राज ठाकरेंचं 'हिंदुत्व' भाजपाला आव्हान ठरेल का?

फोटो स्रोत, facebook
- Author, मयुरेश कोण्णूर
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
राज ठाकरेंनी घेतलेली आक्रमक हिंदुत्वाची भूमिका सध्या सर्वत्र चर्चेचा विषय आहे. मुंबई, ठाण्यातल्या सभा आणि पुण्यातील 'हनुमान चालिसा' पठणानंतर आता औरंगाबादेतही राज ठाकरेंची सभा होते आहे.
अक्षयतृतीयेला राज्यभर 'महाआरती'चे आदेश राज यांनी दिलेत. पक्षाचा तीन रंगांचा जुना झेंडा पूर्ण भगवा करुन हिंदुत्वाच्या रस्त्यावरुन चालणार हे सूचित केल्यानंतर मोठ्या काळानंतर प्रत्यक्षात राजकीय कृती सुरु केली आहे.
त्याचे परिणामही राज्यात दिसू लागले आहे. सध्या राजकारण 'अजान आणि हनुमान चालिसा' या मुद्द्यांभोवती फिरते आहे. भोंगा हा सामाजिक मुद्दा आहे, राजकीय नाही असं राज यांनी म्हटलं तरीही विशिष्ट समुदायाकडे असलेला रोख लपलेला नाही. हे धार्मिक आणि संवेदनशील मुद्दे असल्यानं, सोबतच शेजारच्या कर्नाटक, मध्यप्रदेश, राजस्थान या राज्यांमध्ये अशा मुद्द्यांवरून नुकत्याच घडलेल्या घटनांचा इतिहास ताजा असल्यानं, महाराष्ट्रातही तणावाची स्थिती निर्माण होते की काय असे प्रश्न उठू लागले आहेत.
सुरुवातीला राज यांच्या सभांकडे आणि वक्तव्यांकडे हलक्या गांभीर्यानं पाहणा-या राज्य सरकारनं आणि त्यातल्या राजकीय पक्षांनी आता हे राज यांचं हिंदुत्वाचं राजकारण नव्या गांभीर्यानं घेतलं आहे असंही चित्र आहे.
राज यांच्या प्रश्नांना उत्तरं देण्यासाठी तात्काळ पत्रकार परिषदा घेतल्या जात आहेत. त्यांच्या आरतीला महाआरती आणि इफ्तारनं प्रतिक्रिया दिली जात आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी त्यात आघाडीवर आहेत. राज यांनी अयोध्या दौ-याची घोषणा करताच आदित्य यांचाही अयोध्येचा दौरा आता ठरतो आहे.
राज यांच्या समर्थकांनी त्यांना 'नवा हिंदुहृदयसम्राट' म्हणतात शिवसेनेच्या गोटातून त्याला तीव्र विरोध झाला. उद्धव यांनी तर कोल्हापूर निवडणुकीच्या भाषणादरम्यान नाव घेता ' नकली हिंदुहृदयसम्राट' असा टोला राज यांना लगावला. मग आता 'मनसे'च्या कार्यकर्त्यांनी राज यांना आता 'हिंदुजननायक' म्हणायला सुरुवात केली आहे.
समाजमाध्यमांवरही राज यांची चर्चा सर्वाधिक आहे. एकंदरीत महाराष्ट्रात सध्या हिंदुत्वावरुन सुरु असलेल्या राजकारणाचा नरेटिव्ह हा राज यांनी सेट केला आहे हे नक्की.

फोटो स्रोत, facebook
राज यांच्या या आक्रमक हिंदुत्वामागे भाजपासोबत युती करण्याचं राजकीय कारण आहे असं पहिल्यापासून म्हटलं गेलं आहे. राज यांची गेल्या काही काळापासून भाजपाशी वाढत चाललेली जवळीक ही त्यांच्या नव्या राजकीय भूमिकेचं निमित्त ठरलं.
एकीकडे शिवसेनेनं कॉंग्रेस-राष्ट्रवादीसोबत जाऊन हिंदुत्वाचा मुद्दा कायमचा सोडला हे राज ठाकरे यांच्या आक्रमक हिंदुत्वानं ठसवायचं आणि अगोदरपासूनच मराठीसाठी आक्रमक असलेल्या मनसेकडून या दोन मुद्द्यांवर शिवसेनेच्या मतांमध्ये विभाजन करायचं, अशी भाजपाची रणनीति आहे असंही एक बाजूनं विश्लेषण केलं गेलं आहे.
पण आता 'हिंदुजननायक' अशी आक्रमक प्रतिमा घडवू पाहणारे राज ठाकरे आणि त्यांची 'मनसे' कोणाची हिंदुत्ववादी मतं आपल्याकडे खेचतील? शिवसेनेची की भाजपाची? नरेंद्र मोदींची बहुमतातली सत्ता येण्यामागे आणि ती आल्यानंतर भाजपानं पहिल्यापासून हिंदुत्वावरच आधारलेलं त्यांचं राजकारण अधिक निर्णायक केलं.
