शिवाजी विद्यापीठ नामविस्तार : छत्रपती हा उल्लेख टाळला तर शिवाजी महाराजांचा अपमान होतो का?

फोटो स्रोत, Getty Images
- Author, स्वाती पाटील-हर्षल आकुडे
- Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी
महाराष्ट्रात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झाल्यानंतर तातडीनं एकापाठोपाठ एक निर्णय घेतले जात आहेत.
रायगड किल्ल्यासाठी निधी उपलब्ध करून देणं, आरे कारशेडला स्थगिती, आरे-नाणारमधील आंदोलकांवरील गुन्हे मागं घेणे, असे महत्त्वाचे निर्णय या सरकारनं घेतले.
दरम्यान, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याचं 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' करण्यासाठी त्वरित कायदेशीर प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल तथा कुलगुरू भगत सिंह कोश्यारी यांना केली.
शिवाजी महाराज हा महाराष्ट्रासाठी अस्मितेचा विषय आहे. काही दिवसांपूर्वी 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रमात अमिताभ बच्चन यांनी शिवाजी महाराजांचा उल्लेख एकेरी केल्यामुळे वाद निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवाजी विद्यापीठाचं जुनं नाव कायम ठेवायचं की छत्रपती शिवाजी महाराज या नावाने विद्यापीठाला नवी ओळख द्यायची, हा प्रश्न ठिकाठिकाणी चर्चिला जात आहे.
या विषयावर मतमतांतर व्यक्त होत असून याविषयी दोन मतप्रवाह निर्माण झाल्याचं दिसून येत आहे.
'शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहावं'
शिवाजी विद्यापीठाच्या पहिल्या सल्लागार समितीचे सदस्य राहिलेल्या प्रा. एन. डी. पाटील यांनी या नामविस्ताराला विरोध दर्शवला आहे. "छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव हे जनतेच्या ओठात, पोटात आणि सगळीकडे आहे. विस्तार करण्याच्या निमित्ताने नवे वाद वाढवण्यापेक्षा शिवाजी विद्यापीठ हेच नाव राहायला हवं," असं त्यांना वाटतं.
एन. डी. पाटील यांनी पुढे म्हटलं, "सध्या शिवाजी विद्यापीठाच्या उल्लेखामुळे 'शिवाजी' हे नाव उच्चारलं जातं. पण त्याचा नामविस्तार केल्यास हे नावसुद्धा गायब होण्याची शक्यता आहे. नाव लांबलचक असलं ते संपूर्ण उच्चारलं जात नाही. शिवाजी विद्यापीठाच्या बाबतीत हे होऊ नये या विचारातून 50 वर्षांपूर्वी घेतलेला निर्णय योग्य होता."

फोटो स्रोत, Getty Images
शिवाजी विद्यापीठाच्या स्थापनेनंतर नामकरण होत असतानाच या विषयाचा निवाडा झालेला आहे. त्यामुळे शिवाजी विद्यापीठ या नावात 'शिवाजी' हा उल्लेख कायमस्वरुपी टिकून राहणे आवश्यक असेल तर शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार होऊ नये हेच योग्य आहे," असं सांगून पाटील यांनी नामविस्तार करण्याची गरज नसल्याचं स्पष्ट केलं.
हा निर्णय कोणाचा?
विद्यापीठ स्थापन करताना महाराष्ट्र सरकारने श्री छत्रपती शिवाजी युनिव्हर्सिटी कमिटी या नावाने एक समिती नेमली होती. या समितीत प्राचार्य सी. रा. तावडे यांच्या नेतृत्वाखाली तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी, बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर, राजाराम बापू पाटील, ना. सी. फडके, डॉक्टर बी. एस. पाटील, डॉ. बी. आर. ढेकणे, डॉ. भगवान दास, डॉ. बी. एस. नाईक, व्ही. ए. आपटे, आर. एस. मुगळी यांचा समावेश होता.
या समितीचं नाव 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ कमिटी' असं असलं तरी विद्याठाचं नाव शिवाजी विद्यापीठच असावं, अशी सूचना दिली होती. त्याचं भाषांतरही शिवाजी विश्वविद्यालय न करता शिवाजी विद्यापीठ असंच ठेवावं, असंही त्यांनी सांगितलं होतं. अन्यथा त्यांच नाव एससीएस युनिव्हर्सिटी होईल, अशी शक्यता त्यांनी व्यक्त करताना इतर विद्यापीठांचं उदाहरण दिलं होतं, असं ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे सांगतात.

