जेम्स लेन प्रकरण: शिवाजी महाराज, जिजाऊंपासून ते राज ठाकरे-शरद पवारांपर्यंत

शिवाजी महाराज

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, ओंकार करंबेळकर,
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

जेम्स लेनचं भूत पुन्हा महाराष्ट्राच्या मानगुटीवर येऊन बसलंय. किंवा त्याला बसवण्यात आलंय. राज ठाकरेंनी पुन्हा जेम्स लेन आणि बाबासाहेब पुरंदरेंचा मुद्दा चर्चेत आणला आणि खुद्द शरद पवारांनी दोन-दोन वेळा त्याबद्दल विधानं करून चर्चा पुढे नेली.

पण दोन दशकांपूर्वी आलेल्या या वादळाची आता अनेकांना माहिती नसेल किंवा विसर पडला असेल. तसंच, काहींना हाही प्रश्न पडला असेल की राज ठाकरे आणि पुरंदरेंचा या वादाशी नेमका संबंध काय आहे. 10 प्रश्न आणि 10 उत्तरांमध्ये सोप्या भाषेत समजून घेऊया या वादाचा इतिहास आणि वर्तमान.

1. जेम्स लेन प्रकरण काय आहे?

13 फेब्रुवारी 2003 या दिवशी 'शिवाजी: हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' हे इंग्रजी पुस्तक ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने प्रकाशित केलं. त्याचे लेखक होते अमेरिकन इतिहास अभ्यासक जेम्स लेन.

शिवाजी महाराजांच्या जीवनाची माहिती देणाऱ्या या पुस्तकात जिजाऊंबद्दल बदनामीकारक मजकूर छापण्यात आला होता. त्याविरोधात महाराष्ट्रात आणि विशेषतः पुण्यात हिंसक पडसात उमटले.

जेम्स लेन यांना मदत केल्याचा ठपका काही इतिहासतज्ज्ञांवरही ठेवण्यात आला आणि त्यांच्यावर टीका करण्यात आली. पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला करून तेथील पुस्तके- कपाटं अशा वस्तूंची तोडफोड करण्यात आली होती. या प्रकरणाला ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग होता.

YouTube पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 1

या पुस्तकावर बंदी घालण्यात आली, पण नंतर कोर्टाने ती उठवली. 2004 सालच्या निवडणूक प्रचारात हा महत्त्वाचा मुद्दा ठरला.

2. जेम्स लेन कोण आहेत?

जेम्स लेन हे अमेरिकेतले इतिहास आणि धर्म या विषयांचे प्राध्यापक आहेत. ते अमेरिकेतील मिनियापोलिस राज्यातील मॅकालस्टर कॉलेज येथे अध्यापन करतात.

जेम्स लेन

फोटो स्रोत, Macalester

फोटो कॅप्शन, जेम्स लेन

जेम्स लेन या कॉलेजमधील धार्मिक अभ्यास म्हणजेच रिलिजियस स्टडिज विभागात कार्यरत आहेत. जेम्स लेन यांचा आशियातील धर्म आणि इस्लाम हा विशेष अध्ययनाचा विषय आहे. ते कॅथॉलिझम या अभ्यासक्रमाचंही अध्यापन करतात. त्यांना संस्कृत आणि मराठी या भाषाही येतात, असं ते सांगतात. त्यांनी हारवर्ड विद्यापीठातून पी.एचडी केलं आहे.

जेम्स लेन यांनी 1989 साली 'व्हिजन ऑफ गॉडः थिओफनी नॅरेटिव्ह्ज इन द महाभारत' नावाचं पुस्तक प्रसिद्ध केलं. 2001 साली त्यांनी 'द एपिक ऑफ शिवाजी' नावाचं पुस्तक लिहिलं. 2003 साली त्यांनी 'शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया' पुस्तक प्रसिद्ध केलं. 2014 साली त्यांनी 'मेटा रिलिजनः रिलिजन अँड पॉवर इन वर्ल्ड हिस्ट्री' हे पुस्तक प्रसिद्ध केलं. या पुस्तकात त्यांनी धर्म आणि राजकीय शक्ती यांच्या नात्यावर उपस्थित होणाऱ्या प्रश्नांचा उहापोह केला आहे.

3. शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया

हे पुस्तक 2003 साली प्रसिद्ध झालंय. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेस, यूएसएने ते प्रकाशित केलंय. या पुस्तकात मुख्य विषयाच्या ओळखीनंतर 5 प्रमुख प्रकरणं आहेत.

