शीख धर्मात दलित जाती कशा? त्यांच्यावर डॉ. आंबेडकरांचा प्रभाव किती?

    • Author, दिपाली जगताप, सिद्धनाथ गानू
    • Role, बीबीसी मराठी

2003 साली पंजाबच्या जालंधरमध्ये जाट शीख विरुद्ध दलित शीख यांच्यातला संघर्ष एवढा तीव्र झाला की यामुळे जिल्ह्यात थेट कर्फ्यू लागू करावा लागला. या वादाचं कारण होतं शीख दलितांनी गुरुद्वारा प्रबंधक समितीमध्ये आपला प्रतिनिधी असावा अशी मागणी केली.

जाट शिखांनी याला विरोध केला कारण गुरुद्वारांमध्ये जाट शिखांचं वर्चस्व असतं. या प्रकरणात पंजाब सरकारला हस्तक्षेप करावा लागला आणि अखेर गुरुद्वारा समितीत दोन दलित (केशधारी - जे दाढी आणि केस वाढवतात) सदस्य नेमण्यात आले.

शीख धर्माची शिकवण जात-पात मानत नाही, पण शीख धर्मात जात व्यवस्था हे धगधगतं वास्तव आहे. शिखांमध्ये हिंदू धर्माप्रमाणे जातींची उतरंड आहे. तिथल्या दलितांवरही अत्याचार होत असतात आणि त्यांना सामाजिक आणि धार्मिक बाबींत दुय्यम वागणूक दिली जाते.

शीख आणि हिंदू धर्मीयांमध्ये मिळून पंजाबची एक-तृतीयांश लोकसंख्या दलित आहे. देशात हे प्रमाण सर्वाधिक आहे. पण स्वातंत्र्यानंतर 74 वर्षांत पंजाबमध्ये एकही दलित नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही. काँग्रेसचे चरणजीत सिंह चन्नी पंजाबचे पहिले दलित मुख्यमंत्री बनले होते.

मुळात शीख धर्मात जाती आहेत हेच चन्नी यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अनेकांना पहिल्यांदा कळलं. अनेकांनी सोशल मीडियावर आश्चर्यही व्यक्त केलं. पण प्रश्न हा पडतो की जाती व्यवस्थेच्या विरोधात असलेल्या शीख धर्मात जाट आणि दलित आले कुठून?

हिंदू धर्मातून शिखांमध्ये शिरल्या जाती?

2011 च्या जनगणना अहवालानुसार पंजाबमध्ये सुमारे 32 टक्के दलित समाज आहे. यात हिंदू, शीख, बौद्ध या धर्मातील दलितांचा समावेश आहे.

"जातिव्यवस्था हा फक्त हिंदू धर्माचा भाग आहे असं मानणं चुकीचं आहे. हिंदू धर्मात त्याला मनुस्मृतीत स्थान मिळाल्यामुळे धर्माची मान्यता मिळाली आहे. याच विविध जातींचे होते पुढे शीख चळवळीचा भाग होते. (शीख धर्म स्वीकारल्यावर) ते शीख दलित झाले," असं जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील समाजशास्त्राचे प्राध्यापक सुरिंदर सिंह जोधका बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.

पंजाबमध्ये कायम जाट शिखांचं वर्चस्व राहिल्याने राजकीय नेतृत्व कायम त्यांच्याकडे राहिलं. याचं कारण बहुतांश शेतजमिनी त्यांच्याकडे आहेत. त्यानंतर खत्री समाजाकडेसुद्धा सावकारी आणि जमिनी पूर्वापार आहेत, असंही प्रा. जोधका सांगतात.

पंजाब विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागाचे प्राध्यापक मोहम्मद खालीद सांगतात, "शीख धर्म जाती व्यवस्था मानत नसला तरी बहुतांश शीख हे हिंदू धर्मातून धर्मांतर केलेले आहेत. त्यामुळे तिथून ही व्यवस्था शीख धर्मात आली. पण शीख धर्मगुरूंनी कधीही असमानतेला स्थान दिलेलं नाही."

जाट शीख आणि खत्री यांना उच्च जातीचे मानलं जातं, तर पंजाबमधील अनुसूचित जातींमध्ये मजहबी शीख यांचा समावेश आहे. हा समाज शीख धर्म मानतो. पंजाबच्या दलित समाजात रविदासीय सर्वाधिक आहेत. त्यांच्यापाठोपाठ वाल्मिकी समाजाचे लोक येतात. रामदासी समाज सुद्धा आहे. रविदासीय समाजात बहुतांश लोक शेतमजूर आहेत, असं प्रा.खालिद सांगतात.

