ST संप : एसटी गावखेड्यातल्या पोरांच्या रक्तात भिनली आहे, कारण... - ब्लॉग

एसटी

फोटो स्रोत, MSRTC

    • Author, श्रीकांत बंगाळे
    • Role, बीबीसी मराठी

नोव्हेंबर 2018 मध्ये दिवाळीची सुट्टी संपवून दिल्लीला निघालो. तेव्हा देऊळगावराजाहून औरंगाबादला जाणारी एसटी पकडली. एसटीत प्रचंड गर्दी होती. मग बसायचं कुठं तर ड्रायव्हरच्या सीटाच्या मागे एक टायर ठेवलेलं होतं. त्यावर आधीच तिन जण बसलेले होते. त्यात एक आजी होती.

आजीला म्हटलं, 'ओ आजी, सरका जरसक, लांब जायचंय, दिल्लीलं.' आजीनं माझं म्हणणं ऐकलं आणि 'बस बाळा' म्हणत मला जागा दिली. मग टायरवर चारही बाजूंनी आम्ही चार जण बसलो आणि औरंगाबादपर्यंतचा प्रवास केला.

एसटीच्या अशा अनुभवांनी माझ्यासारख्या गावखेड्यातल्या पोरांना आयुष्यात अॅडजस्ट करायला शिकवलं. माणसांशी बोलायला, त्यांना बोलतं करायला शिकवलं. माणसाच्या घामाच्या वासाशी कनेक्ट व्हायला शिकवलं.

एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असल्यामुळे हा किस्सा मला चटकन आठवला. खरं तर माझ्यासारख्या असंख्य ग्रामीण मुलांचं पहिलं प्रेम आहे एसटी. कारण एसटीनं आम्हाला फक्त शहराशीच जोडलं असं नाही, तर जगाबद्दलचा आमचा जो आवाका होता, त्यालाही विस्तारायचं काम केलं.

प्रेमात तरी दुसरं काय होतं? आपण एखाद्याच्या सहवासात अनेक दिवस राहतो आणि मग त्या व्यक्तीमुळे आपलं जगणं अधिक समृद्ध होतं. एसटीनं आमचं जगणं असंच समृद्ध केलं, श्रीमंत केलं.

माझं आणि एसटीचं नातं बालपणापासूनचं. माझे वडील विदर्भातल्या बुलडाणा जिल्ह्यातल्या सिनगावचे शेतकरी. त्यामुळे तालुक्यात दर शनिवारी जो आठवडी बाजार भरायचा त्यानिमित्तानं त्यांचं देऊळगाव राजाला जाणं व्हायचं. कधीमधी मलाही ते त्यांच्यासोबत घेऊन जात.

उन्हाळ्यात आईसोबत तालुक्याला आंबे विकायला जाणं असो की मामाच्या गावाला जाणं असो, आम्हाला एसटीच लागायची. कुणाचं काही दुखलं-खुपलं की दवाखान्यात तालुक्याला जाण्यासाठीही एसटीच लागायची. याचं कारण एकच, ते म्हणजे एसटी सामान्यातल्या सामान्य कुटुंबातल्या माणसाला परवडायची.

2018च्या नोव्हेंबर महिन्यात एसटीतून केलेला प्रवास
फोटो कॅप्शन, 2018च्या नोव्हेंबर महिन्यात एसटीतून केलेला प्रवास

याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर माझा मोठा भाऊ तालुक्याला शिकायला असताना त्याचा डब्बाही एसटीनंच पाठवला जायचा. गावात सकाळी येणारी वर्तमानपत्रं एसटीच घेऊन यायची.

एसटीमुळे शिक्षण परवडलं

वयाच्या दहाव्या वर्षापासून एसटी माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग बनली. पोराला चांगलं शिक्षण मिळावं म्हणून माझ्या वडिलांनी मला पाचवीत असताना तालुक्याच्या शाळेत टाकलं.

तेव्हापासून पुढे दहावी होईपर्यंत रोज एसटीनं प्रवास करायचो. सिनगाव जहांगीर ते देऊळगाव राजा हे सुमारे 10 किलोमीटर अपडाऊन एसटीनं ठरलेलं असायचं.