फोटो स्रोत, Twitter
"शिवसेनेला या कामाशिवाय करण्यासाठी इतर खूप साऱ्या गोष्टी आहेत. शिवाजी विद्यापीठाचं नाव बदलण्याची मागणी करणाऱ्या शिवसेनेने याची सुरुवात स्वतःपासून करावी. त्यांनी आपल्या पक्षाचं नाव छत्रपती शिवाजी महाराज सेना करावी," असा खोचक सल्ला महाराष्ट्र टाईम्सचे सहायक संपादक विजय चोरमारे यांनी केला आहे.
शिवसेनेच्या नावाबाबत सोशल मीडियावरही या विषयावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या असून सोशल मीडिया वापरकर्ते थेट शिवसेनेलाच नाव बदलण्याचा सल्ला देताना दिसत आहेत. संतोष शिंदे नावाच्या एका व्यक्तीने अशाच प्रकारची प्रतिक्रिया मुख्यमंत्री कार्यालयाच्या शिवाजी विद्यापीठ नामविस्ताराबाबतच्या ट्विटवर दिल्याचं दिसून आलं.
संपूर्ण विचाराअंती निर्णय
या विषयावर 60 वर्षांपूर्वीच चर्चा होऊन सर्वांनी संपूर्ण विचारांती त्याचं नाव शिवाजी विद्यापीठ ठेवलं, अशी माहिती इतिहासाचे अभ्यासक जयसिंगराव पवार यांनी दिली.
ते सांगतात, "स्थापनेच्या वेळी याबाबत चर्चा करण्यात आली होती. ज्यांनी हे विद्यापीठ स्थापन केलं त्यांनी या प्रश्नाचा निकाल लावलेला आहे. यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब देसाई यांच्यासारख्या दिग्गज मान्यवरांनी हा निर्णय घेतला होता. त्यावेळीसुद्धा छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं नाव देण्याची मागणी प्रा. एन. डी पाटील काही सदस्यांनी केली होती."
"पण यशवंतराव चव्हाण यांनी त्यांना हा आग्रह सोडण्यास सांगितलं होतं. जर संपूर्ण नाव दिलं तर लघुरूप वापरलं जाईल. बडोद्याचं महाराजा सयाजीराव विद्यापीठाचं नाव एमएसयू असं वापरलं जातं. त्याचप्रकारे सीएसएम हे नाव वापरलं जाण्याची शक्यता आहे, असं चव्हाणांनी सांगितल्यानंतर हा निर्णय सर्वांनी मान्य केला होता, अशी माहिती पवार यांनी दिली.
"राजाराम महाराज आणि प्रा. डॉ. बाळकृष्ण यांनी शिवाजी विद्यापीठाचं स्वप्न पाहिलं, शिवाजी विद्यापीठ हेच नाव त्यांच्या मनात होतं. बाळकृष्ण हे शिवचरित्राचे गाढे अभ्यासक होते. त्यांनी दीड हजार पानांचं इंग्रजी शिवचरित्र लिहिलं आहे. त्यातसुद्धा 'शिवाजी द ग्रेट' असाच उल्लेख आहे. त्यातही छत्रपती शिवाजी महाराज असा उल्लेख नाही." असं पवार पुढे सांगतात.
'मोठ्या नावाचं लघुरुप वापरलं जातं'
''नाव मोठं असेल तर लोक संपूर्ण नाव घेत नाहीत, त्याचं लघुरूप वापरलं जातं. मुंबईत व्हिक्टोरिया टर्मिनसला शिवाजी महाराजांचं नाव देण्यात आलं. आता त्याचं 'छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस' असं नामकरण झालं आहे. लोक आता त्याला सीएसटी म्हणायला लागले. स्टेशनच्या पाटीवर पूर्ण नाव आहे. एकमेकांशी बोलताना लोक लघुरूपच वापरतात'', असं ज्येष्ठ लेखक सदानंद मोरे यांनी सांगितलं.

