महाराष्ट्रात लोडशेडिंग करण्याची वेळ महावितरणवर का आली?

वीज निर्मिती

फोटो स्रोत, Getty Images

    • Author, रोहन नामजोशी
    • Role, बीबीसी मराठी प्रतिनिधी

राज्यात विजेचं भारनियमन सुरू झालं असून राज्यातील वीज उपलब्धतेची सद्यस्थिती पाहता भारनियमन कधीपर्यंत असेल, हे सांगता येणार नसल्याचं वक्तव्य ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केलं आहे.

कोळसा आणि वीज टंचाईमुळे राज्यात वीज टंचाईचे अभूतपूर्व संकट निर्माण झाले आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत आढावा घेतला. या बैठकीनंतर नितीन राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

अदानी कंपनीकडून होणाऱ्या वीज पुरवठयात अचानक कपात झाल्यामुळे राज्यात 1400 ते 1500 मेगावॉट विजेचे भारनियमन सुरू करण्यात आलं असून राज्यातील जनतेने वीज जपून वापरावी असे आवाहन उर्जामंत्र्यांनी केले आहे.

X पोस्टवरून पुढे जा, 1
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 1

पण, महाराष्ट्रात ही परिस्थिती का उद्भवली? याची काय कारणं आहेत? हे शोधण्याचा आम्ही प्रयत्न केला.

महाराष्ट्राला वीज कुठून मिळते?

महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ म्हणजेच MSEB या संस्थेतर्फे महाराष्ट्रात वीज पुरवली जायची. 2003 नंतर या संस्थेचं विभाजन झालं आणि चार कंपन्या स्थापन झाल्या. त्यानुसार महाजनको कंपनी वीजनिर्मितीची जबाबदारी सांभाळतं.

Electricity act 2003 या कायद्यान्वये या कंपनीची स्थापना झाली आहे. 15 सप्टेंबर 2005 पासून कंपनी अस्तित्वात आली.

'महाजनको' 13,602 मेगावॅट इतक्या क्षमतेची वीज निर्मिती करू शकते. महाराष्ट्रात औष्णिक विद्युत, जलविद्युत प्रकल्पांतून वीज मिळते. त्यातील 75 टक्के वीज औष्णिक विद्युत प्रकल्पातून मिळते. वायूचा वापर करून वीजनिर्मिती करणारा एक प्रकल्प उरणला आहे. तसंच सौर उर्जा वापरूनही महाराष्ट्रात विजेची निर्मिती केली जाते.

महाराष्ट्रातल्या कोणत्या वीजनिर्मिती केंद्रात किती वीज उत्पादन होतं याचा तक्ता.
फोटो कॅप्शन, महाराष्ट्रातल्या कोणत्या वीजनिर्मिती केंद्रात किती वीज उत्पादन होतं याचा तक्ता.

महाराष्ट्रात कोराडी, नाशिक, भुसावळ, पारस, परळी, खापरखेडा, चंद्रपूर या ठिकाणी औष्णिक विद्युत केंद्र आहे. तर कोयनेला मोठं जलविद्युत केंद्र आहे.

वीज निर्मिती
फोटो कॅप्शन, जलविद्युत केंद्रातून होणारी वीज निर्मिती.

सध्याचं संकट का निर्माण झालं आहे?

महाराष्ट्रात उष्णतेची मोठी लाट आली आहे. त्यामुळे घरगुती वापरासाठी आणि शेतीसाठी वीजेची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. राज्याची वीज मागणी 22 एप्रिलला 27561 मेगावॅटच्या घरात गेली आहे आणि 17541 मेगावॅट इतकी वीज महाराष्ट्रात निर्माण होत आहे. महाराष्ट्रात विजेची मागणी साधारणपणे 19,000 ते 24,000 मेगावॅटच्या घरात असते.

महाराष्ट्र वीजनिर्मितीसाठी कोळशावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतो. गेल्या काही काळात कोळशाची टंचाई मोठ्या प्रमाणात निर्माण झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने 14 एप्रिलला दिलेल्या आकडेवारीनुसार खापरखेडा केंद्रात 7 दिवस, चंद्रपूर केंद्रात 7.5 दिवस, पारस केंद्रात 6 दिवस, परळी केंद्रात अवघा दीड दिवस, भुसावळ केंद्रात 1 दिवस, नाशिक केंद्रात 3.5 दिवस आणि कोराडी केंद्रात 2 दिवस इतका साठा शिल्लक आहे. त्यामुळे वीजेचं संकट आणखी गहिरं होण्याची शक्यता आहे.

भारतात 319 अब्ज टन एवढा कोळशाचा साठा आहे. 2019-20 मध्ये भारताने 73.08 कोटी टन उत्पादन केलं आहे. 2020-21 मध्ये हे उत्पादन 71.60 कोटी टन एवढं होतं.

