इन्व्हर्टर कसं निवडायचं? नुकसान टाळण्यासाठीचे 8 उपाय

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, राजेश पेडागाडी
    • Role, बीबीसी तेलुगू

उन्हाळ्यात वीजेची मागणी आणि पुरवठा यातील तफावत सतत वाढत जाते. एसी आणि कुलरचा वापर जसजसा वाढत जातो, तसतशी वीजेची मागणीही वाढते.

त्यामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकारही समोर येतो. या परिस्थितीत लोडशेडिंगपासून दिलासा देणाऱ्या इन्व्हर्टरची मागणी वाढत आहे.

पण हे इन्व्हर्टर कसं काम करतं? आपल्या घराच्या गरजेनुसार योग्य इन्व्हर्टर कसा निवडावा? अशा प्रश्नांची उत्तरं आता आपण पाहणार आहोत.

1. इन्व्हर्टर काम कसं करतं?

बाजारात इन्व्हर्टरचे अनेक ब्रँड आणि मॉडेल्स उपलब्ध आहेत. आपला गरजा पूर्ण करणारा इन्व्हर्टर निवडणं थोडं कठीण आहे. पण, तज्ज्ञ म्हणतात की जर तुम्हाला इन्व्हर्टरच्या कार्यपद्धतीबद्दल माहिती असेल, तर तुमच्या गरजेनुसार इन्व्हर्टर निवडणं सोपं जाईल.

इनव्हर्टर हे बॅकअप पॉवर डिव्हाइसेस आहेत. हे कमी व्होल्टेज डीसीचे (डायरेक्ट करंट) एसी (पर्यायी प्रवाह) मध्ये रूपांतर करतात. जे घरगुती उपकरणांसाठी आवश्यक असचं. वीजकपाती दरम्यान, इन्व्हर्टर घरगुती विद्युत उपकरणांना वीज पुरवतात.

"डिझेल जनरेटरप्रमाणे इन्व्हर्टर मोठा आवाज करत नाहीत. शिवाय, इन्व्हर्टर चालवण्यासाठी तुम्हाला डिझेल खरेदी करण्याची गरज नाही," अमर राजा बॅटरीज लिमिटेडचे ज्येष्ठ अभियंता लोकेंद्र झा सांगतात. इन्व्हर्टर खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, याविषयी जाणून घेण्याकरचा बीबीसीनं त्यांच्याशी संवाद साधला.

"इन्व्हर्टर खरेदी करताना, आपण प्रथम आपल्या घरात किती वीज लागते ते मोजलं पाहिजे. आपल्या घराचे क्षेत्रफळ किती आहे? घरात किती विद्युत उपकरणं आहेत? त्यासाठी किती वीज लागते? या गोष्टी सगळ्यात आधी जाणून घेतल्या पाहिजेत," असं ते सांगतात.

ते म्हणतात की, ही गणितं ठरवून आपण आपल्या गरजेप्रमाणे आवश्यक क्षमतेचा इन्व्हर्टर निवडला पाहिजे.

2. किती पॉवर आवश्यक आहे?

प्रत्येक विद्युत उपकरणाला वैयक्तिकरित्या किती पॉवर आवश्यक आहे, हे आपल्याला माहित असलं पाहिजे. आपली एकूण वीज गरज अशा प्रकारे मोजली जाते.

"उदाहरणार्थ, आपल्या घरात तीन पंखे, तीन ट्यूबलाइट आणि एक टीव्ही आहे. प्रत्येक पंख्यासाठी 70 वॅट, एका ट्यूब लाईटसाठी 60 वॅट आणि टीव्हीसाठी 120 वॅटचा वापर होईल. ही गणना विचारात घेतल्यास, आपल्याला 510 वॅट्स पॉवरची आवश्यकता आहे," लोकेंद्र सांगतात.

