प्रशांत किशोरः काँग्रेस प्रवेशाला नकार देणारे प्रशांत किशोर कोण आहेत?

    • Author, नामदेव काटकर
    • Role, बीबीसी मराठी

प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. गेले अनेक दिवस ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का याबद्दल चर्चा सुरू होती. अखेर आज त्यांनी या चर्चांना विराम दिला आहे. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यास नकार दिला आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी ही माहिती दिली आहे.

2011 साली प्रशांत किशोर दक्षिण आफ्रिकेत होते. तिथं ते संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्यसंबंधी कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून काम करत होते.

ते मूळचे भारतातले. बिहारच्या बक्सर जिल्ह्यातले. त्यामुळे परदेशात काम करत असतानाही मायदेशातल्या घडामोडींवर त्यांची नजर असेच.

एक दिवस त्यांनी महाराष्ट्र, हरियाणा, कर्नाटक आणि गुजरात या चार राज्यांमधील कुपोषणाच्या स्थितीबाबत एक लेख लिहिला. गुजरातबद्दल टीका नसली, तरी चार राज्यांच्या तुलनेत गुजरातमध्ये कुपोषणाबाबत काही नीट काम सुरू नसल्याचं त्यांनी लेखात म्हटलं होतं.

इकडे गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका वर्षभरावर येऊन ठेपल्या होत्या. नरेंद्र मोदी हे मुख्यमंत्रिपदाची हॅटट्रिक साधण्याच्या तयारीत होते.

गुजरातवर टीका करणाऱ्या लेखावर नरेंद्र मोदी यांच्या ऑफिसमधील कुणाचीतरी नजर पडली. मग गुजरातच्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यालयातूनच एक फोन प्रशांत किशोर यांना गेला आणि तेव्हा पहिल्यांदा प्रशांत किशोर आणि नरेंद्र मोदी या दोघांची चर्चा झाली.

तुम्ही आमच्यासोबतच काम का करत नाही, असं म्हणत मोदींनी प्रशांत किशोर यांना आमंत्रणच दिलं. ते प्रशांत किशोर यांनी स्वीकारलं आणि ते दक्षिण आफ्रिकेतून थेट गांधीनगरमधल्या स्वर्णिम संकुल-1 इथं दाखल झाले. इथं गुजरातच्या मुख्यमंत्र्यांचं कार्यालय आहे.

रेस्ट इज हिस्ट्री म्हणाव्या अशा पुढे सर्व भारतीयांना एव्हाना माहीत असलेल्या घडामोडी घडल्या.

संयुक्त राष्ट्रात काम करत असताना भारतातल्या कुपोषणावर लेख लिहिणं, मग मोदींचा फोन येणं, त्यांच्यासोबत काम करायला सुरुवात करणं आणि मोदींना केवळ गुजरातचे मुख्यमंत्री नव्हे, तर भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत नेण्यास 'स्ट्रॅटेजिक' मदत करणं... हे एखाद्या सिनेमाच्या कथानकासारखं वाटत असलं, तरी ते प्रशांत किशोर यांच्याच तोंडून सांगितलेले प्रसंग आहेत. लल्लनटॉप या वृत्त संकेतस्थळाशी बोलताना प्रशांत किशोर यांनी हे सांगितलं.

2011 ते 2021... बरोब्बर दहा वर्षांचा कालावधी. प्रशांत किशोर ज्यांच्या ज्यांच्या 'स्ट्रॅटेजी' ठरवत होते, ते ते यश मिळवत होते. त्यामुळे केवळ राजकीय वर्तुळातच नव्हे, तर प्रसारमाध्यमांसह जनसामान्यांमध्ये 'प्रशांत किशोर' या नावाबद्दल कुतुहल निर्माण झालं, ते आज दहा वर्षांनीही कायम आहे. उलट वाढत जाताना दिसतंय.

