औरंगाबाद : 'राज ठाकरे विकासाच्या ब्लू प्रिंटवरून थेट भोंग्यांवर आले' - सभास्थळावरून ग्राऊंड रिपोर्ट

फोटो स्रोत, @mnsadhikrut
- Author, श्रीकांत बंगाळे
- Role, बीबीसी मराठी, औरंगाबाद
"आपल्याकडे हॉलिवूडला लाजवेल असा नेता (अमित ठाकरे) आहे."
"तुमचं सगळ्या गावाशी जमतं, पण भावाशी जमत नाही."
मनसे प्रमुख राज ठाकरे यांचं औरंगाबादमधील भाषण सुरू होण्यापूर्वी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे सभास्थळावर टाळ्यांचा कडकडाट झाला.
औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर राज ठाकरे यांची सभा 1 मे रोजी पार पडली. मशिदीवरील भोंग्यांविरोधात 3 मेपर्यंत दिलेल्या अल्टिमेटमवर आपण ठाम असल्याचं यावेळी त्यांनी पुन्हा अधोरेखित केलं.
राज ठाकरे रात्री 8 वाजून 3 मिनिटांनी भाषण द्यायला उभे राहिले आणि साधारण पुढची 45 मिनिटे ते बोलत होते.
त्यांच्या अर्ध्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्यावर महाराष्ट्रात जातीयवाद पसरल्याचा आरोप होता आणि उर्वरित अर्ध्या भाषणात भोंग्यांचा उल्लेख होता.
'मी लाऊडस्पीकरवर येणार आहे, थांबा', असं जेव्हा राज म्हणाले, तेव्हा मात्र मैदानात घोषणा आणि टाळ्यांचा पाऊस पडला.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
मैदानावर जमलेल्या प्रत्येकासाठी राज ठाकरे भोंग्यांविषयी नेमकं काय बोलणार आहेत, हेच सर्वाधिक महत्त्वाचं आहे, हे त्यातून दिसत होतं.
राज ठाकरे यांच्या भाषणाच्या शेवटच्या 10 मिनिटांत त्यांना उपस्थितांमधून टाळ्यांचा, घोषणांचा सर्वाधिक प्रतिसाद मिळाला. या 10 मिनिटांच्या काळात राज ठाकरे मशिदीवरील भोंग्यांवर बोलत होते.
पण, राज असो की इतर नेते. मूळात सभास्थळी जाऊन त्यांनं ऐकणं फार सोपं काम नव्हतं.
पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त
आम्ही दुपारी 4 वाजता मराठवाडा सांस्कृतिक मैदानाच्या गेटवर पोहोचलो. तेव्हा तिथं प्रवेश करण्यासाठी मोठी रांग लागलेली दिसून आली.
पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. पत्रकार असल्यामुळे आणि आमच्याकडील आयडी कार्ड व बूम बघितल्यानंतरच आम्हाला मैदानात सोडण्यात आलं. इतर सामान्य माणसांना मात्र बॅग किंवा पाण्याची बॉटलसुद्धा मैदानात नेण्याची मूभा नव्हती.
त्यामुळे मग आमच्याकडची बॉटल पाहून अनेक जण पाणी पिऊ का, असं मध्येमध्ये विचारत होते.
मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात 80 हजार लोक बसू शकतात. पोलिसांकडून आयोजकांना 15 हजार खुर्च्या टाकण्यास परवानगी देण्यात आली होती.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
दुपारची 4 वाजेची वेळ असताना, सूर्य आग ओकत असतानाही लोक मात्र मैदानात येऊन जागा पकडण्याचा प्रयत्न करत होते.
आम्ही या मैदानात मागच्या बाजूला ठेवलेल्या खुर्च्यांवर जाऊन बसलो, कारण तिथं नेमकीच थोडी सावली आली होती.
पत्रकार असल्यामुळे ड्यूटीवरील पोलीस कर्मचाऱ्यानं आम्हाला तिथं बसू दिलं.
"अहो, दुपारपासून भर ऊन्हात उभा आहे. आता कुठं थोडी सावली मिळाली," त्या कर्मचाऱ्याचं हे वाक्य दिवसभराच्या त्याच्या मानसिक, शारीरिक अवस्थेविषयी सांगत होतं.
खुर्चीवर बसलो तोच वरती लक्ष गेलं. ड्रोनची करडी नजर प्रेक्षकांवर असल्याचं लक्षात आलं. ड्रोन्स सातत्यानं मैदानाची पाहणी करत होते.