फोटो स्रोत, unishivaji.ac.in
एन. डी. पाटील यांनासुद्धा अशीच शक्यता वाटते. ते याबाबत सांगतात, "शिवाजी विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या मागणीला काही राजकीय पक्ष तसेच सरकारी स्तरावरून पाठिंबा दिला जात असेल तर संक्षिप्तकरणामुळे विद्यापीठाच्या नावातून 'शिवाजी' हा शब्दच पुसला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. पुणे येथील सर परशुराम कॉलेजचे 'एस.पी.' कॉलेज झाले. बेळगाव येथील राणी पार्वतीदेवी कॉलेजचे 'आरपीडी' कॉलेज झाले."
"बडोद्याच्या सयाजीराव महाराज विद्यापीठाचे 'एसएम विद्यापीठ' झाले. श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी विद्यापीठ आज 'एसएनडीटी' या नावानेच उच्चारले जाते. आता, मोठ्या नावाचं संक्षिप्तकरण करण्याच्या सवयीचा फटका शिवाजी विद्यापीठाच्या नावाला बसण्याची शक्यता आहे," असं ते सांगतात.
याबाबत सदानंद मोरे यांनी इतर काही उदाहरणं समजून सांगितली.
गोपाळकृष्ण गोखले रोड असं नाव असेल तर लोक संपूर्ण नाव घेत नाहीत. पुण्यात अप्पा बळवंत चौक आहे. लोक त्याला एबीसी म्हणतात. खरंतर अप्पा बळवंत मेहेंदळे असं नाव आहे. रामानंद तीर्थ, संत तुकडोजी महाराज विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ अशी काही नावे आहेत.
या सगळ्या विद्यापीठांच्या नावांची लघुरुपं लोकांनी दैनंदिन व्यवहारात तयार केली आहेत. बाबासाहेब आंबेडकर, तुकडोजी महाराज यांचा उल्लेख होत नाही. तसं कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचं होऊ नये असं वाटत असेल तर शिवाजी विद्यापीठ ठेवावं. जेणेकरून लोक शिवाजी विद्यापीठच म्हणतील. छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं कोणीही म्हणणार नाही.
'शिवाजी महाराज सर्वांच्याच मनात'
शिवाजी महाराज महाराष्ट्राच्या अस्मितेचे मानबिंदू आहेत. महाराजांबद्दल आदर व्यक्त करण्याची संधी मराठी माणूस सोडत नाही. मराठी माणसाला त्यांच्याप्रती कृतज्ञ वाटतं. शिवाजी महाराजांचं स्मरण व्हावं, त्यांच्याप्रती आदर व्यक्त व्हावा यासाठी मोठ्या संस्थांना, वास्तूंना त्यांचं नाव देण्यात येतं. तो उद्देश सफल होणार नसेल तर आपण थोडा विचार करायला हवा, असं मत सदानंद मोरे व्यक्त करतात.
"पण असं असलं तरी विद्यापीठाच्या नामविस्ताराची मागणी करणाऱ्यांच्या हेतूबाबत शंका नसल्याचंही मोरे यांनी स्पष्ट केलं. ते म्हणाले, "हा व्यवहार्य मुद्दा आहे. यात तात्विक काहीही नाही. ज्यांनी विद्यापीठाच्या नामबदलाची मागणी केली आहे त्यांच्या मनात अन्य मराठी माणसांप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आदर आणि कृतज्ञता आहे. त्यांच्या हेतूबद्दल जराही शंका नाही. मात्र नाव मोठं करून हेतू साध्य होणार नाही. यात भावनांचा मुद्दा नाही. भावना सगळ्यांची चांगलीच आहे. विरोधाचाही विषय नाही. काय होऊ शकतं हे सांगितलं. निर्णय घेणारे लोक समर्थ आहेत," असं मोरे यांनी स्पष्ट केलं.
'फक्त शिवाजी म्हणणं खटकतं'
शिवाजी विद्यापीठामुळे महाराजांचा एकेरी उल्लेख करावा लागतो, हे आम्हाला वर्षानुवर्षे खटकतं, असं मत शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाप्रमुख तसंच आण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांनी व्यक्त केलं आहे.
नामविस्ताराबाबत सरकारने घेतलेली भूमिका योग्य असून त्यामुळे महाराजांचा सन्मानच राखला जाईल, असं ते सांगतात.

