शिवाजी महाराज आणि त्यांच्याबद्दलचे हे 7 वाद तुम्हाला माहीत आहेत?

पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारं 'आज के शिवाजी' हे पुस्तक भाजपचे दिल्लीतील नेते जय भगवान गोयल यांनी प्रकाशित केलं आणि एका नव्या वादाला तोंड फुटलं आहे.
शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे महाराष्ट्रात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. मात्र शिवाजी महाराजांच्या नावाने वाद उद्भवण्याचा हा पहिलाच प्रसंग नाही. याआधी अनेकदा शिवाजी महाराजांच्या निमित्ताने अनेक वाद उद्भवले आणि त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालं आहे.
शिवाजी महाराजांबद्दल गेल्या काही वर्षांत झालेले वेगवेगळे वाद आणि चर्चांवर एक नजर टाकूया
1. शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार
कोल्हापूर विद्यापीठ शिवाजी विद्यापीठ नावाने ओळखलं जातं. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार सत्तेत आल्यावर छत्रपती शिवाजी विद्यापीठ करावं अशी मागणी कुलपती आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे करण्यात आली होती. त्यावरून चर्चांना उत आला होता.
अनेक वाद प्रतिवाद झाले. सध्या हे प्रकरण प्रलंबित असून त्यावर कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही.
2. कौन बनेगा करोडपतीमधील वाद
कौन बनेगा करोडपती या सोनीटीव्हीवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमात एका प्रश्नात शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख करण्यात आला, पण त्याचवेळी औरंगजेब यांचं नाव सम्राट औरंगजेब लिहिल्यामुळे कार्यक्रमावर आणि या वाहिनीवर समाजमाध्यमांतून टीकेची प्रचंड झोड उठली होती.
त्यानंतर अमिताभ बच्चन यांनी ट्विटरवरून प्रेक्षकांची माफी मागितली आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
3. उदयनराजेंच्या प्रवेशानंतर शरद पवारांचं वक्तव्य
कोल्हापूरचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या वेळी भाजपत प्रवेश केला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या कुटुंबातील माणसं दिल्लीत जाऊन गमछा घालून घेण्यात धन्यता मानतात अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

फोटो स्रोत, Twitter
"छत्रपती शिवाजी महाराजांना पुरंदरचा तह सहन करावा लागला. मिर्झाराजे जयसिंग यांच्या सांगण्यावरून आग्र्याला औरंगजेबाच्या दिल्ली शहराच्या भेटीसाठी ते गेले देखील. परंतु खचून न जाता पुन्हा महाराष्ट्रात परतून त्यांनी नव्याने सर्व किल्ले जिंकले आणि स्वतः हिंदवी स्वराज्य निर्माण केलं," हा इतिहासातील दाखलाही यावेळी पवारांनी दिला होता.
4.जेम्स लेन प्रकरण
पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेवर जानेवारी 2004 मध्ये हल्ला झाला. या हल्ल्याचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित विषयाशी होता.
जेम्स लेन या लेखकानं त्यांच्या 'Shivaji: Hindu King in Islamic India' या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याचा आरोप होता.

फोटो स्रोत, Getty Images
याविषयी ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात, "विलासरावांनी पुस्तकावर बंदी घातली आणि आर. आर. पाटालंनी प्रचाराचा मुद्दा बनवला होता. त्यामुळं काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीच्या राजकारणाला या सर्व गोष्टींचा नक्कीच फायदा झाला."
5. शिवस्मारकाची घोषणा
महाराष्ट्रात 2004 सालच्या विधानसभा निवडणुकीतच अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचा मुद्दा पुढे आला.
काँग्रेसचे तत्कालीन मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मुंबईलगतच्या अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारण्यात येईल, अशी घोषणा केली होती. तेव्हापासून महाराष्ट्राच्या राजकारणात छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावानं 'शिवस्मारक' हा नवीन मुद्दा समाविष्ट झाला.
त्यानंतर पाच वर्षांनी, म्हणजे 2009 मध्ये या स्मारकाबाबत पुन्हा चर्चा झाली, जेव्हा आपल्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यात काँग्रेसनं या स्मारकाचा पुन्हा उल्लेख केला.
त्यानंतर 2014च्या विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात शिवस्मारकाचा मुद्दा गाजला. भाजप-शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादीला या मुद्द्यावरून जाब विचारला होता.