परंतु दलितांची लोकसंख्या एवढी असूनही त्यांच्याकडे तुलनेने शेतजमिनी अत्यल्प आहेत. कृषी क्षेत्रात दिसणारी ही असमानता इतर धार्मिक संस्था, समाजकारण आणि राजकारणातही दिसून येते. असमानता आणि अन्याय या गोष्टी सोबतच येतात.

दलित शिखांचे गुरुद्वारे स्वतंत्र असतात का?

पंजाबमधील गुरुद्वाऱ्यांवरही जाट शिखांचं प्रभुत्व दिसून येतं. शिखांच्या धार्मिक रचनेत कुठेही जातीय उल्लेख नसला तरी संख्याबळ आणि परंपरागत रुढींमुळे अनेक गोष्टी जातींवर आधारित असल्याचं चित्र आहे.

प्राध्यापक खालिद सांगतात, "गुरुद्वारांमध्ये कधीही कोणत्याही समाजाला प्रवेशापासून वंचित ठेवलं जात नाही. परंतु गुरुद्वारा प्रबंधक समितीच्या राजकारणात मात्र दलितांना असमानतेचा अनुभव येतो."

पंजाबमध्ये अनेक ठिकाणी ग्रामीण भागात दलितांनी स्वतंत्र गुरुद्वारा बनवल्याचं दिसतं. कारण त्यांच्यावर त्यासाठी दबाव आणला जातो असंही प्रा.खालिद सांगतात.

या परिस्थितीमुळेच पंजाब-हरियाणा भागात अनेक 'डेरे' स्थापन झाले. डेरे हे धार्मिक आश्रम असतात, जिथे दलित समाज अध्यात्मिक-धार्मिक पर्याय म्हणून जातो. परदेशात वसलेल्या दलित शिखांकडून डेऱ्यांना योगदान दिलं जातं. म्हणून शीख संघटनांचा डेऱ्यांसंदर्भातला विरोध वाढत असल्याचंही चित्र आहे.

पंजाबमध्ये डेरे बाराव्या शतकापासून आहेत. पण दलित डेरे गेल्या 100-150 वर्षांत प्रामुख्याने उदयाला आले आहेत.

बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर सांगतात, "मंदिरं किंवा गुरुद्वारांमध्ये स्थान न मिळाल्याने दलितांचा डेऱ्यांकडचा ओढा वाढला. जालंदरमधील डेरा सचखंड बल्ला हे त्याचंच एक उदाहरण. हे डेरे अनेक प्रकारे काम करतात; शिक्षणासाठी मदत, नोकरीसाठी मदत, मुला-मुलींची लग्न जुळवण्यात मदत अशा गोष्टी हे डेरे करत असतात."

लग्नव्यवस्थेवर जातीचा पगडा

इतर धर्मांप्रमाणे शीख धर्मातही आंतरधर्मीय आणि आंतरजातीय लग्नाला तीव्र विरोध दर्शवला जातो.

पत्रकार आणि लेखक दलजित आमी सांगतात, "शीख धर्मात आंतरजातीय लग्न शक्यतो होत नाहीत. अपवाद वगळले तर विरोध दर्शवला जातो. वृत्तपत्रांमध्येही जाहिराती पाहिल्या तरी लक्षात येतं की जातीचा उल्लेख स्पष्ट केलेला असतो."

शहरांमध्ये तरी आंतरजातीय लग्नासाठी परवानगी दिल्याची मोजकी उदाहरणं दिसतात परंतु ग्रामीण भागात हे जणू अशक्य आहे अशीच परिस्थिती असल्याचं प्राध्यापक खालिद सांगतात.

"जाट शीख आणि खत्री यांच्यातही 'रोटी-बेटीचा व्यवहार' होत नाही. जाट शीख किंवा खत्री यांच्यात आपल्या मुलांची लग्न एकमेकांच्या जातीत लावण्यास कट्टर विरोध दर्शवतात. त्याचप्रमाणे दलित समाजातील मुलांशीही लग्न ठरवण्यास तीव्र विरोध असतो. ग्रामीण भागात तर ही परिस्थिती आणखी संवेदनशील आणि कठीण आहे," असं प्रा. खालिद सांगतात.

बसपाची सुरुवात पंजाबमधूनच...

दलितांना देशातल्या सर्वांत मोठ्या राज्यात सत्तेत नेणारी पार्टी म्हणजे बहुजन समाज पार्टी. पण उत्तर प्रदेशात एके काळी सत्ता मिळवणाऱ्या या पार्टीची मुळं पंबाजमध्ये आहेत.