फोटो स्रोत, Getty Images
आपली भूमिका स्पष्ट करताना त्यांनी म्हटलं, "छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचं आराध्यदैवत आहेत. आमच्यासाठी ते पूजनीय आहेत. पण नामकरण करताना कोल्हापूरच्या विद्यापीठाचं नाव शिवाजी विद्यापीठ असं नाव ठेवण्यात आलं. अनेक वर्षांपासून त्याचा असा उल्लेख करणं अनेक जणांना पटत नाही. शिवाजी आमचे राजे आहेत, आमचे दैवत आहेत. त्यांना एकेरी स्वरूपात शिवाजी म्हणणं आम्हाला खटकतं. ते आम्हाला पटत नाही. हे आम्हाला योग्य वाटत नाही. कोणतेही राष्ट्रपुरुष असो, ते योग्य दिसत नाही आणि सुसंस्कृत वाटत नाही."
संजय पवार पुढे म्हणाले, "दोन वर्षांपूर्वी शिवसेनेने अशी मागणी केली होती, ती योग्यच होती. नामविस्तारामुळे शिवाजी महाराजांचं नाव गायब होईल. महाराजांचा त्यात उल्लेख होणार नाही किंवा लघुरूप वापरलं जाईल, अशी शंका कोणीही ठेवू नये. असं काहीही होणार नाही. यामुळे उलट राजांचा सन्मान राखला जाणार आहे, हे सर्वांनी लक्षात घ्यावं."
'यापेक्षा उर्वरित निधी मिळावा'
नामविस्तारापेक्षाही शिवाजी विद्यापीठाच्या विकासासाठी घोषित निधी सरकारने लवकर द्यावा, अशी मागणी जयसिंगराव पवार यांनी केली आहे.
ते सांगतात, "शिवाजी विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त 2012-13 ला कोल्हापूरमध्ये एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी विद्यापीठाच्या शैक्षणिक विकासासाठी 50 कोटी रुपये निधी देण्याची घोषणा केली होती. पण पुढे हा निधी मिळण्यासाठी कोणतीही पावले सरकारने उचलली नाहीत. हा निधी मिळण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने अनेकवेळा पत्रव्यवहार केला"
"सात वर्षांनंतरसुद्धा घोषित निधीपैकी सुमारे पाच कोटी रुपयेच विद्यापीठाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नामविस्तार करुन वाद ओढवून घेण्यापेक्षा विद्यापीठाच्या विकासासाठी हा निधी मिळण्याची व्यवस्था करावी. खासदार संभाजीराजे छत्रपती यांनीही यासाठी प्रयत्न करायला हवेत. शिवाजी विद्यापीठाचा एक विद्यार्थी म्हणून हीच आमची भूमिका आहे," असं जयसिंगराव पवार म्हणाले.
कोल्हापूर विद्यापीठाचा इतिहास
बाळासाहेब देसाई यांच्या प्रयत्नाने कोल्हापूरसाठी विद्यापीठ मंजूर झाले. त्यावेळी नगराध्यक्षपदी केशवराव जगदाळे होते. विद्यापीठाला जमिनीची आवश्यकता होती. अनेक मान्यवर व्यक्तींनी विद्यापीठासाठी जागा दिली. कोल्हापूर शहरातल्या विविध तालीम मंडळांच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केलं. विद्यापीठाच्या उभारणीसाठी आर्थिक मदत म्हणून एक रुपयाची कुपनं काढण्यात आली.
केशवराव जगदाळे, रामभाऊ ऊबाळे, डी.एस.नार्वेकर, हिंदुराव साळुंखे, बाळ साटम, काका राऊत, ए.आर. साळोखे यांनी सायकलवर फिरून कुपनं खपवली. 18 नोव्हेंबर 1962 मध्ये विद्यापीठाची स्थापना झाली. डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या हस्ते विद्यापीठाचं उद्घाटन झालं. पहिले कुलगुरू म्हणून आप्पासाहेब पवार यांनी पदभार स्वीकारला. 1969 मध्ये कमवा आणि शिका ही योजना सुरू झाली.
कोल्हापूर विद्यापीठाच्या वेबसाईटनुसार, दक्षिण महाराष्ट्राच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी या विद्यापीठाची निर्मिती करण्यात आली. कोल्हापूर, सांगली, सातारा अशा तीन जिल्ह्यांमध्ये विद्यापीठाचा आवाका आहे. कोल्हापूर विद्यापीठाशी 280 कॉलेज आणि शैक्षणिक संस्था संलग्न असून 3 लाख विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)