वीज

फोटो स्रोत, Reuters

2020 मध्ये कोरोना संकटामुळे वीजेची मागणी कमी झाल्याने कोळशाची मागणीही कमी झाली होती. त्याचा परिणाम उत्पादनावरही झाला होता.

हे संकट का निर्माण झालं याविषयी आम्ही MSEB चे माजी अध्यक्ष राजेंद्रकुमार गोयंका यांच्याशी संवाद झाला. ते म्हणाले, "दरवर्षी उन्हाळ्यात मागणी वाढतेच. सरकार वीजेच्या नियोजनात पूर्णपणे अपयशी ठरलं आहे. वीज कंपन्यात तज्ज्ञ लोकांची वानवा आहे."

X पोस्टवरून पुढे जा, 2
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

X पोस्ट समाप्त, 2

तर, देशभरात कोळसा टंचाई आहे. कोळसा संकटाचा सामना महाराष्ट्र सक्षमपणे करत आहे. ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व्हावा हेच आमचे उद्दिष्ट आहे आणि त्यासाठीच आमचे भारव्यवस्थापन सुरू आहे, असं महावितरणनं म्हटलं आहे.

लोडशेडिंगचं लोड

लोडशेडिंग म्हणजेच भारनियमन हा जनतेच्या जिव्हाळ्याचा विषय असतो. ऐन उन्हाळ्यात वीज नसणं यासारखा त्रास नाही. ज्या ठिकाणी कंपनीला तोटा कमी आहे अशा ठिकाणी लोडशेडिंग कमी होणार असल्याचं सरकारने जाहीर केलं आहे. पुण्या-मुंबईसारखे शहरं लोड शेडिंगमधून आधीच वगळली आहेत.

बीबीसी मराठीच्या प्रतिनिधींनी माहिती दिल्याप्रमाणे महाराष्ट्राच्या काही भागात 2-3 तास वीज नसतेच.

राजेंद्रकुमार गोयंका यांच्या मते, "लोडशेडिंगचा निर्णय अत्यंत चुकीचा आहे. लोकांकडून बिलं वसूल करणं हे सरकारचं काम आहे. योग्य प्रमाणात वसुली करणं हे सरकारचं काम आहे. ते नीट झालं नाही त्याचा फटका प्रामाणिकपणे बिल भरणाऱ्या लोकांनी का सोसायचा?"

सरकारने काय पावलं उचलली आहेत?

या वीज संकटावर सरकारने काय पावलं उचलले आहेत याविषयी आम्ही MSEDCL चे अध्यक्ष विजय सिंघल यांच्याशी संवाद साधला. त्यांच्या मते, कोळसा मिळत नसल्याने सध्या मोठं संकट निर्माण झालं आहे. तरीही सरकारने याबाबत तातडीची पावलं उचलली आहेत.

कोळसा

"आम्ही केंद्राकडून NTPC ची वीज घेतली. परवाच्या कॅबिनेटमध्ये टाटाची वीज घेण्याचा निर्णय घेतला. कोयना जलविद्युत प्रकल्पात पाण्याचा साठा करून ठेवलाय. वीजेची अचानक वाढलेली मागणी आम्हालाही अनपेक्षित आहे.कोळशाची टंचाईसुद्धा पूर्ण देशात आहे. ती फक्त महाराष्ट्रातच नाही," असं सिंघल म्हणाले.

या संकटावर तोडगा काय?

गोयंका यांच्या मते, "सरकारने वीजनिर्मिती क्षेत्रातून संपूर्णपणे काढता पाय घ्यायला हवा. सरकारकडे कोणत्याही प्रकाराची दूरदृष्टी नाही. सध्या वीजनिर्मिती कंपन्यांकडे 40 हजार कोटींपेक्षा अधिक थकबाकी जमा झाली आहे. शेती क्षेत्र हे व्होट बँक म्हणून सरकार वापर करतं. त्यांची मतं मिळावी म्हणून त्यांची वीज कापत नाहीत, दर वाढवत नाही.

"हे सगळं सरकारचं नियंत्रण असल्यामुळे होत आहे. सरकारकडे दूर दृष्टी नाही. असली तरी त्यांना काहीही करायचं नाहीये. कोळसा वगैरे ठीक आहे. तो कधीतरी संपणार आहे. आपल्याकडे खूप सौर उर्जा आहे. तिचा वापर करायला पाहिजे."

हे संकट कधी संपणार याची वाट महाराष्ट्राची जनता पाहत आहे. तर आम्हीही तुमच्यासारखीच वाट पाहतोय, असं विजय सिंघल बीबीसी मराठीशी बोलताना म्हणाले.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)