एसटी आंदोलन : 'बायकोचे दागिने विकून चिवड्याचं दुकान थाटलं, पण एसटी संपातून माघार घेतली नाही'

- Author, नितेश राऊत
- Role, बीबीसी मराठीसाठी
राज्य शासनात विलीनीकरणाचा मुद्द्यावरून जवळपास साडेपाच महिने आंदोलन करणारे एसटी कर्मचारी 22 एप्रिल पर्यंत नोकरीवर रुजू होणार असल्याचं संघटनेनं जाहीर केलंय. दरम्यानच्या काळात अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट होती. त्यावर आंदोलक कर्मचाऱ्यांनी छोटी मोठी दुकान थाटून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवला. त्यापैकीच एक आहेत सहायक मेकॅनिकल तुषार मेसरे.
राज्य सरकारमध्ये विलीनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यांपासून एसटी कर्मचारी तुषार मेसरे हे आंदोलन करताहेत. पण हायकोर्टाच्या निर्णयाचा आदर करत 22 एप्रिलला नोकरीवर परतण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.
साडेपाच महिन्याच्या कालावधीत कर्मचाऱ्यांवर अनेक वाईट प्रसंग आलेत. त्यात पगार नसल्यामुळे आर्थिक संकटात सोडलेले तुषार मेसरे यांनी चिवडा, भेळ आणि मुरमुरे फुटाण्याचं दुकान चालवलं. काँग्रेस नगर रोड परिसरात अजूनही त्यांचं किरकोळ खाद्य साहित्य विक्रीचं दुकान सुरू आहे.
मेसरे यांनी पत्नीचे दागदागिने विकून चिवड्याचं दुकान लावलं. त्यातूनच त्यांच्या कुटुंबाचा गाडा चालतोय.
मेसरे अमरावतीच्या आगार क्रमांक एकमध्ये 18 वर्षापासून सहायक मेकॅनिकल म्हणून काम करतात. आतापर्यंत नोकरी करूनही त्यांना 26 हजार पगार आहे. पण त्या पगारात कपात होऊन त्यांच्या हाती जवळपास 10 हजार इतकेच पडतात. अत्यल्प पगारात कुटुंबाचा गाडा चालवणे शक्य नसल्याचं ते सांगतात. त्यामुळं अजूनही ते विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनात पहिल्या दिवसापासून मेसरे सहभागी आहेत. दरम्यानच्या काळात अनेक संकट त्यांच्यावर आली.
'तरीही आंदोलनातून हटणार नव्हतो'
ते म्हणतात "विलिनीकरणाच्या मागणीसाठी गेल्या साडेपाच महिन्यात 127 एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांचं कुटुंब उघड्यावर पडलय. त्यांच कुटुंब अत्यंत वाईट जीवन जगत आहेत. त्यामुळे आत्महत्या हा अंतिम पर्याय नव्हता अस मला वाटतं."

