एसीमुळे येणारं वीज बिल कमी करण्याचे 8 मार्ग माहिती आहेत का?

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो
    • Author, राजेश पेडगडी
    • Role, बीबीसी न्यूज तेलुगू

देशात मे आणि जून महिन्यात उष्णतेची लाट येणं हे नेहमीचं झालंय आहे. मात्र मार्चपासूनच तापमानात कमालीची वाढ झाली आहे. एअर कंडिशनिंगमुळे अर्थात एसीमुळे कडक उन्हाळ्यात आपल्याला आराम मिळतो. मात्र याचा परिणाम जास्त वीज बिलांच्या रूपात येतो.

एसीचा वापर करूनही वीजबिल कमी येऊ शकतं असं तज्ज्ञांच म्हणणं आहे. एसी वापरताना विजेचा वापर कमी व्हावा यासाठी तज्ञांनी काही सूचना दिल्यात.

1. टेंपरेचर किमान 24-27 डिग्रीच्या दरम्यान सेट केलं पाहिजे

बर्‍याच घरांमध्ये लोक एअर कंडिशनिंग सिस्टीमचं म्हणजे एसीचं टेंपरेचर 18 डिग्रीवर सेट करतात. जेणेकरून खोली लवकर थंड होईल असं लोकांना वाटतं. पण एसीचे टेंपरेचर 18 डिग्री ठेवू नये, असं सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायर्नमेंट (CSE) चे वरिष्ठ संशोधक अविकल सोमवंशी सांगतात.

बीबीसी बोलताना त्यांनी सांगितलं की, "एसीचं टेंपरेचर 24-27 डिग्रीच्या दरम्यान सेट केलं पाहिजे. यामुळे एसीचा टिकाऊपणा वाढतो आणि वीज बिल कमी यायला मदत होते. सीएसईने केलेल्या अभ्यासात असं आढळून आलंय की, जेव्हा एसीचे टेंपरेचर 27 डिग्रीपेक्षा कमी होतं तेव्हा एसीची वीज वापरण्याची क्षमता देखील 3 ते 10 डिग्री खाली आली होती."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, TADO

ते असं ही म्हटले की, "20 डिग्रीवर 5 स्टार एसी लावण्यापेक्षा एक स्टार असलेला एसी 27 डिग्रीवर लावणं केव्हाही चांगलं आहे. जर तुम्ही 18 डिग्री सेट करून एसी लावत असाल, तर तुमच्या घराचं तापमान ही 18 डिग्री पाहिजे, पण जे शक्य नसतं. खोलीच्या बाहेरील तापमान 18 डिग्रीवर यायला किती वेळ लागतो याचा विचार करा."

यावेळी त्यांनी एसीचं डीफॉल्ट टेंपरेचर 24 डिग्री ठेवण्याच्या भारत सरकारच्या निर्णयाची ही आठवण करून दिली.

एसी ज्या तापमानाला सुरू होतो त्याला डीफॉल्ट टेंपरेचर असं म्हणतात. ब्युरो ऑफ एनर्जी इफिशियन्सीने एसीचे स्टार्ट टेंपरेचर 24 डिग्रीवर निश्चित करण्याचा आदेश पारित केला आहे. याचा अर्थ एसीचे सुरुवातीचं टेंपरेचर 24 डिग्री असेल. लोकांच्या इच्छेप्रमाणे ते कमी जास्त करू शकतात.

हे टेंपरेचर 24 डिग्रीवर ठेवण्यामागचं कारण म्हणजे विजेचा वापर कमी करणे आहे असं अविकल यांचं मत आहे.

ते म्हणतात, "जेव्हा एसीचे टेंपरेचर 24 डिग्रीपेक्षा जास्त असतं तेव्हा वीज वापर 6 टक्क्यांनी कमी होऊ शकतो."

युनायटेड नेशन्स ऑर्गनायझेशन 'कुल यूएन' नावाने एक विशेष मोहीम राबवतं आहे. घरामध्ये एसीचं टेंपरेचर 25 डिग्रीपर्यंत मर्यादित ठेवण्याबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी ही विशेष मोहीम आहे.