हिंदुत्वाच्या मुद्द्यानं त्यांना लोकसभा आणि विविध राज्यांतल्या विधानसभा निवडणुकांमध्ये मतं आणि विजय मिळवून दिला आहे. महाराष्ट्रही त्याला अपवाद नाही. मग राज ठाकरेंची कठोर हिंदुत्ववादी भूमिका ही भाजपाकडे जाणारी हिंदुत्ववादी मतं त्यांच्याकडे खेचतील का?
त्यामुळे 'हिंदुजननायक' राज ठाकरे हे भाजपाचाही अडथळा बनू शकतील का असा प्रश्न मतांच्या गणिताच्या अंदाजात विचारला जातो आहे. त्याला कारणंही तशीच आहेत.
बाळासाहेब ठाकरे ते राज ठाकरे, हिंदुहृदयसम्राट ते हिंदुजननायक
1980 मध्ये भाजपाची स्थापना झाल्यानंतर काहीच काळात रामजन्मभूमीचा मुद्दा भारतीय राजकारणात मध्यवर्ती आला आणि अगोदरच्या जनसंघापेक्षा अधिक आक्रमक भूमिका घेत लालकृष्ण आडवाणींनी भाजपाला या मुद्द्यावर आरुढ केलं. भाजपाचा देशभर विस्तार यानंतरच झाला.
अयोध्येच्या या मुद्द्यावरुन जी हिंदूंची भावना देशभरात तयार झाली त्याकडे पाहूनच तोपर्यंत मुंबईतल्या स्थानिकांच्या मराठी अस्मिता प्रश्नावर लढणा-या शिवसेनेनं 1985 मध्ये हिंदुत्वाचा मुद्दा उचलला. त्याचा त्यांनाही फायदा झाला आणि मुंबईसह महाराष्ट्रभर शिवसेनेची वाढ सुरु झाली.

फोटो स्रोत, Getty Images
याच मुद्द्यावर शिवसेना-भाजपा युती झाली. पण आक्रमक पवित्र्यामुळे बाळासाहेब ठाकरे 'हिंदुहृदयसम्राट' झाले आणि शिवसेना युतीत 'मोठा भाऊ'बनली. केंद्रात वाजपेयींच्या नेतृत्वात भाजपाचं सरकार आलं, महाराष्ट्रात युतीचं एकदा सरकारही आलं. पण महाराष्ट्रात हिंदुत्वाचा ब्रँड हे कायम बाळासाहेब ठाकरेच राहिले.
मोदींचा गुजरातमध्ये उदय झाला होता, 2002 च्या गुजरात दंगलींनंतर त्यांची एक प्रतिमा झालेली होती, त्यांच्या राष्ट्रीय राजकारणातला दबदबाही वाढत होता.
2003 मध्ये शिवसेनेचा बालेकिल्ला असणा-या शिवाजी पार्कवर मोदींची सभाही भाजपानं घेतली होती.
पण तरीही बाळासाहेबांची हिंदुत्ववादी प्रतिमा महाराष्ट्रात मोठी राहिली. 2014 मध्ये देशातलं राजकारण बदललं. हिंदुत्वाचा मुद्दा मुख्य प्रवाह बनला आणि मोदी त्याचा चेहरा.
त्याच आधारावर महाराष्ट्रात लागोपाठ दोन निवडणुकांत सर्वात मोठा पक्ष बनला. असं असलं तरीही बाळासाहेब आणि शिवसेनेची हिंदुत्ववादी प्रतिमा हे महाराष्ट्रात भाजपाच्या हिंदुत्ववादी प्रतिमेसमोर कायमच आव्हान राहिली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना आणि मोठं काम महाराष्ट्रात असतांनाही तसं झालं.
ती हिंदुत्वाची प्रतिमा राजकारणात कायम आपली करण्याची संधी भाजपाला बाळासाहेबांपश्चात जेव्हा शिवसेनेनं 'महाविकास आघाडी'त जायचं ठरवलं तेव्हा मिळाली.
महाराष्ट्रातल्या राजकीय हिंदुत्वाची एकमेव दावेदार भाजपा आणि त्याचा चेहरा केवळ नरेंद्र मोदी अशी ती संधी आहे. शिवसेना आपण 'हिंदुत्व सोडलं नाही' असं जरी सांगत असली तरी त्यांची राजकीय कसरत लपून राहिली नाही. पण राज ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या भूमिकेसहीत नव्या उदयानं आता एक नवं आव्हान उभं राहिलं आहे.