"या कालावधीत माझ्यावरही अनेक संकट आलीत. आई आजारी असते. परिस्थिती अशी होती की तिच्या उपचारासाठीही पैसे नसायचे. मोठ्या मुलाच्या शाळेत दाखल्यासाठीही पैसे नव्हते म्हणून तो शिक्षणापासून वंचित आहे. पण आंदोलनातून माघार घेणार नसल्याचं निश्चय मी आधीच केला होता," मेसरे सांगतात.
पत्नीचे दागदागिने विकून मेसरे यांनी छोटंसं दुकान थाटले. त्यातून येणाऱ्या मिळकतीवर त्यांचं घर चालतं. पण यातून येणारा पैसाही अपुरा पडतो. गरजा भरपूर आहेत. पण गरजांना अंकुश लागला आहे.
घर, दुकान सांभाळून आंदोलनात हजेरी
घर, दुकान सांभाळून आंदोलनालाही ते हजेरी लावतात. सकाळी दुकान उघडतात. दुपारी 2 वाजता जेवणासाठी घरी येतात. 2.30 वाजताच्या दरम्यान अमरावतीच्या मुख्य आगार पुढे चालू असलेल्या आंदोलन स्थळी येतात. गेल्या पाच महिन्यांपासून त्यांचा हा नियमित दिनक्रम आहे.
नोकरीवर असतानाही त्यांच्या कामाचा ठराविक वेळ नव्हता. यावर बोलताना ते सांगतात "आमची साडे आठ तासांची ड्युटी असते. तस असतांनाही कधीही कामावर जावं लागतं. पण त्या कामाचा योग्य मोबदला मिळत नाही. राज्य शासनात विलीनीकरण झाल्यास आमच्या वेतनात वाढ होईल. कारण वयाचे 18 वर्ष काम केल्यानंतरही हातात कमी पगार पडतो. त्यात आमचा उदरनिर्वाह कठीण आहे".
हिवाळ्यात सकाळी मेसरे यांनी चहा आणि नाष्टाचा व्यवसाय केला. आता त्यांनी किराणाचे दुकान घेतले. त्यातूनही कुटुंबाचा गाडा चालेल इतकी मिळकत होत नाही. तरीही त्यांनी आंदोलक बांधवांना धोका दिला नाही. नोकरीवर रूजू न होता आंदोलनात सहभाग कायम ठेवला.

पण मेसरे अजूनही विलिनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यासाठी कोणत्याही लढ्याला ते तयार होते. आंदोलनाला काहीस यश मिळालेही. पण त्या यशाचा आनंद साजरा करतोच ते लढ्याचे प्रमुख वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली.
त्याचबरोबर 22 एप्रिल पर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश हायकोर्टाने एसटी कर्मचाऱ्यांना दिले. तसेच यानंतर कोणतही आंदोलन न करण्याचा इशारा देण्यात आला. हायकोर्टाचा आदेशाचा मान राखत मेसरे सह अमरावती मुख्य आगारातील कर्मचाऱ्यांनी नोकरीवर रूजू होण्याची तयारी दाखवली. पण आंदोलन अद्यापही सुरू आहे.
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्यामुळे आंदोलनाला गालबोट
नोकरीवर रूजू होण्या संदर्भात बोलताना मेसरे सांगतात "शरद पवार यांच्या घरावर चपला आणि दगडफेक करून आझाद मैदानातील आंदोलनाला गालबोट लागले. त्या घटनेचा आम्हीही निषेध करतो. आमचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी शांततेत आंदोलनाचा सल्ला आम्हाला दिला होता.
आमच्या मागण्या पूर्ण झाल्या होत्या. त्यामुळं एकाच दिवशी नोकरीवर रूजू होण्यासंदर्भात सदावर्ते यांनी आदेश दिले होते. त्यानुसार आम्ही जॉईन होणार होतो. पण सदावर्ते यांची आम्ही वाट बघणार आहोत. पण त्यापूर्वी म्हणजेच 22 एप्रिल पर्यंत आम्ही नोकरीत रूजू होणार आहोत."

अमरावती आगार क्रमांक ऐक मध्ये 254 कर्मचारी आहेत. त्यापैकी 30 लोक नियोजित कामगिरीवर रूजू झालेत. महामंडळाने कंत्राटी तत्वावर 40 कर्मचारी जॉईन झाले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. पण इतक्या वर्षापासून कार्यरत असणारे कर्मचारी आणि कंत्राटी तत्वावर भरती करण्यात आलेले कर्मचारी यांच्यात अंतर आहे. गाडी चालवताना अनुभवी कर्मचाऱ्यांकडून धोका नसतो तर कंत्राटी कर्मचाऱ्यांकडून अपघाताची शक्यता असते असं मेसरे यांचं मत आहे. इतक्यात झालेल्या दुर्घटना या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्याच हातून झाल्या आहेत असा आरोपही त्यांनी केला.
पण मेसरे यांची सरकारकडे एकच मागणी आहे, ती म्हणजे राज्य सरकारने विलिनिकरणाची मागणी पूर्ण करावी.
हे वाचलंत का?
या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.
YouTube पोस्ट समाप्त
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)