40 रुपये मासिक पास होता तेव्हा एसटीचा. एसटीमुळेच वर्षानुवर्षं शाळेसाठी लागणाऱ्या प्रवासाचा खर्च आमच्यासारख्यांना परवडला.

अकरा वाजता शाळा भरायची. 9 वाजता आम्ही सगळी शाळकरी मुलं गावातल्या एसटी स्टँडवर एसटीची वाट बघत असायचो. एसटी लांबून दिसली की जागा पकडण्यासाठी सगळ्यांची लगबग सुरू व्हायची. कुणी खिशातला रुमाल, तर कुणी पाठीवरचं दप्तर खिडकीतून आत टाकायचं आणि मग सीट पकडल्याचा दावा करायचं.

प्रातिनिधिक फोटो

फोटो स्रोत, Buldana katta

फोटो कॅप्शन, प्रातिनिधिक फोटो

साडे नऊची गाडी आम्हाला 10च्या सुमारास तालुक्याला सोडायची. देऊळगाव राजा बस स्टँडला उतरलो की तिथून किलोमीटरभर एवढ्या अंतरावर शाळा होती. हे अंतर आम्ही पायी गाठायचो.

शाळा 5 वाजता सुटली की आमची गडबड साडेपाच वाजताची गाडी पकडायची असायची. त्यामुळे 5 वाजता घंटा वाजली की आम्ही पळत सुटायचो, 15 ते 20 मिनिटांत ते किलोमीटरभर अंतर पार करायचो. कारण साडेपाच नंतर साडे सहाला एसटी असायची आणि मग नंतर शेवटची एसटी साडे नऊला. त्यामुळे मग साडे पाचची एसटी सुटू नये म्हणून आमची एकच धावपळ उडायची.

असं नाही की त्यावेळी खासगी वाहनं नव्हती. गावाहून तालुक्याला येणारी टमटम तेव्हाही होती आणि आजही आहे. पण, एसटी आणि सुरक्षित प्रवास हे नातं मनात घट्ट असल्यानं सगळ्यांचा ओढा एसटीतल्या प्रवासाकडे असायचा.

आमच्या शेजारच्या गावातून तर एकाच वेळी एसटीत 30 ते 35 मुली बसायच्या. मुलींसाठी तर एसटीचा प्रवास सगळ्यांत सुरक्षित समजला जायचा.

एसटी कचाकच भरलेली असायची. दोन जणांच्या सीटावर आम्ही चारचार जण बसायचो. एसटी दणादण आदळायची. जागा मिळाली नाही, तर उभ्यानंही प्रवास करावा लागायचा. पुढे लातूर आणि पुण्याला शिक्षणासाठी गेलो. तेव्हाही एसटीनंच प्रवास करायचो. कारण तेच की एसटी परवडायची आणि सुरक्षित वाटायची.

एसटी

फोटो स्रोत, HINDUSTAN TIMES

सुरुवातीला एसटीत बसल्यामुळे आपली मज्जा होते म्हणून तेवढ्यापुरतचं एसटीचं कौतुक वाटायचं. मोठा झालो तेव्हा कळलं की, एसटीनं आम्हा गावखेड्यातल्या पोरांना आमच्या आर्थिक ऐपतीत शहराशी, चांगल्या शिक्षण प्रणालीशी जोडलं.

आता कामानिमित्त दिल्लीत असतो, तर कधीतरीच एसटीनं प्रवास करायला मिळतो. मागे एकदा औरंगाबादहून देऊळगाव राजाला जाणारी एसटी पकडली आणि प्रवास करायला लागलो तर मन भरून आलं. सगळ्या जुन्या आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहिल्या.

एसटीनं माझ्यासारख्यांना अनेक नवे मित्र दिले. तालुक्याच्या ठिकाणापर्यंत जायचं असल्यानं मधात येणाऱ्या तीन-चार गावातील मुलं एसटीत चढायचे. पुढच्या काळात ते केवळ आणि केवळ एसटीमुळे माझे मित्र झाले.

