मिथुन चक्रवर्तींचा राजकीय प्रवास, डाव्यांशी जवळीक ते भाजप प्रवेश व्हाया तृणमूल काँग्रेस

पश्चिम बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाचे 38 आमदारांचे भाजपशी चांगले संबंध आहेत. त्यांपैकी 21 आमदार थेट आमच्या संपर्कात आहेत, असा दावा भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.

एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी म्हटलं- तुम्हाला ब्रेकिंग न्यूज ऐकायची आहे? यावेळी टीएमसीचे 38 आमदार असे आहेत, ज्यांच्याशी आमचे चांगले संबंध आहेत. त्यांपैकी 21 जण आमच्या थेट संपर्कात आहेत.

294 सदस्य संख्या असलेल्या पश्चिम बंगालच्या विधानसभेमध्ये सध्या भाजपचे 71 आमदार आहेत. तृणमूल काँग्रेसच्या आमदारांची संख्या 220 आहे.

मिथुन यांच्या या दाव्यावर टीएमसीचे खासदार शांतनु सेन यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

त्यांनी म्हटलं आहे की, मिथुन चक्रवर्ती मानसिकदृष्ट्या आजारी आहेत. त्यांना काही दिवसांपूर्वी हॉस्पिटलमध्ये भरती करावं लागलं होतं, असंही मी ऐकलंय. माझ्या मते ते मानसिकदृष्ट्या आजारी होते, शारीरिकदृष्ट्या नाही. त्यांना राजकारण कळत नाही.

'गरिबांचा अमिताभ' म्हणून ओळखले जाणारे मिथुन कधीकाळी डाव्यांच्या जवळचे मानले जायचे. त्यानंतर काहीकाळ ते ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेससोबतही होते आणि त्यांनी मार्च 2021 भाजपमध्ये प्रवेश केला आहे. मिथुन यांची राजकारणातली ही नवीन इनिंग त्यांचा एखादा जुना हिट चित्रपट नवीन रुपात रिलीज केल्याप्रमाणे वाटत आहे.

रील लाइफमध्ये त्यांनी केलेल्या राजकारण्यांच्या भूमिकांचं भलेही कौतुक होत असेल, पण वास्तव आयुष्यात राजकारण त्यांना लाभलं नाही. त्यामुळेच गेली काही वर्षे सक्रीय राजकारणापासून दूर राहिलेल्या मिथुन यांनी दुसऱ्यांदा राजकारणात येण्याचा निर्णय का घेतला? त्यासाठी त्यांनी भाजपचा पर्याय का निवडला? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहेत.

प्रणब मुखर्जींच्या समर्थनासाठी प्रचार

तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेलेल्या मिथुन यांनी आपली खासदारकी मध्येच सोडली होती.

डाव्यांशी जवळीक असतानाही मिथुन यांनी काँग्रेसचे तत्कालिन उमेदवार प्रणब मुखर्जी यांच्यासाठी प्रचार केला होता. त्यानंतर ते तृणमूल काँग्रेसकडून राज्यसभेवर खासदार म्हणून गेले होते. आणि आता नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा हा राजकीय प्रवास पाहता राजकारणात काहीच कायमस्वरुपी टिकून राहणारं नसतं, याचीच प्रचिती येताना दिसते.

बंगालमध्ये जेव्हा डाव्यांचं सरकार होतं तेव्हा मिथुन हे सीपीएम आणि त्यातही तत्कालिन परिवहन मंत्री सुभाष चक्रवर्ती यांच्या जवळचे मानले जायचे.

ते अनेक कार्यक्रमांतही त्यांच्यासोबत असायचे. 1986 मध्ये तत्कालिन ज्योती बसू सरकारच्या कार्यकाळात त्यांनी कोलकात्यामध्ये होप-86 या कार्यक्रमाचंही आयोजन केलं होतं.

आपण डाव्या विचारांचे आहोत, असं स्वतः मिथुनही सांगायचे. नंतर मात्र त्यांनी तत्कालीन परराष्ट्र मंत्री प्रणब मुखर्जी यांच्यासाठीही प्रचार केला होता.

चिटफंड घोटाळ्यात नाव

2011 मध्ये पश्चिम बंगालमध्ये डाव्यांची सत्ता संपुष्टात आल्यानंतर मिथुन यांची जवळीक तृणमूल काँग्रेससोबत वाढली.

दोन-तीन वर्षांत त्यांचं पक्षासोबतचं नातं घट्ट झाल्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्यांना राज्यसभेवर पाठवलं.

राज्यसभेवर नियुक्ती झाल्यानंतर काही काळातच शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव समोर आल्यानंतर मिथुन हे काहीसे त्रासले. खासदार म्हणून त्यांची संसदेतली उपस्थितीही अतिशय कमी होती.

तीन वर्षे राज्यसभेचे खासदार असताना ते केवळ तीन वेळाच संसदेत गेले होते.

राजकारणातून संन्यास

चिटफंड घोटाळ्यामध्ये नाव आल्यानंतर 2016 च्या शेवटी मिथुन यांनी खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांनी राजकारणातूनही संन्यास घेतला.

त्यावेळी मिथुन यांनी आपल्या तब्येतीचं कारण पुढे केलं. मात्र ज्यावेळी शारदा चिटफंड घोटाळ्यात नाव आलं, तेव्हापासूनच त्यांचा राजकारणातला रस कमी झाला होता.

मिथुन चक्रवर्ती शारदा कंपनीचे ब्रँड अम्बेसिडर होते. याप्रकरणी ईडीने त्यांची चौकशीही केली होती.

त्यानंतर मिथुन यांनी काही दिवसांतच ब्रँड अम्बेसिडर म्हणून कंपनीकडून घेतलेले 1 कोटी 20 लाख रुपयेही परत केले होते. मला कोणाचेही पैसे हडप करायचे नाहीत, असं त्यांनी म्हटलं होतं.

त्यानंतरच मिथुन यांनी राजकारणातून संन्यास घेतला आणि सार्वजनिक कार्यक्रमातली त्यांची उपस्थितीही कमीकमी होत गेली. नंतर ते बहुधा उपचारांसाठी परदेशात निघून गेले.

'ताश्कंद फाइल्स'

2019 मध्ये मिथुन यांनी दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांच्या 'ताश्कंद फाइल्स' चित्रपटात अभिनय केला होता.

अग्निहोत्री यांच्याच 'द काश्मिर फाइल्स' चित्रपटातही मिथुन यांची महत्त्वाची भूमिका आहे.

मिथुन यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यानंतरच मिथुन राजकारणात परततील असा कयास लावला जाऊ लागला.

मात्र ही केवळ सदिच्छा भेट होती, असं म्हणत मिथुन यांनी राजकारणात परतण्याच्या सर्व शक्यता फेटाळून लावल्या.

मात्र नंतर त्यांनी अचानक भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला.

हे वाचलंत का?

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.रोज रात्री8 वाजता फेसबुकवर बीबीसी मराठी न्यूज पानावर बीबीसी मराठी पॉडकास्ट नक्की पाहा.)