त्यामुळे भाजपा आणि संघ यांच्या निकटवर्तीयांमध्येही राज ठाकरे यांच्या प्रभावी होत चाललेल्या हिंदुत्ववादी प्रतिमेमुळे भुवया उंचावल्या आहेत. समाजमाध्यमांवरच्या प्रतिक्रियांमध्येही ते दिसतं आहे.
राज यांची हिंदुत्ववादी प्रतिमा भाजपापेक्षा आक्रमक आणि प्रभावी होईल का असा तो प्रश्न आहे. जर तसं झालं तर शिवसेनेच्या हिंदुत्ववादी मतांसोबत भाजपाचीही स्वत:ची मतं राज यांच्याकडे जातील का असाही प्रश्न विचारला जातो आहे. त्यामुळे राज यांना हिंदुत्वाचा भूमिकेवर आणणं ही भाजपाची रणनीति आहे असं जे विश्लेषण केलं जातं आहे, ते किती फायद्याचं ठरेल? हिंदुत्ववादी मतांमध्ये भाजपा, शिवसेना आणि मनसे अशी विभागणी निवडणुकीच्या मतांच्या गणितात कोणाच्या फायद्याची ठरेल?
'वसंतसेना' म्हणवली गेलेली शिवसेना कॉंग्रेसपेक्षा मोठी झाली
राज आणि मनसेच्या आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन मोठं होणं यामागे भाजपाचं राजकारण आहे असं म्हटलं जात असलं तरीही इतिहासातल्या शिवसेनेच्या प्रवासाचा संदर्भ देऊनही मनसेकडे बघितलं गेलं आहे.
मराठीचा मुद्दा स्थापनेपासून घेऊन आता हिंदुत्ववादी भूमिकेपर्यंत, राज हे त्यांच्या काकांच्या पावलावर पाऊल ठेवून वाटचाल करत आहेत असं म्हटलं जातं.

फोटो स्रोत, STRDEL
त्या इतिहासातून भाजपासाठीही एक संदर्भ आहे. कॉंग्रेसचे मुख्यमंत्री असलेल्या वसंतराव नाईकांनी मुंबईतलं कम्युनिस्टांचं वर्चस्व मोडून काढण्यासाठी शिवसेनेला मोठं केलं.
आचार्य अत्रेंनी त्यामुळं शिवसेनेला 'वसंतसेना' म्हटलं होतं आणि त्याचे दाखले आजही दिले जातात. कम्युनिस्टांचा प्रभाव कमी होत गेला, दत्ता सामंतांच्या संपानंतर कामगारविश्व बदललं आणि कॉंग्रेसचं तत्कालिन राजकारण परिणामकारक ठरलंही. पण याच काळात आणि प्रक्रियेदरम्यान शिवसेनाही मोठी होत गेली. तिची मुळंही खोल जात राहिली.
पाहता पाहता कॉंग्रेसकडून शिवसेनेनं मुंबई महापालिका जिंकून कायमची आपल्या ताब्यात घेतली. राज्यातही सेना विस्तारली आणि एक वेळ आली की शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांची संख्या पूर्ण राज्यावर एकेकाळी सत्ता असणा-या कॉंग्रेसपेक्षा जास्त झाली.
तशाच प्रकारे जर शिवसेनेच्या प्रभाव कमी करण्यासाठी दुस-या ठाकरेंसोबत, म्हणजे राज ठाकरेंसोबत, भाजपा मैत्री करुन त्यांना मोठं करण्याची राजकीय रणनीति खरंच आखत असेल तर शिवसेना आणि कॉंग्रेसचा हा इतिहासही अधोरेखित होतो. त्यात एक मुद्दा म्हणजे शिवसेनेचा निर्णायक विस्तार हा हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच झाला होता जो आज राज ठाकरेंनी घेतला आहे.
अर्थात इतिहासाची पुनरावृत्ती होऊ शकते का हे भाजपा मनसेची ही मैत्री केवढी आणि किती काळ एकत्र होते यावर अवलंबून आहे.
हिंदुत्वाची लाट आणि राज यांचा करिष्मा
हे स्पष्ट आहे की देशाच्या राजकारणात सध्या हिंदुत्व आणि राष्ट्रवाद यांचे प्रवाह सर्वात प्रबळ आहेत. एका प्रकारे ती लाटच आहे. भाजपानं हे दोन्ही मुद्दे प्रभाविरित्या उचलले आहेत. त्याचा निवडणुकीतल्या मुद्द्यांवरुन आणि निकालांवरुन प्रत्यय येतो आहे.
दुसरीकडे राज यांचा करिष्मा, त्यांचे वक्तृत्व, त्यांचे असणारे आकर्षण आणि त्यांच्या सभांना होणारी गर्दी हे राज्यातलं एक पक्कं समीकरण बनलं आहे. त्या राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा आक्रमकपणे उचलणं हे सध्याच्या राजकारणातलं प्रभावी कॉम्बिनेशन ठरु शकतं. ते दिसतंही आहे.
