ST संप : शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं निलंबन मागे

फोटो स्रोत, Hindustan Times
- Author, मयांक भागवत
- Role, बीबीसी मराठी
बडतर्फ एसटी कर्मचाऱ्यांना (शरद पवारांच्या घरावर हल्ला केलेले कर्मचारी) परत कामावर घेण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे.
एसटी आंदोलनाला 8 एप्रिल 2022 रोजी हिंसक वळण मिळालं होतं. काही आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांनी थेट राष्टवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 'सिल्व्हर ओक' या निवासस्थानावरच हल्ला केला.
या प्रकारानंतर मुंबई पोलिसांकडून शरद पवारांच्या निवासस्थानाच्या सुरक्षेत त्रुटी राहिली होती का, असा प्रश्न उपस्थित केला गेला.
महाराष्ट्राचे तेव्हाचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत कमी राहिल्याचं मान्य केलं होतं.
ST कर्मचारी पवारांचं निवासस्थान आणि मातोश्रीवर आंदोलन करू शकतात, असा अलर्ट विशेष शाखेने 4 एप्रिलला मुंबई पोलिसांना दिला होता.
आंदोलनाची पूर्वसूचना असूनही मुंबई पोलीस शरद पवारांच्या घरावरील हल्ला रोखू शकले नाहीत. मग प्रश्न उपस्थित होतो की, मुंबई पोलिसांकडून नेमकी चूक कुठे झाली?
गुप्तचर विभागाने दिला होता अलर्ट?
सहा महिने संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी 9 एप्रिलला दुपारी अचानक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर हल्ला केला.
शरद पवार यांच्या दक्षिण मुंबईतील सिल्व्हर ओक या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी घरात घुसण्याचा प्रयत्न केला.
पण, सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या या संभाव्य आंदोलनाची माहिती होती.
मुंबई पोलिसांच्या विशेष शाखेने 4 एप्रिलला, हल्ल्याच्या पाच दिवस आधी, वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत अलर्ट दिला होता.
बीबीसी मराठीला एसटी कर्मचाऱ्यांच्या संभाव्य आंदोलनाबाबत विशेष शाखेने मुंबई पोलिसांना दिलेल्या अलर्टची कॉपी मिळाली. विशेष शाखेच्या अपर पोलीस आयुक्तांनी, मुंबईचे सह-पोलीस (कायदा व सुव्यवस्था) यांना एसटी कर्मचाऱ्यांच्या या संभाव्य आंदोलनाबाबत अलर्ट दिला होता.

फोटो स्रोत, Social Media
या अलर्टमध्ये सांगण्यात आलंय की, एसटी कर्मचाऱ्यांनी 4 एप्रिलला मंत्रालय आणि 5 एप्रिलला 'सिल्व्हर ओक' आणि 'मातोश्री'वर आंदोलन करण्याचा धमकीवजा इशारा दिला आहे. त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
एसटी कर्मचारी खासगी वाहन किंवा रेल्वेने येण्याची शक्यता आहे, असंही त्यात म्हटलं आहे.
खासगी वाहने मुलुंड, वाशी आणि दहिसर टोल नाक्यावरून मुंबईत येण्याची शक्यता असल्याने बंदोबस्त ठेवावा, असं या अलर्टमध्ये सांगण्यात आलं होतं. शरद पवारांचं निवासस्थान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं घर 'मातोश्री' आणि परिवहनमंत्री अनिल परब यांच्या घरी आंदोलन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.
राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी पोलिसांकडे ही पूर्वसूचना होती हे मान्य केलंय.
वळसे-पाटील यांनी म्हटलं, "गुप्तचर विभागाने चार एप्रिलला मुंबई पोलिसांना याबाबत पत्र लिहून कळवलं होतं. तरीसुद्धा सुरक्षेत त्रुटी राहिली. पोलिसांकडून शरद पवारांच्या घराबाहेर जेवढा बंदोबस्त ठेवायला हवा होता. तेवढा ठेवला गेला नाही."
मुंबईत घडणाऱ्या प्रत्येक राजकीय, सामाजिक किंवा महत्त्वाच्या घटनांवर मुंबई पोलिसांची विशेष शाखा नजर ठेऊन असते. विशेष शाखेचे अधिकारी सर्व महत्त्वाच्या घटनांची माहिती पोलीस आयुक्तांपर्यंत पोहोचवत असतात.
'Z+' सुरक्षा असूनही चूक झाली?
राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शरद पवारांना जानेवारी 2021 पासून 'Z+' सुरक्षा दिली आहे.
शरद पवारांना असलेला संभाव्य धोका ओळखून गृहविभागाच्या समितीने त्यांना सर्वोच्च सुरक्षा देण्याचा निर्णय घेतला होता. पण, शरद पवारांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे सुरक्षा कमी करण्याची मागणी केली होती.

