You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
'किरीट सोमय्या यांचे आरोप आणि बाता नागपूरच्या गोटमारीसारख्या' #5मोठ्या बातम्या
विविध वर्तमानपत्रं आणि वेबसाईट्स यांचा घेतलेला आढावा
1. ठाकरे सरकार जोर लावूनही पडत नाही म्हणून विरोधी पक्षाच्या तोंडास फेस - सामना
महाराष्ट्राचे ठाकरे सरकार केंद्रीय जोर लावूनही पडत नाही म्हणून इथल्या विरोधी पक्षाच्या तोंडास फेस आला आहे. भाजपचे माजी खासदार सोमय्या यांचे आरोप आणि बाता या नागपूरच्या गोटमारीसारख्याच आहेत असं 'सामनाच्या अग्रलेखात' म्हटलं आहे.
मुंबई लोकलमध्ये विषारी वायू सोडण्याचा अतिरेक्यांचा कट होता. पोलीस त्या तपासात गुंतले असतानाच विरोधी पक्ष राज्यात भलतेच प्रश्न निर्माण करून पोलिसांवरील ताण वाढवला आहे.
ईडी, सीबीआयसारख्या केंद्रीय तपास यंत्रणा आपल्या खिशातच आहेत आणि त्यांच्या जोरावर आपण राजकीय विरोधकांना धमक्या देऊ शकतो असं महाराष्ट्रातल्या भाजप पुढाऱ्यांना वाटत आहे. कोल्हापुरातून पळ काढून कोथरुडला जाऊन निवडणूक लढवावी लागली. कोथरुडला विजय मिळवताना पाटलांच्याही तोंडाला फेस आला होता, असं सामनाने म्हटले आहे.
राज्यपालांपासून विरोधी पक्षनेत्यांपर्यंत प्रत्येकजण महाराष्ट्र सरकारला शत्रू मानून वागत आहे. पाटील ईडी, सीबीआयसारख्या संस्थांना बदनाम करत आहेत.
नागपूरच्या परंपरेनुसार पोळ्याच्या पाडव्याला नदीच्या काठावर गोटमारी हा खेळ खेळला जातो. त्यामध्ये एकामेकांवर दगडफेक केली जाते. यात अनेक जण जखमी होतात.
2. काँग्रेसकडून रजनी पाटील यांना उमेदवारी
काँग्रेस नेते राजीव सातव यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी महाराष्ट्रातून रजनी पाटील यांचं नाव जाहीर झाल्याने चर्चांना पूर्णविराम लागला आहे. या जागेसाठी 4 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
रिक्त झालेल्या जागेसाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी रजनी पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आहे. रजनी पाटील यांचं नाव राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या यादीत आहे. पण गेल्या वर्षभरापासून उमेदवारी रखडल्याने त्यांचं नाव राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलं आहे. 'लोकसत्ता'ने ही बातमी दिली आहे.
यापूर्वीही विलासराव देशमुख यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर रजनी पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती.
3. राज कुंद्राला जामीन
पॉर्नोग्राफी प्रकरणात अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राला दिलासा मिळाला आहे. मुंबईतील मॅजिस्ट्रेट कोर्टानेकडून राज कुंद्राला जामीन मंजूर करण्यात आला आहे. 50 हजारांच्या जातमुचलक्यावर न्यायालयाने राज कुंद्राला जामीन मंजूर केला आहे.
19 जुलैला मुंबई पोलिसांनी राज कुंद्राला अटक केली होती. तसचं राज कुंद्राचा साथीदार आणि या प्रकरणात महत्त्वाचा साक्षीदार असलेल्या रायन थोरोपेलाही जामीन मिळाला आहे. 'दैनिक भास्कर'ने ही बातमी दिली आहे.
पॉर्नोग्राफी प्रकरणात राज कुंद्रा जुलैपासून अटकेत आहे. पोलिसांच्या चैकशीत राज कुंद्राविरोधात अनेक पुरावे हाती लागल्याने राज कुंद्राच्या न्यायालयिन कोठडीत वाढ होत गेली.