त्यामुळे राज हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्या लोकप्रियतेमुळे भाजपाच्या हातून राज्यात खेचून घेतील का असंही काही भाजपा समर्थकांना वाटतं.

फोटो स्रोत, Getty Images
नरेंद्र मोदी यांचा राजकारणात करिष्मा आहे. तो देशभर आहे. योगी आदित्यनाथ यांचाही हिंदुत्वाच्या राजकारणात एक करिष्मा आहे. पण उत्तर प्रदेशातही भाजपाअंतर्गत योगींपेक्षा महत्व मोदींनाच आहे.
उदाहरणार्थ योगींना अयोध्येतून विधानसभा निवडणूक लढवायची होती, पण भाजपानं त्यांना गोरखपूरमधनंच लढायला सांगितलं, असं म्हटलं गेलं. त्यामुळे आता महाराष्ट्रात करिष्मा असणाऱ्या राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा घेणं आणि त्याचा प्रभाव, हे भाजपाअंतर्गत कसं पाहिलं जातं, हे महत्वाचं आहे.
शिवाय राज यांचा सारखा गर्दी खेचणारा आणि गर्दीवर प्रभाव असणारा नेता महाराष्ट्रातला इतर कोणत्याही पक्षात नाही. त्या प्रभावामुळे ते हिंदुत्वाचा मुद्दा त्यांच्याकडे खेचून घेऊ शकतात.
'राज मोदींपेक्षा प्रभावी होऊ शकणार नाहीत'
ज्येष्ठ राजकीय पत्रकार संदीप प्रधान यांना वाटतं की राज यांच्या हिंदुत्ववादी भूमिकेची चर्चा आणि त्यांना गर्दी होत असली तरीही हिंदुत्वाचा जो मतदार मोदींकडे खेचला गेलेला आहे तो अजिबात दुरावला जाणार नाही.
"राज ठाकरे असोत वा इतर कोणतेही प्रादेशिक नेते असोत, ते सगळे नरेंद्र मोदींच्या करिष्म्यापुढे फिके पडले आहेत. ते सगळे बोलू शकतात पण मोदी करुन दाखवतात ही धारणा राममंदिर, कलम 370 किंवा तलाक प्रश्न याच्यामुळं पक्की झाली आहे. त्यामुळे राज भाषणं करतील, आंदोलनं करतील, पण 'हिंदूराष्ट्र' येण्यासाठी जे करावं लागेल ते मोदीच करतील हे त्यांच्या उच्चभ्रू, मध्यमवर्गीय मतदाराच्या मनामध्ये जे बसलं आहे ते सध्या तरी कोणी दूर करु शकत नाही. त्यामुळे राज यांचा भाजपाला काही तोटा होईल असं मला वाटत नाही," असं प्रधान म्हणतात.

फोटो स्रोत, Getty Images
"पण दुसरीकडे एक होतं आहे की शिवसेनेची अडचण होते आहे. त्यांना हिंदुत्ववादी भूमिका घ्यावी लागते आहे. पण कितीही झालं तरी सेनेकडे आमदारांची संख्या असणार आहे. राज यांच्या हल्ल्यामुळे सेना त्यांच्या पुरोगामी मित्रांपासून दुरावत जाईल. शेवटी भाजपाच त्यांना सोबत घेईल. राज यांच्याकडे पक्षसंघटन नसल्यानं त्यांचे किती लोक निवडून येतील? 'लाव रे तो व्हिडिओ'च्या वेळेस जसा त्यांचा वापर करुन घेण्यात आला, तसंच आताही होईल," प्रधान पुढे म्हणतात.
राजकीय पत्रकार मृणालिनी नानिवडेकर म्हणतात, " हिंदुत्वाच्या बसमध्ये गर्दी वाढली आहे हे खरं आहे. पण ट्रस्टेड कोण आणि टेस्टेड कोण हे मात्र लोकांना ठरवावं लागेल. राज यांना पूर्वी मतं मिळाली होती, पण तेव्हा मोदींचा उदय राष्ट्रीय राजकारणात झाला नव्हता. आता मोठा ब्रँड हा मोदीच आहेत. पण तरीही राज ठाकरे कोणाची मतं आपल्याकडे वळतात, शिवसेनेची की भाजपाची, हे मात्र पहावं लागेल. लक्ष ठेवावच लागेल. दुसरं मला असंही वाटतं की राज ठाकरेंना भाजपा चालवते आहे असं जे म्हटलं जातंय त्यातलं तथ्यही शोधायला हवं. मोदी हे अहंमन्य नेते आहेत आणि त्यांच्या प्रतिमेशी स्पर्धा करु शकणा-या कोणाला भाजपा जवळ करेल का हा प्रश्नही विचारायला हवा."
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