फोटो स्रोत, Maharashtra DGIPR
24 डिसेंबर 2016 रोजी मुंबई महापालिकेच्या मतदानाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नरीमन पॉईंटजवळच्या समुद्रात 'जलपूजन' केलं होतं. मात्र अजूनही या स्मारकाचं काम दृष्टिपथात नाही.
2004 पासून आज 2019 पर्यंत प्रत्येक निवडणुकीत शिवस्मारकाचा मुद्दा केंद्रस्थानी राहिला आहे.
6.भवानी तलवार आणण्याची अंतुलेंची घोषणा
1980 ते 1982 या काळात बॅरिस्टर अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. त्यांची कारकीर्द गाजली, ती भवानी तलवार लंडनहून परत आणण्याच्या घोषणेनं. छत्रपती शिवाजी महाराज यांचं महाराष्ट्रातील जनतेच्या मनावरील गारूड पाहता बॅरिस्टर अंतुले यांच्या या घोषणेनं त्यावेळी प्रचंड प्रसिद्धी मिळवली.

फोटो स्रोत, Getty Images
"भवानी तलवार आणण्याची अंतुलेंची घोषणा केवळ चर्चेचा मुद्दा होता. ते मुसलमान मुख्यमंत्री असल्यानं त्यांनी भवानी तलवार आणण्याची घोषणा करणं, याला महत्त्वं होतं," असं ज्येष्ठ पत्रकार अरुण खोरे सांगतात.
अंतुलेंनी भवानी तलवारपुरताच छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा राजकीय वापर केला, असं नाही. पुढे त्यांनी कुलाबा जिल्ह्याचं नामांतर 'रायगड' असं केलं.
7. शिवरायांच्या वंशजांचा राजकारणातील वावर
शिवाजी महाराजांचे वंशज किंवा त्यांच्या सरदारांचे वंशज यांचा राजकीय वावर महाराष्ट्राच्या राजकारणात कायमच चर्चेचा विषय राहिला. त्यांच्या राजकारणाचा संबंध सहाजिक छत्रपती शिवाजी महाराजांशी जोडला गेला. मात्र या वंशजांचा निवडणुकीत किती परिणाम झाला, हा प्रश्न कायमच उपस्थित केला गेला.

फोटो स्रोत, Getty Images
याविषयी ज्येष्ठ पत्रकार संजय मिस्किन सांगतात, "छत्रपतींच्या घराण्याचा महाराष्ट्राच्या राजकारणात फारसा प्रभाव नाहीय. सुरूवातीला यशवंतराव चव्हाणांनी सांगितलं होतं की, छत्रपतींची घराणी राजकारणात आणू नका. मात्र कालांतरानं ही घराणी राजकारणात आली. निंबाळकर, भोसले, जाधव ही घराणी येत गेली. मात्र, त्यांच्याभोवती महाराष्ट्राचं राजकारण कधीच केंद्रित झालं नाही."
सध्याच्या पुस्तकाच्या निमित्तानं सुरू झालेल्या वादादरम्यान शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांनी शिवाजी महाराजांच्या वंशजांवर निशाणा साधला. ते म्हणाले भाजपमध्ये असलेल्या छत्रपती शिवाजींच्या वंशजांनी आपली भूमिका स्पष्ट करावी.
त्यावर भाजप आमदार आणि शिवाजी महाराजांचे वंशज शिवेंद्रराजे भोसले यांनी आपली भूमिका मांडताना म्हटलं की अतिउत्साही नेत्यांना आवर घालण्यात यावा.
याशिवाय शिवाजी महाराजांच्या नावाने प्रचारकी घोषणा दिल्या जातात. त्याच्या नावानं वेगवेगळ्या सरकारांनी वेगवेगळ्या योजनाही आणल्या.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)








