राज ठाकरे: हिंदुत्वाच्या मुद्यावर शिवसेनेची फरपट होतेय का?

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हिंदुत्व, शिवसेना, मनसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, राज ठाकरे, दिवंगत बाळासाहेब ठाकरे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

हिंदुत्वाच्या मुद्यावरून मनसे आणि शिवसेना यांच्यात जुगलबंदी रंगली आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्याची पुण्यात घोषणा केली. त्याचबरोबर ठाण्याच्या सभेत मशिदीवरचे भोंगे खाली उतरवण्यासाठी 3 मे पर्यंतचं 'अल्टिमेटम' दिलं आहे.

काही वर्षांपूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडलेली भूमिका राज ठाकरे यांनी पुन्हा प्रखरतेने मांडली आहे. अयोध्या दौरा असो किंवा मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करणं असो. मुंबई महापालिकेची निवडणूक तोंडावर असताना हिंदुत्वाच्या मुद्यावर आक्रमक झालेल्या राज ठाकरेंमुळे शिवसेनेची कोंडी होताना दिसतेय. शिवसेनेला हिंदुत्व हे वारंवार का सिद्ध करावं लागतय? राज याबाबतचा हा आढावा.

मनसेमुळे शिवसेनेला हिंदुत्व सिध्द करावं लागतंय?

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या सभेत प्रखर हिंदुत्वाची भूमिका मांडल्यानंतर शिवसेनेलाही काही राजकीय पावलं उचलावी लागली.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अयोध्येला जाणार ही चर्चा गुढीपाडव्याच्या सभेपासून सुरू होती. त्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनीही अयोध्या दौरा जाहीर केला. त्यांनी तारीख जाहीर केली नसली तरी मे महिन्यात ते अयोध्येला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज ठाकरे यांनी 5 जूनला अयोध्या दौऱ्याची पुण्यात घोषणा केली. त्यामुळे राज ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघंही अयोध्या दौरा करणार आहेत. राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, "काही लोक मंदिरात प्रसाद मिळतो म्हणून जातात. आम्ही रणांगणावर जातो आणि याआधी गेलो देखील... "

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हिंदुत्व, शिवसेना, मनसे

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे

मनसे कार्यकर्त्यांनी मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करायला सुरुवात केली. त्याचबरोबर हनुमान जयंतीनिमित्त राज ठाकरे यांनी पुण्यात हनुमान मंदीरात महाआरती केली. या महाआरतीची घोषणा झाल्यानंतर शिवसेनेकडूनही दादरच्या गोल मंदीरात हनुमान आरतीचं आयोजन केले. शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांच्याकडून ही आरती करण्यात आली.

1 मे महाराष्ट्र दिनी राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर सभा घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. हे जाहीर करताना राज ठाकरे यांनी औरंगाबादचा उल्लेख 'संभाजीनगर' असा केला.

ज्या मैदानावर राज ठाकरे यांनी सभा आयोजित केली आहे, त्या मैदानाला एक इतिहास आहे. या मैदानावर दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभा होत असतं आणि बाळासाहेब ठाकरे यांनी पहिल्यांदा औरंगाबादचं नाव 'संभाजीनगर' करावं पहिल्यांदा ही घोषणा याच सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर झालेल्या सभेत केली होती. 1 मे रोजी राज ठाकरे हे शिवसेनेला औरंगाबादच्या नामकरणावरून लक्ष्य करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता शिवसेना काय भूमिका घेणार याकडे लक्ष आहे.

ज्येष्ठ पत्रकार दिपक भातुसे याबाबत विश्लेषण करताना सांगतात, "राज ठाकरेंनी घेतलेला हिंदुत्वाचा मुद्दा आणि त्याला भाजपची असलेली अंतर्गत साथ ही आगामी निवडणुकांसाठीची उघड रणनीती आहे. या जाळ्यात शिवसेना अडकत चालली आहे.

आपल्या हातून हिंदुत्वाचा मुद्दा सुटू नये यासाठी शिवसेनेची धडपड दिसून येत आहे. आमदार रवी राणा मुख्यमंत्र्यांना मातोश्रीच्या समोर येऊन हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान देतो. शिवसेनेने द्विधा मनस्थितीत न राहता ही परिस्थिती नीट हाताळली तर त्यांना निवडणुकीत फार चिंता करण्याची गरज लागणार नाही".

शिवसेनेची फरपट कशामुळे?

शिवसेनेने 2019 मध्ये धर्मनिरपेक्ष असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे युती केली आणि महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. धर्मनिरपेक्ष पक्षाशी युती केल्यामुळे शिवसेनेने हिंदूत्व सोडलं अशी टीका भाजप आणि आता मनसेकडून केली जात आहे.

बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, राज ठाकरे, हिंदुत्व, शिवसेना, मनसे
फोटो कॅप्शन, हिंदुत्व

मशिदींवरच्या भोंग्यांची भूमिका ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मांडली असल्यामुळे राजकीयदृष्ट्या त्याला विरोध करणं हे शिवसेनेला शक्य नाही. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याचीही मुख्यमंत्री म्हणून काळजी घ्यावी लागेल. त्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे.

"राज्याचे पोलीस महासंचालक आणि मुंबईचे पोलीस आयुक्त हे भोंग्यांसंदर्भात काही मार्गदर्शक सूचना तयार करतील. त्याची अधिसूचना येत्या एक दोन दिवसांत जारी केली जाईल" असं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सांगितले.

हे वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)