किरीट सोमय्या कोण आहेत? त्यांचा सीए ते भ्रष्टाचार खणून काढणारे नेते हा प्रवास कसा झाला?

    • Author, नूतन ठाकरे
    • Role, बीबीसी मराठीसाठी

मुंबईत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्रा या निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्यासाठी आलेले खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना खार पोलिसांनी काल अटक केली होती.

या दाम्पत्याला भेटण्यासाठी भाजप नेते किरीट सोमय्या जात असताना त्यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांचं नाव पुन्हा चर्चेत आलं आहे. किरीट सोमय्या यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिला, ते पाहूया...

आर्थिक घोटाळ्यांची खडानखडा माहिती काढणारे किरीट सोमय्या चार्टर्ड अकाउंटंट आहेत. चार्टर्ड अकाउंटटच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत त्यांनी स्थान मिळवलं होतं. पुढे 2005 साली त्यांनी मुंबई विद्यापीठातून फायनान्समध्ये डॉक्टरेटही मिळवली. विशेष म्हणजे डॉक्टरेटसाठी सर्वात मोठे प्रबंध (थिसीस) सादर करणाऱ्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी दोन खंडांमध्ये तब्बल 1202 पानांचा प्रबंध सादर केला होता.

1954 साली मुंबईतल्या मुलुंडमध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. 1975 च्या जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनातून त्यांनी राजकारणात पाऊल ठेवलं.

विद्यार्थी चळवळीनंतर त्यांनी भाजपत प्रवेश केला. मात्र, त्यांना प्रसिद्धी मिळाली ती मुंबईत गरबा कार्यक्रमांच्या आयोजनांमुळे. त्यांनी मुलुंड, घाटकोपर या गुजरातीबहुल भागांमध्ये गरब्यांचे कार्यक्रम आयोजित केले.

पत्रकार संदीप प्रधान बीबीसीशी बोलताना म्हणाले, "किरीट सोमय्यांनी आयोजित केलेले गरबा कार्यक्रम खूप गाजायचे. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेनंतर सोमय्यांनी एका गरबा कार्यक्रमात अडवाणींनाही आणलं होतं आणि त्यांनी नृत्यही केलं होतं. तिथून ते पुढे आले. मग मुंबईतले छोटे-छोटे मुद्दे घेऊन रस्त्यावर उतरायचे, भिडायचे आणि यातून त्यांनी स्वतःची अँग्री यंग मॅन अशी प्रतिमा तयार केली."

1991 साली ते मुलुंड मतदारसंघातून मोठ्या मताधिक्क्याने विधानसभेवर निवडून गेले. त्यावेळीसुद्धा मुंबई भाजपमध्ये बरीच नाराजी व्यक्त झाली होती.

याविषयी सांगताना संदीप प्रधान म्हणाले, "त्यावेळी किरिट सोमय्या राजकारणात तरुण होते आणि भाजपचे त्यावेळचे ज्येष्ठ नेते आणि मुलुंडचे आमदार वामनराव परब यांना डावलून पक्षाने सोमय्यांना तिकीट दिलं. त्यावरून या तरुण नेत्याला का तिकीट दिलं, अशी नाराजी व्यक्त झाली होती."

आमदार असताना त्यांनी गुंतवणूकदार संरक्षण कायदा आणि शवविच्छेदन कायदा असे दोन महत्त्वाचे कायदे मंजूर करून घेतले होते. मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी महत्त्वाचं असलेले हाउसिंग सोसायटी कन्वेयंस विधेयकही त्यांनीच सादर केलं होतं आणि अशाप्रकारे ते राजकारणात स्थिरावले.

पुढे 1999 साली पक्षाने त्यांना ईशान्य मुंबई मतदारसंघातून लोकसभेतं तिकीट दिलं आणि काँग्रेसचे दिग्गज नेते गुरुदास कामत यांचा पराभव करत ते विजयी झाले. त्यावेळीसुद्धा खासदार म्हणूनही त्यांची कामगिरी चमकदार ठरली.

