असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, शरद पवार यांनी मार्च 2020 मध्ये राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात -
शरद पवार यांची एकूण संपत्ती 32 कोटी 73 लाख 67 हजार 269 रुपये एवढी आहे. शरद पवारांची जंगम मालमत्ता 25 कोटी 21 लाख 33 हजार 329 रुपये आहे. तर स्थावर मालमत्ता 7 कोटी 52 लाख 33 हजार 941 रुपये आहे.
- जंगम मालमत्तेत, 65,680 रुपये रोकड, 9 कोटी 39 लाख 93 हजार 386 रुपये बँकेत विविध स्वरुपात आहेत.
- 7 कोटी 46 लाख 24 हजार 449 रुपयांचे बाँड्स आणि कंपनी शेअर आहेत.
- 88 लाख 65 हजार 805 रुपयांचे दागिने असल्याचा उल्लेख आहे.
- 7 कोटी 45 लाख 84 हजार रुपये एवढे वैयक्तिक कर्ज किंवा अॅडव्हॉन्स म्हणून दिलेली रक्कम आहे.
- स्थावर मालमत्तेत, 1 कोटी 30 लाख 97 हजार 960 रुपयांच्या शेतजमिनींचा उल्लेख आहे.
- 91 लाख 71 हजार 480 रुपयांची बिगरशेती जमीन आहे.
- 3 कोटी 12 लाख 50 हजार रुपये मालकीची व्यावसायिक इमारत आहे. तर 2 कोटी 17 लाख 14 हजार 501 रुपये मालकीची रहिवासी इमारत आहे.
शरद पवारांवर 1 कोटी रुपयाचे देणे आहे. यातले 50 लाख रुपये शरद पवार यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि 50 लाख रुपये नातू पार्थ पवार यांच्या कडून घेतले आहेत.
प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्याप्रमाणे, ही एकूण संपत्ती शरद पवार आणि त्यांच्या पत्नी प्रतिभा पवार यांच्या नावे नमूद करण्यात आली आहे.
शरद पवारांच्या नावावर एकही गाडी नसल्याची माहितीही प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे.
दहा वर्षांत संपत्तीत किती वाढ?
2009 मध्ये शरद पवार माढा लोकसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यावेळी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार,
असोसिएशन फॉर डेमोक्रटिक रिफॉर्म्स (ADR) या निवडणुकीसंदर्भातल्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार,
त्यांची एकूण संपत्ती 8 कोटी 72 लाख 38 हजार 434 एवढी होती. यामध्ये 5 कोटी 15 लाख 24 हजार 248 रुपये जंगम मालमत्ता तर 3 कोटी 57 लाख 14 हजार 186 रुपये स्थावर मालमत्ता होती.

फोटो स्रोत, Getty Images
- जंगम मालमत्तेत, शरद पवार, त्यांच्या पत्नी आणि एकत्र कुटुंबाचे मिळून 2 लाख 10 हजार रुपये रोकड
- बँकेतील आणि इतर ठेवी, इ. मिळून शरद पवार, त्यांच्या पत्नी आणि एकत्र कुटुंब असे मिळून 1 कोटी 81 लाख 81 हजार 191 रुपये आहेत. तसेच एकूण 27 लाख 33 हजार 802 किमतीच्या दगिन्यांचा उल्लेख आहे.
- यामध्ये बाँड्स, शेअर्स आणि इतर क्लेम्स असे सगळे मिळून एकूण 5 कोटी 15 लाख 24 हजार 248 रुपये जंगम मालमत्ता दाखवण्यात आली आहे.
- तर शेतजमीन, भूखंड, इमारत अशी एकूण 3 कोटी 57 लाख 14 हजार 186 रुपयांची स्थावर मालमत्ता दाखवण्यात आली आहे.
गेल्या दहा वर्षांत शरद पवारांच्या संपत्तीत 24 कोटी 1 लाख 28 हजार 835 रुपयांनी वाढ झाली आहे.
2014 च्या राज्यसभा निवडणुकीच्या प्रतिज्ञापत्रासोबत तुलना केली तर गेल्या सहा वर्षांत शरद पवार यांची संपत्ती 60 लाख रुपयांनी वाढली आहे. 2014 च्या प्रतिज्ञापत्रात त्यांची एकूण संपत्ती 32.13 कोटी रुयये होती.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