इन्व्हर्टरची बॅटरी

फोटो स्रोत, Shrikant bangale/bbc

फोटो कॅप्शन, इन्व्हर्टरची बॅटरी

अशा परिस्थितीत आपण 1000 वॅटपेक्षा जास्त क्षमतेचा इन्व्हर्टर विकत घ्यावा, असा सल्ला ते देतात. आपण आपल्या विजेच्या गरजेच्या दुप्पट क्षमतेचे इन्व्हर्टर खरेदी करावं, असं ते सूचवतात.

3. बॅटरी कशी निवडावी?

मायक्रोटेक इंटरनॅशनल कंपनीचे इन्व्हर्टर तज्ज्ञ गौरव कोचर म्हणतात की, इन्व्हर्टर बॅटरीच्या बाबतीत आपण अधिक सतर्क राहायला हवे.

"आपल्याला दोन घटक लक्षात ठेवावे लागतील. पहिली म्हणजे इन्व्हर्टरची क्षमता. ही म्हणजे इन्व्हर्टरची एकूण उर्जा प्रदान करण्याची क्षमता. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बॅटरीची क्षमता. याचा अर्थ बॅटरीची ऊर्जा साठवण्याची क्षमता."

त्यांनी स्पष्ट केलं की, इन्व्हर्टरच्या कामाचा कालावधी हा बॅटरीच्या कार्यक्षमतेवर अवलंबून असतो.

"बॅटरीची क्षमता अम्पिअर अवर्समध्ये मोजली जाते. आपण बॅकअपची गरज लक्षात घेऊन बॅटरी निवडली पाहिजे," असं गौरव सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

"बॅटरीची क्षमता मोजण्यासाठी आपण आपल्याला गरजेची असलेली उर्जा (वॅट्समध्ये) आणि बॅकअप टाईम यांचा गुणाकार केला पाहिजे. ही बेरीज बॅटरी व्होल्टेजनं (12 V) भागली पाहिजे."

"उदाहरणार्थ, आपल्याला 510 वॅट इतकी पॉवर तीन तासांसाठी वापरायची असल्यास आपणाला 127 अम्पियर अव्हर (AH) बॅटरीची आवश्यकता आहे. काही इन्व्हर्टरमध्ये, दोन बॅटरी असतील. जेव्हा वीज कपात खूप जास्त असते, तेव्हा अशी मॉडेल्स निवडली पाहिजेत."

4. इन्व्हर्टर कुठे ठेवायचे?

विद्युत उपकरणांना उर्जा पुरवणारं इन्व्हर्टर लवकर गरम होतं. म्हणूनच तज्ञांच्या मते, ते कोरड्या आणि खुल्या ठिकाणी ठेवायला हवं.

"अशी उष्णता कमी करण्यासाठी आपल्याला खबरदारी घ्यावी लागेल. अन्यथा, इन्व्हर्टर खराब होऊ शकतात," लोकेंद्र सांगतात.

हवेचा प्रवाह कमी असलेल्या ठिकाणी इन्व्हर्टर ठेवल्यास आगीच्या दुर्घटना घडण्याची शक्यता असते, असं त्यांनी स्पष्ट केलं.

त्यांनी 16 मार्च रोजी कोईम्बतूर इथं घडलेल्या घटनेची आठवण करून दिली. या घटनेत बॅटरीमधून निघणाऱ्या आगीमुळे आणि धुरामुळे 50 वर्षीय महिला आणि तिच्या दोन मुलींचा मृत्यू झाला होता.

5. बॅटरीचा वापर कधी व कसा करावा?

इन्व्हर्टरमधील बॅटरी वारंवार वापरल्या पाहिजेत, असं बॅटरी मेंटेनन्समधील तज्ज्ञाचं म्हणणं आहे. वीजपुरवठा खंडित होत नाही या भावनेनं आपण आत्मसंतुष्ट राहता कामा नये, असं ते सांगतात.