13 व्या लोकसभेत सर्वाधिक पिटिशन्स (27 पैकी 11) मांडणाऱ्या खासदारांमध्ये सोमय्या पहिल्या क्रमांकावर होते. लोकसभेतले ते सर्वाधिक सक्रीय सदस्य होते. 800 हून अधिक प्रश्न त्यांनी विचारले होते. 2014 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपने त्यांना तिकीट दिलं आणि त्यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय दिना पाटील यांचा पराभव करत निवडणूक जिंकली.

भ्रष्टाचार खणून काढणारे की विरोधकांना गोत्यात आणणारे नेते?

लहान-लहान घोटाळे आणि मुद्द्यांवरून आवाज उठवणारे किरीट सोमय्या यांनी 2007 साली महाराष्ट्र सरकारचा गहू घोटाळा बाहेर काढला होता. रेशनवर मिळणारा लाल गहू अत्यंत खालच्या दर्जाचा असल्याचा आरोप करत महाराष्ट्रभरातून त्या गव्हाचे नमुने गोळा करून मानवाधिकार आयोगाकडे याची तक्रार केली होती.

त्यानंतर आयोगाने गव्हाची प्रयोगशाळेत चाचणी करून गहू माणसाला खाण्यास योग्य नसल्याचा निर्वाळा दिला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यातून हा लाल गहू मागे घेण्याची नामुष्की तत्कालीन सरकारवर ओढावली होती.

यूपीए सरकारच्या काळात भाजपने भ्रष्टाचारविरोधात स्कॅम एक्सपोज कमिटी स्थापन केली होती. किरीट सोमय्या त्या समितीचे राष्ट्रीय संयोजक होते. त्यावेळी त्यांनी देशातल्या जवळपास 16 राज्यातल्या 100 जिल्ह्यांमध्ये फिरून काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांच्या भ्रष्टाचाराविरोधात राळ उठवली होती.

महाराष्ट्रातही अजित पवार आणि सुनिल तटकरे यांना अडचणीत टाकणारा सिंचन घोटाळा, अशोक चव्हाणांना गोत्यात आणणारा आदर्श घोटाळा, छगन भुजबळ यांच्यावर केलेला सदनिका हडपण्याचा आरोप असे अनेक घोटाळे आणि भ्रष्टाचाराची मोठी प्रकरणं त्यांनी बाहेर काढली.

मात्र, कर्नाटक भाजपचे नेते येडियुरप्पा यांच्यावर करण्यात आलेला खाण घोटाळा असो किंवा नितीन गडकरींच्या पूर्ती समूहावर झालेला घोटाळ्याचा आरोप असो, स्वपक्षीयांच्या घोटाळ्यांबाबत सोमय्या यांनी कायम मौन बाळगलं.

ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "किरीट सोमय्या अभ्यासू आहेत. एखादा घोटाळा काढतात तेव्हा त्याची सगळी कागदपत्रं त्यांच्याकडे असतात. पण ते एकांगी किंवा निवडक आहेत. ते स्वतःच्या पक्षातल्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराविषयी बोलत नाहीत."

पत्रकार मृणालिणी नानिवडेकर मात्र वेगळं मत मांडतात. बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाला, "एखादा माणूस एखाद्या पक्षाचा सदस्य असेल तर तो त्याच्या पक्षाबद्दल बोलत नसतोच. लोकशाही व्यवस्थेत हे दुसरं कुणीतरी बोलायचं असतं.

किरीट सोमय्या सामाजिक कार्यकर्ते असते तर त्यांना सिलेक्टिव्ह म्हणणं संयुक्तिक ठरलं असतं. ते एका राजकीय पक्षाचे नेते आहेत. त्यामुळे ते भाजपसाठी सोयीचे नसणाऱ्या किंवा त्यांच्यासाठी अडचणीचे असणाऱ्या लोकांबद्दलच बोलतील, हे आपण गृहित धरलं पाहिजे. असे किरीट सोमय्या जर दुसऱ्या पक्षात असतील तर ते भाजपवर आरोप करतील."

