शरद पवार: 'आमच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्री मुंबईत बसून परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात' #5मोठ्याबातम्या

आज विविध वृत्तपत्र आणि वेबसाईटवर प्रकाशित झालेल्या बातम्यांपैकी पाच मोठ्या बातम्यांचा थोडक्यात आढावा...

1. आमच्या आग्रहामुळेच मुख्यमंत्री मुंबईत बसून परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात - शरद पवार

"कोरोनाच्या संकटादरम्यान मुख्यमंत्री एखाद्या जिल्ह्यात गेले तर समस्यांवर तातडीने निर्णय घेण्यास अडचणी येतील. हे लक्षात घेऊन आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना मुंबईत बसून काम पाहण्याचा आग्रह केला आहे. त्यामुळेच ते मुंबईत एका ठिकाणी बसून सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवतात," असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं आहे.

शरद पवार शनिवारी (25 जुलै) औरंगाबाद दौऱ्यावर होते. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत पवार बोलत होते.

80 व्या वर्षीही शरद पवार इतर जिल्ह्यांच्या दौऱ्यांसाठी बाहेर पडतात. पण मुख्यमंत्री राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बाहेर पडत नाही, अशी टीका उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात येत आहे. या टीकेला उत्तर देताना शरद पवार यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची पाठराखण केली.

"मी सतत लोकांमध्ये राहणारा माणूस आहे. मला एका ठिकाणी बसवत नाही. त्यामुळे आपण फिल्डवर जात असतो. लातूरला भूकंप असताना मुख्यमंत्री कार्यालय हलवण्यापर्यंत कार्यवाही करण्यात आली. पण ती आपत्ती एका जिल्ह्यापुरती मर्यादित होती. आता तशी स्थिती नाही. राज्यासाठी निर्णय घेताना कॅप्टनला आपली टीम नीट काम करते का, ते पाहावं लागतं," असं पवार म्हणाले. ही बातमी एबीपी माझाने दिली आहे.

2. सोनिया गांधी मजुरांच्या तिकिटाचे पैसे देणार होत्या, त्याचं काय झालं? - पीयुष गोयल

कोरोना लॉकडाऊनच्या सुरुवातीला विविध राज्यांत अडकलेल्या मजुरांना गावी जाण्यासाठी श्रमिक स्पेशल ट्रेन सोडण्यात आल्या होत्या. रेल्वेने मजुरांच्या तिकिटातून 428 कोटी रुपये कमावल्याच्या बातमीचा उल्लेख करत राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर टीका केली होती. या मुद्द्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या टीकेवर रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

"देशाला लुटणारे लोकच अनुदानाला नफा म्हणू शकतात. रेल्वेने राज्यांपेक्षा कित्येकपट अधिक रक्कम श्रमिक रेल्वे चालवण्यासाठी वापरली. सोनिया गांधी तिकिटाची रक्कम देणार होत्या, त्याचं काय झालं?" असा प्रश्न लोक विचारत आहेत, असं पीयुष गोयल ट्वीट करून म्हणाले.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर आपापल्या गावी पायी जाणाऱ्या मजुरांचा प्रश्न निर्माण झाला होता. त्या कालावधीत मजुरांसाठी रेल्वे गाड्या सुरू करण्यात आल्या, पण मजुरांना तिकिटाचे पैसे आकारले जात असल्याच्या मुद्द्यावर काँग्रेसने टीका केली होती. त्या मजुरांचे तिकिटाचे पैसे काँग्रेसकडून दिले जातील, असं सोनिया गांधी म्हणाल्या होत्या. रेल्वेमंत्री पीयुष गोयल यांनी हाच मुद्दा वापरून सोनिया गांधी यांना टोला लगावला आहे. ही बातमी महाराष्ट्र टाईम्सने दिली आहे.

3. शपथविधीसाठी उपराष्ट्रपतींनी मार्गदर्शक तत्वे निश्चित करावीत, राज्यपालांची मागणी

नवनिर्वाचित खासदार तसेच आमदार यांच्या शपथविधीसाठी मार्गदर्शक तत्वे ठरवून द्यावीत, अशी मागणी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे केली आहे. ही बातमी लोकसत्ताने दिली आहे.

