किरीट सोमय्यांनी 'जितेंद्र आव्हाडांचा सचिन वाझे' असा उल्लेख केलेले प्रविण कलमे कोण आहेत?

    • Author, मयांक भागवत
    • Role, बीबीसी मराठी

भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शुक्रवारी (15 एप्रिल) 'अर्थ' या समाजिक संस्थेचे संस्थापक प्रविण कलमे यांच्यावर 'गृहनिर्माण विभागाचे सचिन वाझे' असल्याचा आरोप केला.

"प्रविण कलमेंवर एसआरए (झोपडपट्टी पुर्नविकास) विभागातील कागद चोरी प्रकरणी गुन्हा दाखल झालाय. मग ते आहेत कुठे? ते परदेशात गेलेत. त्यांना पळून लावण्यास उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली का?" असे प्रश्न किरीट सोमय्या यांनी उपस्थित केले.

किरीट सोमय्या यांच्या आरोपाबाबत बीबीसी मराठीने प्रविण कलमे यांच्याशी संपर्क करून त्यांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला. प्रविण कलमे यांनी सोमय्या यांनी लावलेले सर्व आरोप फेटाळून लावलेत.

आखाती देशात असलेल्या प्रविण कलमे यांच्याशी बीबीसी मराठीचे प्रतिनिधी मयांक भागवत यांनी चर्चा केली.

सोमय्यांचा पहिला आरोप - शुक्रवारी दुपारी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी प्रविण कलमे यांचा उल्लेख जितेंद्र आव्हाड यांचे वाझे असा केला. कलमे यांना 100 कोटी वसूलीचं टार्गेट देण्यात आलं होतं, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

प्रविण कलमेंचं उत्तर - त्यांनी आरोप केला होता की, प्रविण कलमे गृहनिर्माण मंत्रालयाचा सचिव वाझे आहे. त्यावेळी ते 1000 कोटी बोलले होते. आज 100 कोटी म्हणाले. मी किरीट सोमय्यांच्या विरोधात शिवडी कोर्टात मानहानीची तक्रार दाखल केलीये. त्यात कोर्टाने सोमय्या प्रथमदर्शनी दोषी आहेत असं म्हटलंय. कोर्टाने यावर प्रोसेस इश्यू केलीय. या खटल्याच्या पुराव्याच्या स्टेजला आता आम्ही आहोत.

किरीट सोमय्यांच्या बांधकाम व्यवसायिक मित्रांनी केलेले घोटाळे उघडकीस येऊ नये म्हणून मला सचिन वाझे यांच्यासोबत लिस्टमध्ये बसवण्यात आलंय. मी सत्याची लढाई लढतोय.

सोमय्यांचा दुसरा आरोप - प्रविण कलमेंवर एसआरए विभागातील कागदपत्र चोरण्याप्रकरणी गुन्हा दाखल झालाय. हा गुन्हा एसआरए विभागाने दाखल केलाय. पोलीस त्यांना शोधत आहे. मग उद्धव सरकारने त्यांच्यावर कारवाई का केली नाही?

प्रविण कलमेंचं उत्तर - किरीट सोमय्या मुंबई पोलिसांचा भाग कधीपासून बनलेत. माझ्यावर दाखल झालेल्या FIR ची कॉपी त्यांना कशी मिळाली. मला माझ्यावर गुन्हा दाखल झाल्याचं मला माहित नाही. किरीट सोमय्यांच्या पत्रकार परिषदेतून कळलं. ही पत्र त्यांच्याकडे कशी पोहोचली. हा चौकशीचा विषय आहे. माझ्याकडे FIR कॉपी नसल्याने त्यात काय म्हटलंय याची मला माहिती नाही. मला मिळालेल्या माहितीनुसार एका फाईलमधील काही कागद चोरी केल्याचा माझ्यावर गुन्हा दाखल झालाय.

मी ज्या इमारतीच्या निर्माणाबाबत कायदे मोडल्याची तक्रार दाखल केली. त्या बिल्‍डिंगची काही कागदपत्र घेऊन गेल्याचा माझ्यावर आरोप आहे. हा आरोप मला फक्त गोवण्यासाठी करण्यात आलाय. बहुधा आर्थिक गुन्हे शाखेला त्यांना ते कागदपत्र द्यायचे नसतील म्हणून त्यांनी हा खोटा आरोप केलाय. या प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेने पीई दाखल करून चौकशी सुरू केली होती.

FIR कॉपी मिळाल्यानंतर पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू करू. आता यावर काहीच बोलता येणार नाही.

सोमय्यांचा तिसरा आरोप - गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रविण कलमे परदेशात निघून गेले. प्रविण कलमे कुठे आहेत? ते परदेशात तर गेले नाहीत ना? उद्धव ठाकरे आणि आव्हाड यांनी त्यांना मदत तर केली नाही? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

प्रविण कलमेंचं उत्तर - मी कामा निमित्त बाहेर आहे. मी आखाती देशात कामानिमित्त आलोय. मी बाहेरगावी कामासाठी सतत जात असतो. माणूस फरार केव्हा होईल, जेव्हा तो नॉट रिचेबल होईल. जसे किरीट सोमय्या झाले होते. मी संयुक्त राष्ट्रसंघासोबत अर्थ या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून काम करतो. माझा स्वतचा व्यवसायही आहे.

या क्षणापर्यंत मला मुंबई पोलिसांनी गुन्ह्याबाबत कळवलेलं नाही. मी फोन आणि ई-मेलवर संपर्कात आहे. मग मी फरार कसा असू शकेन. माझं काम संपल्यावर पुन्हा मुंबईत येईन. मी फरार होण्याचा प्रश्न नाही.

मी गुन्हा दाखल झाल्यानंतर बाहेर गेलो असतो तर हा मुुद्दा येतो. मला गुन्ह्याची माहिती नाही. त्यामुळे मी पळून गेलो असं म्हणणं चुकीचं आहे. माझं काम झालं की लगेचच मी मुंबईत येईन. माझे वकील कायदेशीर प्रक्रिया सुरू करत आहेत.

सोमय्यांचा चौथा आरोप - प्रविण कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी अमर्याद अधिकार दिले. कोरोना काळात मंत्रालय बंद असताना प्रविण कलमे यांनी 82 आरटीआय केले. एसआरएच्या प्रकल्पाबाबत आरटीआयमधून माहिती मागवण्यात आली होती.

प्रविम कलमेंचं उत्तर - जितेंद्र आव्हाडांना आम्ही जून 2020 ला पहिल्यांदा भेटलो. अमर्याद अधिकार सरकारी अधिकाऱ्यांना असतात. आम्ही सर्व कायदेशीर केलंय. बेकायदेशीर मार्गाने काही केलेलं नाही. आम्ही बेछूट आरोप केले नाहीत. एक व्यक्तीने किती RTI दाखल कराव्यात यावर काही बंधन नाही.

कोण आहेत प्रविण कलमे?

प्रविण कलमे पेशाने व्यवसायिक आहेत. शेतीविषयक उत्पादनांचं ट्रेडिंग हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. त्याचसोबत पब्लिक रिलेशन एजेंसीचे मालकही आहेत.

साल 2015 पासून प्रविण कलमे 'अर्थ' नावाची सामाजिक संस्था चालवतात. त्यांची ही सामाजिक संस्था संयुक्त राष्ट्रसंघासोबत काम करते.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)