शिवसेनेशी वितुष्ट

काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे गैरव्यवहार बाहेर काढणारे किरीट सोमय्या यांचं शिवसेनेशी वितुष्ट सुरू झालं ते 2014 नंतर.

पत्रकार संदीप प्रधान सांगतात, "महाराष्ट्रात 2014 साली भाजपच्या नेतृत्त्वाखाली सरकार स्थापन झालं. त्यानंतर भाजपने मुंबईतही जम बसवायला सुरुवात केली. त्यांचं लक्ष्य मुंबई महापालिका होतं. शिवसेनेला महापालिकेतून पायउतार करून सत्ता काबीज करण्याचा त्यांचा उद्देश होता. यासाठी कुणीतरी बळीचा बकरा लागतो, तसंच काहीस सोमय्यांच्या बाबतीत म्हणावं लागेल.

भाजपने त्यांना याकामी वापरून घेतलं. किरीट सोमय्या शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्याविरोधात बोलू लागले. त्यावेळी त्यांनी ठाकरे कुटुंबीयांच्या पैशाचे व्यवहार शोधून काढले आणि पत्रकार परिषद घेऊन ती सगळी कागदपत्रं मांडली होती."

2017 साली किरीट सोमय्या यांनी 'बांद्रा का माफिया' असा शब्दप्रयोग केला होता. ही थेट उद्धव ठाकरेंवर केलेली टीका मानलं गेलं आणि तेव्हापासून शिवसेना आणि किरीट सोमय्या यांच्यात चांगलाच बेबनाव झाला.

महापालिकेचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून किरीट सोमय्यांनी एक ना अनेक घोटाळे, गैरव्यवहार, कामकाजातल्या अनियमितता आणि लोकांचे प्रश्न रेटले. परिणामी शिवसेनेची सत्ता असलेल्या महापालिकेत भाजपने पूर्वीच्या तुलनेत चांगली कामगिरी केली. शिवाय, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांचे आर्थिक अपहार खणून काढण्यातही किरिट सोमय्या यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. मात्र, तरीही त्यांना विश्वासार्हता कमावता आली नाही.

विश्वासार्हतेचा अभाव

याचं कारण सांगताना संदीप प्रधान म्हणतात, "किरीट सोमय्या प्रकरणं काढतात पण ती तडीस नेत नाहीत. अशाप्रकारे पत्रकार परिषद घेऊन एखाद्याविरोधात आरोप केले की प्रसिद्धी मिळते. तशी ती सोमय्यांना मिळते. पण त्याचं पुढे काहीच होत नाही. त्यामुळे त्यांना विश्वासार्हता कधी मिळू शकली नाही. त्यांनी केलेले अनेक आरोप गंभीरही होते. पण विश्वासार्हताच नसल्यामुळे ते गांभीर्याने घेतेले गेले नाही."

पत्रकार हेमंत देसाईसुद्धा असंच मत व्यक्त करतात. बीबीसी मराठीशी बोलताना ते म्हणाले, "माझा आक्षेप असा आहे की एखादी गोष्ट सुरू केली की ते ती तडीस नेत नाहीत. अचानक गप्प होतात. त्यांनी केलेल्या आरोपांचा फॉलोअप घेऊन संपूर्ण भाजप पक्ष म्हणून त्यांच्या मागे उभी राहिली आहे, असं कधी होत नाही. यामुळे त्यांनी केलेल्या आरोपांमध्ये तथ्य जरी असलं तरी त्यांची टिंगल केली जाते."

ते पुढे म्हणतात, "दुसरं असं की एखाद्या घोटाळ्याविषयी ते बोलतात आणि अचानक तो विषय बंद करतात. वरून आदेश आल्यावर ते गप्प बसतात. त्यांनी मातोश्रीला माफिया म्हटलं होतं. त्यानंतर विधानसभेत शिवसेना-भाजप एकत्र आले होते ना. त्यावेळी त्यांनी काहीच आक्षेप घेतला नाही. म्हणजे त्यांना गप्प करण्यात आलं आणि ते गप्प बसले.