गौरव सांगतात, "तुमच्याकडे वीजकपात नसली तरीही इन्व्हर्टरला जोडलेली बॅटरी पॉवर रिसायकल असावी. याचा अर्थ एकूण ऊर्जा पूर्णपणे वापरली जावी आणि पुन्हा बॅटरी नव्यानं चार्ज केली जावी.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

महिन्यातून एकदा तरी पॉवर रिसायकलिंग करावी, असा सल्ला ते देतात. हे करत असताना उपलब्ध उर्जा पूर्णपणे वापरली जावी आणि पुन्हा बॅटरी चार्जिंगला लावावी. रिसायकलिंग न केल्यास बॅटरी खराब होण्याचा धोका असतो.

6. पाण्याची पातळी पाहणं का गरजेचं?

इन्व्हर्टरमधील रासायनिक क्रियेसाठी सल्फ्यूरिक असिडचा वापर केला जातो. पण जसजसा वेळ जातो तसतसं चेंबर्समधील पाणी कमी झाल्यामुळे असिड आकुंचन पावत जातं.

"जर पाण्याची पातळी खाली गेली तर इन्व्हर्टरची कार्यक्षमताही कमी होते. त्यामुळेच मग पाणी टाकून हे अॅसिड सामान्य पातळीवर आणावं लागतं," लोकेंद्र सांगतात. पण, यासाठी सामान्य पाण्याऐवजी फक्त डिस्टिल्ड वॉटर वापरावं, असं ते सांगतात.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

"सामान्यत: पाण्यात आयन (अणू किंवा रेणू) असतात. ते बॅटरीमधील इलेक्ट्रोडला चिकटून राहतात आणि शेवटी बॅटरीमधील रासायनिक क्रियेसाठी अडथळा बनतात. जेव्हा डिस्टिल्ड वॉटर वापरले जाते तेव्हा त्यांच्यामध्ये कोणतेही आयन नसतात," असं ते पुढे सांगतात.

बॅटरीजमधील पाण्याची पातळी तपासणं हे तिच्या प्रभावीपणे काम करण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. सहा महिन्यांतून एकदा तरी पाण्याची पातळी तपासली पाहिजे, असा सल्ला ते देतात.

7. स्वच्छता का महत्त्वाची?

इन्व्हर्टर वेळोवेळी स्वच्छ करणं आवश्यक आहे. इन्व्हर्टरच्या कार्यक्षमतेवर धुळीचा परिणाम होऊ शकतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. एम. रवीकुमार विझागमधून इन्व्हर्टरची देखभाल करतात.

ते सांगतात, "इन्व्हर्टरच्या बॅटरी वारंवार स्वच्छ केल्या पाहिजेत. टर्मिनल्स साफ करताना पेट्रोलियम जेली वापरता येऊ शकते."

"बॅटरी साफ करताना किंवा कोणतीही दुरुस्ती केली जात असल्यास, इन्व्हर्टर डिस्कनेक्ट करणं (बंद) आवश्यक आहे. अन्यथा वीजेचा धक्का बसण्याचा धोका असतो,"ते सांगतात.

2018 मध्ये उत्तर प्रदेशातील बरेली येथे एक तरुण इलेक्ट्रिशियन (24) बॅटरीची दुरुस्ती करत असताना विजेचा धक्का बसला आणि त्याचा मृत्यू झाल्याचं उदाहरण ते इथं देतात.

8. बॅटरी खराब झाल्यास काय करायचं ?

कधीकधी बॅटरी लवकर डिस्चार्ज होते. ही समस्या ओळखून सावध व्हायला हवं, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.

"चार्जिंग सामान्यपेक्षा जास्त कमी झाल्यास आपण सतर्क असलं पाहिजे. आपण अशा बॅटरी बाजूला ठेवल्या पाहिजेत," लोकेंद्र सांगतात.

ते पुढे सांगतात, "अशा बॅटरी लवकर बदलल्या पाहिजेत. त्यामुळे आगीचे अपघात टाळण्यास मदत होते."

जर आपण या सूचनांचे पालन करून इन्व्हर्टरचा वापर केला तर त्याचे दीर्घायुष्य वाढते आणि आपण आगीच्या दुर्घटना टाळू शकतो.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)