तितक्यात औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी सभास्थळावरील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. जवळपास 3 हजार पोलिसांचा फौजफाटा या सभेसाठी तैनात करण्यात आल्याचं बोललं जात होतं. मैदानाकडे जाणाऱ्या प्रत्येक चौकात पोलिसांचा पथक होतं.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
मैदानात एका बाजूला कार्यकर्त्यांना पाणी पिण्यासाठी पाण्याचं टँकर, तर दुसऱ्या बाजूला रुग्णवाहिका तैनात करण्यात आली होती.
संध्याकाळी सहाच्या सुमारास गर्दी इतकी वाढली की, मैदानावरील भींतीसुद्धा कमी पडायला लागल्या. मग मैदानाच्या मागच्या बाजूस असलेल्या पायऱ्यांवर बसण्याची विनंती आयोजकांनी केली आणि तरुणांचे घोळच्या घोळ मैदानातील पायऱ्यांकडे पळत सुटले.
घरांच्या बाल्कनीत काही जण उभे होते. तर काही जण झाडांवर बसले होते. मैदानातही जिथं जागा मिळेल, तिथं लोक उभे राहत होते.
'ब्लू प्रिंट ते भोंगा'
यापैकी एक होते नितीन देसाई. औरंगाबादमधल्या पैठणचे नितीन यांचं डी.एडचं शिक्षण झालंय. सध्या ते शेती करतात.
दिवसभर शेतातले कामं आटोपून ते राज ठाकरे यांना ऐकण्यासाठी पाच वाजता सभेच्या ठिकाणी पोहोचले होते. राज ठाकरे यांचं वक्तृत्व त्यांना आवडतं. पण, सध्या राज यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे काही प्रश्नही त्यांच्या मनात आहेत.
ते म्हणाले, "राज ठाकरे यांनी याआधी महाराष्ट्राच्या विकासाची ब्लू प्रिंट आणली होती. आणि आता ते भोंग्यांवर बोलत आहेत. त्यांचा हा प्रवास चकित करणारा आहे असं नाही का वाटत?
"पण, आमच्या गावात म्हणाल तर बेरोजगारीचा मोठा प्रश्न आहे. तरुण शिकलाय, पण त्याच्या हाताला रोजगार नाहीये. दुसरं म्हणजे कितीतरी लाख टन ऊस तसाच पडून आहे. ऊसाचं पेमेंट वेळेवर मिळत नाही. ऊसाचा प्रश्न मोठा आहे. यावरही बोलायला हवं."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचा विकास आराखडा दर्शवणारी एक ब्लू प्रिंट काढली होती. त्यात त्यांनी वीज, अन्न, पाणी, शेती, महिला अशा वेगवेगळ्या क्षेत्रात महाराष्ट्र कुठे आहे आणि महाराष्ट्रानं काय करायला हवं, हे सांगितलं होतं.
नितीन यांच्याशी चर्चा सुरू असताना मनसेच्या नेत्यांकडून सभा ऐकण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना शिस्त पाळण्याचं वारंवार आवाहन करण्यात येत होतं. 'खुर्चीवर उभं राहिलेल्यांनी खाली बसा','महिलांना जाण्यासाठी रस्ता द्या...'या व अशा सुचनांचा यामध्ये समावेश होता.
त्यानंतर मध्येच मोठ्या आवाजात, एखाद्याला धडकी भरेल अशा आवाजात 'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजय असो', 'राज ठाकरे तुम आगे बढो....'अशा घोषणा ऐकायला येत होत्या.
'भोंग्याचा त्रास होतो'
राज ठाकरे यांच्या सभेला सर्वाधिक उपस्थिती तरुणांची होती. पण, इथंच आमची भेट 62 वर्षांच्या गजानन बापू देशमुख यांच्याशी झाली.
बाळासाहेब ठाकरे यांनी 1988 साली याच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानात सभा घेतली होती. देशमुख स्वत: ती सभा ऐकायला या मैदानात उपस्थित होते आणि आता राज यांचीही सभा ऐकण्यासाठी आले होते.