राज कुंद्रासह चार आरोपींविरोधात मुंबई पोलिसांनी दीड हजार पानांचं आरोपपत्र दाखल केलंय. कुंद्रा हा पॉर्नोग्राफी प्रकरणात मुख्य सूत्रधार असल्याचे पुरावे गुन्हे शाखेला मिळाले आहेत.
4. महंताचा संशयास्पद मृत्यू
प्रयागराज येथील अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला. अल्लापूर येथील बाघंबरी या ठिकाणी गळफास लावलेल्या स्थितीत नरेंद्र गिरी आढळले आहेत. 'टीव्ही9मराठी'ने ही बातमी दिली आहे.
महंत नरेंद्र गिरी यांचा मृतदेह एका पंख्याला लटकलेल्या स्थितीत आढळला आहे. तसेच ज्या घरात गिरी यांचा मृतदेह लटकलेला होता, त्या घराचे सर्व दरवाजे बंद होते. पोलिसांनी हे आत्महत्येचे प्रकरण असू शकते असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला आहे.
रविवारी गिरी यांनी उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांची भेट घेतली होती. मागील अनेक दिवसांपासून गिरी यांचा त्यांचे शिष्य आनंद गिरी यांच्याशी वाद सुरु होता. नरेंद्र गिरी यांनी आनंद गिरी यांना त्यांच्या आश्रमातून बाहेर काढलं होतं. हा वाद संपल्यानंतर आनंद गिरी यांनी नरेंद्र गिरी यांची माफी मागितली होती.
5. इंग्लंडची पाकिस्तान दौऱ्यातून माघार
सुरक्षेच्या कारणास्तव इंग्लंडनेही पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडचा पुरुष आणि महिला संघ रावळपिंडीत प्रत्येकी 2 ट्वेन्टी-20 सामने खेळणार होता. 'टाईम्स ऑफ इंडिया'ने ही बातमी दिली आहे.
काही दिवसांपूर्वीच न्यूझीलंड संघाने सुरक्षिततेच्या कारणास्तव अगदी आयत्या वेळी माघार घेतली होती. न्यूझीलंडचा संघ 3 वनडे आणि 5 ट्वेन्टी-20 खेळणार होता.
न्यूझीलंडचा संघ पाकिस्तानात दाखल झाला. वनडे मालिकेच्या ट्रॉफीचं अनावरणही झालं. पहिल्या वनडेच्या काही तास आधी न्यूझीलंड क्रिकेट संघाने पाकिस्तान दौऱ्यातून माघार घेतली.
इंग्लंड क्रिकेट बोर्डाने यासंदर्भात परिपत्रक जारी केलं आहे. न्यूझीलंड क्रिकेटप्रमाणे ईसीबीने ईएसआय सेक्युरिटी या तटस्थ सुरक्षा यंत्रणेने परिस्थितीचा आढावा घेतला.
"खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ यांची सुरक्षा आणि आरोग्य हा आमच्यासाठी प्राधान्याचा विषय आहे. सध्याची परिस्थिती लक्षात घेता या गोष्टींचं भान राखणं आवश्यक आहे. कोव्हिड नियमावलीचं पालन करत आम्ही काही दौरे केले आहेत. आमचा दौऱ्यातून माघार घेण्याचा निर्णय पीसीबीसाठी निराशानजक आहे. पाकिस्तानात दौरा आयोजित करण्यासाठी आम्ही कसोशीने प्रयत्न करून आखणी केली. पीसीबीच्या मित्रत्वामुळेच इंग्लंडमधली मालिका सुरळीत पार पडली. आमच्या निर्णयामुळे पाकिस्तानातील क्रिकेटवर जो परिणाम होईल त्याकरता आम्ही दिलगिरी व्यक्त करतो", असं ईसीबीने म्हटलं आहे.
हे वाचलंत का?
(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.
बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.
'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)