जर एखादा विषय काढून तो पक्षामुळे तडीस नेता येत नसेल तर विषय काढता कशाला? सिंचन घोटाळ्यातही त्यांनी अजित पवारांवर बरेच आरोप केले होते. मात्र, देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली त्यावेळी त्यांनी कधी पक्षांतर्गतही विरोध केला नाही."

किरीट सोमय्या यांनी शिवसेनेशी वितुष्ट येताच बोलतं व्हावं आणि त्यांच्याशी जुळवून घेण्याची वेळ आली की शांत रहावं, हे त्यांच्याबद्दल संशय निर्माण करतं, असं मत पत्रकार मृणालिनी नानिवडेकर व्यक्त करतात.

बीबीसी मराठीशी बोलताना त्या म्हणाल्या, "बरेचदा किरीट सोमय्या आर्थिक घोटाळा पुढे आणतात आणि मग अचानक त्यावर बोलणं बंद करतात. पण, एखादा मुद्दा मांडल्यावर ते अचानक तो मुद्दा मागे का घेतात किंवा त्याचा पाठपुरावा का करत नाहीत, हे पत्रकार म्हणूनही मलाही त्याचं कुतूहल आहे. शिवसेना काय किंवा भाजपेतर मोठे पक्ष काय हे किरीट सोमय्या सेटलमेंट करतात, असा आरोप करतात."

त्या पुढे म्हणतात, "किरीट सोमय्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. मतदारसंघावरही त्यांची पकड होती. पण, त्यांना राजकीय प्रगल्भता नाही, या समजाचे ते शिकार झाले आहेत. त्यांचे आरोप गंभीर असले तरी गंभीरपणे घेले जात नाहीत.

"काही आरोप ते परसेप्शनसाठी करतात. उदाहरणार्थ अन्वय नाईक आणि रश्मी ठाकरे यांच्या जमीन व्यवहारात लपवण्यासारखं काही नाही आणि ते पब्लिक डोमेनमध्येही आहे. पण, यासंदर्भातला जो आरोप किरीट सोमय्या यांनी केला तो परसेप्शन तयार करण्यासाठी केला आहे. पण त्याच वेळी दहिसर आणि कोव्हिड रुग्णालयासाठी घेतलेली जमीन यासंदर्भातले आरोप तपासून बघण्याची गरज आहे."

"यापूर्वी मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी त्यांनी महापालिकेत कचरा घोटाळा होत असल्याचा आरोप केला होता. त्यामुळे वातावरण तापलं होतं. त्याचा फायदा भाजपला झाला आणि त्यांना बऱ्याच जागा जिंकता आल्या. पण, पक्षाला इतका फायदा करून देणारा नेता किंवा कार्यकर्ता आहे त्याला सेनेशी संबंध चांगले रहावे, यासाठी तिकीट नाकारलं गेलं की त्यामागे इतर काही कारण होतं. मोदी-शहांचं त्यांच्याबद्दल काही प्रतिकूल मत आहे का, हा प्रश्न निश्चितपणे आहे."

गुंतवणूकदार तक्रार निवारण मंच

किरीट सोमय्या यांनी गुंतवणूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हितासाठी गुंतवणूकदार तक्रार निवारण मंचची (investors griviences forum) स्थापना केली होती. याच मंचाच्या माध्यमातून त्यांनी नॅशनल स्टॉक एक्स्चेंज लिमिटेडमधला हजारो कोटी रुपयांचा घोटाळा बाहेर काढला होता. मात्र, पुढे हे प्रकरणंही बंद करण्यात आलं.

उलट याच इन्व्हेस्टर ग्रिव्हान्सेस फोरमचे सेक्रेटरी आणि सोमय्या यांचे सहकारी शेखर वैष्णव यांनी सोमय्यांवर आर्थिक अफरातफरीचे आरोप केले होते.

दरवर्षी आर्थिक बाजारपेठेत 5 हजार कोटींची अफरातफर होते आणि हे पैसे पक्षाकडे वळविले जातात, असा आरोप त्यांनी केला होता. तसंच अनेक कंपन्यांच्या शेअर्सच्या किंमतीत होणाऱ्या चढ-उतारामध्ये सोमय्या यांचा हात असतो आणि अनेक घोटाळे लपवण्यासाठी त्यांनीच मला सांगितल्याचंही ते म्हणाले होते. पण पुढे या आरोपांचंही काही झालं नाही.