आपण हे पुस्तक का लिहितोय हे सांगताना जेम्स लेन पुस्तकाच्या परिचयाच्या प्रकरणत लिहितात, "शिवाजी हे त्यांच्या काळात आख्यायिकेप्रमाणे झाले असतील, पण गेल्या 300 वर्षांमध्ये ही आख्यायिका विस्तारत गेली आहे. त्यामुळे पुस्तक लिहिताना मी दोन कामं केली आहेत. पहिलं म्हणजे शिवआख्यायिकेच्या कथानकाची तपासणी आणि दुसरं आणि सर्वांत महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रीय हिंदू ओळखीशी त्यांचा संबंध जोडला जावा इतपत त्यामध्ये पडलेली भर."

पुस्तकाचं कव्हरपेज

फोटो स्रोत, Amazon

फोटो कॅप्शन, पुस्तकाचं कव्हरपेज

या पुस्तकाच्या पहिल्या प्रकरणात लेन यांनी शिवाजी महाराजांची पहिली ओळख कशी झाली हे सुरुवातीलाच सांगितलं आहे. ते लिहितात, "1988 साली मला माझ्या एका मित्राने महाराष्ट्रातील चौथीच्या मुलांसाठी तयार करण्यात आलेलं एक पुस्तक दिलं. त्याचं नावं शिवचरित्र (1985) होतं. या पुस्तकाचा उद्देश महाराष्ट्रातील मुलांना शिवाजी महाराजांनी 350 वर्षांचं परदेशी आक्रमकांची म्हणजे इस्लामी सत्ता कशी उलथवून स्वराज्याची स्थापना केली हे सांगणं होता."

या पुस्तकाच्या संशोधनासाठी त्यांनी महाराष्ट्रातील अनेक इतिहासकारांची भेट घेतली होती.

या पुस्तकाच्या 93व्या पानावर शिवाजी महाराजांच्या आई जिजाबाई यांच्याबद्दल बदनामी करणारा मजकूर गावगप्पा म्हणून देण्यात आला. त्याला महाराष्ट्रातील इतिहासकारांनी आणि शिवप्रेमींनी जोरदार आक्षेप घेतला.

लेखक आणि प्रकाशकांनी नंतर माफी मागू हा मजकूर पुस्तकातून हटवला.

4. भांडारकर संस्थेवर हल्ला

हे पुस्तक प्रकाशित झाल्यावर आणि त्यातल्या वादग्रस्त मजकुराची बातमी पसरल्यानंतर महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया आल्या. पुस्तकाच्या लेखनासाठी आणि गावगप्पा पुरवल्यासाठी पुण्यातील काही इतिहास संशोधकांनी मदत केल्याचा आरोप करण्यात झाला.

शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया

फोटो स्रोत, TWITTER/PRANAV JADHAV

फोटो कॅप्शन, शिवाजीः हिंदू किंग इन इस्लामिक इंडिया

संभाजी ब्रिगेड निदर्शनांमध्ये आघाडीवर होती. ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातल्या भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला केला.

या संस्थेत भारताच्या इतिहासावर संशोधन आणि लिखाण होतं. या हल्ल्यामध्ये काळजीपूर्वक जतन करण्यात आलेल्या अनेक ऐतिहासिक वस्तू आणि पुराव्यांचं मोठं नुकसान झालं.

5. ब्राह्मण विरुद्ध मराठा वाद

या हल्ल्याला आणि निदर्शनांना ब्राह्मण विरुद्ध मराठा असा जातीय रंग होता. ब्राह्मण इतिहासकारांनी शिवाजी महाराजांच्या इतिहासाचं ब्राह्मणीकरण केलं आणि दादोजी कोंडदेव, रामदास स्वामी अशा ब्राह्मण व्यक्तींनी शिवाजी महाराजांच्या शौर्याचं श्रेय देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मराठा संघटनांनी आणि नंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केला.

शिवाजी महाराजांच्या गुरू केवळ जिजाऊच होत्या, असं मत दुसऱ्या गटातल्या इतिहासकार-संघटनानंचं होतं. काही ब्राह्मण इतिहासकारांनी जेम्स लेनला चुकीची माहिती पुरवली, असाही त्यांचा आरोप होता.

पुण्यातमध्ये अनेक दशकांपासून धुमसत असलेल्या जातीय वादाला जेम्स लेनच्या निमित्ताने तोंड फुटलं.

6. बंदी आणि निवडणुका

2004 सालच्या जानेवारी महिन्यात राज्यातल्या काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने जेम्स लेनच्या पुस्तकावर महाराष्ट्रात बंदी घातली.