फोटो स्रोत, Video Grab
'Z+' सुरक्षा असल्याने शरद पवारांसोबत आणि त्यांच्या घराबाहेर 24 तास महाराष्ट्र पोलिसांची सुरक्षा तैनात असते. मुंबई पोलिसांचा जागता पहारा असूनही आंदोलनकर्ते एसटी कर्मचारी थेट शरद पवारांच्या घरापर्यंत पोहोचले.
यामुळे मुंबई पोलिसांवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
मुंबई पोलिसांकडून चूक कुठे झाली?
मुंबई पोलिसांकडून सुरक्षेत त्रुटी राहिल्या, हे गृहमंत्र्यांनीदेखील मान्य केलंय. मग नक्की चूक कुठे झाली? आम्ही माजी IPS अधिकाऱ्यांकडून जाणून घेण्याचा प्रयत्न केला.
विशेष शाखेमध्ये सेवा बजावलेले माजी IPS अधिकारी सुरेश खोपडे यांनी सांगितलं, "या प्रकरणी मुंबई पोलिसांकडून प्रथमदर्शनी चूक झाली हे दिसून येतंय. पण, ही चूक नक्की कुठे झाली याबाबत आपल्याला अधिक तपासण्याची गरज आहे."
यासाठी तीन महत्त्वाचे मुद्दे ते सांगतात.
- अलर्टबाबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली होती का? का ही गुप्त सूचना कागदावरच राहिली. हे तपासणं गरजेचं आहे.
- वरिष्ठ पोलीस निरीक्षक त्या विभागाचे प्रमुख असतात. त्यांना ही सूचना मिळाली होती का?
- पोलिसांच्या मोबाईल व्हॅन्स परिसरात सातत्याने फिरत असतात. रस्त्यावर कुठेही जमाव जमल्याची माहिती मिळताच दोन ते सात मिनिटात पोहोचतात. या कर्मचाऱ्यांना आंदोलनकर्ते जमल्याची माहिती मिळाली नाही?
शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याच्या दिवशी मीडियाचे कॅमेरे उपस्थित होते. पण, पोलीस अधिकारी मात्र एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाबाबत अनभिन्ज्ञ असल्याचं पहायला मिळालं होतं.
माजी अपर पोलीस महानिरीक्षक आणि निवृत्त IPS अधिकारी पी.के जैन म्हणाले, "एसटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन काही महिन्यांपासून सुरू आहे. या काळात कर्मचारी मंत्री, नेते यांच्या घरावर आंदोलन करू शकतात अशा प्रकारचा अलर्ट पुष्कळ वेळा आला असण्याची शक्यता आहे. जेव्हा असे अलर्ट सारखे येतात तेव्हा त्याचं गांभीर्य कमी होतं. अशा रूटीन सूचनांमुळे पोलिसांना काम करणं कठीण होतं. माझ्या मतानुसार, या प्रकरणात हीच प्रमुख त्रुटी राहिली."
सण, मोर्चा, राजकीय किंवा सामाजिक प्रश्नांच्या वेळी गुप्तचर विभागाकडून पोलिसांना विविध सुरक्षा अलर्ट दिले जात असतात. त्यानंतर सुरक्षा बंदोबस्त वाढवण्यात येतो.
गृहविभागातील वरिष्ठ अधिकारी नाव न घेण्याच्या अटीवर म्हणाले, "एसटी कर्मचारी आंदोलन करण्याची शक्यता आहे याची पूर्वसूचना पोलिसांना होती. पण कारवाई केली नाही. ही मुंबई पोलिसांची गंभीर चूक झाली."
पी.के जैन पुढे म्हणाले, "एखाद्या घटनेबाबत पक्की गोपनीय माहिती मिळाली, तरी कारवाई झाली नसेल. ही मोठी चूक आहे. पण ही घटना निश्चितच रोखता आली असती."
पोलिसांवर कारवाई?
शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ला प्रकरणी गावदेवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना निलंबित करण्यात आलंय, तर पोलीस उपायुक्तांची बदली करण्यात आलीये.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील म्हणाले, "या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आलीये."
विशेष शाखेने लिहीलेलं पत्र मुंबईचे सह-पोलीस आयुक्त कायदा व सुव्यवस्था विश्वास नांगरे-पाटील यांना लिहीण्यात आलं होतं. त्यामुळे त्यांच्यावरही या प्रकरणी प्रश्न उपस्थित होणं साहजिक आहे. नांगरे-पाटील यांनी याबाबत प्रसारमाध्यमांना काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
गृहमंत्र्यांनी म्हटलं की, चौकशीत ज्या गोष्टी समोर येतील. त्यानंतर पुढील कारवाई केली जाईल.
हेही वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)