हेमंत देसाई म्हणतात, "किरीट सोमय्या यांनी गुंतवणूकदारांच्या समस्या सोडवण्यासाठी इन्व्हेस्टर ग्रिव्हान्सेस फोरमची स्थापना केली होती. त्यांनी गुंतवणूकदारांच्या हितासाठी अनेक तक्रारी केल्या. मात्र, या फोरमच्या माध्यमातून फार प्रभावी काम कधी झालं नाही. मात्र, त्यावेळपासून त्यावेळपासून त्यांच्या हेतूवर शंका उपस्थित करण्यात आल्या."

तर मृणालिनी नानीवडेकर म्हणतात, "किरीट सोमय्यांचे गैरव्यवहार असतील तर ते ही समोर आणायला हवेत. शिवसेनाविरोधी राजकारणात त्यांचा उपयोग भाजप करत असते. पण, आजवर त्यांनी काढलेली प्रकरण महत्त्वाची ठरली आहेत."

जनतेचा सेवक

जनतेचा सेवक अशी सोमय्या यांची एक प्रतिमा आहे. त्यांनी 'युवक प्रतिष्ठान'ची स्थापना केली आहे. गेल्या 30 वर्षांपासून या प्रतिष्ठानच्या माध्यमातून झोपडपट्टीधारकांचं पुनर्वसन, आरोग्यसेवा वाजवी किंमतीला उपलब्ध करून देणं, शिक्षण आणि खेळ यांच्याविषयी जागरुकता निर्माण करण्याचं काम करण्यात येतं.

मुंबईत हिपेटायटीस बीच्या उच्चाटनासाठी जी मोहीम राबवण्यात आली होती त्यात त्यांनी लसीचे 32 लाख डोस सवलतीच्या दरात उपलब्ध करून दिले होते. याची नोंद लिम्का बुकमध्येही झाली होती.

त्यांनी मोतीबिंदूविरोधातही मोहीम उघडली होती. या मोहिमेअंतर्गत त्यांनी मुंबईभर 400 शिबिरं आयोजित केली होती. ज्यातून हजारो लोकांचं मोतीबिंदू ऑपरेशन करण्यात आलं.

रेल्वेच्या प्रवाशांच्या सुरक्षेसाठीही ते कायम आघाडीवर असतात. फुटपट्टी घेऊन रेल्वे फलाट आणि लोकल डब्याचं दार यांतलं अंतर मोजणारे किरीट सोमय्या यांचं छायाचित्र सगळ्यांना आठवतच असेल. त्यांनी रेल प्रवासी सुरक्षा अभियानही सुरू केलं होतं. या अभियानाअंतर्गत त्यांनी लोकल अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांचे कुटुंबीय किंवा जखमी झालेल्यांना मोठी मदत केली.

रेल्वे स्टेशन अधिकाधिक सुरक्षित कशी करता येईल, यादृष्टीने अभ्यास करून अहवाल तयार केला आणि त्यावर 50 हजार लोकल प्रवाशांची स्वाक्षरी घेऊन तो संसदेत सादर केला होता.

हेमंत देसाई म्हणतात, "हे अभ्यासू नेते आहेत. कष्टाळू नेते आहेत. मुलुंड रेल्वे बॉम्बस्फोटातल्या जखमींना मदत करणं, रेल्वे सुधारणांसाठी आग्रह धरणं, असं बरंच काम त्यांनी केलं आहे. भाजपमधले जुने आणि लोकांना भेडसावणाऱ्या मुद्द्यांमध्ये रस घेणाऱ्या अतिशय मोजक्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यामुळे त्यांचा तेवढ्यापुरता पक्ष वापर करून घेताना दिसतो. मात्र, त्यापलिकडे त्यांना पक्षात फार महत्त्व आहे, असं दिसत नाही."

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)