एसटी आणि शहाणपण

एकदा देऊळगाव राजा ते पुणे असा प्रवास करत होतो. एसटीत माझ्याशेजारी माझ्या आईच्या वयाची एक बाई बसली होती. पुढच्या काही क्षणात तिनं तिचा जीवनप्रवास उलगडून सांगितला, तिचं दु:ख सांगितलं, घरची स्थिती सांगितली. शेवटी उतरताना म्हणाली, 'बाळा नजर चांगली पाहिजे. जग आपोआप चांगलं दिसतं.' अशाप्रकारे एसटीनं आम्हाला शहाणपण शिकवलं.

एसटीच्या या अनुभवांमुळे एसटी ग्रामीण पोरांच्या रक्तात भिनली आहे. त्यामुळे मग एसटी आणि तिच्याशी संबंधित सगळ्या घटकांवर आमचं प्रेम आहे.

याच एसटी कर्मचाऱ्यांचा सध्या संप सुरू आहे. खरं तर हे कर्मचारी आमच्यासाठी आमचे कंडक्टर मामा आणि ड्रायव्हर काका. यांना पूर्वी अख्खं गाव ओळखायचं. गावात एसटी मुक्कामाला असली की गावातल्याच घरी त्यांना जेवण दिलं जायचं. इतकं एसटी कर्मचारी आणि ग्रामीण भागाचं कौटुंबिक नातं आहे.

एसटी बस स्टँड

फोटो स्रोत, Social media

आज एसटी बंद आहे, तर मनाला वाईट वाटतं. त्या मुला-मुलींकडे बघून वाईट वाटतं, जे आज शाळा सुरू असताना शाळेत जाण्यासाठी गावच्या फाट्यावर एसटीची वाट बघत थांबले असतील. गावातून शहराच्या ठिकाणी भाजी-पाला, दुध, दाळी-साळी विकण्याकरता नेण्यासाठी ताटकळलेल्या आमच्या मायबापांकडे पाहून वाईट वाटतं.

आणि एसटीच्या बस स्टँडवर जी लालपरी दिमाखात उभी दिसायची, तिथं आज खासगी वाहनं उभी पाहताना मन विषण्ण होतं.

एसटी कर्मचाऱ्यांना मिळणारा तुटपुंजा पगार पाहून 12 ते 13 हजार रुपयांत या महागाईच्या काळात घर कसं चालवायचं, हा प्रश्न मनाला पडतो.

आपली एसटी तोट्यात आहे. राज्यभर एसटीच्या 16000 बसेस चालतात. 65 लाखांपर्यंत प्रवासी रोज एसटीतून प्रवास करतात. यातून मिळणाऱ्या नफ्यामधून एसटी कर्मचार्‍यांचे पगार आणि इतर खर्च केला जातो. पण कोरोनाच्या काळात एसटीचा तोटा हा 10 हजार कोटींच्या घरात असल्याची माहिती प्रशासकीय अधिकारी सांगतात.

एसटी लोककल्याणकारी योजनेच्या रुपात चालवली जात असल्यानं ती तोट्यातच राहणार, असं अनेकांचं म्हणणं आहे. पण, एसटी जगवणारे आणि तिला लोककल्याणकारी करणारे हात तोट्यात राहता कामा नये, असं मनातून वाटतं.

हेही वाचलंत का?

YouTube पोस्टवरून पुढे जा
परवानगी (सोशल मीडिया साईट) मजकूर?

या लेखात सोशल मीडियावरील वेबसाईट्सवरचा मजकुराचा समावेश आहे. कुठलाही मजकूर अपलोड करण्यापूर्वी आम्ही तुमची परवानगी विचारतो. कारण संबंधित वेबसाईट कुकीज तसंच अन्य तंत्रज्ञान वापरतं. तुम्ही स्वीकारण्यापूर्वी सोशल मीडिया वेबसाईट्सची कुकीज तसंच गोपनीयतेसंदर्भातील धोरण वाचू शकता. हा मजकूर पाहण्यासाठी 'स्वीकारा आणि पुढे सुरू ठेवा'.

सावधान: बाहेरच्या मजकुरावर काही अॅड असू शकतात

YouTube पोस्ट समाप्त

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)