2. इन्स्टॉलेशनमध्ये येणाऱ्या अडचणी

एसीच्या इन्स्टॉलेशन दरम्यान येणाऱ्या अडचणी हे देखील जास्त वीज बिल येण्यामागचं एक कारण असल्याचं इलेक्ट्रॉनिक फर्म टीसीएलने आपल्या वेबसाइटवर म्हटलंय.

वेबसाइटवर नमूद केल्याप्रमाणे, "इंस्टॉलेशन दरम्यान येणाऱ्या अडचणीमुळे एसी नीट काम करत नाही. ज्यामुळे त्याची क्षमता कमी होते"

अर्बन कंपनीत एसी रिपेअर सर्व्हिस टेक्निशियन असलेले एम रिहान म्हणतात, "योग्य इन्स्टॉलेशन करून मिळत नाही म्हणून घरासाठी अनुकूल असा एसी निवडणे ही खरंतर इंस्टॉलेशन मधली समस्या आहे."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

रिहान सांगतात, "खोलीच्या आकारानुसार एसी निवडावा लागतो. उदाहरणार्थ, खोलीचा आकार 120 - 140 चौरस फूट दरम्यान असल्यास 1 टन क्षमतेचा एसी पुरेसा असतो. जर खोलीचा आकार 150 - 180 चौरस फूट असेल तर 1.5 टन क्षमतेचा एसी हवा. जर खोलीचा आकार 180 चौरस फुटांपेक्षा जास्त असेल तर 2 टन क्षमतेचा एसी निवडणं योग्य ठरतं."

"जर एखाद्याने लहान खोलीसाठी जास्त क्षमतेचा एसी बसवला तर विजेचा वापर साहजिकच जास्त होईल. त्याच वेळी कमी क्षमतेचा एसी मोठ्या खोलीत लावता येणार नाही. जागेचा आकार लक्षात घेऊन एसी खरेदी केले पाहिजेत." असं रिहान सांगतात.

तासाला जितकी गरम हवा बाहेर फेकली जाते त्याची क्षमता टनांमध्ये मोजली जाते. जास्त क्षमतेच्या एसीसाठी जास्त वीज वापरली जाईल.

3. एसी थेट सूर्यप्रकाशाच्या संपर्कात नसावा

ज्या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश पडतो अशा ठिकाणी एसी लावू नये. हे एक जास्त वीज बिल येण्यामागचं कारण आहे असं तज्ञांच मत आहे.

"आउटडोअर एसी युनिटमध्ये कंडेन्सर कॉइल आणि कंडेन्सर फॅन असतो. हा फॅन गरम हवा कंडेन्सर कॉइलमध्ये जाण्यास मदत करतो. मात्र, कंडेन्सर कॉइलवर सूर्यप्रकाश पडला तर हवा थंड करण्याची एसीची क्षमता कमी होते. दुसऱ्या शब्दांत, जर सूर्यप्रकाश थेट एसी वर पडला तर एसीची गरम हवेचं थंड हवेत रूपांतर करण्याची क्षमता कमी होते." असं रिहमान यांनी बीबीसीला सांगितलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"सूर्यप्रकाशाच्या थेट संपर्कात आल्यामुळे एसीला खोली थंड होण्यासाठी जास्त वेळ लागेल साहजिकच वीज बिल जास्त येईल." असं ही त्यांनी स्पष्ट केलं.

ते पुढे सांगतात, "एसी थेट सूर्यप्रकाशात येऊ नये म्हणून काही लोक एसीच्या बाहेरील युनिट्सला कपड्याने गुंडाळतात. हे तर जास्त धोकादायक असतं. जर ते कापड एसीमध्ये अडकलं तर एसी बंद पडेल."

वीज बिल कमी करण्यासाठी एसीचे बाहेरील युनिट सावली असेल अशा ठिकाणी इन्स्टॉल करावे असे रिहमान यांनी सांगितलं.

4. सर्व्हिसिंग गरजेचं आहे

एसीच्या देखभालीची गरज असते. आणि तो चांगल्या स्थितीत असेल तरचं वीज वाचवता येईल असं तज्ञ म्हणतात. "दरवर्षी सर्व्हिसिंग केल्यास एसीची क्षमता देखील वाढते" असं रिहान म्हणतात.