महाराष्ट्रालाही हे नाव काही नवीन नाही. विधानसभा निवडणुकीपूर्वी प्रशांत किशोर अचानक महाराष्ट्राच्या राजकीय केंद्रांपैकी एक असलेल्या 'मातोश्री'वर दाखल झाले आणि चर्चांना बेसुमार उधाण आलं. पुढे आदित्य ठाकरे यांची युवा संवाद रॅली ही या भेटीचं द्योतक होतं.

परवा शरद पवारांच्या 'सिल्व्हर ओक'वर प्रशांत किशोर पोहोचले आणि पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आले. पवार हे राज्यासह देशाच्या राजकारणातले सक्रिय नेते आहेत. तिसऱ्या आघाडीच्या समीकरणांची अधून-मधून चर्चा होते, तेव्हा पवार हे केंद्रस्थानी असतात, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे प्रशांत किशोर आणि शरद पवार भेटीनं पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली.

प्रशांत किशोर हे व्यवसायाने निवडणूक रणनितीकार असले, तरी त्यांच्या राजकीय आशा-आकांक्षाही लपून राहिल्या नाहीत. नितीश कुमारांच्या जदयूचे उपाध्यक्षपद हाती घेणं, हे त्याचं द्योतक होतं. त्यामुळे पवारांची भेट घेतल्यनंतर प्रशांत किशोर यांच्या प्रवासावर नजर टाकणं आवश्यक बनलं आहे. कारण यातूनच त्यांच्या भविष्यातील वाटचालीची बिजं सापडू शकतात. तर मग आपण पाहूया, प्रशांत किशोर यांचा आजवरचा प्रवास...

2014 साली मोदींसाठी काम

सुरुवातीलाच नमूद केल्याप्रमाणे 2011 साली प्रशांत किशोर हे नरेंद्र मोदी यांच्या संपर्कात आले. इथूनच प्रशांत किशोर यांच्या 'निवडणूक रणनिती'ला सुरुवात झाली.

गुजरातमध्ये 2012 सालच्या निवडणुकीत प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदी यांना मदत केली. तिथे मोदींचा विजय झाला आणि ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री बनले.

यानंतर प्रशांत किशोर यांनी काही सहकाऱ्यांच्या मदतीने सिटिझन फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स या प्रचार कंपनीची स्थापना केली. 2014 सालची भाजपची प्रचारमोहीम या कंपनीच्या अंतर्गतच प्रशांत किशोर यांनी चालवली.

यावेळी त्यांनी नरेंद्र मोदी आणि भाजपच्या प्रचारासाठी वापरलेल्या क्लृप्त्यांची बरीच चर्चा झाली होती. मंथन कार्यक्रम, रन फॉर युनिटी, श्रेष्ठ भारत यांसारखे कार्यक्रम. चाय पे चर्चाची तर सर्वत्र चर्चा झाली. थ्रीडी होलोग्राम सभांचा बोलबालाही भरपूर होता.

2014 साली नरेंद्र मोदी यांच्या प्रचारात कुठल्या गोष्टी वापरल्या याची I-PAC ने वेबसाईटवर यादी दिलीय. त्यात 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी'चाही समावेश केलाय. 'स्टॅच्यू ऑफ यूनिटी' म्हणजे गुजरातमध्ये बांधण्यात आलेला माजी केंद्रीय गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांचा पूर्णाकृती पुतळा होय.

2014 साली लोकसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळालं, नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. मात्र, त्यानंतर प्रशांत किशोर यांनी भाजपपासून फारकत घेतली. ते तिथून बाहेर पडले आणि नितीश कुमारांसाठी काम करू लागले.

या काळात अशा बऱ्याच बातम्या समोर आल्या, ज्यात प्रशांत किशोर आणि अमित शाह यांच्यातल्या नाराजीच्या चर्चा झाल्या. मात्र, या दोन्ही व्यक्तींनी कधीच या बातम्यांना दुजोरा दिला नाही. किंबहुना, प्रशांत किशोर यांनी त्या बातम्यांचं खंडनच केलं. मात्र, भाजपला सोडून प्रशांत किशोर नितीश कुमारांकडे गेले हे खरं.

