You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
खालसा पंथ: गुरू गोविंद सिंग यांनी स्थापन केलेल्या पंथाचे महत्त्व काय आहे?
शेतकरी आंदोलनादरम्यान दिल्लीतील लाल किल्ल्यावर आंदोलकांनी शेतकरी आंदोलनाच्या झेंड्यासोबतच एक केशरी रंगाचा झेंडा लावला होता. त्या झेंड्यावर एक चिन्ह होते.
त्या चिन्हाचा अर्थ काय तुम्हाला ठाऊक आहे का? त्या पंथाचे चिन्ह केशरी रंगाच्या झेंड्यावर असते.
बीबीसी पंजाबीचे प्रतिनिधी खुशाल लाली सांगतात, या झेंड्याला 'निशाण साहेब' म्हणतात. यावर एक चिन्ह आहे. या चिन्हाला 'खंडा' असे म्हणतात. शीखांचे गुरू हरगोविंद सिंगांनी 'संत सिपाही'ची संकल्पना मांडली होती. हीच संकल्पना शीखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी पुढे नेली. त्यानुसार 'खंडा'चे चिन्ह तयार करण्यात आलेले आहे.
शिखांचे दहावे गुरू श्री गुरू गोविंद सिंग यांनी खालसा या पंथाची स्थापना केली होती. त्यांनीच खालसा पंथाचे स्वरूप कसे असावे, चिन्ह कोणते असावे याबाबत सूचना दिलेल्या आहेत. हर गोविंदसिंग यांच्या काळात सुरुवातीला खंडाच्या चिन्ह्यात फक्त दोन कृपाण होत्या पण गुरू गोविंद सिंग यांनी त्यात चक्र आणि दुधारी तलवार यांचा समावेश केला.
हे खंडा चिन्ह एक दुधारी तलवार, एक चक्र आणि दोन कृपाण मिळून तयार करण्यात आलेले आहे. केसरी रंगाच्या ध्वजावर हे चिन्ह झळकताना दिसते. केसरी रंग हा त्यागाचे प्रतीक आहे. प्रत्येक गुरुद्वाऱ्याबाहेर हा ध्वज लावला जातो. दुरून येणाऱ्या व्यक्तीला हे कळावे की गुरुद्वारा कुठे आहे ही त्यामागची भावना आहे.
सीख म्युजियम या वेबसाईटवर खंडाच्या चिन्हाचा अर्थ उलगडून दाखवण्यात आला आहे.
दुधारी तलवार ईश्वराचं प्रतीक आहे, अकाल पूरख म्हणजेच निराकार आहे त्याचं प्रतीक ही तलवार आहे.
ईश्वर अनादी आणि अनंत आहे तसेच त्याने आखून दिलेल्या नियमात आपले आयुष्य घालवावे याचे प्रतीक चक्र आहे.
शीख धर्मीय हातात जे कडे घालतात ते ईश्वराची आठवण सतत राहावी म्हणून.
दोन कृपाण आहेत त्या मीरी आणि पीरी म्हणजेच अध्यात्म आणि राजकारण यांच्या निदर्शक आहेत. याचा अर्थ आहे जितकं महत्त्व अध्यात्माला दिलं जाईल तितकंच महत्त्व कर्तव्याला देखील असायला हवं.
हे चिन्ह शीख धर्मीयांच्या स्वतंत्र अस्तित्वाचे आणि अस्मितेचे निदर्शक आहे त्यामुळे शीख धर्मीयांमध्ये या चिन्हाला विशेष महत्त्व आहे. गुरू गोविंद सिंगांचे निधन झाल्यानंतरही जितकेही युद्ध शीखांनी लढले त्यात हाच झेंडा वापरण्यात आला.
सोशल मीडियावर प्रतिक्रिया
तिरंग्याचा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली आहे. ते म्हणतात जर सरकारच्या मनात आलं असतं तर ही हिंसा थांबवता आली असती. जे सुरू आहे त्याचं समर्थन कुणी करत नाहीये.
लाल किल्ला आणि तिरंग्याचा अपमान सहन केला जाऊ शकत नाही पण सरकारने हा देखील विचार करायला हवा की ही वेळच का आली? सरकार हे कायदे का रद्द करत नाहीये.
हे वाचलंत का?
(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)