बहुजन समाज पार्टीचे संस्थापक कांशीराम पंजाबच्या होशियारपूरचे होते. त्यांनी 1984 मध्ये बसपाची स्थापना केली. पण त्यांना पंजाबमधील दलितांना राजकारणात एकत्र आणण्यात यश आलं नाही. पुढे ती करामत त्यांच्या शिष्या मायावती यांनी उत्तर प्रदेशात करून दाखवली.

पंजाबमध्ये दलित जवळपास एक-तृतीयांश असले तरी त्यांचं राजकारण विभागलेलं आहे, असं बीबीसी पंजाबीचे संपादक अतुल संगर सांगतात: "दलित मतांच्या आधारावर अमुक इतक्या जागा पंजाबमध्ये जिंकता येतील असं नाहीये. दलित समाज प्रामुख्याने काँग्रेसबरोबर जात आला आहे, गेल्या काही वर्षांत त्यांनी अकाली दलालाही साथ दिली आहे आणि अरविंद केजरीवालांचा आम आदमी पक्षही गेली काही वर्षं रविदासीय समाजाला जवळ करण्याचा प्रयत्न करतो आहे."

अकाली दलाबरोबर आघाडीत असलेला बहुजन समाज पक्ष पंजाबमध्ये मतांचा आणि जागांच्या बाबतीच नाममात्र आहे.

संगर पुढे सांगतात, "मुख्यमंत्री चन्नी हे स्वतः चर्मकार समाजाचे आहेत. त्यांच्याकडे दलित समाजाला आपल्यामागे आणि पर्यायाने काँग्रेस पक्षामागे उभं करण्याची संधी आहे. पण तसं करण्यात धोका हा आहे की हिंदू आणि जाट शीख काँग्रेसपासून दूर जातील."

"पंजाबमध्ये आत्ताच जाट शिखांना हातातून मुख्यमंत्रिपद गेल्याचा संताप आलेला स्पष्टपणे दिसतो आहे. याचा फायदा इतर पक्षांना होऊ शकतो," असंही ते सांगतात.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा प्रभाव किती?

1920 सालचं मंगूराम यांचं आदिधर्म आंदोलन आणि पुढे आंबेडकरांच्या विचारांमुळे पंजाबी दलितांना सर्व साधनांमध्ये सक्रिय भागीदारी मिळवण्यासाठी प्रोत्साहन मिळालं.

पंजाबमधील दलित शिखांमध्येही आंबेडकरवाद ठळकपणे दिसून येतो, परंतु त्यांनी बौद्ध धर्म मोठ्या प्रमाणावर स्वीकारल्याचं चित्र इथे दिसत नाही.

प्रा. सुरिंदर सिंह जोधका याबद्दल सांगतात: "दलित समाजासाठी डॉ. आंबेडकर दैवतासमान आहेत. मी माझ्या संशोधनासाठी ग्रामीण पंजाबमध्ये फिरत असताना रविदास समाजाच्या गुरुद्वारांमध्ये मला गुरु ग्रंथ साहिब, रविदासांची प्रतिमा आणि डॉ. आंबेडकरांचा फोटो असं चित्र सर्रासपणे पाहायला मिळत असे.

पण ज्याप्रमाणे डॉ. आंबेडकरांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तसं इथे घडलं नाही कारण शीख धर्माचा पगडा प्रचंड आहे. लोक डॉ. आंबेडकरांना मानतात पण दुसऱ्या कुठल्या धर्माची दीक्षा घ्यावी हा विचार इथे रुजला नाही."

आंबेडकरांचे अन्यायाविरुद्ध पेटून उठण्याचे विचार इथल्या संस्कृतीत मात्र स्पष्टपणे दिसतात. गाण्यांसाठी, पॉप आणि रॅप संगीतासाठी प्रसिद्ध असलेल्या पंजाबच्या सुपीक भूमीत दलित रॅप हा प्रकार लोकप्रिय आहे.

जालंधर जिल्ह्यातलं एक दलित रॅप तर एखाद्या अँथमप्रमाणे गायलं जातं. "हुंदे असले तों वध डेंजर चमार ('शस्त्रांपेक्षाही जास्त धोकादायक आहेत चमार') 2016 मध्ये गिनी माही या दलित तरुणीचं हे रॅप लोकप्रिय झालं होतं.

त्याच 'डेंजर' म्हणवल्या जाणाऱ्या पण मागास समाजातला माणूस आता राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यामुळे दलितांच्या राजकारणात बदल होऊ शकेल, पण त्यांची सामाजिक, आर्थिक परिस्थिती सुधारेल का, या प्रश्नाचं उत्तर देणं कठीण जाईल.

हे वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)