नितीश कुमार यांच्याशी जवळीक, पक्षात प्रवेश आणि हकालपट्टी

2015 साली 'झांसे में ना आएंगे, नितीश को जिताएंगे' म्हणत प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यासाठी 'रणनिती' आखली. यावेळी 'नितीश निश्चय'अंतर्गत विकासाच्या सात सूत्रांची केलेली मांडणीही चर्चेचं केंद्र बनली होती.

नितीश कुमार यांच्यानंतर प्रशांत किशोर यांनी पंजाबमध्ये काँग्रेससाठी काम केलं आणि तिथेही त्यंना यश मिळालं.

2011 पासून सुरू झालेल्या प्रशांत किशोर यांच्या विजयरथाला पहिल्यांदा ब्रेक लागला तो 2017 साली. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या दोन निवडणुकीत काँग्रेसची बाजू प्रशांत किशोर सांभाळत होते. मात्र, तिथे त्यांना यश मिळवता आलं नाही.

या परभवावेळी प्रशांत किशोर यांच्या 'रणनिती'वर शंकाही उपस्थित केल्या गेल्या.

हे एकीकडे होत असताना, प्रशांत किशोर यांनी सगळ्यांनाच धक्का दिला. त्यांनी सप्टेंबर 2018 मध्ये थेट जनता दल यूनायटेडमध्ये म्हणजेच नितीश कुमार यांच्या पक्षात प्रवेश केला.

नितीश कुमार यांनी त्यांना पक्षाच्या उपाध्यक्षपदीही विराजमान केलं. एवढंच नव्हे, तर नितीश कुमार यांनी प्रशांत किशोर यांना 'पक्षाचं भविष्य' म्हटलं होतं. त्यामुळे जदयूचं पुढचं नेतृत्त्वं म्हणून प्रशांत किशोर यांच्याकडे पाहिलं गेलं. मात्र, 15 महिन्यानंतर प्रशांत किशोर यांना नितीश कुमार यांनी पक्षातून काढलं.

त्यावेळी आधी 'बिहार में बहार है, नितीश कुमार है' म्हणणाऱ्या प्रशांत किशोर यांनी 'बिहार अजूनही देशातील सर्वात गरीब राज्य' म्हणत टीका केली.

त्यानंतर फेब्रुवारी 2020 मध्ये 'बिहार की बात' नावाचं व्यासपीठ सुरू केलं. बिहारला येत्या दहा वर्षांत अग्रगण्य राज्यांच्या यादीत नेणं आणि त्यासाठी गावपातळीवरल्या तरुणांना राजकीय वर्तुळात आणणं, हा उद्देश या व्यासपीठाचा आहे. हे व्यासपीठ अजूनही सुरू आहे.

पुन्हा विजयी घोडदौड

2017 मध्ये उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये पराभव झाल्यानं टीकेला सामोरे गेलेल्या प्रशांत किशोर यांनी पुन्हा विजयी घोडदौड केली.

प्रशांत किशोर यांच्या I-PAC ने आंध्र प्रदेशात जगनमोहन रेड्डी, दिल्लीत अरविंद केजरीवाल, पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी आणि तामिळनाडूत एमके स्टॅलिन यांच्यासाठी काम केलं. या सगळ्या राज्यात I-PAC ला यश आल्याचं दिसून आलं.

महाराष्ट्रातही आदित्य ठाकरे आणि शिवसेनेसाठी प्रशांत किशोर यांनी काम केलं. शेतकऱ्यांशी संवाद, महिलांशी संवाद आणि युवासंवाद हे कार्यक्रम प्रशांत किशोर यांच्या कंपनीच्याच कल्पना होत्या.

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधल्या अपयशानंतर होणाऱ्या टीकांना पश्चिम बंगालच्या यशाच्या माध्यमातून प्रशांत किशोर यांनी उत्तर दिल्याचं सीएसडीएसचे प्रमुख संजय कुमार म्हणतात.

पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूमध्ये प्रशांत किशोर यांच्या कंपनीनं जे केलं, ते पाहता त्यांनी पुन्हा दाखवून दिलं की निवडणूक रणनितीत आपण यशच मिळवतो, असं संजय कुमार म्हणतात.

प्रशांत किशोर यांची कंपनी काम कसं करते?

प्रशांत किशोर यांच्या या निवडणूक रणनितीसाठी काम करणाऱ्या I-PAC बद्दल जाणून घेतलं.

I-PAC सोबत काम करणाऱ्या एका कर्मचाऱ्यानं नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर सांगितलं, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूसाठी आम्ही एकूण 1700 जणांच्या टीमनं काम केलं. निवडणूकनिहाय ही संख्या कमी जास्त होत जाते. मात्र, एका व्यक्तीकडे दोन विधानसभा जागा असतात.

लोकांच्या समस्या आणि त्यावर उपायाचं कोणतं आश्वासन देता येईल, हे सांगण्याचं काम I-PAC करतेच. मात्र, कुठला नेता नाराज आहे, माध्यमांमध्ये काय सूर आहे, कुणाला पक्षात घेता येऊ शकेल इत्यादी कामंही या काळात केली जातात.

प्रशांत किशोर यांची I-PAC च्या कामात रोजची भागिदारी नसली, तरी महत्त्वाच्य मिटिंगसह निर्णय घेताना त्यांची उपस्थिती असते. एखाद्या निवडणुकीच्या रणनितीची दिशा तेच ठरवतात. त्यानुसार बाकीचे सर्व काम करतात, असं त्या सांगतात.

पण इथं प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे, प्रशांत किशोर आणि त्यांची टीम एखाद्या पक्षाची रणनिती ठरवताना ज्या मुद्द्यांना लोकांसमोर घेऊन जाते, ते मुद्दे खरंच लोकांचे मुद्दे असतात की लोकांना संभ्रमित करणारे असतात?

याबाबत सीएसडीएस या संस्थेचे प्रमुख संजय कुमार यांना आम्ही विचारलं, तर ते म्हणतात, "लोकांमध्ये जाऊन त्याचा कानोसा घेऊन ते वेगवेगळ्या कल्पना मांडतात. त्यात वावगं काहीच नाही. एखाद्या नेत्याच्या चांगल्य गोष्टी शोधून त्या लोकांसमोर मांडण्यात चूक काय आहे? प्रशांत किशोर यांचा तो व्यवसाय आहे."

"तसंच, अनेकदा पक्षाचे कार्यकर्ते त्यांच्या नेत्यासमोर पक्षातील कमकुवत गोष्टी सांगत नाहीत. अशावेळी प्रशांत किशोर यांच्यासारख्यांची गरज राजकीय नेत्यांना भासते, जे तळातलं वास्तव त्यांच्यासमोर मांडतील आणि तेच काम प्रशांत किशोर करतायेत," असंही संजय कुमार सांगतात.

सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चचे डॉ. राहुल वर्मा म्हणतात, "नव्या माध्यमांच्या उदयानंतर लोकांशी जोडण्यासाठी राजकीय पक्षांना I-PAC सारख्या कंपन्यांची गरज भासते. पॉलिटिकल कन्सल्टन्सी हा व्यवसाय आहे. यामुळे जर राजकीय पक्षांना लोकांशी जोडण्यास सोयीचं जात असेल, तर ते चांगलंच म्हणायला हवं."

शिवाय, प्रशांत किशोर यांच्यासारख्या लोकांची बदलत्या राजकीय स्थिती अपरिहार्यता बनल्याचंही डॉ. राहुल वर्मा सांगतात.

पुन्हा राजकारणात प्रवेश करणार?