"बाळासाहेबांच्या सभेनंतर शिवसेनेला मराठवाड्यात मोठं यश मिळालं. त्यामुळे मग आता शिवसेनेनं राज ठाकरे यांची धास्ती घेतलीय. त्यांना ते विरोध करत आहेत. गर्दीचं म्हणाल तर बाळासाहेबांच्या सभेसारखीच गर्दी याहीवेळी जमली आहे," गजानन देशमुख इतिहास आणि वर्तमानाची सांगड घालताना सांगत होते.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
एरवी साडे सात वाजले होते. अजून अर्धा तास राज ठाकरे बोलणार नाहीत, असा देशमुख यांचा अंदाज होता.
"मी काही मनसेचा कार्यकर्ता किंवा पदाधिकारी नाहीये. पण, मला राज ठाकरेंचा भोंग्यांचा मुद्दा पटतोय. अहो, सकाळीसकाळी तो भोंगा वाजतो तेव्हा किती त्रास होतो त्याचा. आणि महागाई, बेरोजगारी हे प्रश्न सोडवायला ते थोडीच सत्तेत आहेत?", राज्यातील इतर समस्यांविषयी विचारल्यावर देशमुख यांनी असा सवाल केला.
राज यांचं भाषण आता संपायला आलं होतं. ते भोंग्यांच्या मुद्द्यावर बोलायला लागले होते. आपण आपल्या अल्टिमेटमवर ठाम असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
त्यानंतर राष्ट्रगीतानं सभा संपली.
पण, तोवर ज्याला त्याला घरी परतण्याची घाई झाल्याचं दिसून येत होतं. मैदानातून बाहेर पडण्यासाठीचं प्रवेशद्वार लहान असल्यानं तरुण मंडळी अक्षरश: भींतीवरून उड्या मारून बाहेर पडत होते.

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
काही तरुण विशिष्ट समुदायाच्या विरोधात घोषणा देत असल्याचंही कानावर येत होतं.
सव्वा नऊच्या सुमारास राज ठाकरे सभास्थळाच्या बाहेर पडले. त्यांना निरोप देताना मनसेच्या कार्यकर्त्यांनी मोठी घोषणाबाजी केली.
सभास्थळाहून पार्किंगपर्यंत येण्यासाठी आम्हाला जवळपास 15 मिनिटे लागली. तिथून घरी येताना रस्त्यावर मनसेकडून लावलेले होर्डिंग्ज रात्रीच्या प्रकाशात अगदी ठळक दिसत होते. ज्यावर राज ठाकरे यांचा उल्लेख 'हिंदू जननायक' असा केला होता.
पुण्याहून आलेल्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांना सभास्थळी याच मुद्द्यावर विचारलं तेव्हा ते म्हणाले, "राज ठाकरेंनी मराठी आणि हिंदुत्वाचा मुद्दा कधीच सोडला नव्हता. बाळासाहेबांचे विचार खऱ्या अर्थानं राज ठाकरे पुढे नेत आहेत. भोंग्याचा आवाज थांबला पाहिजे, कारण लहान मुलांना त्याचा त्रास होतो."
याच पदाधिकाऱ्यानं हेही सांगितलं की, पुण्यातल्या काही भागात 2 तास, 4 तास, तर काही भागात 8 तास लोडशेडिंग असतं.
मराठवाड्यातील तरुणाला नेमकं काय हवंय?
दहाच्या सुमारास मी घरी पोहोचलो. तेव्हा मात्र मला सभास्थळी ऐकू आलेली काही संभाषणं प्रकर्षानं आठवली.
राज ठाकरे बोलायला उभे राहिले, तेव्हा तरुणांनी त्याचे व्हीडिओ रेकॉर्ड करायला सुरुवात केली. माझ्या मागे असलेला तरुणही तेच करत होता. पण, त्याच्या शेजारचा त्याला म्हणाला, "कुणाचा फोन आला तर कट करू नको. ते कामाचे फोन असतात."
मी म्हटलं, ते खरं काम का? तर तो म्हणाला, "हो बरोबर आहे की. हे काय (सभा आणि भाषणं) चालूच राहणार. यातून पोटापाण्याला थोडंच काही मिळणार आहे."

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc
दुसरं एक असंच संभाषण. एकाचा फोन वाजला आणि त्यानं तो उचलला.
"वरच्या बाजूनं पाणी लावून झालं का, झालं असेल तर खालच्या बाजूनं लाव. सभा संपते अर्ध्या तासात. मी येतोच आहे."
मराठवाड्यातील या व अशाच तरुणांची सर्वाधिक संख्या राज ठाकरे यांच्या सभेला होती.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