भाजपचे राज्यसभा खासदार उदयनराजे भोसले यांचा शपथविधी दोनच दिवसांपूर्वी दिल्ली येथे पार पडला.

यावेळी उदयनराजे भोसले यांनी खासदारकीची शपथ घेऊन झाल्यानंतर जय भवानी, जय शिवाजी अशी घोषणा दिली होती. त्याबाबत उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी उदयनराजेंना अशा प्रकारची घोषणाबाजी पुन्हा करू नये, असं सांगितलं होतं. यावरून शिवप्रेमींची संतप्त प्रतिक्रिया राज्यभरात दिसून आली.

सहा महिन्यापूर्वी महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं. त्यावेळी आयोजित शपथविधीदरम्यानसुद्धा नवनिर्वाचित मंत्र्यांनी अशाच प्रकारे विविध घोषणा केल्या होत्या.

त्यावेळीसुद्धा याप्रकरणी वाद निर्माण झाला होता. त्यामुळे अशा घटना वारंवार घडू नये, यासाठी राज्यपाल कोश्यारी यांनी याबाबत दिशानिर्देश द्यावेत, अशी विनंती उपराष्ट्रपती आणि लोकसभा अध्यक्षांकडे केली आहे.

सदस्यांनी अशा प्रकारे आपल्या नेत्यांची किंवा आराध्य व्यक्तींची नावे घेतल्यामुळे शपथविधीचं गांभीर्य कमी होतं, असं राज्यपाल म्हणाले आहेत.

4. लाठ्यांचा खेळ आणि कसरती दाखवून पोट भरणाऱ्या आजींना राष्ट्रवादीकडून 1 लाखाची मदत

लाठ्यांचा खेळ आणि कसरती दाखवून लोकांचं मन जिंकणाऱ्या पुण्यातील 85 वर्षीय आजींचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून सन्मान करण्यात आला. गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या हस्ते एक लाख रुपयांचा धनादेश आणि नऊवारी साडी देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं. ही बातमी टीव्ही 9 मराठीने दिली आहे.

शांताबाई पवार असं या आजीबाईंचं नाव आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याच्या रस्त्यांवर आजीबाई लाठ्यांचा खेळ दाखवताना दिसून आल्या. एका स्थानिक मुलीने हा व्हीडिओ सोशल मीडियावर पोस्ट केल्यानंतर तो प्रचंड व्हायरल झाला आहे.

या आजीबाईंची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. म्हणून त्यांना कोरोनाच्या साथीच्या काळातही बाहेर पडून काम करावं लागतं. याबाबत कळल्यानंतर लोक त्यांना मोठ्या प्रमाणात मदत करताना दिसत आहेत.

5. राज्य सरकार साप समजून भुई थोपटतं - चंद्रकांत पाटील

राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार पाडण्याचा उल्लेख भाजपकडून केला जात नाही. सरकारमधील तिन्ही पक्षच वारंवार याचा उल्लेख करून कार्यकर्त्यांना धीर देत आहेत. ते साप समजून भुई थोपटत आहेत, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.

चंद्रकांत पाटील शनिवारी (25 जुलै) पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

आम्ही कधी गमतीनेही सरकार पाडण्याचा उल्लेख केला नाही. शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फक्त सामनाला मुलाखती दिल्या. तिथं ते सरकार पाडण्याबाबत सांगत असतात.

मुळात आम्ही सरकार पाडण्याचा प्रश्नच नाही. हिंमत असेल तर सरकार पाडा असं म्हणत ते फक्त कार्यकर्त्यांना धीर देतात. साप समजून भुई थोपटण्याचा हा प्रकार आहे, असं पाटील म्हणाले. ही बातमी ई-सकाळने दिली आहे.

हेही वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.'बीबीसी विश्व' रोज संध्याकाळी 7 वाजता JioTV अॅप आणि यूट्यूबवर नक्की पाहा.)