You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
चंद्रकांत पाटील : अभाविपचे कार्यकर्ते, प्रदेशाध्यक्ष ते मंत्रिपद...असा आहे प्रवास
- Author, प्रतिनिधी
- Role, बीबीसी मराठी
शिंदे-फडणवीस सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांना उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य अशी खाती देण्यात आली आहेत.
चंद्रकांत पाटील हे भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष आहेत.
चंद्रकांत पाटील यांचा राजकीय प्रवास नेमका कसा राहिलाय, त्यांच्याविषयी व्यक्त केली जाणारी मतं आणि प्रत्यक्षात त्यांचं व्यक्तिमत्त कसं आहे, त्यांचं राजकीय वजन किती आहे, याविषयीची सविस्तर जाणून घ्यायचा प्रयत्न बीबीसी मराठीनं केला आहे.
चंद्रकांत पाटील यांची राजकीय कारकीर्द
चंद्रकांत पाटील मूळचे कोल्हापूर जिल्ह्यातल्या भुदरगड तालुक्यातल्या खानापूर गावचे. पण, वडील गिरणी कामगार असल्यामुळे त्यांचं बालपण मुंबईत गेलं.
त्यांनी 13 वर्षं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) पूर्ण वेळ कार्यकर्ता म्हणून काम केलं. पुढे अभाविपचे प्रदेश मंत्री, क्षेत्रीय संघटनमंत्री आणि अखिल भारतीय महामंत्री म्हणून काम केलं.
1995 ते 1999 या काळात त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोल्हापूर विभागाचे सहकार्यवाह म्हणून काम पाहिलं. त्यांची 2004 मध्ये भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस म्हणून निवड झाली.
पुढे 2008 मध्ये पुणे पदवीधर मतदार संघातून निवडणूक लढवली आणि महाराष्ट्र विधान परिषदेवर निवडून आले. 2009 मध्ये ते भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस झाले.
त्यानंतर 2014 मध्ये दुसऱ्यांदा आमदार झाल्यावर पाटील यांच्यावर भाजप प्रदेश उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली. त्यानंतर त्यांच्याकडे राज्याच्या महसूल मंत्रिपदाची जबाबदारी सोपवण्यात आली.
जुलै 2019 मध्ये त्यांनी पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि त्यात त्यांचा विजय झाला. आता ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत.
पण, चंद्रकांत पाटील यांना 2019च्या विधानसभा निवडणुकीत पुण्यातील कोथरूड मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांच्यावर 'बाहेरचा उमेदवार' अशी टीका केली होती.
पण, बीबीसी मराठीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा मुद्दा खोडून काढत म्हटलं होतं, "मी 1982 पासून दर महिन्याला पुण्यात येत आहे, विद्यार्थी परिषद, भाजपमध्ये काम करत असताना सतत पुण्यात येत आहे. तसंच पुणे पदवीधर मतदारसंघाचा मी गेली 12 वर्षं आमदार आहे."
चंद्रकांत पाटील यांच्या सुरुवातीच्या राजकीय कारकिर्दीविषयी कोल्हापूरमधील ज्येष्ठ पत्रकार सुभाष देसाई सांगतात, "चंद्रकांत पाटील आणि कोल्हापूर यांचा काही अर्थाअर्थी संबंध नाही. भाजप नेते प्रमोद महाजन किंवा इतर मंडळी जेव्हा कोल्हापूरला यायचे तेव्हा चंद्रकांत पाटील त्यांच्यासोबत इथं यायचे. पुढे प्रमोद महाजन यांनी दूरसंचार मंत्री असताना त्यांना कोल्हापूरात टेलिमॅटिक्स नावाची कंपनी टाकून दिली आणि मग त्यांचं कोल्हापूरात बस्तान बसलं. याव्यतिरिक्त ते म्हणजे मुंबईत भाजपच्या गोटातील एक कार्यकर्ता इतकीच त्यांची ओळख होती."
कोल्हापूर आणि चंद्रकांत पाटील
चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरवरील प्रेम पुतनामावशीचं आहे, असं देसाई पुढे सांगतात.
त्यांच्या मते, कोल्हापूरमधून निवडणूक जिंकणं शक्य नाही म्हणून चंद्रकांत पाटील यांनी पुण्याचा रस्ता धरला. त्यांचा कोल्हापूरकरांवर विश्वास असता तर ते इथूनच लढले असते. त्यांचं कोल्हापूरवरील प्रेम हे पुतनामावशीचं प्रेम आहे.
पण, ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे याविषयी वेगळं मत मांडतात. त्यांच्या मते, "कोल्हापूरमधील मतदारसंघांमध्ये शिवसेनेचे आमदार होते आणि भाजप-सेना एकत्र निवडणूक लढवत असल्यामुळे चंद्रकांत पाटील यांना मतदारसंघ मिळणं अपेक्षित नव्हतं. त्यामुळे मग त्यांनी पुण्यातून निवडणूक लढवण्याचं ठरलं. याचा अर्थ ते कोल्हापूरमधून पळून गेले असा होत नाही.
"कोल्हापूर परिसरातल्या कितीतरी व्यक्ती आणि संस्थांना त्यांनी अडचणीच्या काळात मदत केली आहे. कोल्हापूरचा टोल रद्द करायचं जे काम राष्ट्रवादी आणि काँग्रेसला जमलं नाही, ते चंद्रकांत पाटील यांनी सत्तेत आल्यानंतर करून दाखवलं. पंधरा वर्षांच्या सत्तेच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी केली नसेल त्याहून अधिक मदत पाच वर्षांत चंद्रकांत पाटील यांनी लोकांना केली आहे," असंही चोरमारे सांगतात.
चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे की मुंबईचे?
चंद्रकांत पाटील कोल्हापूरचे आहेत की मुंबईचे हा वाद सातत्याने समोर येत असतो.
चंद्रकात पाटील यांच्या वेबसाईटनुसार, 'त्यांचा जन्म मुंबईतील एका मराठी कुटुंबात 10 जून 1959 रोजी झाला. मुंबईतील गिरणगावात ते वाढले.'
सुभाष देसाई यांच्या मते, "चंद्रकांत पाटील मुंबईचे आहेत. त्यांचा जन्मही मुंबईत झाला आणि जडणघडणही तिकडच झाली. त्यांचे वडील मात्र कोल्हापूरच्या खानापूरचे. चंद्रकांत पाटील यांचं टेलिमॅटिक्स व्यवसायापुरतं कोल्हापूरशी नातं आहे. कोल्हापूरच्या दक्षिण भागात त्यांचा बंगला आहे. विधानसभा निवडणुकीला कोल्हापूरमधून उभं राहायचं याची चर्चा सुरू होती, तेव्हा मी कोल्हापूरचाच आहे, असं सांगण्याचा त्यांचा प्रयत्न होता."
पण चंद्रकांत पाटील यांचे वडील कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांचं मूळ कोल्हापूर असल्याचं विजय चोरमारे यांचं मत आहे.
ते म्हणाले, "चंद्रकांत पाटील यांच्या वडिलांचं गाव कोल्हापूर जिल्ह्यातील खानापूर आहे. तिथं त्यांचं घरही आहे. पाटील यांचे वडील गिरणी कामगार असल्यामुळे मुंबईला गेले. मग मुंबईतच त्यांचं शिक्षण झालं. त्यांच्या घडणीशी कोल्हापूरचा काही संबंध नाही. 1995च्या दरम्यान ते कोल्हापूरला परत आले. असं असलं तरी पाटील यांचे वडील कोल्हापूरचे असल्यामुळे त्यांचं मूळ कोल्हापूर हे आहे."
संघाचे निष्ठावान आणि उत्तम संघटक
चंद्रकांत पाटील हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निष्ठावान असल्याचं देसाई यांचं मत आहे.
ते म्हणतात, चंद्रकांत पाटील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी खूप निष्ठावान आहेत. RSSचे सरसंघचालक जे सांगतील, तेच चंद्रकांत पाटील ऐकतात, तर चोरमारे यांच्या मते, "चंद्रकांत पाटील चार दशकांहून अधिक काळ संघटनात्मक कामात आहेत आणि आयुष्यातली अनेक वर्षं त्यांनी पूर्णवेळ संघटनात्मक कामासाठी दिली आहेत. म्हणूनच तर चंद्रकांत पाटील हे भाजपपेक्षाही संघाचे म्हणूनच अधिक ओळखले जातात."
ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार यांच्या मते, संघटन ही चंद्रकांत पाटील यांची जमेची बाजू आहे.
ते सांगतात, "कोणताही पक्ष चालवण्यासाठी दोन प्रकारचे नेते हवे असतात. एक म्हणजे समोर जाऊन भाषण करणारे आणि दुसरे म्हणजे पक्षासाठी अनेकांचं संघटन करणारे. चंद्रकांत पाटील दुसऱ्या गटात मोडतात. चंद्रकांत पाटील यांची कारकीर्द प्रामुख्यानं संघटक म्हणून राहिली आहे. राजकारणात ते अलीकडच्या काळात आले. ते पडद्यामागच्या राजकारणात तज्ज्ञ आहेत. पण, मैदानी राजकारणाचा त्यांना अनुभव नाही."
"दुसरं म्हणजे भाजप सत्तेत आल्यानंतर त्यांना मूळचा संघाचा पण मराठा समाजाचा नेता हवा होता. त्यामुळे मग चंद्रकांत पाटील यांना एक एक जबाबदारी मिळत गेली आणि ते ती व्यवस्थितपणे पार पाडत गेले."
मुख्यमंत्रिपदाची इच्छा
चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीदरम्यान पत्रकाराच्या एका प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्रिपदाची इच्छा बोलून दाखवली होती.
पुणे पत्रकार संघाच्या एका कार्यक्रमात तुम्हाला संघटनेनं सांगितलं तर मुख्यमंत्री व्हायला आवडेल का, असं विचारल्यावर ते म्हणाले होते, "सोडतो की काय?"
चंद्रकांत पाटील यांच्या राजकीय वजनाविषयी चोरमारे यांनी सांगितलं, "चंद्रकांत पाटील जेव्हा अभाविप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम करत होते, तेव्हाच त्यांचा अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांच्यासोबत संपर्क आला. त्यांनी सोबत कामंही केलं. त्यातही पाटील यांनी अमित शहा यांच्यासोबत अधिक काळ काम केलं आहे.
"महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या, तेव्हा अमित शहा यांनी त्यांना भेटीसाठी बोलावलं. त्या भेटीत अमित शहा यांनी चंद्रकांत पाटील यांना थेट विचारलं होतं की, तुम्हाला प्रदेशाध्यक्ष व्हायला आवडेल की उपमुख्यमंत्री?, यातून मग चंद्रकांत पाटील यांचं पक्षातील स्थान समजून येतं."
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)