एकीकडे निवडणुकीच्या रणनिती आखत असताना, दुसरीकडे प्रशांत किशोर यांच्या राजकीय भूमिकाही दिसू लागल्या आहेत. खरंतर 2018 साली त्यांनी जदयूमध्ये प्रवेश करून आपली राजकीय महत्त्वकांक्षा उघडपणे दाखवून दिली. मात्र, आता शरद पवार यांच्या भेटीनंतर किंवा एरवीही सोशल मीडियावरून सातत्यानं नरेंद्र मोदी यांच्यावर भाष्य करणं, यामुळे प्रशांत किशोर यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेवर पुन्हा चर्चा सुरू झालीय.

त्यात CAA-NRC असो वा कोव्हिड काळातील परिस्थिती असो, प्रशांत किशोर हे सातत्यानं मोदी सरकारवर टीका करताना दिसतायेत.

संजय कुमार याबाबत बोलतात, "प्रशांत किशोर हे प्रत्येकाकडे क्लाएंट म्हणून पाहतात. मात्र, गेल्या काही दिवसातील त्यांच्या टीकेचा सूर पाहता, ते नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना दिसतात. ही गोष्ट इतकी पुढे गेलीय की, यापुढे ते नरेंद्र मोदी किंवा भाजपसाठी राष्ट्रीय वा राज्य स्तरावर काम करतील असं दिसत नाही."

डॉ. राहुल वर्मा म्हणतात, "राजकीय पक्षांच्या रणनिती आखणं हेही एकप्रकारे ते राजकारणात असल्यासारखंच आहे. शिवाय ते जदयूमध्ये काही काळ होते. त्यामुळे त्यांनी वेगळं राजकारणात येण्याचं काही उरलं नाहीय. पण आता नव्या आघाडीची चाचपणी किंवा पक्षाची स्थापना याबाबत काही आताच बोलता येणार नाही."

मात्र, एनडीटीव्हीचे व्यवस्थापकीय संपादक मनोरंजन भारतीय म्हणतात, "प्रशांत किशोर यांनी शरद पवारांना भेटणं हे पूर्णत: राजकीय हालचाली आहेत, यात कुठलंच दुमत नाही."

किंबहुना, "येत्या काळात ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालमध्ये पाठिंबा दिलेल्या प्रत्येकाच्या प्रशांत किशोर भेटीगाठी करताना दिसतील. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्त्वात तिसऱ्या आघाडीसाठी मोर्चेबांधणीच्या दृष्टीनेच या हालचाली असल्याचा अर्थ निघतो," असंही मनोरंजन भारती म्हणतात.

एक मात्र खरं, बिहारच्या बक्सरमधल्या सर्वसाधारण घरातून आलेल्या प्रशांत किशोर यांनी भारतातल्या निवडणुकांच्या रणनितीत एक मोठा बदल घडवलाय. स्वत:ला चर्चेच्या केंद्रस्थानी आणलंय.

पश्चिम बंगाल निवडणुकीनंतर I-PAC ही कंपनी सोडण्याची त्यांनी घोषणा केली. मात्र, पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचे सल्लागार म्हणून ते काम पाहतायेत.

2022 साली पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्यामुळे निवडणूक रणनितीपासून फारकत घेतल्याचं प्रशांत किशोर सांगत असले, तरी पंजाबमधील त्यांची भूमिका या निर्णयाला दुजोरा देत नाही, हेही तितकंच खरं आहे.

येत्या काळात निवडणूक रणनितीकार म्हणूनच प्रशांत किशोर दिसतील की स्वत:साठीच रणनिती ठरवतील, हे आगामी घडामोडीच सांगतील.

हेही वाचलंत का?

(बीबीसी न्यूज मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला YouTube, Facebook, Instagram आणि Twitter वर नक्की फॉलो करा.

बीबीसी न्यूज मराठीच्या सगळ्या बातम्या तुम्ही Jio TV app वर पाहू शकता.

'सोपी गोष्ट' आणि '3 गोष्टी' हे मराठीतले बातम्यांचे पहिले पॉडकास्ट्स तुम्ही Gaana, Spotify, JioSaavn आणि Apple Podcasts इथे ऐकू शकता.)