तेव्हा लोकसभेच्या निवडणुका तोंडावर होत्या केंद्रात वायपेयींच्या नेतृत्वात भाजपचं सरकार होतं. अशा वेळी राष्ट्रवादी काँग्रेसने आक्रमकपणे हा मुद्दा प्रचारात आणून भाजप-शिवसेनेला अडचणीत आणायचा प्रयत्न केला.

मराठा समाजाची मतं एकवटण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला या मुद्द्याचा फायदा झाला, असं निरीक्षण तेव्हा राजकीय विश्लेषकांनी नोंदवलं होतं.

विलासरावांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि आर. आर. पाटालंनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता.

फोटो स्रोत, Rohit Patil twitter

फोटो कॅप्शन, विलासरावांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि आर. आर. पाटालंनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता.

बीबीसी मराठीशी काही महिन्यांपूर्वी बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन यांनी म्हटलं होतं की "विलासरावांनी या पुस्तकावर बंदी घातली आणि आर. आर. पाटालंनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या राजकारणाला या सर्व गोष्टींचा नक्कीच फायदा झाला."

लेखक आणि प्रकाशकांनी माफी मागितल्यानंतर आणि पुढील आवृत्त्यांत हा मजकूर वगळू असं आश्वासन दिल्यानंतर पुढे 2007 साली या पुस्तकावरील बंदी उठवण्यात आली. या बंदी उठवण्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केलं.

7. बाबासाहेब पुरंदरेंची भूमिका

इतिहास अभ्यासक बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आरोप करण्यात आले की त्यांनी जेम्स लेन यांना चुकीची माहिती दिली. बाबासाहेब हयात असेपर्यंत त्यांनी या राजकारी आरोप-प्रत्यारोपांत पडण्याचं टाळलं.

बाबासाहेब पुरंदरे

फोटो स्रोत, Hindustan Times

त्यांनी आयुष्यभर महाराष्ट्रात गावोगाव फिरून शिवाजी महाराजांच्या कथा सांगितल्या. त्यांनी 'जाणता राजा' या भव्य नाटकाची निर्मिती केली. त्यावेळी सर्व राजकीय पक्षांचे नेते त्यांच्या सोबत होते. पुरंदरे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित असूनही त्यांचे काँग्रेसच्या नेत्यांसाबोत चांगले संबंध होते.

पण जेम्स लेन प्रकरणानंतर अनेक नेत्यांनी त्यांच्यापासून अंतर राखायला सुरुवात केली.

2015 साली महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिवसेनेची सत्ता असताना पुरंदरेंना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर करण्यात आला. हा पुरस्कार त्यांना मिळू नये अशी मागणी काही संघटनांनी केली होती.

त्यावेळेस संभाजी ब्रिगेडचे प्रवीण गायकवाड बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले होते, "जेम्स लेन आणि भांडारकर प्राच्यविद्या संस्थेचे प्रकरण झाल्यावर त्यांनी आजवर कोणतीही स्पष्ट भूमिका घेतली नाही. त्यामुळेच आम्ही विरोध करत आहोत. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या वेळेस राज्यभरात आम्ही 28 शिवसन्मान परिषदा घेतल्या होत्या. परंतु इतकं होऊनही पुन्हा त्यांना पुरस्कार देणं म्हणजे विशिष्ट विचारसरणीला पाठिंबा दिल्यासारखं मला वाटतं."

बाबासाहेब पुरंदरे यांनी या पुस्तकाशी कोणताही संबंध नसल्याचं जाहीर केलं. त्यांनी या वादापासून दूर राहात बहुतांशी मौन बाळगण्याची भूमिका घेतली.

8. राज ठाकरे विरुद्ध शरद पवार

इतर राजकीय पुढारी दुरावले तरी राज ठाकरे एक राजकीय नेते आहेत, ज्यांनी शेवटपर्यंत बाबासाहेब पुरंदरेंची बाजू घेतली. त्यांनी पूर्वी रायगडावर जाऊन पुरंदरेंची मुलाखतही घेतली होती.

आता राज ठाकरे भाजपच्या जवळ येत असताना पुरंदरेंबद्दलची त्यांची भूमिका भाजपच्या भूमिकेशी मिळती-जुळती आहे.

शरद पवार

फोटो स्रोत, Getty Images

नुकतेच ठाण्यात झालेल्या सभेत राज ठाकरे यांनी बाबासाहेब सॉफ्ट टार्गेट होते म्हणून त्यांच्यावर शरद पवार टीका करत होते असं म्हटलं. त्याला दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी उत्तर दिलं आहे. त्या पुस्तकात बाबासाहेबांचं नाव असल्यामुळे त्यांच्यावर टीका करणं काही गैर नाही अशी स्वतःची बाजू मांडली.