"एसीच्या फिल्टर आणि डक्टमध्ये धूळ आणि काजळी साचते. जर ती काढली नाही तर एसीची कार्यक्षमता कमी होते." असं त्यांनी सांगितलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, EPA

"कधीकधी एसी मधून गॅस लीक होतो ज्यामुळे एसी बंद पडतो. सर्व्हिसिंग दरम्यान गॅसचं प्रेशर तपासणं आवश्यक असल्याचं" रिहान सांगतात.

रिहान सांगतात, "कधीकधी, कॉम्प्रेसरला सुरू व्हायला वेळ लागतो . अशा वेळी सर्व्हिसिंगही करावी लागते. हे एसीच्या टिकाऊपणासाठी महत्वाचं असतं."

5. एसी चोवीस तास सुरू ठेऊ नये

एसी 24/7 चालवू नये. अशावेळी टायमर वापरावा लागेल असं अविकल म्हणाले. "जवळपास सर्वचं एसीमध्ये टायमर असतो. खोली थंड होण्यासाठी लागणारा वेळ पाहून टायमर लावावा. यामुळे वीज बिल कमी होण्यास मदत होते."

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"जेव्हा आपण एसी बंद करतो तेव्हा एसीचे पार्टस थंड होतात आणि जेव्हा आपण एसी पुन्हा सुरू करतो तेव्हा ते चांगल्या पद्धतीने काम करतात. एसी मधील एनर्जी सेव्हिंग मोड वापरणं आवश्यक असतं" असं अविकल सुचवतात.

6. दार खिडक्या बंद करा

एसी चालू असताना दार खिडक्या बंद कराव्यात असं तज्ञ म्हणतात. "एसी चालू असताना दार खिडक्या बंद आहेत का हे पाहावं. जर थंड हवा बाहेर गेली तर कॉम्प्रेसरवरचं प्रेशर वाढतं. यामुळे वीज बिल देखील वाढतं" असं रिहान सांगतात.

"खोलीत मोठ्या प्रमाणावर सूर्यप्रकाश येणार नाही याची ही काळजी घ्यावी. काचेच्या खिडक्या असतील तर जाड पडदे वापरावेत. यामुळे सूर्यप्रकाश थेट खोलीत येणार नाही" असं ते म्हणाले.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

अविकल सांगतात की, पडदे खिडक्यांच्या बाहेरच्या दिशेने लावता येऊ शकतात.

"जर पडदे आतून लावले तर खिडक्यांच्या काचा तापण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे खोलीचं तापमान वाढतं आणि एसीला जास्त वेळ सुरू ठेवावा लागतो. पण पडदे जर खोलीच्या बाहेर लावले तर खिडक्यांवर पडणारा सूर्यप्रकाश कमी होईल" असं अविकल सुचवतात.

7. फ्रीज आणि टीव्ही बाहेर असावेत

इलेक्ट्रॉनिक वस्तू खोलीच्या बाहेर असाव्यात असं तज्ञ म्हणतात.

"फ्रिज, टीव्ही आणि कॉम्प्युटर या वस्तू खूप उष्णता निर्माण करतात. खोलीत इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवल्यास एसी जास्त वेळ सुरू ठेवावा लागतो. या वस्तू जेवढी उष्णता निर्माण करतात ते कदाचित नसेल. पण इलेक्ट्रॉनिक वस्तू जसजशा जुन्या होतात तसतसं त्यांच्यापासून निर्माण होणारी उष्णता वाढते." असं रिहान सांगतात.

8. पंखे सुरू करा

एसी सुरू असताना पंखा सुरू करावा जेणेकरून खोलीतील तापमान कमी होतं असं तज्ञ म्हणतात. "नेहमी असा सल्ला दिला जातो की एसी चालू असताना पंखा सुरू करण्याची गरज नसते. पण, हे खरं नाही." असं अविकल म्हणतात.

"एका अभ्यासानुसार, जेव्हा पंखे एसीसह एकाच वेळी सुरू केले जातात तेव्हा खोलीचे तापमान 3 - 4 डिग्रीने कमी होतं." असं अविकल यांनी सांगितलं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Getty Images

"तापमान कमी असेल तर आम्ही सहसा एसीचं टेम्परेंचर वाढवतो ज्यामुळे विजेचा वापर कमी होतो" असं ते म्हणाले.

या सर्व सूचनांचं पालन केल्यास वीज बिल कमी करता येऊ शकतं आणि एसीचा वापरही कमी करता येऊ शकतो असं तज्ञ सांगतात.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)