आदित्य ठाकरेंची संपत्ती: हिऱ्यांचं कडं, चांदीची भांडी, शेतजमीन आणि बरंच काही

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/@AUThackeray

ठाकरे कुटुंबीयांच्या संपत्तीबद्दल अनेकांच्या मनात कुतूहल असतं. यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या रूपानं ठाकरे कुटुंबातील पहिली व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात उतरलीये.

आपला उमेदवारी अर्ज भरताना ठाकरे यांनी दिलेल्या माहितीमुळे किमान आदित्य ठाकरे यांच्या संपत्तीचे तपशील लोकांसमोर आले आहेत. उमेदवारी अर्जासोबत आदित्य ठाकरेंनी जे प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे, त्यामध्ये त्यांनी आपल्या संपत्तीचे तपशील दिले आहेत.

आदित्य ठाकरे ठाकरे यांची एकूण स्थावर आणि जंगम मालमत्ता 16 कोटी 5 लाख 12 हजार 172 रूपये एवढी आहे.

आदित्य ठाकरेंकडे एकूण जंगम मालमत्ता 11 कोटी 38 लाख 5 हजार 258 रूपये एवढी आहे.

गाड्या, दागिने आणि गुंतवणूक

आदित्य ठाकरेंनी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या ठेवींची रक्कम 10 कोटी 36 लाख 15 हजार 218 रूपये आहे. HDFC बँक, ICICI, भवानी सहकारी बँक, सारस्वत बँक, इंडियन ओव्हरसीज बँक अशा बँकांमध्ये त्यांनी ठेवी ठेवल्या आहेत.

त्यांची बाँड्स, शेअर्स यातील गुंतवणूक 20 लाख 39 हजार 12 रूपयांची आहे. म्युच्युअल फंडात 24 हजारांची रक्कम गुंतवलीये.

आदित्य ठाकरेंकडे बीएमडब्ल्यू कार आहे. ही कार 2019 साली खरेदी केली असून या कारची आताची अंदाजे किंमत 6 लाख 50 हजार रुपये आहे. या कारच्या क्रमांकाची नोंदणी 2010 साली केलीये.

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/@AUThackeray

आदित्य ठाकरेंकडे 64 लाख 65 हजार 74 रूपयांचे दागिने आहेत. यात 535 हिरे लावलेलं गोल्ड प्लेटेड ब्रेसलेट आहे. याची किंमत 5 लाख 53 हजार 370 रूपये एवढी आहे. शिवाय, 24 कॅरेटचे सोन्याची नाणी आणि बार (किंमत 54,97,500 रूपये) आणि चांदीची भांडी आणि नाणी (किंमत 7,14,204 रूपये) आहेत.

10 लाख 22 हजार 610 रूपयांच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत.

शेतजमीन आणि व्यावसायिक जागा

आदित्य ठाकरेंच्या नावे रायगड जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील बिलावले इथं शेतजमीन आहे. या जमिनीची आताची अंदाजे किंमत 77 लाख 66 हजार रूपये एवढी आहे. ही जागा वडिलांनी गिफ्ट दिलेली आहे.

ठाणे जिल्ह्यातील कल्याण आणि घोडबंदर अशा दोन ठिकाणी व्यावसायिक जागा आहेत. कल्याणमधील जागा 1250 स्केअर फूट (सध्याची अंदाजे किंमत 89 लाख 40 हजार 914 रूपये) आणि घोडबंदर येथील जागा 1508 स्केअर फूट (सध्याची अंदाजे किंमत 3 कोटी रूपये) आहे.

म्हणजेच जागा शेतजमीन आणि व्यावसायिक जागांची एकूण अंदाजे किंमत 4 कोटी 67 लाख 6 हजार 914 रूपये एवढी आहे.

आदित्य ठाकरे

फोटो स्रोत, Twitter/@AUThackeray

कुठून आला पैसा?

आदित्य ठाकरे यांनी आपण व्यावसायिक असल्याचे प्रतिज्ञापत्रात म्हटलंय. व्याज, भाडे, व्यावसायिक संस्थेच्या नफ्यातला हिस्सा, लाभांश (Dividend) असे आदित्य ठाकरे यांनी उत्पन्नाचे स्रोत प्रतिज्ञापत्रात नमूद केले आहेत.

आदित्य ठाकरे यांच्यावर कुठलेही कर्ज नाही.

आदित्य ठाकरे यांचं वार्षिक उत्पन्न (वर्षनिहाय आकडेवारी):

  • 2014-15 - 22 लाख 15 हजार 700 रूपये
  • 2015-16 - 85 लाख 50 हजार 70 रूपये
  • 2016-17 - 9 लाख 35 हजार 110 रूपये
  • 2017-18 - 7 लाख 19 हजार 950 रूपये
  • 2018-19 - 26 लाख 30 हजार 560 रूपये

आदित्य ठाकरेंकडे 13 हजार 344 रूपयांची रोख रक्कम आहे.

उद्धव ठाकरेंच्या वार्षिक संपत्तीचाही उल्लेख

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी प्रतिज्ञापत्रात वडील उद्धव ठाकरे यांच्या वार्षिक उत्पन्नाचाही उल्लेख केला आहे. उद्धव ठाकरेंचं उत्पन्न दरवर्षी कमी होताना दिसतंय.

  • 2014-15 - 24 लाख 64 हजार 80 रूपये
  • 2015-16 - 17 लाख 1 हजार 710 रूपये
  • 2016-17 - 12 लाख 52 हजार 990 रूपये
  • 2017-18 - 3 लाख 11 हजार 10 रूपये
  • 2018-19 - 2 लाख 4 हजार 780 रूपये

प्रतिज्ञापत्रातील 'HUF' (हिंदू अनडिव्हायडेड फॅमिली) या रकान्यात ही माहिती देण्यात आलीये.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)