दुसऱ्या दिवशी शरद पवार म्हणाले, "पुरंदरेंनी त्यांच्या पुस्तकात जिजामातेने महाराजांना घडवलं असं लिहिण्याऐवजी दादोजी कोंडदेवांनी शिवाजी महाराजांना घडवलं, असं चुकीचं लिहिलं. त्याला माझा सक्त विरोध आहे. महाराजांना जिजामातेनेच घडवलं. सर्वांत मोठं योगदान जिजामातेचंच आहे. पुरंदरेंनी चुकीची माहिती दिली, त्याला माझा विरोध आधी होता आणि आताही आहे."

9. पुरंदरेंनी लेनचा विरोध केला होता का?

शरद पवार यांनी आपली बाजू मांडल्यावर बाबासाहेब पुरंदरेंचं एक जुनं पत्र मनसेनं प्रसिद्ध केलं. हे पत्र बाबासाहेब पुरंदरे, प्रदीप रावत, जयसिंगराव पवार, निनाद बेडेकर, सदाशिव शिवदे, वसंत मोरे, गजानन भास्कर मेहेंदळे यांनी 10 नोव्हेंबर 2003 साली ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसला पाठवलं होतं.

बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहास अभ्यासकांचे पत्र

फोटो स्रोत, TWITTER

फोटो कॅप्शन, बाबासाहेब पुरंदरे आणि इतर इतिहास अभ्यासकांचे पत्र

यामध्ये पुस्तकातला आक्षेपार्ह मजकूर वगळावा आणि 25 नोव्हेंबर 2003 पर्यंत माफी मागावी असे लिहिले आहे.

या पत्राला ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसच्या मंझर खान यांनी 21 नोव्हेंबर रोजी उत्तर पाठवून माफी मागितली आहे.

बीबीसी मराठीशी बोलताना भारत इतिहाससंशोधक मंडळाचे अध्यक्ष आणि या पत्रावर स्वाक्षरी असणारे प्रदीप रावत म्हणाले, "आम्ही पहिल्यांदा पत्र पाठवून माफी मागण्याची सूचना केली होती. बाबासाहेब पुरंदरे यांनी पाठवलेल्या या पत्रामुळेच प्रकाशकांनी माफी मागितली होती. मात्र हे कोणीच समोर आणत नाही. जाणीवपूर्वक हे बाजूला ठेवले जाते. बाबासाहेबांच्या मृत्यूनंतरही त्यांच्यावर असे आरोप होणं वाईट आहे. समाजात दुही पसरू नये यासाठी आम्ही आवाहन केलं होतं."

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने पाठवलेले पत्र

फोटो स्रोत, FACEBOOK/MANDAR CHAKRADEO

फोटो कॅप्शन, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने पाठवलेले पत्र

मात्र संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांना मात्र हे मान्य नाही. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "सोलापूरच्या जनता व्याख्यानमालेत बाबासाहेबांनी जेम्स लेन आणि त्याच्या कामाचं कौतुक केलं होतं... बाबासाहेबांचं जे पत्र आता दाखवत आहेत ते जयसिंगराव पवार, वसंतराव मोरे यांनी पठवलं होतं. त्यावर बाबासाहेबांनी स्वाक्षरी केली होती."

जेम्स लेन प्रकरणाची पुन्हा चर्चा होऊ लागल्यावर टेनेसी विद्यापीठातील पत्रकारिता विभागात शिक्षण घेणारे प्रणव जाधव यांनी एक ट्वीटमालिका प्रसिद्ध केली आहे. त्यात ते लिहितात, "या पुस्तकात मदत करणाऱ्या लोकांची लेन यांनी कृतज्ञता नामावली दिली आहे. त्यात बाबासाहेब पुरंदरे यांचं नावही नाही."

X पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त

10. महाराष्ट्रावर परिणाम

जेम्स लेनच्या पुस्तकानंतर शिवकालीन इतिहासाकडे पाहण्याच्या दोन स्वतंत्र दृष्टी पुढे आल्या आहेत. इतिहास जणू जातींच्या चष्म्यातून पाहिला जात आहे.

पुण्यातली लाल महालातून 2010 साली दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हटवण्यात आला. संघ परिवारातून आलेले महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर रामदास स्वामींची छाप असल्याचा उल्लेख केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा जोरदार विरोध केला.

ही दरी केवळ इतिहासाच्या लिखाणापुरती राहिली नसून त्याचा परिणाम समाजकारण आणि राजकारणावर झाल्याचं दिसतं. गेल्या 20 वर्षांत जातीय अस्मिता टोकदार झाल्यामुळे राज्याच्या समाजव्यवस्थेत आणि राजकारणातही मोठे बदल झाले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त, 2

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)